चित्रपट, मालिकांमध्ये झळकणारे चेहरे लोकप्रिय होतात आणि त्यांना आपण सेलेब्रिटी स्टेटस देऊन टाकतो; पण यूटय़ूबसारखा सोशल व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आता तरुणाईच्या मनातली सेलेब्रिटींची व्याख्या बदलणार असं दिसतंय. तुमच्या-आमच्या सामान्यांतले ‘व्हिडीओ क्रिएटर्स’देखील आता प्रसिद्धी मिळवून सेलेब्रिटी बनू शकतात. मुंबईत गेल्या आठवडय़ात झालेल्या यूटय़ूब फॅन फेस्टनं तेच दाखवून दिलं.
यूटय़ूब म्हणजे केवळ आपल्या आवडत्या मालिकेचा चुकलेला भाग पाहण्याची साइट असं समीकरण उरलेलं नसून एक सोशल प्लॅटफॉर्म म्हणून पुढे येतंय. ज्यातून जगभरातल्या व्हिडीओ आपल्याला पाहता येतात आणि आपल्याला जगभर पोहोचता येतं. यामुळे ओळख तर प्राप्त होतेच, पण त्यासोबत मिळते ती प्रसिद्धी आणि सेलेब्रिटी स्टेटस. आपल्या देशातल्या प्रेक्षकांवर बॉलीवूड आणि नेहमीच्या साच्यातल्या मालिका यांचा पगडा तर आहेच, त्यातल्या नायक-नायिका आपल्या सेलेब्रिटी असतात; पण यूटय़ूबमुळे मनोरंजनाचा एक नवा पैलू समोर येतो आहे. यामुळे सेलेब्रिटीची व्याख्याच बदलतेय. प्रेक्षक आणि सेलेब्रिटी यांच्यात संवाद होतोय. लोकांची आवडनिवड थेटपणे कलाकारांपर्यंत आणि इंटरनेटमुळे क्षणार्धात शक्य होतेय. गेल्या आठवडय़ात मुंबईत यूटय़ूबने फॅन फेस्ट आयोजित केला होता. तिथे जमलेल्या यूटय़ूबप्रेमींनी याच गोष्टी दाखवून दिल्या.
यूटय़ूब फॅनफेस्ट म्हणजे अगदी नावाप्रमाणे यूटय़ूबप्रेमींसाठीचा सोहळाच होता! ज्यांचे व्हिडीओज् आपण लाइक, कमेंट, सबस्क्राइब करून टक लावून आपण पाहत असतो, त्यातला एखादा आपला फेव्हरेट स्टार होतोच. त्या स्टारला ‘याचि देहि याचि डोळा’ पाहण्याची आपल्याला इच्छा असते. सुपरवुमन, कनन गिल, ज्यू रिन, कर्ट ह्य़ुगो श्नायडर, सॅम्युअल तुसी हे यूटय़ूबर्स सध्या जगभरातील तरुणाईने डोक्यावर घेतले आहेत. भारतात ‘ऑल इंडिया बकचोद’ अर्थात एआयबी, ‘द व्हायरल फीवर’ अर्थात टीव्हीएफ या दोन यूटय़ूब चॅनेलने धुमाकूळ घातलाय. यातले स्टारही यूटय़ूब फॅन फेस्टच्या निमित्ताने मुंबईच्या तरुणाईला भेटले. या सगळ्या सामान्य तरुणांना यूटय़ूबवरच्या त्यांच्या व्हिडीओज्मुळे स्टार व्हॅल्यू मिळाली. स्वत:च्या कलागुणांचं, विचारांचं व्हिडीओच्या प्रभावी माध्यमातून त्यांनी लोकांसमोर सादरीकरण केलं नि चाहत्यांच्या प्रेमामुळे त्यांना एक स्टार सेलेब्रिटी म्हणून ओळख प्राप्त झाली आहे.
याबाबत सुपरवुमन अर्थात लिली सिंग म्हणाली, ‘‘यूटय़ूबमुळे अॅक्सेसिबिलिटी वाढलीये. कमेंट्समुळे प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया क्षणार्धात आणि थेट समजतात. ट्विटरच्या माध्यमातून मी शक्य तितक्यांना रिप्लायही देऊ शकते. हे माध्यम खूपच इंटरॅक्टिव्ह झाल्यामुळे सेलेब्रिटी स्टेटसची व्याख्याच बदलतेय.’’ ‘टीव्हीएफ’चा अरुण कुमार म्हणाला, ‘‘यूटय़ूब म्हणजे क्रिएटिव्ह डेमोक्रसी आहे. एखाद्या मोठय़ा सेलेब्रिटीला भेटताना कदाचित चाहते कचरतात, पण आम्हाला भेटताना त्यांना तेवढं दडपण येत नाही. त्यामुळे चाहते नि आमच्यात एक मोकळेपणा असतो.’’
याविषयी ‘एआयबी’चा अबिश मॅथ्यू म्हणाला की, ‘‘सेलेब्रिटी म्हणजे बॉलीवूड स्टार असं समीकरण होतं एवढे दिवस, पण आता चेहऱ्याचे नाही, तर व्हिडीओमागच्या कामाचे चाहते असलेले लोक आम्हाला भेटतात. आमच्या कामामुळेच ते आम्हाला सेलेब्रिटी स्टेटस देतात. सबस्क्रायबर्स, कमेंट्समुळे लोकांच्या प्रतिक्रिया मिळतात. त्यामुळे प्रेक्षकांशी संपर्क येतो. हेट कमेंटपण तितक्याच स्पोर्टिगने घ्यायला हवं. मी काही वेळा या कमेंट्सदेखील स्क्रीनशॉट काढून शेअर करतो.’’
यूटय़ूबच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कलागुणांना प्रसिद्धी देऊ शकता. त्यासाठी कोणत्याही रिअॅलिटी शोची गरज नसते. भाषेचं बंधन नसतं. केवळ तुमच्या कंटेंटमध्ये सातत्य आणि नावीन्य असावं लागतं. पुढच्या पिढीसाठी यूटय़ूबसारखा सोशल मीडिया प्रभावी ठरणार आहे. हे या यूटय़ूब कंटेंट क्रिएटर्सनी दाखवून दिलंय.
क्रिएटर्ससाठी अॅकॅडमी
यूटय़ूबवर व्हिडीओज् अपलोड करणं सोपं आहे तितकंच यूटय़ूब चॅनेल सुरू करणंही सोपं आहे. ज्यांनी नुकतंच स्वत:चं यूटय़ूब चॅनल सुरू केलंय अशा यूटय़ूब क्रिएटर्ससाठी यूटय़ूब फॅनफेस्ट अॅकॅडमी या एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन यूटय़ूबतर्फे केलं होतं. या अॅकॅडमीमुळे नवोदित यूटय़ूब क्रिएटर्सना त्यांच्या लाडक्या यूटय़ूब स्टार्सना भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली. कमेंट पोस्ट हॅशटॅग या सत्रातून सोशल मीडियातज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं. हा फॅन फेस्ट मुंबईत भरूनही मराठीत मनोरंजन क्षेत्रासाठी कुणी प्रश्न विचारलेलं दिसलं नाही. मराठी कण्टेण्ट क्रिएटर्सही फारसे दिसले नाहीत. ‘सर्वासाठी खुल्या असणाऱ्या या माध्यमाचा वापर करून तुम्हीही स्टार बनू शकता’, असं आवाहन यूटय़ूबच्या वतीनं करण्यात आलं. ‘‘टीव्हीएफ आणि एआयबीनं भारतीय तरुणाईला मनोरंजन क्षेत्राची नवी कवाडं दाखवली आहेत. इंग्रजीबरोबर हिंदी आणि इतर भारतीय भाषांमधल्या कण्टेण्टलाही तेवढीच संधी आहे. आम्ही स्थानिक भाषांमधल्या कण्टेण्ट क्रिएटर्सना मार्गदर्शन करायला तयार आहोत,’’ असं यूटय़ूबचे संचालक (कण्टेण्ट अँड पार्टनरशिप) गौतम आनंद यांनी सांगितलं. मराठीतल्या टॅलेण्टनी नेहमीच्या माध्यम चाकोरीच्या बाहेर पडून या नव्या माध्यमाचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे.