सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडीओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे? या सगळ्याचा आढावा घेणारं साप्ताहिक सदर..

याद रखो रिक्षावाला..
त्या गाण्यातल्यासारखं ‘वाट माझी बघतोय रिक्षावाला’, असं व्यावहारिकदृष्टय़ा वास्तवातलं चित्र असतं तर किती बरं झालं असतं. पण रिक्षाप्रवाशांच्या नशिबी एवढं ते कुठलं भाग्य! जवळचं भाडं नाकारण्यापासून अचानक रिक्षाबंदला प्रवाशांना सामोरं जावं लागतं. बऱ्याचदा नाइलाजानं प्रवासी हे सहनही करतात. पण हैद्राबादमध्ये यावर इलाज शोधला तो अमेरिकन तरुणीनं. हिंदी भाषा समजणाऱ्या या तरुणीला चारमिनार भागात जायचं होतं. त्या ठिकाणी जायला नकार देणाऱ्या रिक्षावाल्याला हिंदी गाणं गात तिनं जेरीस आणलं नि ती मुक्कामी पोहोचलीदेखील. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. तिच्या मुक्कामाच्या ठिकाणी जायला रिक्षावाल्यानं नकार दिल्यावर तिनं रिक्षातच ठाण मांडलं. ‘मी दिवसभर फ्री असल्यामुळं अशीच रिक्षात बसून राहीन आणि इतर प्रवाशांचं मनोरंजन करेन असा पवित्रा तिनं घेतला. ‘मुझे िनद ना आये, मुझे चैन ना आये हे गाणं ती गात राहिली. तिच्या तोंडी हिंदी गाणं ऐकून रिक्षावाला अवाक् झाला नि अखेर त्यानं चारमिनारचा रस्ता धरला. तीन दिवसांत या व्हिडीओला ५३३,५९९ व्ह्य़ूज मिळालेत. ‘इनक्रेडिबल इंडिया’च्या जाहिरातीच्या जवळ जाणारा हा प्रसंग म्हणावा लागेल. त्यामुळं आपल्या वागण्यामुळं परदेशी पाहुण्यांच्या मनात काय प्रतिमा निर्माण होत असेल, हा विचार व्हायला हवा.

थांबवा ‘सेल्फिश’ होणं
सेल्फी काढण्याची टूम आजकाल प्रचंड वाढलीय. मात्र सेल्फी का, केव्हा, कुठं, कशी काढावी याचं बेसिक्स सेल्फीप्रेमींना शिकवावं लागणार की काय, इतपत हे प्रमाण वाढलंय. केवळ प्रमाण वाढलं असं नाही, तर त्यानं असंवेदनशीलतेचा कळस गाठलाय. सेल्फी नि संवेदना पुन्हा एकदा चर्चेत यायचं कारण आहे ते अमिताभ बच्चन यांचं ट्विट नि सौदी अरेबियातल्या तरुणाचा आजोबांच्या मृतदेहासोबतचा व्हायरल झालेला सेल्फी. अमिताभ त्यांच्या मित्राच्या अंत्ययात्रेला उपस्थित राहिले होते. मात्र पार्थिवासोबत काढले जाणारे सेल्फी पाहून त्यांचा संताप उफाळला. ‘माझ्या मित्राचं अचानक निधन झालं. आम्ही गप्पा मारत होतो आणि अचानक.. आयुष्य किती क्षणभंगुर आहे. मित्राच्या अंत्यविधीसाठी दिल्लीला गेलो होतो. मात्र तिथं पार्थिवासोबत काढले जाणारे फोटो नि सेल्फी पाहून मी अवाक् झालो. ‘लोकांमध्ये मृत व्यक्तीबद्दल आदर नाही नि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेल्या जिवंत व्यक्तींबाबतही..’ अशा भावना अमिताभ बच्चन यांनी फेसबुक नि ट्विटरवर शेअर केल्यात. तर सौदीमधल्या मुलानं आपल्या मृत आजोबांच्या बाजूला उभं राहून हसत आणि जीभ बाहेर काढत सेल्फी काढलाय. सोशल मीडियावर पोस्ट करताना या तरुणानं फोटोला ‘अलविदा दादा’ अशी कॅप्शनही दिलीय. या शेअरिंगवर त्याला बऱ्याच तिखट कमेंट्स मिळाल्यात. त्याच्या या असंवेदनशीलतेबद्दल अनेकांना आश्चर्यही व्यक्त केलंय. अशा घटनांची पुनरावृत्ती होणं कायमचं थांबलं पाहिजे.

नया है यह..
उमेश शुक्ला दिग्दर्शित ‘ऑल इज वेल’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झालाय. अवघ्या चार दिवसांत या ट्रेलरला २३,३९,२६९ व्ह्य़ूज मिळालेत. एका रोड ट्रीपची गोष्ट असणाऱ्या या चित्रपटात अभिषेक बच्चन, ऋषी कपूर, असीन, सुप्रिया पाठक याच्या भूमिका आहेत.
‘वेलकम बॅक’ या चित्रपटाचं पोस्टर रिलिज झालंय. ‘वेलकम’ या २००७मधल्या कॉमेडीपटाचा सिक्वेल असणाऱ्या या चित्रपटात परेश रावल, नाना पाटेकर, अनिल कपूर, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, श्रुती हसन आदी तगडी स्टारकास्ट आहे.
वास्तववादी चित्रपट दिग्दर्शित करणारा मधुर भांडारकरच्या ‘कॅलेंडर गर्ल्स’चा टिझर रिलिज झालाय. या चित्रपटात फॅशन इंडस्ट्रीकडं आकर्षित झालेल्या पाचजणींची गोष्ट सांगण्यात आलीय. त्यांना फॅशन वर्ल्डची नि प्रसिद्धीची चटक कशी लागते नि पुढं त्याची परिणती कशात होते, याचं चित्रण यात आहे.

हरनाम कौर की कहानी
ब्राइड इन फ्लोरल बियर्ड (Bride in Floral Beard) हे फोटोशूट व्हायरल झालंय. या फोटोत दिसतेय हरनाम कौर. तिला पॉलिस्टिक ओव्हरी सिंड्रोममुळं शरीरभर केस उगवू लागले. त्यामुळं समाजात वावरणं मुश्कील झालं. मित्रमंडळी नि लोकांच्या टिंगलटवाळीमुळं हैराण होऊन तिला आत्महत्याही करावीशी वाटू लागली होती. पण एक दिवस हरनामच्या आयुष्यात सकारात्मक विचारांचे किरण डोकावले. जीवनाशी दोन हात करायचा निश्चय तिनं मनाशी केला. तिनं स्वत:ला आहे तसं स्वीकारलं नि ‘माणूस’ म्हणून जगायचं ठरवलं. तिच्या या साहसाला एका फोटोग्राफरनं आपल्या कॅमेऱ्याची जोड दिली नि हा फोटोशूट झाला. सोशल मीडियावर तो व्हायरल झाल्यावर अनेकांसाठी हरनाम प्रेरणा ठरलेय. फेसबुकवर तिला अनेकजण फॉलो करताहेत.

शाहीदचा विवाह नं १
शाहीद कपूरचं दिल्ली गर्ल मीरा राजपूतशी मंगळवारी लग्न झालं. रील लाइफचा विवाह अनुभवल्यानंतर शाहीदचा हा रिअल लाइफ विवाह खूपच गाजला. ट्विटरवर #शाहीद की शादी हा ट्रेण्ड नंबर १ वर होता..तेही वर्ल्ड वाइड ट्रेण्डिंग. शाहीद मीरा का संगीत, फर्स्ट पिक असे ट्रेण्डही फिरत होते. शाहीदने मात्र आपल्या विवाहाचा पहिला फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला.

‘विराट’ हेराफेरी|
सध्या बॉलीवूडमध्ये दिसतोय ‘डबस्मॅश’चा फिव्हर. क्रीडापटूही या डबस्मॅशनामक अ‍ॅपच्या प्रेमात पडलेले दिसताहेत. टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज नि कसोटी कर्णधार विराट कोहलीनंही डबस्मॅश केलंय. विराटनं डबस्मॅशचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड केलाय. या डबस्मॅशमध्ये विराट ‘हेराफेरी’मधील डायलॉग बोलताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये त्याचा मित्र अक्षयकुमारचा डायलॉग नि विराट परेश रावलचा डायलॉग बोलताना दिसतोय. विराटचा हा डबस्मॅश सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

vv09फॉरवर्डेड
सोशल मीडियावर केव्हा काय फॉरवर्ड होईल काही सांगता येत नाही. व्हॉट्स अ‍ॅपवर काही फोटोज व्हायरल होताहेत. त्यातले हे टॉप फोर. एक आहे- ही आहे फणसाची रांगोळी, झूम करा नि बघा. दुसरा आहे-आज दिनांक ३-७-१५ या तारखेची गंमत पाहा. तिसरा आहे-नेल्सन मंडेला या नावावरची कोटी. चौथं म्हणजे नियती मिरजकर या मुलीला अपघात झालाय, तिला भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय, असा मेसेज फिरत होता. मात्र काही काळानं स्वत: नियतीनंच या संदर्भात पोस्ट शेअर करत तिच्या अपघाताची पोस्ट चुकीची असल्याचं सांगत ती सुखरूप असल्याचं कळवलं. तीही पोस्ट वेळीच फॉरवर्ड केली गेली. अशा प्रकारचा अपघात, हरवलाय आदी संवेदनशील ठरणाऱ्या पोस्ट फॉरवर्ड करताना सोशल मीडियाकरांनी कायम विचार करावा.

राधिका कुंटे – viva.loksatta@gmail.com

Story img Loader