मी थर्ड इअर आय. टी. इंजिनीअरिंगला आहे. पुण्यात मी माझ्या आई-बाबांसोबत राहते. गेले काही महिने मी एका अडचणीला तोंड देते आहे आणि ती अडचण म्हणजे दिवसा पडणारी स्वप्नं. मी या डे ड्रिमिंगमध्ये बरीच रमते. पुढच्या वर्षी मला सिव्हिल सव्र्हिसची परीक्षा द्यायची आहे. सात तासांची शांत झोप घेऊन सकाळी पाच वाजता उठल्यानंतर व्यायाम वगैरे करून मी अभ्यासाला सुरुवात करते. पण, पुस्तक हातात घेताक्षणीच मला स्वप्नं पडू लागतात, जसं मी आय. ए. एस. ऑफिसर झाले आहे. अक्षरश: मी दोन ते तीन तास ही अशी स्वप्न पाहण्यात वाया घालवते. हे असं संध्याकाळीही होतं. या सवयीमुळे मी वास्तव जगापासून दुरावत एका भासमान विश्वात प्रवेश करत आहे, जे वास्तवापासून फार दूर आहे, हे मला कळतंय. तरीही मी त्यातून बाहेर येऊ शकत नाही. डॉक्टर या अडचणीतून बाहेर येण्यासाठी काय करू?
– आराधना
प्रिय आराधना,
तुझा प्रश्न हा कदाचित तुझ्या जनरेशनचा प्रातिनिधिक प्रश्न असू शकेल. इतका हा कॉमन आहे. आपल्याला कुठे पोहोचायचे आहे, हे तुमची जनरेशन फार लवकर ठरवते. त्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी लागणारी वैयक्तिक क्षमता, स्वभाव विशेष, मेहनत याबाबत फारसा विचार न करता ध्येयनिश्चितीही केली जाते. बरेचदा प्रत्यक्ष प्रयत्न जेव्हा सुरू होतो तेव्हा तो प्रवास आवडीचा जरी वाटला नाही तरी ध्येय ठरविल्यामुळे दुसऱ्या कुठच्याही प्रवासाचा कवडसाही मनात येत नाही. अशा प्रकारे एकांगी, अनिश्चित, प्रवासात प्रयत्नांमधला आनंद कमी होऊन उद्दिष्ट गाठण्याची इच्छा, प्रयत्नाच्या संपण्याची वाट बघायला लागते. अशा वेळेला दिवास्वप्न ही बऱ्याच वेळेला येऊ शकतात.
तुझा प्रयत्न हा ‘यूपीएससी’ दिसतो आहे. पण, सध्या तू परीक्षा मात्र ‘आयटी’ची देते आहेस. याचा अर्थ असा होऊ शकतो की, ध्येयनिश्चितीमध्ये आता जो तू प्रयत्न करते आहेस त्याचा फारसा उपयोग होणार नाही असं वाटायला लागणं शुद्ध सत्य आहे. यूपीएससी देण्यासाठी आपल्याला पदवीधर होणं आवश्यक आहे हे समजून तू आयटीचा अभ्यास करते आहेस. तुझ्या आताच्या प्रयत्नाचं तुझ्या उद्दिष्टाबरोबर काय कनेक्शन आहे, हेच समजत नाही. तू केवळ प्रक्रिया म्हणून अभ्यासाकडे बघते आहेस. जसं सोसायटीत क्रिकेट खेळायला मुलं आल्यानंतर केवळ आई सांगते म्हणून मुलं अभ्यास करतात. तुझं तसंच आहे थोडंफार.
तुझ्या आयटीची दोन र्वष पूर्ण झाली आहेत. म्हणजे ‘हत्ती गेला आणि शेपूट राहिलं’. अशा वेळी अभ्यास न होणं चांगलं नाही. मनाच्या तजेला जप. त्यासाठी छंद जोपास. तुझ्या अभ्यासाच्या वेळा किंवा टाइमटेबल असं बनव की, ज्यात तुझ्या आवडीच्या गोष्टींचा समावेश असेल. हे करत असताना विश्रांतीलाही महत्त्व दे. अति अभ्यासानेही असं होऊ शकतं. शीण येऊ शकतो. तू वर्षभर जो काही अभ्यास केलास त्याचा सारासार विचार कर. जर जास्त अभ्यास झाला असेल तर चक्क पुस्तक बंद कर आणि आराम कर. पण एक गोष्ट लक्षात ठेव – आयटी इंजिनीअरिंगची शेवटची परीक्षा झाल्याशिवाय तू यूपीएससी देऊ शकत नाहीस. या सूचनांचा जर उपयोग नाही झाला तर, तुझ्या जवळच्या समुपदेशकास जरूर भेट.
मोकळं व्हा!
अभ्यास, परीक्षा, रिलेशनशिप, ब्रेक-अप, एकटेपणा, रॅगिंग.. अशा एक ना दोन असंख्य गोष्टीत नैराश्याचे क्षण येतात. निर्णय घेण्याची वेळ येते, तेव्हा काय करावं सुचत नसतं. याचा मानसिक त्रास होतो आणि कुणाकडे तरी सल्ला मागावासा वाटतो. कुणाबरोबर तरी आपला प्रश्न शेअर करावासा वाटतो. असा कुणी तरी त्या वेळी लागतो, जो आपलं म्हणणं ऐकून घेईल, समजून घेईल आणि योग्य तो सल्ला देईल. लोकसत्ता व्हिवामधली ही जागा तुमच्या अशाच बावरलेल्या मनासाठी दिली आहे. ही जागा तुमची आहे. तुम्ही इथे मोकळेपणानं व्यक्त व्हा. मुंबईतील प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आशीष देशपांडे या सदरातून तुमच्या प्रश्नांना उत्तरं देतील. डॉक्टरांपर्यंत पोचण्यासाठी तुमचे प्रश्न viva@expressindia.com या ई-मेल आयडीवर आम्हाला पाठवा. सब्जेक्टलाइनमध्ये ‘बावरा मन’ असं जरूर लिहा.