वैष्णवी वैद्य मराठे
फॅशन इंडस्ट्री ही अथांग आहे. त्याला आजच्या काळात कसलीही सीमा, परिसीमा राहिलेली नाही. दिवसागणिक, ऋतुगणिक, माणसागणिक फॅशन बदलत राहते. याचे मूळ कारण आजची तरुण पिढी. त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मते प्रत्येक क्षणाची फॅशन वेगळी असू शकते. हिवाळा म्हटलं की फॅशनचं परिमाण पूर्णपणे बदलतं, पण हिवाळयातली फॅशन सगळयात स्मार्ट दिसते अशी आजच्या तरुणाईची धारणा आहे. हिवाळयातील फॅशन ट्रेण्ड्सचा घेतलेला हा आढावा..
डेनिम जॅकेट्स
हिवाळयात जरा लूज कपडे घालायला तरुणाईला आवडतं. डेनिम जॅकेट्स हा या मौसमातील सगळयात ट्रेण्डी प्रकार आहे. ते घातल्यावर अतिशय स्मार्ट लूक येतो. हिवाळयात कॅज्यूअल कपडय़ांबरोबर डेनिम जॅकेट परिधान केलं जाऊ शकतं. डेनिम जॅकेट हे ट्रेण्डी वुलन क्रॉप टॉप तसंच टी शर्टबरोबर ट्राय करता येतं. तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये डेनिम जॅकेट्स मिळू शकतात. शॉर्ट, लॉन्ग, हाफ, फुल, स्लीव्हलेस असे विविध प्रकार आणि रंग आता डेनिममध्ये उपलब्ध आहेत. डेनिमचे जम्पसूटसुद्धा हिवाळयात छान दिसतात. छोटीशी ट्रिप, एक दिवसाची पिकनिक किंवा अगदी ऑफिसच्या कॅज्यूअल वेअरसाठी डेनिम जम्पसूट हा उत्तम पर्याय आहे. तुम्हाला इनफॉर्मल, आरामशीर लूक हवा असेल किंवा तुमच्या नेहमीच्या लूकपेक्षा अधिक स्टायलिश आणि लक्षवेधी लूक करायचा असेल तर थंडीच्या दिवसांत डेनिम जॅकेट तुमच्या वॉर्डरोबमध्ये एक अष्टपैलू जोड ठरू शकते. डेनिम हा पाश्चात्त्य संस्कृतीतून आपल्याकडे आलेला प्रकार आहे, पण सध्या भारतातली त्याची लोकप्रियता, आवड आणि वापर इतर कुठल्याही देशांपेक्षा जास्त आहे.
हेही वाचा >>> फुडी आत्मा : जे कराल ते मनापासून..
स्वेट शर्ट्स
हा प्रकारसुद्धा थंडीच्या दिवसांत फार स्मार्ट आणि कुल दिसतो. खरंतर स्वेट शर्ट घालायची सुरुवात नव्या पिढीतील मराठी-हिंदी सिनेतारकांनी केली आणि तेव्हापासून स्वेट शर्ट्सचा ट्रेण्ड दिवसेंदिवस वाढतो आहे. स्वेट शर्ट मुळात वूलन किंवा थोडया जाड कापडाचे असतात, ज्याने थंडीत थोडी फार उब मिळते. स्वेट शर्ट हा प्रकारसुद्धा तुम्ही कुठल्याही निमित्ताने घालू शकता. त्यावर छान स्पोर्ट्स शूज आणि मुलींनी केसाची पोनी टेल बांधली की एकदम स्मार्ट लूक येतो. स्वेट शर्ट मध्येही अनेक रंग आता पाहायला मिळतात, पण शक्यतो ब्लॅक, ब्ल्यू, व्हाइट असे रंग मुलं आणि मुली दोघांनाही स्मार्ट आणि खुलून दिसतात. स्वेटरच्या तुलनेत हे थोडे पातळ असते, त्यामुळे तुम्ही अगदी उन्हाळयातही स्वेट शर्ट्सचा पर्याय निवडू शकता.
लेदर जॅकेट्स
हुडीज आणि लेदर जॅकेट्स हा प्रकारसुद्धा थंडीतला ट्रेिण्डग प्रकार आहे. साध्या टी शर्ट्सवर किंवा अगदी कुठल्याही प्रकारच्या कपडय़ांबरोबर तुम्ही जॅकेट्स पेअर करू शकता. लेदर जॅकेटची फॅशन कधीही कालबाह्य होत नाही. लेदर जॅकेट विंटर वार्डरोबमधील सर्वोत्तम स्टायलिश आऊटफिटपैकी एक आहे. डेनिम जॅकेट किंवा स्वेट शर्टपेक्षा हे जॅकेट थोडं जास्त महाग असतं, पण एखादं तरी जॅकेट तुमच्या स्टायलिश कपडय़ांच्या कलेक्शनमध्ये असायला हवं. लेदर जॅकेट वापरताना थोडया फार टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे, जेणेकरून ते जास्त काळ टिकतं. लेदर जॅकेट प्राण्यांच्या कातडीपासून बनवलं जातं, त्यामुळे ते खरेदी करताना पूर्णपणे माहिती घेऊन आणि तपासून पहा. ते धुण्यासाठी कुठल्याही सोल्यूशनच्या पाण्यात भिजवून धुवा, मशीनमध्ये लेदर जॅकेट धुतलं तर लगेच खराब होऊ शकतं. जॅकेट परिधान करताना आणि कपाटात ठेवताना ते किंचितही ओलसर राहणार नाही याची काळजी घ्या. या जॅकेट्समध्येही वेगवेगळे प्रकार असतात जसं की ओपन झिप, लेदर बॉम्ब, पफर जॅकेट आणि अजून बरंच काही. एकेकाळी जॅकेट फक्त ठरावीक वर्गाची मक्तेदारी मानली जायची, परंतु आता सर्रास कोणीही वेगवेगळया पद्धतीने जॅकेट परिधान करू शकतं.
लॉन्ग कोट्स
लॉन्ग कोट्स साडीवर पूर्वीच्या काळी स्त्रिया परिधान करत असत. त्यानंतर हा प्रकार सिनेमातही बऱ्याचदा पाहायला मिळाला. पूर्वी स्त्रिया बऱ्याचदा महागडया काश्मिरी पश्मिना कोट्सना अधिक पसंती द्यायच्या. आज त्यामध्येही वेगवेगळे प्रकार आले आहेत. परंतु, अशा पद्धतीचे कोट्स आणि जॅकेट्स यात बराच फरक जाणवतो. हे कोट्स जास्त करून व्हेल्वेट आणि पश्मिना प्रकारात उठावदार आणि राजेशाही दिसतात. आजही ती पद्धत विशिष्ट सामुदायांमध्ये प्रचलित आहे. परदेशात राहणारे, ये – जा करणारे आणि उत्तर भारतात राहणाऱ्यांकडे असे कोट्स हमखास पाहायला मिळतात. उन्हाळयात आणि पावसाळयात मात्र याचा फार उपयोग होत नाही, त्यामुळे अगदी गरज असेल तरच हे कोट घ्यावेत.
थंडीतल्या फॅशनची गंमत म्हणजे मुलं-मुली, स्त्री-पुरुष सर्वांनाच सेम पद्धतीचे, स्टाइलचे कपडे वापरतात. कारण जॅकेट्स, हुडी, स्वेटर हे सगळंच कपडय़ांच्या युनि-सेक्स प्रकारात येतात. विंटर फॅशनमध्ये अनेक प्रयोग करता येतात असं तरुणाईचं म्हणणं आहे. हे कपडे कुठल्याही प्रकारे पेअर केले तरी खूप स्मार्ट आणि स्टायलिश दिसतात.
आत्ता आपण जरी फक्त कपडय़ांबद्दल बोललो असलो तरी हिवाळयात शाली आणि स्कार्फ हेसुद्धा तरुणाईच्या कलेक्शनमध्ये पाहायला मिळतात. त्यांचं असं म्हणणं आहे की थंडीत तर ते उपयोगी पडतंच, पण स्कार्फ हा आता रोजच्या जगण्याचा एक भाग झाला आहे. थंडी, धुळ, वारा, ऊन कधीही स्कार्फ हा लागतोच. तरुण पिढी मुळातच शॉपोहोलिकच असल्याने आजकाल सगळय़ांकडेच शाली, कोट्स असे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. हिवाळयात फॅशनचं प्रमाण वाढण्याचं कारण म्हणजे तरुणांची भटकंती. कुठेही फिरताना गरम कपडे (थर्मल्स) घेऊन फिरावं लागतं, त्यामुळे काही जण फक्त थर्मल्स आणि त्यावर जॅकेट्स पेअर करतात, तेही खूप छान दिसतं. तुम्ही जर उत्तरेकडे फिरायला जाणार असाल तर थंडीतल्या कपडय़ांची खास तयारी करणं गरजेचं आहे. अंगात घालणाऱ्या कपडय़ांबरोबरच कानटोपी, हात मोजे आणि गम बूट्स या बेसिक गोष्टी तुमच्याकडे असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामध्येही तुम्हाला हवे तसे प्रकार, फॅशन, स्टाइल मिळते. कुडकुडत्या थंडीत फॅशनेबल कपडय़ांची हौसही भागवता येते आणि गुलाबी थंडीची मजाही घेता येते. त्यामुळे एकूणच सगळया ऋतूंमध्ये हिवाळयातील फॅशन तरुणाईला अधिक भावते.
viva@expressindia.com