हाय फ्रेण्डस् ! ‘मुलगी म्हणून संगोपन कसं झालं, ‘या सब्जेक्टवर लेख हवाय, असं सांगितलं गेलं. मनात आलं की, आजच्या जमान्यातही हा विषय दिला जातोय, हे कसं काय बुवा? मुलगा-मुलगी हा भेद अजूनही आहे का, तो का आहे, कसा आहे वगरे पॉइंट्सवर लिहायला मी कुणी स्पेशालिस्ट नाहीये. मी आहे एक ‘कॉमन गर्ल’, ‘कॉमन मॅन’सारखी ‘कॉमन गर्ल.’ सो, मी मला जे वाटतंय, मी आणि माझ्या मत्रिणी जे अनुभवतोय नि माझ्याभोवती जे घडतंय, ते सांगण्याचा प्रयत्न करणारेय.
मुळात हे ‘अपब्रिंगिंग’ किंवा ‘संगोपन’ म्हणजे तरी काय हो? सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या बाळाला वाढवणं. बस्स! मग हे बाळ मुलगा आहे की मुलगी आहे हे बघायचं कारणच काय? बाळाचं छान संगोपन केलं गेलं झालं. पण असं दृश्य अजून कॉमन नाहीये. परवाचीच गोष्ट. शेजारच्या अनूदीदीला बाळ झालं म्हणून आम्ही आनंदात होतो. तर एका आजींनी विचारलं काय पेढा का बर्फी? छोटा तनय तर त्यांच्याकडं बघायलाच लागला. त्याला वाटलं, अरेच्चा.. ‘बर्फी’ म्हणजे तर रणबीर कपूर.. तो कसा काय इथं येईल.. वगरे. जोक्स अ पार्ट, पण उत्तर मिळाल्यावर आजी दीदीची चौकशीही न करता नाक मुरडून तरातरा निघून गेल्या. पण त्यांच्या वागण्यानं डिस्टर्ब न होता आम्ही बाळाला खेळवत राहिलो..
खरंच, या गोष्टीचा विचार करताना कितीतरी गोष्टी सहजपणं जाणवल्या. काही ठिकाणी अजूनही मुलगा-मुलगीत सॉलिड भेद केला जातो. म्हणजे शिक्षण वगरे दिलं जात असलं, पण घरातली वागणूक मात्र.. मत्रिणींच्या घरचेच पाहा ना. साक्षीच्या घरचे सातच्या आत घरात, मुलांशी बोलू नको, जास्त शिकून काय करायचंय टाइप्सचं. अनन्याकडं ती केव्हा आली, कुठं गेली, काय करत्येय, याचा कुणालाही पत्ता नसतो. सगळे जण व्हेरी बिझ्झी. सोहाकडं मात्र ओके. म्हणजे तिच्या अॅक्टिव्हिटीज घरी माहीत असतात नि रिस्ट्रिक्शन्सचा मारापण नसतो आणि महत्त्वाचं म्हणजे आमचे भाऊ, मित्र किंवा एकूणच मुलग्यांना मात्र अशी रिस्ट्रिक्शन्स नसतात, असा समज होता एवढे दिवस. पण आजकालच्या घटनांमुळं मुलींची जशी काळजी घेतली जातेय, तसंच मुलग्यांनाही का, कधी, कसं, कुठं असले प्रश्न विचारले जाऊ लागल्येत.
कसं आहे ना, एवढय़ा दिवसांची पुरुषप्रधान का काय म्हणतात ती पद्धत मोडून काढायला मुलींना मुलांसारखी वागणूक दिली गेली. त्यांना हवं तेवढं शिक्षण, विचार-निर्णयाचं स्वातंत्र्य वगरे. पण हे सगळं रिअल लाइफमध्ये अप्लायही व्हायला पाहिजे ना. म्हणजे मुलग्यांना मात्र तसंच पारंपरिक पद्धतीनं वाढवलं गेलं. मग अंतर पडलं असावं.. मुलग्यांना वाढवण्यात अलीकडं थोडेसे बदल होताहेत. आशेला वाव आहे. मुलगा-मुलगी नि समानता हे समीकरण सुटेल की नाही, तेही मला माहीत नाहीये. पण आजच्या पिढीला वाटतंय की, आमचा विचार मुलगा-मुलगी म्हणून न होता माणूस म्हणून व्हावा. माणूस म्हटलं की त्याचं चूक-बरोबर वागणं, त्याच्या भावभावना, त्याचे आचार-विचार-निर्णयक्षमता हे सगळं त्याच अँगलनं लक्षात घ्यायला हवं. कसं आहे, बरीच मोठी माणसं ‘ही आजकालची मुलं म्हणजे ना..’ असं सरसकट लेबल लावून मोकळी होतात. पण आम्हालाही फििलग्ज आहेत ना. फक्त त्या व्यक्त होण्याचं माध्यम एसएमएस, सोशल साइट्स वगरे आहेत. बघा ना, लेखात मी वापरलाय ना.. या आमच्या भावना अनेक मोठय़ांना कळत नाहीत, त्याला आम्ही काय करणार? जुन्या-नव्याचं कॉम्बिनेशन आम्हाला आवडतं. टेक्नॉलॉजीच्या गप्पा मारताना आम्ही आजीची गोधडी लपेटतो. चायनीजसोबत मिसळपावही खातो. भन्नाट ट्रेकिंग करतो. सुसाट खेळतो. पुस्तकं वाचतो. रेफरन्सेस काढतो. ब्लॉग्ज लिहितो. गाणी ऐकतो नि डान्सही करतो. इन शॉर्ट – ‘व्यक्त होतो.’
फ्रेण्ड्स, या लेखानिमित्तानं केलेलं ‘शेअिरग’ तर आपण गप्पांमध्ये-चॅटिंगमध्ये अनेकदा करतोच. आता ते मोठय़ांनीही वाचायला हवं, नाही का? सो, ‘माणूस’ म्हणून समृद्ध होण्याची जबाबदारी आपण उचलली तर ते समजून घ्यायची जबाबदारी मोठी माणसंही आपसूकच घेतील. ‘हम को मन शक्ती दे ना,‘च्या भावना फक्त गाण्यात न राहता त्या आपल्या जाणिवेत यायला हवं. जाणिवेतून ते रिअल लाइफमध्ये अप्लायही व्हायला हवं. ‘जाणिवांचा जागर’ तर झालाच पाहिजे. तो होतोय की नाही, ते या लेखाच्या लाइक्सवरून कळेलच.
स्टेट्स अपडेट – अनुदीदीच्या बाळाचं नाव ठेवलंय राज्ञी.. त्या ‘बर्फी’वाल्या आजीनींच सुचवलंय..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा