|| वेदवती चिपळूणकर

ऑस्कर, मेट गाला असो किंवा कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असो. इथल्या रेड कार्पेटवर कलाकारांकडून केली जाणारी फॅशन मोठय़ा प्रमाणावर तरुणाईकडून फॉलो केली जाते. एरव्ही बॉलीवूडपटांमध्ये फॅशनसाठी फारसा वाव नसलेल्या अभिनेत्री इथल्या रेड कार्पेटवर फॅशनच्या बाबतीत धाडसी प्रयोग करताना दिसतात. मात्र या वेळी कानच्या रेड कार्पेटवर फॅशनच्या बाबतीत दीपिका, सोनम, ऐश्वर्यापासून नवख्या हीना खानपर्यंत सगळ्यांनीच सावधगिरी बाळगत धाडसी प्रयोगांना दूर ठेवले..

गेल्या आठवडय़ात ‘मेट गाला’ची प्रचंड चर्चा झाली. त्यातल्या लुक्सवरून कुठे कौतुक तर कुठे ट्रोलिंग झालं. मेट गाला हा सोशल इव्हेन्ट असला तरी त्याची चर्चा ही त्याच्या सोशल उद्दिष्टांपेक्षा तिथे येणाऱ्या सेलेब्रिटींच्या लुक्स आणि फॅ शनमुळेच नेहमी होत असते. ‘मेट गाला’नंतर लगेचच येणारा दुसरा जागतिक लक्षवेधी इव्हेन्ट म्हणजे ‘कान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’. बॉलीवूडमधून सुरुवातीला केवळ ऐश्वर्या राय बच्चन हिने कानच्या रेड कार्पेटवर पाऊ ल ठेवलं होतं. बॉलीवूडचं जागतिक महत्त्व वाढायला लागल्यापासून ऐश्वर्याच्या पाठोपाठ एकेक करत दीपिका पदुकोण, कंगना राणावत, प्रियांका चोप्रा, सोनम कपूर ही या रेड कार्पेटवर फॅ शनेबल अवतारात झळकणारी रोजची मंडळी झाली आहे.या वर्षी तर हुमा कुरेशी, डायना पेण्टी आणि हीना खान यांनीही टेचात ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ला हजेरी लावली. यंदाच्या ‘मेट गाला’च्या झालेल्या तुफान चर्चेनंतर पाठोपाठच्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये या तारका काय फॅ शन करणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं.

रेड कार्पेटवरच्या या फॅ शनचा सर्वसामान्यांवर मोठा प्रभाव आहे. याआधी कान फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्याने जांभळी लिपस्टिक लावली होती म्हणून तिला मोठय़ा प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं, मात्र आज बाजारपेठेत अशाच रंगांच्या लिपस्टिक्सची चलती आहे. त्यामुळे इथे कलाकारांना फॅ शनच्या बाबतीत नवनवे प्रयोग करायला वाव मिळतो आणि त्यांचे ते प्रयोग यशस्वी ठरले तर ते लगेचच सर्वसामान्यांकडूनही फॉलो के ले जातात. मात्र या सगळ्या प्रक्रियेदरम्यान ट्रोलिंगचं आव्हान कडवं असतं. या वर्षीही कानची सुरुवात होते आहे हे लक्षात येताचट्रोलर्सनी मीम्स बनवायला टेंप्लेट्स तयारच ठेवल्या असतील. मात्र दीपिका, प्रियांका, कंगना या सगळ्यांनी पहिल्या दिवसाच्या पहिल्या लुकमध्येच ट्रोलर्सचीच सरळ सरळ फजिती केली. ऐश्वर्या राय बच्चन, सोनम कपूर, डायना पेण्टी ही मंडळी अजून फेस्टिव्हलला पोहोचली नव्हती. त्यामुळे सोनम कपूरला नेहमीच केलं जातं तसं यंदा तरी ट्रोल करण्याची संधी तिच्याकडून मिळेल, अशी भाबडी आशाही तिच्या पहिल्या लुकनंतर मावळली. बॉलीवूडच्या या अभिनेत्रींसाठी ट्रोल न होऊ  देता ड्रामॅटिक लुक डिझाइन केले गेले आणि सगळ्या तारकांनी ते सहजपणे कॅरीही केले.

कान फेस्टिव्हलमध्ये पहिल्या टप्प्यात चर्चेत आल्या त्या प्रियांका, दीपिका आणि कंगना.. काळ्या रंगाचा डॅझल ड्रेस घालून मेकअपलाही कोणता एक्स्ट्रा ड्रामा न देता प्रियांकाने एण्ट्री घेतली. मात्र प्रियांकाच्या फॅन्सना काही तिचा हा लुक फारसा आवडला नसल्याचं सोशल मीडियावर दिसलं. दीपिकाने काळा आणि पांढरा डीप नेकलाइन असलेला गाऊन, हाय पोनी आणि ड्रामॅटिक आय मेकअपमध्ये रेड कार्पेट गाजवलं. तर कंगनाने गोल्डन साडी, वेस्ट बेल्ट आणि ऑपेरा ग्लोव्हज् (इव्हनिंग ग्लोव्हज्) असा पूर्णत: इंडो – वेस्टर्न लुक घेऊन फॅन्सना प्रेमात पाडलं. प्रियांकाच्या दुसऱ्या लुकचं इन्स्पिरेशन ‘लेडी डायना’ होती, अशी चर्चा आहे. पूर्ण पांढऱ्या रंगाचा सिंगल स्लिव्ह असलेल्या या ड्रेसने प्रियांकाच्या फसलेल्या पहिल्या लुकला विसरायला लावलं. कंगना दुसऱ्या लुकमध्ये एका पँटसूटमध्ये दिसते ज्यात कॉर्सेटचा वापर केला आहे. मात्र तिच्या पहिल्या लुकच्या तुलनेत हा लुक काहीसा कमी पडलेला दिसतो. दीपिकाच्या नंतरच्या लुकमध्ये मात्र ती एकदम समर फ्रेश दिसली. ब्लॅक आणि नियॉन ग्रीन असं कॉम्बिनेशन असलेल्या या लुकसोबत तिने नियॉन ग्रीन रंगाचेच कॅट- आय सनग्लासेसही पेअर केले, ज्यामुळे तिच्या लुकमध्ये ड्रामॅटिक अ‍ॅडिशन झाली. लाइम ग्रीन कलरच्या रफल्ड फुल स्लीव्हज् असलेल्या, बेज कलरच्या कॉलर-बो आणि बेल्टेड वेस्ट असलेल्या गाऊनसोबत तिने बेज कलरच्या हेडबँडला प्राधान्य दिलं. तिचा हा लुक त्यातल्या त्यात जास्त धाडसी आणि प्रयोगशील ठरला.

पहिल्या दिवसापासून या तीन बॉलीवूड स्टार्ससोबतच चर्चेत राहिली ती टीव्ही स्टार हीना खान. प्लंजिंग नेकलाइन असलेला आणि सिक्वेन्स असलेला सिल्व्हर शीअर गाऊन घालून तिने रेड कार्पेटवर पदार्पण केलं. दुसऱ्या लुकमध्ये पर्पल कॉलर ड्रेस आणि ब्लॅक वेस्ट बेल्टसोबत पेअर करून समर व्हाइब्ज तिने फॅन्सना दिल्या. या सगळ्या लुक्सचा परिणाम ओसरत नाही तोपर्यंत सोनम कपूर, हुमा कुरेशी, ऐश्वर्या राय बच्चन आणि डायना पेण्टी याही रेड कार्पेटवर अवतरल्या आणि फॅ शनची चर्चा नव्याने सुरू झाली.

सोनम कपूरने पहिल्याच लुकमध्ये रेड टय़ूब – गाऊन आणि शीअर केप या पेअरिंगने बोल्ड आणि एलिगंट स्टेटमेंट केलं. नंतरच्या अबु जानी – संदीप खोसला यांनी डिझाइन केलेल्या तिच्या महाराणी लुकने एथनिक वेअरला कानच्या रेड कार्पेटवर आणलं. त्याच वेळी ऐश्वर्याने स्नेक स्किन टेक्श्चर असलेल्या गोल्डन ग्रीन कलरच्या फिश टेल गाऊ नमध्ये मुलीसोबत एण्ट्री घेतली. त्यानंतर मात्र नेहमीप्रमाणे ऐश्वर्याच्या लुक्सचीच चर्चा सुरू झाली. व्हाइट मफलर नेक गाऊन, रेड-व्हाइट स्ट्राइप्ड फ्रॉक, डेनीम पँट-जॅकेट अशा सगळ्या लुक्सवर मेकअप मात्र तिने मिनिमल ठेवला होता. आय मेकअप सोडता कोणत्याच एलिमेंटमध्ये विशेष ड्रामा दिसून आला नाही. दुसऱ्या टप्प्यात चर्चेत आलेली तिसरी व्यक्ती म्हणजे डायना पेण्टी. रफल्ड बॉल गाऊनमध्ये रेड कार्पेटवर दिमाखात एण्ट्री घेत तिने तिचा कान डेब्यू गाजवला. त्यानंतर हुमा कुरेशीनेही गौरव गुप्ताच्या सिल्वर फ्लोअर लेंग्थ गाऊनमध्ये रेड कार्पेटवर फोटोग्राफर्सचं लक्ष वेधून घेतलं.

मेट गालाच्या एक्स्परिमेंटल लुक्सनंतर कान फिल्म फेस्टिव्हलमध्येही असेच धाडसी फॅ शन प्रयोग दिसतील, अशी लोकांची अटकळ होती. प्रत्यक्षात चाहत्यांच्या उत्सुकतेला अगदीच निराश न करता ट्रोलिंगला जराही संधी मिळणार नाही अशा पद्धतीची फॅ शन या अभिनेत्रींनी केली. आपली प्रयोगशीलता धोक्यात घालायची नाही, थोडे हटके लुक्स आणि फॅ शन ट्राय करायचे, मात्र ते फसणार नाही याची काळजी घेतबॉलीवूडच्या एलिगंट लेडीज रेड कार्पेटवर अवतरल्या. पँटसूटपासून ते साडीपर्यंत सगळ्या प्रकारची आऊ टफिट्स यंदा कानमध्ये बघायला मिळाली. मेकअपच्या बाबतीत अत्यंत खबरदारी घेतल्यासारखा सगळ्याच सेलेब्रिटींचा मेकअप माइल्ड आणि सटल होता. लुकमधले अनेक एलिमेंट ड्रामॅटिक न करता केवळ मेकअप किंवा त्यातलाही एखादाच स्पेसिफिक एलिमेंट ड्रामॅटिक करून या बॉलीवूड स्टार्सनी नेहमीच्या भडक मेकअप आणि लाऊड आऊ टफिट्सना चॅलेंज केलं आहे, असं म्हणायला हरकत नाही.

viva@expressindia.com