प्रत्येक माणसाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे वेड असते आणि त्या वेडासाठी तो काहीही करायला तयार असतो..कधी कधी आपली माणसं पाठ फिरवतात..परिस्थिती त्याच्या बाजूने नसते..लोकं वेडय़ात काढतात..काही वेळा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनेही प्रवास करावा लागतो..कधी कधी खिशातले पैसे संपतात, पण हे वेड, हा छंद अशा प्रकारे जिवाला पिसे लावतो की, त्यापुढे कुणाचेच काही चालत नाही.. काहीही झाले तरी डोक्यात असलेले वेड मात्र ती व्यक्ती कायम जपते आणि आपले ध्येय गाठते.. ध्येय गाठल्यावर चढत्या सूर्याला नमस्कार करायला सारेच जमतात, पण इथपर्यंत पोहोचेपर्यंतची त्याची ही मेहनत मात्र कोणी लक्षात घेत नाही..अशीच गोष्ट आहे ती महिला शरीरसौष्ठवपटू करुणा वाघमारे स्वामीची. महिला आणि ती पण शरीरसौष्ठवामध्ये हीच कल्पनाच आपल्या चाकोरीबद्ध समाजाला न पटणारी..त्यामुळे करुणाने जेव्हा शरीरसौष्ठवाची सुरुवात केली, तेव्हा तिच्या घरच्यांचा तिला विरोध होता.. सलग तीन वर्षे तिने यासाठी मेहनत घेतली, स्वत:चा खर्च कसाबसा भाग होता, पण स्पर्धेसाठी लागणारे तीन लाख रुपये तिच्याकडे नव्हते, तीन वर्षे मेहनत घेतली ती काहीही करून फुकट घालवायची नाही, हे तिने ठरवले. त्यासाठी तिने आपल्याकडचे सोने गहाण ठेवले आणि पैसे जमवले. स्पर्धेत काहीही करून देशाचे नाव उंचावण्याचे ध्येय तिने उराशी बाळगले आणि चीनमधल्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत तिने भारताचे नाव उंचावले. एकदा नाव उंचावले की लोकं मग डोक्यावर घेतात, तसे तिच्या बाबतीतही घडले आणि आता तिने याच क्षेत्रात करीअर करायचे ठरवले आहे. चीनमधली स्पर्धा जिंकल्यानंतर आता तिला खुणावते आहे ती विश्व अजिंक्यपद स्पर्धा.
आपल्या समाजाचा पूर्वीचा दृष्टिकोन या खेळाबाबत सकारात्मक नक्कीच नव्हता, पण आता मी आणि देशातील काही महिला जिंकल्यावर मात्र लोकांच्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल झालेला आहे. महिला आणि ती शरीरसौष्ठव खेळात कशी काय सहभागी होऊ शकते, असं म्हणत काही जणं भुवया उंचावायचे. पण आता या खेळाचा प्रसार झाल्याने आताचे चित्र सकारात्मक आहे. मला माझ्या वडिलांनीही यासाठी विरोध केला होता. पण चीनमधली स्पर्धा जिंकले आणि त्यांचा विरोध मावळला. आता या स्पर्धामध्ये बऱ्याच युवती येत आहेत. मलाही आता वेध लागले आहेत ते विश्व अजिंक्यपद स्पर्धेचे. या स्पर्धेत जिंकून मला ऑलिंपिया या जगातील प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जायचे आहे. या खेळात देशाचे नाव उंचावावे हीच माझी इच्छा आहे, असे झाल्यास भारतात या खेळाला चांगले दिवस येतील असे करुणा सांगत होती.
शरीरसौष्ठवमध्ये बऱ्याच संघटना होत्या आणि त्याचा फटका खेळाला आणि खेळाडूंना बसत होता. पण आता मात्र भारतीय क्रीडा मंत्रालयाने एका असोसिएशनला मान्यता दिल्याने खेळातील राजकारण कमी होईल, असे तिला वाटते. पण आता मान्यता मिळाल्यावर सरकारने या खेळाला पुरेसा निधी द्यायला हवा, हे सांगायलाही करुणा विसरत नाही.
आम्ही जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धाना जातो, तेव्हा विदेशातील शरीरसौष्ठवपटूंना मिळणाऱ्या सुविधा पाहून थक्क होतो. विकसित देश जाऊ देत, पण नेपाळ, म्यानमारसारख्या देशातील शरीरसौष्ठवपटूंना सर्व सुविधा मिळतात. त्यांना काय हवे, काय नको हे पाहण्यासाठी त्यांच्या बाजूला प्रशिक्षकांबरोबर सपोर्ट स्टाफचा गराडा असतो. नेमकी याच्या उलट परिस्थिती आमच्याकडे असते. आमच्याकडे बघायला कोणीच नसते. आमच्या डाएटपासून व्यायामाचा सर्व खर्च आम्हालाच करावा लागतो. आता असोसिएशनला सरकारची मान्यता मिळाली आहे, त्याचबरोबर सरकारने शरीरसौष्ठवपटूंसाठी निधी द्यायला हवा आणि तो शरीरसौष्ठवपटूंपर्यंत पोहोचायला हवा. आपला देश जर कुठल्या स्पर्धामध्ये मागे पडत असेल तर ते अर्थकारण असेल. चीनमधल्या स्पर्धेसाठी माझ्याकडेही पैसे नव्हते. अखेर मी माझे सोन्याचे दागिने गहाण ठेवले आणि पैसे जमवले. गेली तीन वर्षे मी या स्पर्धेसाठी सराव करत होते, त्यानुसार टाईट घेत होते, तो खर्च करताना नाकी नऊ आले होते. त्यानंतर माझ्याकडे या स्पर्धेसाठी पैसेच शिल्लक राहिले नाहीत आणि त्यामुळेच मला हे पाऊल उचलावे लागले. गेली तीन वर्षे मी जी मेहनत घेत आहे, ती वाया जायला नको हा विचार करून मी हा निर्णय घेतला, असे करुणा सांगत होती.
करुणा खरं तर फिटनेससाठी क्लासेस घ्यायची; पण शरीरसौष्ठव स्पर्धेत आपण उतरावं असं तिला वाटतं नव्हतं, याबद्दल सांगताना करुणा म्हणाली की, २००८ साली माझ्या क्लासमधल्या एका विद्यार्थ्यांने एक मासिक आणलं होतं, ते चाळण्यासाठी मी उचललं. तेव्हा त्याला मासिकाच्या कव्हरवर एका बाईचा फोटो होता आणि त्यावर लिहिलं होतं- ‘मदर ऑफ सिक्स.’ सहा मुलांची आई जर एवढी फिट असू शकते आणि महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत उतरू शकते तर मी का नाही, हा विचार मी त्या वेळेला केला. त्यानंतर मीही मासिकं नियमित वाचायला लागले आणि मला त्याबद्दल माहिती मिळायला लागली. चीनमधली स्पर्धा २०१२ मध्ये होणार असली तरी मी त्याची सुरुवात मार्च २००९ पासून करायला सुरुवात केली. या स्पर्धेत चार विविध गट असतात. त्यांची माहिती घेऊन माझे शरीर नेमके कशासाठी सूट होईल, याचा विचार मी केला आणि फिटनेस व फिगर, असे दोन गट निवडले. त्यानुसार मी व्यायाम करायला सुरुवात केली. या दोन्ही प्रकारांसाठी कार्डिओ आणि जिम्नॅस्टिक या दोन गोष्टींवर मेहनत घ्यायची ठरवली. दररोज मी अथक व्यायाम करत गेले. शरीरसौष्ठव या खेळात व्यायामाबरोबर आहारालाही तेवढेच महत्त्व आहे. त्यामुळे कमीत कमी तेलकट पदार्थ खाण्याचे मी ठरवले. स्पर्धेच्या पूर्वीचा एक महिना सर्वासाठीच महत्त्वाचा असतो. त्यामुळे त्या एका महिन्यात शरीराची काळजी घेतली. कारण या कालावधीत तुमच्या शरीरातले ‘फॅट्स’ कमी दिसायला हवेत, तसे झाल्यावरच तुमच्या मसल्स अधिकाधिक चांगल्या दिसतात. त्यामुळे या साऱ्या गोष्टींची माहिती घेऊन मी त्यानुसार माझा कार्यक्रम आखला.
अडचणींवर मात करत करुणाने चीनच्या स्पर्धेत भाग घेतला आणि आता यामध्ये करीअर करायचं तिने ठरवलं आहे. भविष्यात नेमकं तुला काय करायचं आहे, याबाबत विचारता करुणा म्हणाली की, ही तर माझ्या करीअरची सुरुवात आहे. चीनमधल्या स्पर्धेत मला चागलं यश मिळालं, त्यामुळे माझा हुरूप वाढला आहे. आता विश्व अजिंक्यपद स्पर्धा जिंकायची आहे. फक्त एक वर्ष नाही तर तर मला ५-६ वर्षे या स्पर्धेवर अधिराज्य गाजवायचं आहे. माझ्याकडून देदीप्यमान कामगिरी झाली की त्यानंतरच मी समाधानी होईन. पण जर का स्पर्धा न खेळण्याचे मी ठरवले तर यानंतर या क्षेत्रात येणाऱ्या युवतींना मी नक्कीच मार्गदर्शन करेन. कारण या खेळात आपल्या देशाचं नाव मोठं व्हावं, हीच माझी सदैव इच्छा राहिलेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा