नामांकित ब्रॅण्ड्सच्या जन्माची, साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेणारं हे सदर.
अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, अशी विधानं किती सरधोपट वाटतात! पण काही मंडळी आपल्या कृतीने ही वाक्यं सिद्ध करतात तेव्हा मात्र या घासून गुळगुळीत झालेल्या वाक्यांचा अर्थ नव्याने उमगतो. शाळेत अतिशय हुशार, गुणी, हेडगर्ल म्हणून नावाजलेली मुलगी अगदी अनपेक्षितपणे कॉलेजच्या पहिल्या वर्षांत चक्क नापास होते. या अपयशाने न डगमगता जिद्दीने नवी वाट चोखाळत एका सुप्रसिद्ध भारतीय बॅग्जच्या ब्रॅण्डची सर्वेसर्वा होते. नाही.. ही कोणत्याही चित्रपटाची कहाणी नाही. ही कहाणी आहे, ‘बॅगिट’ या भारतीय स्त्रियांच्या आवडत्या बॅग्जच्या ब्रॅण्डची निर्माती नीना लेखी हिची.
शाळेत अभ्यासात हुशार असणाऱ्या नीना लेखीवर कॉलेजच्या पहिल्याच वर्षी नापास असा शिक्का बसला तेव्हा तिच्यासाठी तो प्रचंड मोठा धक्का होता. हे आपल्या बाबतीत कसं घडू शकतं? या विचाराने अस्वस्थ झालेली ती सतत दोन महिने रडत घरी येत होती. सुदैवाने पालक समंजस होते. आपली मुलगी नापास वर्गातली नाही हे जाणून तिला दूषणं न देता उलट त्यांनी इतकं छान सावरलं की नीनाने पुन्हा परीक्षा द्यायचं ठरवलं. कॉलेजने तशी परवानगीही दिली मात्र तिला कॉलेजमधल्या लेक्चर्सना बसता येणार नव्हतं. अख्खं वर्ष रिकामटेकडं घरी बसून काढण्यापेक्षा नीनाने इंटिरियर डिझाइनिंग आणि स्क्रीन प्रिंटिंगच्या क्लासमध्ये नाव नोंदवलं.
माणूस अपयशाच्या गर्तेतून बाहेर यायला उत्सुक असताना एखादाही आशेचा किरण पुरेसा असतो. आपण नापास असलो तरी आपण कल्पक आहोत हे शिक्षकांना दाखवून द्यायचं हा विचार नीनासाठी असाच पूरक ठरला. तिने घराच्या घरी स्क्रीन प्रिंटिंग सुरू केलं. तिच्या डिझाइनबरहुकूम बॅग शिवून देणारा एक टेलर गाठला आणि काही बॅग्ज बनवायला सुरुवात केली. या हॉलडॉल टाइप बॅग्ज नीना विकायला लागली. १९८५ साली त्यांची किंमत होती फक्त ६५ रुपये. सुट्टीच्या दिवसात नीना सेल्सगर्ल बनून स्वत: वेगवेगळ्या दुकानातून फिरत असे आणि आपल्या बॅग्ज शोरूममध्ये ठेवा, अशी विनंती करीत असे. प्रदर्शनांनीसुद्धा तिला मोठाच आधार दिला. पाच वर्षे अशीच गेली. नीनाच्या बॅग्ज केम्प्स कॉर्नर या दुकानात विक्रीसाठी तिने उपलब्ध केल्या. त्या काळात ऑफिस बॅग्ज म्हणजे काळ्या रंगाच्या एका छापाच्या बॅग्ज हे समीकरण होते. जे नीनाने वैविध्यपूर्ण रंगांच्या बॅग्जमधून बदलले. हळूहळू या बॅग्ज नोकरीदार महिलांना आवडू लागल्या. आणि इथे जन्म झाला एका ब्रॅण्डचा.
या नावाचीही गम्मतच आहे. नीना आणि तिची खास मैत्रीण जी नीनाला व्यवसायात खूपच मदत करीत होती, दोघींच्या गप्पा चालू होत्या. त्या काळात मायकल जॅक्सनचं beat it हे गाणं दोघींच्याही मुखी बसलं होतं. बॅग्जविषयी गप्पा आणि beat it गाणं गुणगुणत कधी beat it चं bag it झालं कळलंच नाही आणि हेच नाव दोघींनी आपल्या ब्रॅण्डसाठी नक्की केलं.बॅगिट .
भावाने भाडय़ाने चालवायला घेतलेल्या केम्प्स कॉर्नर या दुकानाला स्वत: विकत घेणं हा नीनासाठी अभिमानाचा क्षण होता. हळूहळू ब्रॅण्ड विस्तारत गेला. शॉपर्स स्टॉप, पॅण्टालून अशा शोरूम्समधून बॅगिटला छान प्रतिसाद मिळू लागला. तरी ही वाटचाल काही रेशमी गालिचावरून नव्हती. २००० साली नीनाने स्वत:चे शोरूम सुरू करण्याचा प्रयत्न केला तो पूर्ण अयशस्वी ठरला. पुन्हा एकदा आलेल्या अपयशाने न डगमगता नीनाने प्रयत्न सुरूच ठेवले. त्यांना निश्चितच यश मिळालं. आज देशभरातल्या अनेक मॉल्समध्ये बॅगिटची शोरूम्स दिमाखात उभी राहिलेली दिसतात. शिवाय ऑनलाइन साइट्सवरही बॅगिट प्रचंड लोकप्रिय आहे .
या बॅग्जचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे नीना यांनी या बॅग्जच्या निर्मितीत चामडे किंवा प्राण्यांच्या कातडीचा वापर टाळला आहे. २०१४ मध्ये PETA या संस्थेकडून बेस्ट ब्रॅण्ड ऑफ बॅग्ज फॉर इंडियन वुमन हा पुरस्कार बॅगिटला मिळाला.
भारतीय स्त्री फार अलीकडेच आपल्या ऐकून पेहरावासह येणाऱ्या इतर गोष्टींचा बारकाईने विचार करू लागली आहे. नुसता मेकअप किंवा छान ड्रेसच नाही तर सोबत छान पर्सही हवी. आणि ती पर्स किंवा बॅग पार्टिजसाठी वेगळी, ऑफिससाठी वेगळी हवी, हे भान फार अलीकडंच आहे. या अशा बदलत्या भारतीय स्त्रीला तिचा असा स्वत:चा एक छान पर्याय बॅग्जबाबतीत बॅगिटने मिळवून दिला.
ही कहाणी फक्त एका ब्रॅण्डची नाही. ही कहाणी एका नापास झालेल्या मुलीचीही आहे. नापास हा शिक्का तिने किती कल्पकतेने, समर्थपणे दूर केला त्याची आहे. खरंय.. When you are not afraid of failure you can “BAGGIT” a success.
रश्मि वारंग
viva@expressindia.com