|| तेजश्री गायकवाड
उन्हाळ्याची जरा चाहूल लागली की घामाच्या धारा आणि भिजलेले कपडे डोळ्यासमोर येतात. वॉर्डरोबमधले आत्तापर्यंतचे ट्रेण्डी कपडे बाहेरही येऊ नयेत असं वाटतं. मग ऐन उन्हात चिकचिक न होता, कूल कसं राहता येईल याचे पर्याय शोधायला सुरुवात होते..
मार्च महिना म्हणजे कडक उन्हाळ्याची चाहूल. अशा कडक गर्मीमध्ये नक्की काय घालावं हा प्रश्न नेहमीच पडतो. आणि निव्वळ उन्हाळा आहे म्हणून फॅशन करायचीच नाही असं कसं होणार? रोज रोज कॉटनचे ड्रेस घालणंही शक्य नसतं. तेवढे कॉटनचे कपडेही कपाटात नसतात. आणि ऐन गर्मीत फॅ शनच्या नावाखाली अन्य काही कपडे घालून घामाच्या धारांमध्ये चिंब भिजणंही परवडणारं नाही. यातला मध्यममार्ग तर हवा आणि तसे अनेक पर्याय आज बाजारात उपलब्ध आहेत. किंबहुना, गेली काही वर्ष सातत्याने फॅशन डिझायनर्स आरामदायी, सहज वापरता येतील आणि उठून दिसतील अशी कम्फर्टेबल फॅशनडोळ्यासमोर ठेवून काम करतायेत. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात काही एक नवा ट्रेण्ड या फॅ शनेबल कपडय़ांमध्ये नक्कीच अनुभवायला मिळतो. या वर्षी असा नवीन ट्रेण्ड कोणता आहे इथपासून ते उन्हाळ्यात तुमची फॅ शन आणि तुम्ही कूल कसे राहाल, यासाठी सध्या उपलब्ध असलेले ट्रेण्ड्स कसे फायदेशीर ठरतील हे जाणून घेऊयात..
स्टोल जॅकेट्स – स्टोल जॅकेट्स ही नुकतीच आलेली फॅशन आहे. या उन्हाळी फॅ शनमधला अगदी ताजा आणि मनालाही तजेला देणारा असा हा ट्रेण्ड म्हणता येईल. स्टोल हे आपण नेहमी वापरतो. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आपण सध्या स्टोल्सचा जास्त वापर करतो. पण हेच स्टोलआपल्याला जॅकेट्स म्हणून घालणे सहज शक्य आहे. सध्या या स्टोलचे जॅकेट्स बाजारात उपलब्ध झाले आहेत. वजनाला हलके असलेले हे कलरफुल जॅकेट्स आपण कुर्ती, ड्रेस, वनपीस, गाऊन, टॉप अशा कोणत्याही कपडय़ावर घालू शकता. हे शक्यतो कॉटन किंवा पॉलिस्टर आणि कॉटनच्या कॉम्बिनेशन असलेल्या कापडाने बनवलेले असतात. त्यामुळे यात शक्यतो गरम होत नाही. हे स्टोल जॅकेट्स सध्या फ्लोरल, अॅनिमल, नेचर किंवा अॅबस्ट्रॅक्ट अशा वेगवेगळ्या प्रिंट्समध्ये उपलब्ध आहेत. यात रंगांचाही मस्त मिलाफ साधलेला दिसून येतो.
डेनिम वनपीस – या डेनिम ड्रेसच्या फॅशनमध्ये डेनिमचा कपडा वापरला गेलेला नाही. परंतु याचा लुक मात्र हुबेहूब डेनिमसारखाच दिसतो. तुम्ही अनेकदा बाजारात जीन्स, एखादा डेनिमचा शर्ट किंवा कोणत्याही प्रकारचे डेनिमचे कपडे घेताना त्या गारमेंटचा कपडा पातळ आणि हलका लागतो. याचं कारणच ते आहे की हे खरंखुरं डेनिम कापड नसतं. डेनिमसारखा लुक असणारं कॅम्ब्रिक नावाचं हे फॅब्रिक असतं. तुम्ही या कपडय़ापासून बनवलेलं कोणतंही गारमेंट जर नीट जवळून, निरखून बघितलंत तर तुम्हाला त्यामध्ये निळ्या दोऱ्यांसोबत पांढरे दोरेही दिसतील. हे कापड साध्या विवमध्ये विणलेलं असतं आणि त्यामुळेच ते अतिशय हलकं असतं. डेनिमसारखं दिसणारं हे कापड उन्हाळ्यातील नवीन डेनिम आहे किंवा डेनिमला बेस्ट ऑप्शन आहे असं नक्कीच म्हणता येईल. गेल्या एकदोन वर्षांत मुली उन्हाळ्यात सर्रास वन पीस घालताना दिसतात. आणि हीच ग्राहकांची बदलती मागणी बघून आणि डेनिमविषयीचं प्रेम लक्षात घेऊन अनेक ब्रॅण्ड्सनी डेनिम वनपीस बाजारात आणले आहेत. पार्टीपासून ते फिरायला जायला अगदी रोजच्या वापरताही आपण हे वनपीस सहज वापरू शकतो. वेगवेगळे वॉश दिलेले हे डेनिम वनपीस खूप सुंदर दिसतात. वेगवेगळे वॉश, सिल्हाउट्स, रंगांच्या शेड्स, थोडी एम्ब्रॉयडरी, नवनवीन नेकलाइन अशा सगळ्या गोष्टींनी सजलेले हे डेनिम वनपीस तुमच्या समर कलेक्शनमध्ये असायलाच हवेत.
बॅग्जची फॅशन – उन्हाळ्यात अनेकजण बाहेर फिरायला जातात, लग्नसराईचा काळही हाच असतो. अशा वेळी आपण बॅग्जमध्ये पाण्याची बाटली, मेकअपचं सामान असतं, एखादा स्टोल असतो. अशा वेळी या सगळ्या गोष्टी बॅग्जमध्ये बसणं गरजेचं असतं. यासाठी बाजारात मीडियम आकाराच्या बॅग्ज आल्या आहेत. यातल्या बऱ्याच बॅग्ज या टू इन वन आहेत. तुम्ही त्यांचा वापर स्लिंग बॅग म्हणून तर कधी कधी छोटी सॅक म्हणूनही करू शकता. सगळ्या ब्राइट, पेस्टल अशा विविध शेड्समध्ये या बॅग्ज उपलब्ध आहेत. या बॅग्जचं टेक्स्चर मॅट आहे. यावर डेकोरेशन म्हणून फुलं, पानं तर कधी डायमंडचे ब्रोचेसही लावलेले दिसतात.
शुभ्रधवल काही.. – जॅकेट्स, ट्राऊ झर्स, वनपीस, कुर्ता, पायजमा, लाँग स्कर्ट्स असे सगळ्याच प्रकारचे शुभ्रधवल रंगातील आऊ टफिट्स सध्या बाजारात आले आहेत. पांढरा रंग हा फक्त वुमेन्सच नाही तर मेन्स फॅशनमध्येही दिसतायेत. मेन्सवेअरमध्ये कुर्ता, जॅकेट आणि चुणीदार पॅन्टसाठी पांढऱ्या रंगाचा जास्त वापर केलेला दिसतो. डिझायनर महम्मद मझरने तर पांढऱ्या रंगाचंच संपूर्ण कलेक्शन नुकतंच लक्मे फॅशन वीकमध्ये सादर केलं. पांढऱ्या रंगाच्या फॅब्रिकवर मल्टिकलर एम्ब्रॉयडरी केलेली दिसून येते. ज्यात अनारकली, लेहेंगा, घागरा-स्कर्ट, चुणीदार, दुपट्टा असे वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. समर सीझनमध्ये परंपरागत वापरला जाणारा पांढरा रंग आणि त्या रंगातील इंडो-वेस्टर्न लुक दिलेले कपडे बाजारात प्रामुख्याने पाहायला मिळत आहेत.
रंग तुझा कोणता? – उन्हाळ्यात वापरल्या जाणाऱ्या कपडय़ांच्या रंगामुळे आपल्या समर लुकमध्ये खूप फरक पडतो. त्यासाठी कपडय़ांच्या ट्रेण्डिंग रंगांमध्येही योग्य त्या रंगाची निवड केली तर आपल्या शरीरालाही उन्हाचा, गर्मीचा त्रास होत नाही. या वर्षी समर लुकमध्ये टोनल (३ल्लं’) रंग ट्रेण्डिंग आहेत. टोनल रंग म्हणजे सेम रंगाच्या ग्रूपमधल्या शेड्स.
१) लव्हेंडर : समर लुकमध्ये लव्हेंडर हा रंग सगळ्यात जास्त बघायला मिळणार आहे. रोमॅन्टिक आणि ऐलिगंट असा हा रंग कोणत्याही प्रकारच्या कपडय़ांवर सूट करतो.
२) पर्पल अल्ट्रा व्हॉयलेट रंग – हा ‘कलर ऑफ द इअर’ आहे. आणि पर्पल ही याचीच एक शेड आहे. या रंगाची लाइट शेड उन्हाळ्यात डोळ्यांना थंडावा देते. त्यामुळे या समर लुकमध्ये तुमच्याकडे या रंगाचे कपडे असणं नक्कीच गरजेचं आहे.
३) रॅप्चर रोझ – साधारणत: पिंक कलरच्या शेडमध्ये असणारा हा रंगही उन्हाळ्यात डोळ्यांना थंडावा देतो. उन्हाळ्यात घामाने चिकचिक होत असताना फ्रेशनेसची गरज असते आणि तो देण्याचं काम हा रंग करतो.
४) फिक्कट निळा – निळा रंग नेहमीच फ्रेश वाटतो. फिक्कट निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या शेड्स असतात. हा रंग मेन्स फॅशनमध्ये नेहमीच ट्रेण्डिंग असतो.
५) मिल्क व्हाइट – उन्हाळा म्हटलं की पांढरा रंग आलाच. या पांढऱ्या रंगाच्याही शेड्स असतात. यामध्येही तुम्ही नीट बघितलं तर डार्क टू लाइट अशा शेड्स तुम्हाला दिसतील. यामधील मिल्क व्हाइट ही शेड यंदा ट्रेण्डिंग आहे.