विधानसभा निवडणुकांचे वेध लागल्याबरोबर कॉलेज कॅम्पसमधलं वातावरण पुन्हा तापू लागलंय. लोकसभा निवडणुकीत तरुणाईची भूमिका निर्णायक ठरल्यामुळे आता सगळेच पक्ष तरुणाईला आपलंसं करून घ्यायला उत्सुक आहेत. सोशल नेटवर्किंगवरून चर्चाना सुरुवात झाली आहे.
लोकसभा निवडणुका आटोपल्या आणि आता वेध लागलेत ते विधानसभा निवडणुकीचे! लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रचार करण्यासाठी प्रसारमाध्यमांचा तर हातभार लागलाच पण त्या सोबत सोशल मीडियाचाही यात मोलाचा वाटा होता. या निवडणुकीत तरुणाईची भूमिका निर्णायक ठरली असं बोललं गेलं. फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून तर मोदींची लाट आली होती. आता विधानसभेतही तरुणाईलाच टारगेट करून कॅम्पेनिंग केलं जाणार, अशी चिन्हं दिसायला लागली आहेत.
तरुणांपर्यंत पोहोचण्याचा अगदी सहज व सोपा मार्ग म्हणजे सोशल मीडिया. एकाच वेळी मोठय़ा प्रमाणात आणि प्रत्येकापर्यंत थेट पोहोचता येत असल्यामुळे या माध्यमांचा वापर करण्यात येतो. शेअरिंगरूपी मिळालेल्या देणगीचा सदुपयोग समर्थकांना एका क्लिकने सहज शक्य होतो. सोशल मीडियाच्या माध्यमामुळे प्रचारतंत्रात प्रामुख्याने बदल होताना दिसून येतो. मतदारांना आणि खासकरून नवमतदारांना आकर्षति करण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम केले जात आहेत आणि हे करण्यामागची कल्पना ही तरुणांचीच आहे हे विशेष.
नुकताच असा एक उपक्रम शिवसेनेच्या ‘माझं नाव शिवसेना’ या पॉलिटिकल कॅम्पेनिंगद्वारे सुरू करण्यात आलाय. सुरुवातीला पोस्टरच्या माध्यमातून टीझर बनवण्यात आले. गणेशोत्सवानिमित्त काही कल्पक पोस्टर करण्यात आले. त्यानंतर व्हिडीओ क्लिपिंगच्या साहाय्याने प्रचार करण्यात येत आहे. पक्षाच्या उद्दिष्ट आणि संकल्पना यावर त्यांनी प्रकाश टाकण्याचा आणि तरुण मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा उत्तम प्रयत्न याद्वारे करण्यात येतोय. तसेच फेसबुक, व्हॉट्सअप, यूटय़ूबच्या माध्यमातून याचे शेअरिंग केले जातेय.
‘‘पॉलिटिकल कॅम्पेनिंग करताना नेहमीच आश्वासने दिली जातात, मात्र स्टोरीच्या माध्यमातून केलेले कॅम्पेनिंग दिसून येत नाही. नेहमीसारखा प्रचार न करता स्टोरी सांगून त्यातून पक्षाकडून कर्तव्यापेक्षा माणुसकी म्हणून केली जाणारी मदत दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडीओच्या माध्यमातून करतोय.’’ असे ‘माझं नाव शिवसेना’ कॅम्पेनिंग टीमच्या सदस्याकडून सांगण्यात आले.
एकूणच चाकोरी मोडून पॉलिटिकल कॅम्पेनिंग करायचा वेगळा ट्रेण्ड येतोय असे दिसून येतेय. ज्यात इफेक्टिवली सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचण्याचा आणि तरुणामध्ये उत्सुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. राजकारणात तरुणांचा याबाबतीतला वाढता सहभाग आणि उत्साह पाहता सर्व पक्षांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून नवनवीन रंजक कल्पना विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान पाहायला मिळतील. विधानसभा निवडणुकीचे रणिशग फुंकले गेलेय आणि कॅम्पेनिंग फॅक्टरच्या मदतीने तरुणाईचे लक्ष वेधून घेण्यासाठी सर्व पक्षांमध्ये वच्र्युअली स्पर्धा रंगणार असल्याचे दिसून येतेय.
जाहिरातीच्या माध्यमातून काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील प्रचाराला सुरुवात केलीये. ‘आगळीवेगळी वरळी’ साकारण्यात ‘मी साक्षी आहे’, असे म्हणणारे तरुण, तरुणी आणि नागरिक आपल्याला पाहायला मिळतात. निवडणुकीला उभा राहणारा उमेदवारकडून वैयक्तिकरित्या विभाग पातळीवर पॉलिटिकल कॅम्पेनिंग होताना यानिमिताने दिसतेय.
काही पक्षांनी कॉलेजच्या जवळ किंवा कॅम्पसमध्ये देखील आपली सदस्यत्व नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्याच्या अनेक महाविद्यालयांमध्ये संपर्क सुरू केल्याचे दिसते. अधिकाधिक तरुण आपल्या पक्षाला जोडले जावेत, असा प्रयत्न बहुतेक सगळ्याच पक्षांकडून सुरू असल्याचं दिसतंय. ही निवडणूकदेखील तरुणाईच जिंकणार याचीच ही चिन्हं आहेत.
कॅम्पसला वेध निवडणुकांचे
विधानसभा निवडणुकांचे वेध लागल्याबरोबर कॉलेज कॅम्पसमधलं वातावरण पुन्हा तापू लागलंय. लोकसभा निवडणुकीत तरुणाईची भूमिका निर्णायक ठरल्यामुळे आता सगळेच पक्ष तरुणाईला आपलंसं करून घ्यायला उत्सुक आहेत.
First published on: 19-09-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assembly election curiosity in college campus