जगातील १२ टक्के पक्षी भारतात आहेत. भौगोलिक वैविध्य आणि वैशिष्ट्यामुळे भारतात पक्ष्यांचा अधिवास मोठ्या प्रमाणावर आहे. जगातील १० हजार प्रजातींपैकी १३०० प्रजाती भारतात आढळतात. पक्ष्यांचे गाणे, आवाज हा त्यांचा संवाद असतो. पक्ष्यांची निसर्गातील भूमिका महत्त्वाची आहे. झाडांचे संवर्धन, जंगलांची वाढ, स्वच्छता, परागीभवन अशा अनेक भूमिका बजावून निसर्गाचा समतोल राखण्याचे काम पक्षी करतात. अशा पक्ष्यांच्या सान्निध्यात राहून त्याचा मनमुराद आनंद घेणे आणि पक्षी निरीक्षणाच्या जोरावर इतरांनाही आपल्याबरोबर त्या दुनियेत घेऊन जाणे, बेभान होऊन कार्य करत राहणे हा पक्षी अभ्यासकांचा खास गुण असतो. सहज नजरेस पडलेल्या एखाद्या पक्ष्याच्या हालचालींवर आपली नजर खिळते, त्याच्या इवल्याशा छबीवर आपण मुग्ध होतो. चित्तवेधक हालचाली, आवाज आणि रंगसंगतीने लक्ष वेधून घेणारे विविध आकाराचे ‘पक्षी’ आणि त्यांचा किलबिलाट अनुभवण्यासाठी तुम्हाला तुमचा सफरनामा घडवायचा असेल तर महाराष्ट्रातल्या पक्षी अभयारण्यांना आवर्जून भेट द्या.

अनेरडॅम वन्यजीव अभयारण्य

अरुणावती नदीच्या पाणलोट क्षेत्रानजीकचे क्षेत्र अनेरडॅम वन्यजीव अभयारण्य या नावाने ओळखले जाते. सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी शिरपूरपासून १६ किलोमीटर अंतरावर मुंबई -आग्रा रस्त्याला लागून साग, अंजन, पळसाच्या झाडांच्या दाटीत हे राखीव क्षेत्र असून इथे महाराष्ट्राचा राज्यपक्षी ‘हरियाल’ पाहायला मिळतो. अभयारण्यात प्रामुख्याने साग, अंजन, पळस, धावडा, बाभूळ, हेंकळ, चिंच, मोहा, आवळा, आपटा, सलई या वृक्ष प्रजाती असून जैवविविधतेने संपन्न असा हा प्रदेश आहे. कोल्हा, भेकर, खार, मोर, चिंकारा, सुगरण, कोकिळा, घुबड, ससा, तित्तर, बटेर, गिधाड, सुतारपक्षी, मना, मुंगूस, कोब्रा, सायाळ, घोरपड, मण्यार, सरडा, लांडगा, अस्वल, हॉर्नबिल, पाणकोंबडी, रानडुक्कर, बगळे, तरस अशा प्राणी आणि पक्ष्यांनी हा प्रदेश समृद्ध आहे.

हेही वाचा : नावीन्यपूर्ण परंपरा

नायगाव मयूर अभयारण्य

भटकंती करताना अचानक आपल्या गाडीसमोरून मोरांचे थवे उडत आडवे गेले तर? किंवा आपल्या दोन्ही बाजूंनी खिडकीबाहेर डोकावताच फुलवलेल्या पिसाऱ्यांनी नाचणारे, उडणारे मोर, मोरांचे थवेच्या थवे पाहायला मिळाले तर? आनंदालाही पंख फुटतील ना? हा आनंद अनुभवण्यासाठी बीडमधील नायगावच्या मयूर अभयारण्याला भेट द्यावी लागेल. बीड शहराच्या पश्चिमेस २० किमी अंतरावर बीड-पाटोदा-नगर व बीड लिंबादेवी-डोंगरकिन्ही-नगर या दोन रस्त्यांच्या बाजूला असलेल्या डोंगराळ भागात हे अभयारण्य वसले आहे. अभयारण्याच्या रस्त्यावर दुतर्फा मोर-लांडोरांच्या जोड्याच जोड्या पाहायला मिळतात. पाणवठ्यावर आलेले मोर, झाडाच्या फांद्यांवर आपला भला मोठा पिसारा लोंबकळत सोडून बसलेले मोर, डोंगराच्या पायथ्याशी बसलेले मोरांचे थवे, असे मोरच मोर आपल्याला येथे नेत्रसुख देतात. मोरांशिवाय येथे १०० हून अधिक प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात.

नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य

नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यात हे अभयारण्य आहे. जलाशयातील उथळ पाणी, पाण्यातील विपुल जलचर, विविध पाणवनस्पती, किनाऱ्याला असलेली वनराई आणि जवळच्या सिंचित शेतातील पिकं यामुळे पक्ष्यांसाठी हे आकर्षणाचे ठिकाण झाले असून त्यांच्या निवासासाठी एक उत्तम स्थळ गणलं गेलं आहे. हे महाराष्ट्रातील एक उत्तम ‘पक्षीतीर्थ’ आहे. पक्षी निरीक्षणातून येथे २४० हून अधिक प्रकारचे पक्षी असल्याचे आढळून आले आहे. येथील जलाशयात २४ प्रकारचे मासे आहेत. परिसरात ४०० हून अधिक प्रजातींच्या वनस्पतींची विविधता आहे. जलाशयाजवळ गवतीमाळ असल्याने आणि मोठ्या प्रमाणात वृक्ष असल्याने अनेक प्रजातींच्या लहान-मोठ्या स्थानिक-स्थलांतरित पक्ष्यांचा वावर दिसून येतो. पाणकावळे, पाणडुबी, रोहित, चमचा, धनवर कुट यांसारखे पक्षीही येथे आढळतात. महाराष्ट्राचं भरतपूर असंदेखील या अभयारण्याला संबोधलं जातं.

हेही वाचा : परंपरा गणरायाच्या दागिन्यांची

जायकवाडी पक्षी अभयारण्य

संभाजीनगर जिल्ह्यातील रंगीबेरंगी पक्ष्यांचं आश्रयस्थान असलेलं जायकवाडी पक्षी अभयारण्य हे पक्ष्यांसाठी व पर्यटकांसाठी कायमच आकर्षण असलेलं ठिकाण आहे. कायम वास्तव्यास असलेल्या पक्ष्यांच्या २०० प्रजातींशिवाय हिवाळ्याची चाहूल लागताच विविधरंगी मनोहारी पक्षी इथल्या नाथसागर जलाशयाच्या आश्रयास येतात. दक्षिण आफ्रिका, नेपाळ, तिबेट, चीन, रशिया येथून दरवर्षी येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांच्या ७० च्या आसपास प्रजाती इथं पाहायला मिळतात. केवळ एक किंवा दोन दिवसांत इथल्या सगळ्याच गोष्टी पाहता येत नाहीत इतका हा जिल्हा पर्यटनदृष्ट्या समृद्ध आहे. हिवाळा हा पर्यटनासाठी आणि जायकवाडी पक्षी अभयारण्याला भेट देण्यासाठी उत्तम ऋतू आहे.

कर्नाळा पक्षी अभयारण्य

रायगड जिल्ह्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्य मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून अवघ्या १२ किलोमीटरवर आहे. कर्नाळा किल्ला आणि आसपासचा परिसर पक्षी वैविध्याने संपन्न असल्याने महाराष्ट्र शासनाने त्यास राखीव वनक्षेत्र घोषित करून पक्षी अभयारण्याचा दर्जा दिला आहे. या अभयारण्यात विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास आहे. स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांचे हे माहेरघर आहे. आपण येथे १४७ प्रजातींचे पक्षी पाहू शकतो. त्यात ३७ प्रकारचे पक्षी हे स्थलांतरित किंवा प्रवासी पक्षी आहेत. मध्य आशिया, युरोप, उझ्बेकिस्तान, सैबेरियातून पक्षी येथे येतात.

अर्जुनसागर

नाशिकच्या कळवण तालुक्यातील पुनद नदीवरील एक नयनरम्य जलाशय आहे. या जलाशयाला अर्जुनसागर असे नाव आहे. भटकंतीची मजा लुटण्यासाठी आपण कधी तरी निसर्गाच्या जवळ जाऊन राहतो. कधी दाट वृक्षराजीतून तर कधी गवताळ माळरानातून भटकण्याची मजा अनुभवतो. अर्जुनसागर क्षेत्रात जलाशयाच्या भोवती वनपर्यटन करण्याची संधी आपल्याला प्राप्त होते. ही भटकंती करताना फुलं, प्राणी आणि पक्ष्यांच्या अद्भुत दुनियेची सफर घडते. राष्ट्रीय पक्षी मोर, राज्य पक्षी हरियाल, यासारख्या पक्ष्यांबरोबर असंख्य पक्षी अर्जुन सागराभोवती मस्त विहरताना दिसतात. अनेक स्थलांतरित पक्षी आणि पाणपक्षी आपलं अस्तित्व या जलाशयात दाखवत असतात. निसर्गप्रेमी, गिर्यारोहक, साहसवीर, पक्षीप्रेमी यांच्यासह वन्यजीवतज्ज्ञांची येथे नेहमीच गर्दी असते.

हेही वाचा : फेनम स्टोरी : सबसे बड़ा रुपय्या

काटेपूर्णा

अकोला जिल्ह्यात काटेपूर्णा नदीच्या काठावर वसलेलं हे अभयारण्य आपल्याला निसर्गपर्यटनाचा मनमुराद आनंद देणारं वन आहे. ही नदी अभयारण्याच्या मध्यातून वाहते. काटेपूर्णा जलाशयावर पक्ष्यांचा मुक्त वावर असल्याने पक्षीप्रेमींसाठीही हे ठिकाण एक आकर्षणाचा भाग राहिलं आहे. हा जलाशय आणि लागून असलेली वृक्षदाटी यामुळे विविध प्रजातींच्या पक्ष्यांचे मनोहारी दर्शन आपल्याला होतं. हा जलाशय आणि येथील पाणथळ जागा पक्ष्यांचे आश्रयस्थानच बनल्या आहेत. जवळपास दीडशे प्रजातींचे पक्षी येथे आढळून येतात. मोर, घुबड, तितर, खंड्या, पाणकोंबडी, टकाचोर यांसारखे अनेक पक्षी आपण इथं पाहू शकतो.

ठाणे खाडी रोहित पक्षी अभयारण्य

उंच मान, लांब पण बारीक पाय, गुलाबी-पांढरे पंख यामुळे आपले लक्ष वेधून घेणाऱ्या रोहित पक्ष्यांचा ठाणे खाडी परिसर हा हक्काचा परिसर आहे. ही पाणथळ जागा जगातील महत्त्वाच्या पक्षी क्षेत्रांमध्ये गणली जाते. युरोपीय देशांमध्ये मूळ वास्तव्याला असलेले हे दिमाखदार पक्षी हिवाळ्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान या देशांच्या सीमेवरील गुजरातच्या कच्छ भागात वीण घालतात. या ठिकाणी नवीन पिढीला जन्म घातल्यानंतर नवजात पिल्लांसह भारताच्या प्रवासावर निघतात. पांढरेशुभ्र परंतु गुलाबी छटा असलेले पंख, आखूड वक्राकार केशरी चोच, गुलाबी रंगाचे लांब पाय तसेच बाकदार मान हे वैशिष्ट्य असणारे रोहित पक्षी दरवर्षी या परिसरात आपल्याला पाहायला मिळतात. या पक्ष्यांचा पंखाखालील भाग रक्तवर्णीय असतो. आकाशात झेप घेतल्यानंतर ते गडद लाल रंगाचे पंख ज्वाळांप्रमाणे दिसतात. या कारणामुळे या पक्ष्यांना ‘अग्निपंखी’ या नावाने संबोधतात. ज्या वेळी हे पक्षी उथळ पाण्यात उभे असतात, तेव्हा ते गुलाबी रंगमिश्रित धवलवर्णीय दिसतात. या कारणामुळे त्यांना रोहित पक्षी या नावाने ओळखले जाते. रोहित पक्षी व इतर वैविध्यपूर्ण पक्ष्यांच्या संवर्धनास ही जागा मदत करते. चिखलातील खेकडे व निवटी मासे हे येथे मोठ्या संख्येत प्रजनन करतात. निसर्गप्रेमींना नौकाविहारामार्फत येथील जैवविविधतेची झलक मिळते. थेट महानगरातच अनोखे पक्षीवैभव येथे जपले जाते.

पक्ष्यांना शोधण्यासाठी आपली नजर भिरभिरावी, त्यांना निरखताना आपली सौंदर्यदृष्टी जागी व्हावी, त्यांच्या किलबिलाटाचा- त्यातील निरनिराळ्या आवाजांचा अर्थ आपल्याला ओळखता यावा, यासाठी अनोखे पक्षीजगत प्रत्येकानेच अनुभवायला हवे.

viva@expressindia.com