प्रसिद्ध मॉडेल आणि बॉलिवूडची स्टाइल दिवा म्हणून ओळखली जाणारी मलाइका देतेय स्टाइल टिप्स खास व्हिवाच्या वाचकांसाठी.
मलाइका अरोरा खान
फॅशन म्हणजे छान राहणं, प्रेझेंटेबल राहणं, आपला आत्मविश्वास उंचावेल असे कपडे, दागिने, अॅक्सेसरीज वापरणं. फॅशन म्हणजे कलात्मकता. छानछौकीत राहणाऱ्यांची चैन म्हणजे फॅशन, ही कन्सेप्ट कधीच मागे पडली आहे. स्टाइलिश राहणं ही आता काळाची गरज आहे. फॅशनेबल किंवा स्टाइलिश राहण्यासाठी तुम्ही माझ्यासारख्या मॉडेल असायला पाहिजे किंवा शो बिझनेसमध्ये असला पाहिजेत असं नाही. तुम्ही कुठे पार्टीला जाणार असलात, मित्र-मैत्रिणींसोबत फिरायला जाणार असलात, रोजच्या प्रमाणे कॉलेजला किंवा ऑफिसमध्ये कामाला जरी जाणार असलात तरीही व्यवस्थित राहणं, प्रेझेंटेबल असणं हे आवश्यकच आहे. आपलं व्यक्तिमत्त्व खुलवण्याचा सगळ्यांना अधिकार आहे आणि त्यासाठी प्रयत्न करण्यात काहीच गैर नाही. तुमचं व्यक्तिमत्त्व चारचौघांत उठून दिसण्यासाठी थोडा विचार करून ड्रेसिंग आणि अॅक्सेसरीज निवडल्या पाहिजेत.
आपल्याला काय चांगलं दिसेल याचा विचार करून ड्रेसिंग करणं म्हणजेच स्टाइलिंग. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडावा यासाठी हल्ली असं स्टाइलिंग आवश्यकच बनलंय. तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे, व्यक्तिमत्त्व खुलवणारे कपडे असले की, बघणाऱ्यावर छाप पडणारच आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुमचा आत्मविश्वास यामुळे वाढतो. कपडय़ांएवढंच महत्त्व हल्ली अॅक्सेसरिज, मेक-अप आणि हेअर स्टाइलिंग याला आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम तुमच्या लुकवर होत असतो. म्हणूनच परफेक्ट लुकसाठी कपडे, दागिने, इतर अॅक्सेसरिज, मेकअप, हेअर स्टाइल या सगळ्याचा एकत्र विचार करणं आवश्यक आहे. यालाच स्टाइलिंग असं म्हणता येईल.
नुसतेच फॅशनेबल कपडे घातले की स्टाइल होत नाही. ते व्यवस्थित कॅरी करता येणं आवश्यक आहे. तरच त्यातलं स्टेटमेंट अधोरेखित होतं. आता असं स्टाइल स्टेटमेंट कसं करायचं यासाठीच मी तुम्हाला ‘व्हिवा’च्या माध्यमातून टिप्स देणार आहे. तुम्हाला स्टाइलिश बनवण्यासाठी मी माझ्या बेस्ट टिप्स देईन. तुमच्या परफेक्ट लिटिल ब्लॅक ड्रेसबरोबर कुठल्या हिल्स चांगल्या दिसतील ते सांगणं माझं काम.. इतक्या बारीक डिटेल्सचा विचार करणं ही माझी स्टाइल आहे. पार्टी असो वा फंक्शन, कॉलेज असो वा ऑफिस.. स्टाइल मे रहने का! त्यासाठीच मी मदत करणार आहे. फॅशन, कपडे आणि स्टाइलिंग टिप्स तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी मी दर आठवडय़ाला या सदराच्या माध्यमातून तुम्हाला भेटत राहीन. बोल्ड अँड ब्यूटिफुल बनणं अवघड नाही आणि अशक्य तर मुळीच नाही. मग आहात ना तयार?
(सौजन्य : द लेबल कॉर्प)
http://www.thelabelcorp.com, http://www.theclosetlabel.com
आपल्या गर्ल्स गँगबरोबर सकाळी ब्रंचला जाणार आहात की रात्री पार्टीचा प्लॅन आहे? काय घालू, कसं दिसेल या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी स्टाइल दिवा मलाइका अरोरा-खान तुम्हाला मदत करेल. फॅशन, कपडे, हेअर, स्टाइलिंग याबाबतच्या तुमच्या शंकांना मलाइका या सदरामधून उत्तरं देईल. फॅशन आणि स्टाइलिंगविषयीचे आपले कोणतेही प्रश्न viva@expressindia.com या इमेल आयडीवर बिनधास्त पाठवा. आपलं नाव, राहण्याचं ठिकाण यांसह प्रश्न पाठवा आणि सब्जेक्ट लाइनमध्ये स्टाइलिंग बाय मलाइका असं आवर्जून लिहा.