मी थर्ड इअर कॉम्प्युटर इंजिनीअरिंगची विद्यार्थिनी आहे. चार-पाच महिन्यांपूर्वीपर्यंत मी माझ्या ‘बेस्ट फ्रेंड’सोबत रिलेशनशिपमध्ये होते. पण काही काळापूर्वी त्याने ‘परजातीतल्या मुलीशी प्रेम वगैरे केलेलं घरी चालणार नाही’ हे कारण देत आमच्या या नात्यातून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आमच्यातल्या मैत्रीच्या नात्याचा आदर करत मीही त्या निर्णयाचा स्वीकार केला. आम्ही वेगळे झालो. या साऱ्याचा त्रास तर झालाच, पण आम्ही मैत्रीच्या नात्याने संपर्कात होतो. ब्रेकअप होऊन चार महिने झाले तरीही मला ही कालचीच गोष्ट वाटत होती. कारण तो मला शाळेपासूनच आवडायचा. खूप प्रयत्न करूनही माझी त्याच्याबद्दलची ओढ काही कमी झाली नाही. पण एक दिवस मला समजलं की माझा तोच मित्र पुन्हा एकदा ‘रिलेशनशिप’मध्ये आहे, तेसुद्धा परजातीतल्या मुलीसोबत.
माझ्यासाठी अर्थात हा मोठा धक्काच होता. जातीच्या नावाखाली त्याला मलाच नकार द्यायचा होता, असं मला वाटत आहे. या कारणामुळे माझा आत्मविश्वास खचून गेला आहे. जवळचीच व्यक्ती अशी वागल्यामुळे माझ्यातच काही तरी कमतरता आहे असं मला वाटत आहे. जे होऊन गेलंय ते विसरण्याचा मी प्रयत्न करत आहे. अभ्यास करण्यासाठी पुस्तकं उघडून बसल्यावर त्या घटनेचा विचार आला की, मी माझ्याच दुनियेत निघून जाते. तेच तेच विचार करण्यात माझा फार वेळ निघून जातो. रात्रंदिवस हेच विचार माझ्या अवतीभोवती असतात. मला या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे. पण कसं ते ठाऊक नाही. हे सगळं त्याच्यासाठी असलेल्या प्रेमापोटी होत नाही आहे; तर मला असं सतत वाटतंय की माझ्याबरोबर फार चुकीचं घडलं आहे. – रिचा

प्रिय रिचा,
अकिरा कुरोसावा नावाच्या जपानी दिग्दर्शकाचा ‘रोशोमान’ हा चित्रपट आहे. मला वाटतं तू तो जरूर बघायला हवास. आपण सगळेच आपल्या स्वत:च्या एका विश्वात राहत असतो. ते विश्व स्वत:च्या नजरेतून अनुभवत असतो. पण जे आपल्याला समजतं तेच खरं असेल असं प्रत्येक क्षणी सांगता येत नाही. ‘दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं’ असं आपण म्हणतो. आपल्या समाजाला जात, वर्ण आणि धर्मभेदाची मोठी कीड लागली आहे. वेगवेगळ्या परिस्थितीत, वयात, नात्यात हा भेदभावाचा कीडा नाक खुपसून साध्या-सोप्या गोष्टी कठीण करतो.
या गोष्टी आपण इतक्या मान्य केल्या आहेत की, यावर आधारित कारणमीमांसा आपण सहज मान्य करतो. सुरुवातीला तूदेखील हे मान्य केलंस ना? परंतु जेव्हा मित्राने दुसऱ्या परकीय मुलीबरोबर लग्नाचा घाट घातला तो तुला पचनी पडला नाही, कदाचित तुला नाकारण्यास हेच कारण त्याला योग्य वाटलं असावं. तू दुखावली जाणार नाहीस, तुला समजावणं सोपं पडेल यासाठी. पण कुठे तरी तुझा आणि त्याचा या तुमच्या नात्याकडे बघायचा दृष्टिकोन थोडा वेगळाच दिसतो. जसे प्रेमाचे काही नियम असतात तसेच प्रेमातून बाहेर पडण्यासाठीसुद्धा असतात. ते नियम स्वत:च्या ओळखीतून येतात. तू या मुलावर मनापासून प्रेम केलं होतंस असं दिसतंय. उगाच जातीच्या फंदात अडकलीस. तुला हे समजून घ्यायला हवंय की, त्याचं तुझ्यावर आता प्रेम नाही. त्याने कोणावर प्रेम करावं हा त्याचा मुद्दा आहे. त्याचं तुझ्यावर प्रेम नसताना नाते वाढवून तुझी फसगतच होईल. त्याने तुला सरळ सांगणे आवश्यक होते पण त्याला ते जमलं नाही. त्या वेळेला जात आणि घरचे महत्त्वाचे वाटले.
आता तू ठरवायचं आहेस की, तुझ्या प्रेमाऐवजी जात मोठी मानणारा मित्र तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे. तुझ्या मनातील आधीची त्याच्याबद्दलची भावना व आताची भावना सारखी असेल का? प्रेम आधळं असलं, तरी ते अविवेकी नसतं. स्वत: विचार कर आणि होईल तेवढय़ा लवकर मैत्रीत अपयशी ठरलीस, प्रेमात नाही हे समजून घे. या मित्राशी तुझा संबंध नसलेलाच योग्य असेल.

मोकळं व्हा!
अभ्यास, परीक्षा, रिलेशनशिप, ब्रेक-अप, एकटेपणा, रॅगिंग.. अशा एक ना दोन असंख्य गोष्टीत नैराश्याचे क्षण येतात. निर्णय घेण्याची वेळ येते, तेव्हा काय करावं सुचत नसतं. याचा मानसिक त्रास होतो आणि कुणाकडे तरी सल्ला मागावासा वाटतो. कुणाबरोबर तरी आपला प्रश्न शेअर करावासा वाटतो. असा कुणी तरी त्या वेळी लागतो, जो आपलं म्हणणं ऐकून घेईल, समजून घेईल आणि योग्य तो सल्ला देईल. लोकसत्ता व्हिवामधली ही जागा तुमच्या अशाच बावरलेल्या मनासाठी दिली आहे. ही जागा तुमची आहे. तुम्ही इथे मोकळेपणानं व्यक्त व्हा. मुंबईतील प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आशीष देशपांडे या सदरातून तुमच्या प्रश्नांना उत्तरं देतील. डॉक्टरांपर्यंत पोचण्यासाठी तुमचे प्रश्न viva@expressindia.com या ई-मेल आयडीवर आम्हाला पाठवा. सब्जेक्टलाइनमध्ये ‘बावरा मन’ असं जरूर लिहा.