वेदवती चिपळूणकर
जागतिक स्तरावरची सौंदर्यस्पर्धा नुकतीच पार पडली आणि त्यात भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या हरनाज संधूला ‘मिस युनिव्हर्स’चा किताब मिळाला. तिच्या या यशाबद्दल देशभरातून तिचं कौतुक झालं. १९९४ मध्ये सुश्मिता सेनने तर २००० मध्ये लारा दत्ताने हा सौंदर्यमुकुट भारतात आणला होता. तब्बल एकवीस वर्षांनंतर हा मुकुट पुन्हा भारताकडे आल्याचा आनंद सगळय़ांनाच झाला. मात्र हा मुकुट जिंकण्यासाठी अनेक कसोटय़ा पार कराव्या लागतात. नेमके काय असते या सौंदर्यस्पर्धेचे स्वरूप?, हे जाणून घेऊया..
जगभरातून निवडल्या गेलेल्या सौंदर्यवतींमधून प्राथमिक फेरीपासूनच अनेक निकष लावत एकेका स्पर्धकाला बाद करत टॉप १०, टॉप ५ आणि नंतर टॉप ३ निवडल्या जातात. या वर्षी स्पर्धेत सगळय़ात जास्त चर्चा झाली ती हरनाज संधूला टॉप १६ मध्ये असताना करायला सांगितल्या गेलेल्या प्राण्याच्या नकलीची! इतर १५ स्पर्धकांना त्यांच्याविषयी, त्यांच्या विचारांविषयी प्रश्न विचारण्यात आले. त्याच वेळी भारताच्या हरनाज संधूला विचारलं गेलं, ‘तू प्राण्यांच्या नकला उत्तम करतेस असं ऐकलं आहे. तुझी सर्वात बेस्ट असेल ती ऐकूया’. या प्रश्नाने आश्चर्यचकित झालेल्या हरनाजने गोंधळून न जाता ‘मिस युनिव्हर्स’च्या टॉप १६च्या फायनल राऊंडमध्ये चक्क मांजराच्या आवाजाची नक्कल करून दाखवली. ‘वल्र्ड स्टेजवर हे करणं अनपेक्षित होतं, पण आता ऐका’, असं म्हणून हरनाज या प्रश्नालाही आत्मविश्वासाने सामोरी गेली. तिच्या या हजरजबाबीपणालाच इतरांपेक्षा जास्त मार्क्स मिळाले असण्याची शक्यता आहे. या राऊंडनंतर टॉप १० मध्ये हरनाजचं सिलेक्शन झालं.
टॉप ५ मध्ये प्रत्येक स्पर्धकाला वेगवेगळा प्रश्न विचारण्यात आला. फिलिपाइन्सच्या बेआत्रिसला करोनाशी संबंधित प्रश्न विचारला गेला. करोनाच्या पार्श्वभूमीवर युनिव्हर्सल व्हॅक्सिन पासपोर्ट जगभरात बंधनकारक करावा याबद्दल तिचं मत विचारण्यात आलं. कोलंबियाच्या वॅलेरियाला सर्व देश स्त्रियांनी चालवले तर जगावर त्याचा काय परिणाम होईल हे विचारलं गेलं. स्त्रियांनी बॉडी शेमिंगला कशा पद्धतीने हाताळावं याबद्दल पॅराग्वेच्या नादियाचं म्हणणं विचारण्यात आलं. साऊथ आफ्रिकेची स्पर्धक लालेला हिला टीनएजर असताना मुलांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्ट्स किंवा मांडलेली मतं यांच्यासाठी त्यांना नंतर जबाबदार धरलं जाणं योग्य आहे का?, याबद्दल तिचं मत विचारलं. तर भारताच्या हरनाजला पर्यावरणाच्या मुद्दय़ावर तिचं मत व्यक्त करायला सांगण्यात आलं. ‘क्लायमेट चेंज ही थाप आहे किंवा थोतांड आहे असं अनेकांना वाटतं, मात्र हे म्हणणं चुकीचं आहे हे तू त्यांना कसं पटवून देशील?’, असा प्रश्न हरनाजला विचारला गेला. या प्रश्नांना सामोरे जाऊन टॉप ३ मध्ये भारत, पॅराग्वे आणि साऊथ आफ्रिका यांनी प्रवेश केला. टॉप ३ फायनलिस्टना मात्र एकच कॉमन प्रश्न विचारला जातो आणि प्रत्येकीने आपलं उत्तर इतरांपेक्षा वेगळय़ा विचारांनी आणि नेमकेपणाने देणं अपेक्षित होतं. या फेरीत तिघींना विचारण्यात आलं की ताणतणावांचा सामना करणाऱ्या तरुण स्त्रियांना काय सल्ला द्याल? यावर उत्तर देताना स्वत:वरच विश्वास नसणं ही तरुण पिढीची मोठी समस्या आहे, असं मत हरनाजने मांडलं. प्रत्येकाचं वेगळेपण हेच सौंदर्य असतं, त्यामुळे इतरांशी स्वत:ची तुलना करू नका. स्वत:साठी बोला, पुढे या. जगभरात चाललेल्या महत्त्वाच्या घटनांबद्दल बोला. स्वत:वर विश्वास ठेवून वाटचाल केल्यानेच आज मी इथे उभी आहे, अशा ठाम शब्दात हरनाजने दिलेलं उत्तर परीक्षकांनाही आवडलं.
मिस युनिव्हर्सची स्पर्धा १९५२ पासून सुरू झाली आणि तेव्हापासून स्विमसूट किंवा अॅथलेटिक वेअरची एक राऊंड, इव्हिनग गाऊनची एक राऊंड आणि व्यक्तिमत्त्वाचं परीक्षण, हे निकष सातत्याने लावले गेले आहेत. एका वेबसाइटने केलेल्या एकत्रित अभ्यासानुसार इतक्या वर्षांत मिस युनिव्हर्स स्पर्धकांची उंची, वजन अशा बाबींमध्ये लक्षणीय बदल झालेला दिसून आला. अधिक उंची, कमी होत जाणारं वजन आणि कमी होणारा बी. एम. आय. असा ट्रेण्ड सातत्याने पाहायला मिळतो आहे. मात्र हा बदल स्पर्धेच्या निकषांमुळे आहे की मुळातच स्पर्धकांनी हे बदल केले म्हणून त्याचे परिणाम निकालात जाणवत आहेत ही बाब विचार करण्यासारखी आहे. मिस युनिव्हर्स सारख्या जागतिक स्तरावरील सौंदर्यस्पर्धामध्ये कोणत्या निकषांना किती महत्त्व दिलं जातं ही गोष्ट मात्र कायम गुलदस्त्यातच राहिली आहे.
viva@expressindia.com