|| वेदवती चिपळूणकर
‘तोत्तोचान’ नावाचं एक पुस्तक सगळ्यांनीच लहानपणी वाचलं असेल. तोत्तोचानची शाळा ही एक स्वप्नवत गोष्ट होती. कोणतीही परीक्षा नाही, कोणतंही वेळापत्रक नाही, अभ्यासक्रम नाही, ठरावीक पुस्तकं नाहीत, गणवेश नाही. तोत्तोचानच्या शाळेत सगळं शिक्षण हे अनुभवातूनच दिलं जायचं. अशी शाळा मिळणं, जिला खरं तर शाळा म्हणताच येणार नाही, हे सगळ्यांचं कायम फक्त स्वप्नच राहिलं. अशा प्रकारच्या शैक्षणिक संस्थेतून फक्त पुस्तकी शिक्षण नाही तर जीवनशिक्षण दिलं जातं. खरं तर ते द्यावंही लागत नाही, अनुभवातून मिळत जातं. अशा वातावरणात जायला मिळणं हे भाग्यच! अशी भाग्यवान व्यक्ती कोणताही अवघड आणि बोल्ड निर्णय घ्यायला सहसा कचरत नाही. म्हणूनच ‘ग्राममंगल’सारख्या वातावरणात आखीव शाळेत न शिकताही आणि दहावीपर्यंत एकही परीक्षा न दिलेला ‘भरत दानव’ दहावीत ९४% आणि बारावीत ९१% मिळवू शकला. चांगले गुण मिळूनही एक वर्ष ब्रेक घेण्याचं ठरवून त्याने बारावीनंतर कुठेही अॅडमिशन घेतली नाही. त्या एका वर्षांत तो ओडिसा, केरळ, झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार, नेपाळ, पॉन्डीचेरी अशी ठिकाणं फिरून आला आणि आल्यावर त्याने ब्लॉग लिहायला सुरुवात केली.
‘शाळेतल्या अनुभवांमुळे धाडसी निर्णय घ्यायचं बळ आपोआप मिळत गेलं’, भरत म्हणतो, ‘त्या संस्थेत मी होतो हा माझ्या आईबाबांचा निर्णय होता. कोणत्याही नॉर्मल शाळेसारखी ती शाळा नाही. खेळ, अनुभव, प्रत्यक्ष काम अशा गोष्टींमधून आम्ही शिकत होतो. त्यामुळे मुळातच लहान लहान निर्णयही स्वत:चे स्वत:ला घ्यायला शिकवलं गेलं आहे. आपण घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी आपल्या स्वत:वर आहे ही ‘ग्राममंगल’ची शिकवण आहे. शाळेत असतानाही मी सातवीमधून, एक वर्ष वगळून थेट नववीत बसण्याचा निर्णय घेतला होता. शाळाच वेगळ्या विचारांची मिळाल्यामुळे मला स्वत:लाही वेगळा विचार करायची भीती वाटत नाही आणि माझ्या आईबाबांनी मला या शाळेत घातल्यामुळे त्यांचा मुळातच वेगळा विचार होता. त्यामुळे बारावीनंतर ब्रेक घेण्याचा निर्णय माझ्यासाठी विशेष कठीण गेला नाही.’ बारावीनंतर ब्रेक घ्यायचा हे त्याने अकरावीला ‘फग्र्युसन कॉलेज’मध्ये अॅडमिशन घेतली तेव्हाच ठरवलं होतं. त्याच्या या निर्णयाला त्याच्या आईबाबांचा पूर्ण पाठिंबा होता. फग्र्युसनमध्ये असताना स्टुडंट एक्स्चेंज प्रोग्रॅममधून तो डेन्मार्कला जाऊन आला होता, त्यामुळे त्याला फिरण्याचाही अनुभव होताच. बारावीनंतरच्या ब्रेकमध्ये फिरता येईल तेवढं फिरून येण्याची कल्पनाही त्याच्या बाबांनीच त्याला सुचवली होती.
ब्रेकच्या वर्षभरात भारतात शक्य तितक्या ठिकाणी फिरण्याचा निर्णय भरतने घेतला. त्या त्या राज्यातले सण त्या त्या राज्यात जाऊन पाहायचे असं त्याने ठरवलं. सगळ्यात पहिली ट्रिप त्याने केली ती ओडिसाला. एकटय़ाने फिरण्यामागच्या विचाराबद्दल भरत म्हणतो, ‘एकटय़ाने फिरताना हळूहळू स्वत:ला स्वत:ची ओळख व्हायला मदत होते. त्यामुळे एकटय़ाने फिरायलाही तितकीच मजा येते, किंबहुना काहीशी जास्तच! फिरण्यासाठी कोणाची तरी कंपनी लागते हा जसा एक गैरसमज, तसाच फिरण्यासाठी पैसे लागतात हा दूसरा गैरसमज! माझी ओडिसा टूर ही चार हजार रुपयांच्या आसपास खर्चात झाली. टुरिस्ट म्हणून जायचं असेल तर खर्च होतो, ट्रॅव्हलर म्हणून जायचं असेल तर फार काही खर्च येत नाही. मला काही टुरिस्ट म्हणून जाऊन काही ठरावीक प्रेक्षणीय स्थळांचे फोटो काढून परत यायचं नव्हतं. मला खरोखर माणसं बघायची होती, संस्कृती बघायची होती, सौंदर्य बघायचं होतं. वेगवेगळ्या राज्यांत फिरताना मला तिथली हॉस्पिटॅलिटी पाहायची होती आणि वेळोवेळी मला तिचा अनुभव येत गेला. थोडय़ाफार ओळखीच्या असलेल्या माणसांनी मला आपुलकीने राहायला दिलं, माझी जेवणाखाण्याची सोय केली. अनेक माणसं, त्यांचे विचार, परिस्थिती, त्यांचं आदरातिथ्य बघितलं की आपण स्वत:बद्दल अधिक नीट विचार करायला लागतो.’ मुळातच प्रवास हा जितका देश बघण्याचा असतो तितकाच स्वत:च्या आत डोकावून बघण्यासाठीही असतो, यावर त्याचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे जिथे जिथे तो गेला, तिथे तिथे त्याने नवीन माणसं जोडली. काही ठिकाणी अगदी परदेशातून आलेले अनेक सोलो ट्रॅव्हलर्स त्याला भेटले. ‘ब्रेक घेतला त्याच्या सुरुवातीला मी एका वडापावच्या गाडीवर काम करायला सुरुवात केली. त्यानंतर मी एका कॅ फे रेस्टॉरंटमध्ये काम केलं’, भरत सांगत होता. ‘तिथला माझा एक कलीग ओडिसाचा होता. त्यामुळे ओडिसामध्ये माझी सगळी काळजी त्याच्या घरच्यांनी घेतली’, असं भरत म्हणतो.
हा ब्रेक आणि हा प्रवास भरतला आयुष्याचे निर्णय घ्यायला मदत करणारा ठरला. भरत म्हणाला, ‘काय करायचं आहे यापेक्षा काय काय करायचं नाही हे तरी समजत गेलं. आपल्याला काय आवडतंय आणि जमतंय यापेक्षा काय आवडत नाहीये आणि जमत नाहीये हे कळायला लागलं. यानेही खूप मदत झाली. सॉलिटय़ूड आणि लोनलीनेस यातला फरक समजून घ्यायचा असेल तर एकटय़ाने प्रवास करण्याचा खूप फायदा होतो. माणूस म्हणून अनुभवाने समृद्ध होण्यासाठी हा प्रवास असतो. प्रवासाला जाताना त्यावर ब्लॉग वगैरे लिहिणं माझ्या प्लॅनमध्ये नव्हतं. पण कुठे काय आवडलं, काय भावलं अशा सगळ्या गोष्टी मी लिहून ठेवतच होतो. ज्या क्रमाने ठिकाणं बघितली त्याच्या उलट क्रमाने लिहायला सुरुवात केली आहे. हळूहळू सगळी ठिकाणं माझ्या लिहिण्यात येतील’, असं तो सांगतो.
केवळ सतरा वर्षांच्या असलेल्या भरतने घेतलेल्या या बोल्ड निर्णयाला त्याच्या आईबाबांनीही पाठिंबा दिला म्हणून हे शक्य झालं असं तो म्हणतो. टुरिस्ट आणि ट्रॅव्हलर यांच्यातला फरक समजून ‘इकॉनॉमिक ट्रॅव्हलिंग’ करणाऱ्या भरतच्या लेखनाने नक्कीच त्याच्या वाचकांना प्रेरणा मिळेल.
प्रत्येक माणसामध्ये आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर स्वत:वर प्रयोग करून बघायची क्षमता आणि हिंमत असायला हवी असं मला वाटतं. आपण किंवा इतरांनीच आपल्यासाठी निर्माण केलेल्या चौकटीबाहेर पाऊल टाकून स्वत:ची दिशा शोधणं यात एक विलक्षण मजा आणि अर्थदेखील आहे. स्वत:चेच पंख एकमेकांत गुंतवून झाडाच्या कुशीत बसण्यापेक्षा त्यांचा योग्य वापर करून आकाशात उंच उडायचा आनंद काय असू शकतो याचा अंदाज मी जेव्हा बारावीनंतर एक वर्ष एकटय़ाने भारतभ्रमण केलं तेव्हा आला. प्रवास करताना प्रत्येक मैलावर ज्याप्रमाणे भाषा आणि पाणी बदलतं त्याचप्रमाणे काही अंशी मीदेखील बदललेलो असतो. हे संपूर्ण वर्ष माझ्यासाठी निश्चितच एक दिशादर्शक ठरलं. – भरत दानव
viva@expressindia.com