मी २३ वर्षांची असून उंची ४ फूट ९ इंच आहे. मला खूप फॅशनेबल नाही, पण छान राहायला आवडतं. छान दिसायला आवडतं. मला कुठल्या प्रकारचे कपडे शोभतील? मी जनरली काय वापरायला हवं?  
– अनुजा, औरंगाबाद.

प्रिय अनुजा,
तू २३ वर्षांची आहेस आणि फॅशनेबल राहण्याचं हेच वय आहे. फॅशनेबल याचा अर्थ फक्त वेस्टर्न आऊटफिट्स किंवा अंगप्रदर्शन करणारे ग्लॅमरस कपडे असा अर्थ होत नाही. तुझा आत्मविश्वास दुणावतो, तुला कंफर्टेबल वाटतं, असेच कपडे तू वापर.
तुझ्या वर्णनावरून, वेस्टर्न आऊटफिट्सपैकी टॅपरिंग जीन्स (खाली निमुळती होत जाणारी) किंवा ट्राउझर्स वापर. स्कर्ट वापरत असशील तर स्ट्रेट कट स्कर्ट वापर आणि त्यावर शॉर्ट टॉप्स घाल किंवा टक इन केलेले शर्ट वापर.
तू भारतीय कपडय़ांमध्येच अधिक कंफर्टेबल असशील तर भारतीय कपडेच वापर. सध्या ट्रेंड कुर्तीचा आहे. तुझ्या उंचीचा विचार करता तू शॉर्ट कुर्ती वापर. त्याखाली पटियाला किंवा लेगिंग्ज तुला शोभून दिसतील. पूर्ण बाह्यांचे किंवा बंद गळ्याचे, कॉलर असलेले कुडते शक्यतो वापरू नकोस, त्यात तुझी उंची आणखी कमी दिसण्याचा संभव आहे. उभ्या रेषा असलेले किंवा डायगोनल प्रिंट किंवा एम्ब्रॉयडरी असलेले कुडते घाल. त्यामुळे उंच असल्याचा आभास निर्माण होतो. एम्पायर लेंथ योक असलेली कुर्ती वापरायलाही हरकत नाही, त्यामुळे उंचीचा आभास निर्माण होईल. सण- समारंभांना अनारकली घालायला हरकत नाही. पण त्याची उंची पोटऱ्यांपेक्षा जास्त खाली नको. साडी नेसणं आवडत असेल तर स्लीव्हलेस किंवा मेगा स्लीव्हजच्या ब्लाऊजबरोबर साडी नेस. जॉर्जेट, शिफॉनसारख्या मटेरिअलच्या साडय़ा तुला चांगल्या दिसतील. हेवी सिल्कच्या साडय़ांमध्ये जाडी जास्त आणि उंची कमी दिसू शकते. मोठय़ा स्कर्ट बॉर्डर असणाऱ्या, उंच काठांच्या साडय़ा मात्र अगदी टाळ. त्यामुळे कमी उंचीच्या मुली आणखी बुटक्या वाटतात.

एक्स्पर्ट अ‍ॅडव्हाइस : या फंक्शनला कुठला ड्रेस घालावा, कुठला रंग उठून दिसेल, या ड्रेसमध्ये जाड तर दिसणार नाही ना.. असे नाना प्रश्न आपल्याला पडत असतात. प्रत्येक वेळी खास ड्रेस डिझायनर गाठणं काही जमत नाही आणि परवडत नाही. तुमच्या फॅशनविषयीच्या शंकांना या कॉलममधून डिझायनर मृण्मयी मंगेशकर उत्तरं देतील. आपला प्रश्न व्यवस्थित वर्णनासह आमच्याकडे viva.loksatta@gmail.com या आयडीवर पाठवा. सोबत तुमचं नाव, वय आणि आपले राहण्याचे ठिकाणही आम्हाला सांगा. सब्जेक्ट लाइनमध्ये फॅशन पॅशन असा उल्लेख करायला विसरू नका.

Story img Loader