उंच, शिडशिडीत बांधा, गोरापान रंग आणि सोनेरी केस बार्बीच्या याच प्रतिमेची लहानपणापासून आपल्यावर भुरळ असते. मोठेपणी बाहुलीची क्रेझ संपते पण तोपर्यंत तिच्या ‘साइज झीरो’चं कौतुक आणखी वाढलेलं असतं. त्यासाठी अघोरी उपचार सुरू होतात. बार्बी बनण्याच्या या अट्टहासाविरोधात अभिनेत्री कोंकणा सेन शर्मानं नुकतीच वाचा फोडली.
ते सुंदर डोळे, गोरा रंग, सोनेरी केस आणि सगळ्यात महत्त्वाची ती उंची.. तो शिडशिडीत बांधा.. सगळ्यांनाच हवीहवीशी वाटणारी ही बार्बी! लहानपणी तिला आंजारता-गोंजारता मोठेपणी त्या बार्बी फिगरच्या मागे आपण कधी वेडय़ा होतो, कळतही नाही. ‘आय अॅम अ बार्बी गर्ल..’ असं म्हणत जगभरातील मुलींची बालपणाची सर्व स्वप्नं त्या बार्बी डॉलभोवती गुरफटलेली असतात. लहानपणापासूनच ‘ती’ त्या बार्बीत इतकी हरवलेली असते की, ‘तू मोठेपणी कोण होणार? ’ याचं उत्तरंही ती भाबडेपणाने कधी ‘बार्बी गर्ल’ असंच देते. दिवस सरतात आणि ही खरीखुरी गर्ल मोठी होते. पण तिच्या मनातील ती ‘बार्बी गर्ल’ची प्रतिमा काही पुसली जातं नाही. उलट आता तिची लहानपणीची भाबडी इच्छा जिद्द बनलेली अलते. आता तिला बार्बीसारखं उंच, बारीक आणि गोरंपान व्हायचं असतं. मग डायटिंग, जिमिंग आणि ब्युटी ट्रीटमेंटचं एक सत्र सुरू होतं.
प्रसिद्ध अभिनेत्री कोंकणा सेन शर्माने नुकतीच या बार्बी गर्ल इमेजच्या अट्टहासाला वाचा फोडली. नुकत्याच मुंबईत झालेल्या ‘डव्ह पॅचेस’ या कार्यक्रमात याच मुद्दय़ाला धरून कोंकणानं सौंदर्याची एक वेगळी व्याख्या ऐकवली. कोंकणाची गणनासुद्धा लहानपणी ‘नॉट सो गुड’ मुलींच्या गटामध्ये होती. दिसायला सावळीशी, थोडी बुटकी आणि म्हणूनच जराशी जाड वाटणारी कोंकणा आज प्रसिद्ध आहे, ती तिच्यातील गुणांमुळे. तिची गणना आज बॉलीवूडच्या प्रसिद्ध नायिकांमध्ये होते, ती केवळ तिच्या अभिनय कौशल्यामुळे. सौंदर्याबद्दल बोलताना साहजिकच तिने बॉलीवूडकडेच रोख वळवला. ‘माझं क्षेत्रच असं आहे, तिथे सतत एका विशिष्ट रीतीने दिसण्याला, वागण्याला प्राधान्य देण्यात येतं. अशा वेळी तुम्हाला तुमच्या स्वत:वर विश्वास असणं महत्त्वाचं आहे. फक्त दिसण्यावर विसंबून न राहता तुमच्या इतर गुणांवर लक्ष केंद्रित करणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुमचं रूप आणि तुमचे गुण या दोन गोष्टींमध्ये योग्य समतोल साधणं गरजचं आहे,’ कोंकणा म्हणते.
‘माझ्या लहानपणी माझ्या आई-वडिलांनी कधीच मला सुंदर दिसावं, बाहुलीसारखं सजावं म्हणून कधीच अट्टहास धरला नाही. आपल्याकडे लहान मुलींसमोर बार्बीचा आदर्श ठेवला जातो. तिच्यासारखं सुडौल शरीर, गोरीपान कांती, लांब केस आपल्यालाही मिळावेत अशी इच्छा प्रत्येक मुलीची असते. पण आयुष्यात सगळ्या गोष्टी काही आपल्या हातात नसतात. अशा वेळी ज्या गोष्टी आपल्या हातात असतात त्यांना प्राधान्य द्यावं.’
बॉलीवूडमधील नायिकेची चुकीची प्रतिमा
कोंकणाच्या बोलण्याचा गंभीरपणे विचार केला तर दिसतं की, बॉलीवूडमध्ये बहुतक वेळा दाखवली जाणारी नायिकेची प्रतिमासुद्धा खूप स्टीरिओटिपिकल असते. अगदी बार्बीच्या साच्यासारखी. आपल्याला नायक ५० वर्षांचा चालतो पण नायिका विशीतली लागते. म्हणजे नायिका गोरी असून भागत नाही तर ती तरुण असणंसुद्धा बंधनकारक आहे. अर्थात याला काही सणसणीत अपवाद आहेत आणि त्यांची संख्या वाढतेय हे काही कमी महत्त्वाचं नाही.
सुंदर असणं किंवा नसणं हा पूर्णपणे तुमच्या मनाचा खेळ असतो. जगातली सर्वात सुंदर मुलगीसुद्धा प्रत्येक क्षणी सुंदर दिसू शकत नाही. तुमचा आत्मविश्वास ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तीच तुमच्या व्यक्तिमत्त्वाला सौंदर्य प्राप्त करून देते. ‘बार्बी डॉल सगळ्यांनाच होता येत नाही’ यापेक्षा ‘बार्बी म्हणजे सौंदर्याचा शेवटचा शब्द हे खोटं आहे’ हे तथ्य अधिकपणे बिंबवण्याची आवश्यकता आहे. सौंदर्याची परिमाणं, व्याख्या खोडय़ा विस्ताराव्या लागतील त्यासाठी! अगदी साध्या गोष्टी आपण सहज करू शकतो. म्हणजे दुसऱ्याच्या वजनावर भाष्य करणं टाळावं. कोणाच्या दिसण्यावर भाष्य करणं उद्धटपणाचं लक्षण आहे. हे जरी सगळ्यांना पटलं तरी बार्बी गर्ल बनण्याचं खूळ डोक्यातून जरा कमी कमी होईल नक्की!
बार्बी रेग्युलर मेजरमेंटमध्ये
मागच्या वर्षी अमेरिकाच्या ‘निकोले लॅम’ या तरुणाने सर्वसामान्य अमेरिकन मुलींच्या साइजनुसार बार्बीची प्रतिमा तयार केली होती. या संकल्पनेला अमेरिकेत उत्तम प्रतिसाद लाभला होता, परंतु बाजारात या बाहुल्या अजून पाहायला मिळालेल्या नाहीत. बार्बीची आभासी फिगर या विषयावर वाद आणि ग्राफिक्स आधीही झालेली आहेत. आपल्याकडे मात्र भारतीय बाहुली किंवा कठपुतळी, लाकडी बाहुली कधी अशी भयंकर बारीक किंवा साइज झीरो दाखवलेली नाही. पण हल्ली आपल्या मुली कुठे भारतीय बाहुलीशी खेळतात. बार्बीची क्रेझ आपल्याकडे अजूनही प्रचंड आहे.
आपल्याकडे लहान मुलींसमोर बार्बीचा आदर्श ठेवला जातो. तिच्यासारखं ‘सुडौल’ शरीर, गोरीपान कांती, लांब केस आपल्यालाही मिळावेत अशी इच्छा प्रत्येक मुलीची असते. पण फक्त दिसण्यावर विसंबून न राहता तुमच्या इतर गुणांवर लक्ष केंद्रित करणं तितकंच महत्त्वाचं आहे. – कोंकणा सेन शर्मा