वाचन हा अनेकांचा छंद असतो. मातृभाषेसह अन्य भाषांमधील साहित्यही अनेकांकडून सारख्याच तन्मयतेने वाचले जाते. पण वाचलेल्या पुस्तकांबाबत, आवडलेल्या पुस्तकांबाबत अधिकाराने आणि आवडीने लिखाण करण्याचे काम मात्र अभावानेच झालेले आढळते. वास्तविक, ज्यांचे वाचन उत्तम आहे, विविध विषयांवरील अनेक पुस्तके वाचणे हा ज्यांच्या सवयीचा भाग आहे, अशांनी विद्यार्थ्यांना, तरुणांना आणि नववाचकांना मार्गदर्शनपर ठरतील असे लिखाण करणे गरजेचे आहे. आणि म्हणूनच आपल्या निवडलेल्या क्षेत्रांत अत्युच्च उंची गाठत असतानाच, आपल्या वाचनाबद्दल आणि आपल्याला आवडलेल्या पुस्तकांबद्दल आवर्जून लिखाण करणाऱ्यांचे  म्हणूनच अभिनंदन केले पाहिजे.
शेतकरी संघटनेचे प्रणेते आणि आपल्या आयुष्याचा पूर्वार्ध भारतीय पोस्ट सेवेत व्यतीत केलेले शरद जोशी यांनी आपल्याला आवडलेल्या पुस्तकांचे संकलन ‘जग बदलणारी पुस्तके’ या संग्रहात केले आहे. मूळात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना जागतिकतेचे भान यावे, या उद्देशाने हे लेख आपल्या नियतकालिकातून जोशी यांनी लिहिले. आणि विशेष म्हणजे, शेतकरी संघटनेच्या प्रशिक्षण वर्गात येणाऱ्या प्रशिक्षणार्थीच्या दृष्टीकोनात आमूलाग्र बदल झाल्याचे जोशी यांना आढळून आले. आणि म्हणूनच स्वातंत्र्य या संकल्पनेबाबत स्वारस्य असलेल्या सर्वानाच उपयुक्त ठरावे या हेतूने या लेखांचा पुस्तकरूपी संग्रह प्रसिद्ध करण्यात आला.
या संग्रहात सुमारे २५ लेखांचा समावेश आहे. यात ऑस्ट्रियन लेखक हायेक यांच्या ‘गुलामगिरीची वाट’ सारख्या १९४४ सालच्या पुस्तकापासून पंतप्रधान, मंत्रीमंडळ आणि सचिव यांच्यातील जुगलबंदीचे किस्से त्यातल्या राजकारणासह विनोदी धाटणीने खुलवलेल्या ‘येस मिनीस्टर’ सारख्या पुस्तकांचा समावेश आहे. शेतकरी संघटनेचे विचार मूलत स्वातंत्र्यप्रेमी आणि खुल्या बाजारपेठेचे समर्थन करणारे आहेत. शिवाय समाजवादी विचारसरणीवर थेट आणि विवेकनिष्ठ टीकाही करणारे आहेत. त्याच अनुषंगाने समाजवादी व्यवस्थेचा अधपात अपरीहार्य आहे, अशी संकल्पना मांडण्यात आलेल्या पुस्तकांचा समावेश स्वाभाविकपणेच या पुस्तकात केला गेला आहे. यामध्ये जॉर्ज ऑरवेल या भारतात जन्मलेल्या लेखकाच्या ‘अ‍ॅनिमल फार्म’ या रुपककथेच्या पुस्तकाचा, तसेच सर ऑर्थर कोस्लर यांच्या लेखसंग्रहाचा समावेश आहे.
शरद जोशी यांच्या पुस्तकांच्या निवडीत सापडणारा एकसमान धागा म्हणजे त्या पुस्तकांचा आर्थिक गणितांशी असलेला संबंध. पण हा संबंध जोडताना गुणाकारासारख्या संकल्पनांचा आणि शोषणाचा वेगळाच आयाम प्रस्तावनेतून समोर येतो. मानवी जीवनाचा विकास कोमकोणत्या घटकांमुळे होतो याचे वर्णन करणारे काही लेख अर्थात पुस्तके या संग्रहात सुचविण्यात आली आहेत. पृष्ठ क्रमांक १०४ वर असंतुष्ट मधमाशांची परीकथा हा लेख आहे. मँडेलिव्ह या लेखकाने प्रामाणिक झालेल्या पण अंतकरणात भामटेगिरी जपलेल्या व्यक्तींचा रुपकात्मक आविष्कार वर्णिला होता. त्या पुस्तकावरील शरद जोशी यांचे भाष्य आणि अन्वयार्थपर लेख आपल्याला अंतर्मुख करणारा तसेच विचारास चालना देणारा आहे.
असाच एक लेख म्हणजे, मार्क्‍सवादाचा पाडाव आणि स्त्रीप्रश्न! आपल्याला कार्ल मार्क्‍स माहिती असतो पण त्याच्या विचारधारेचे विविध आयाम मांडणाऱ्या फ्रेचरीक एंगल्सचे नांव मात्र आपल्या गावी नसते. त्या एंगल्सची उंची या लेखात आपल्याला जाणवते. पुस्तकातील शेवटचा लेख रोझा लक्झेंबर्ग या क्रांतिकारी साहित्यिकेवर बेतलेला आहे. एकूणच ग्रामीण भारतातील शेतकऱ्यांना जागतिक परिस्थितीचे, जागतिक नेतृत्वाचे, जागतिक लेखनाचे, स्वातंत्र्याच्या विविध आयामांचे भान यावे हाच मुख्यत शरद जोशी यांचा उद्देश असल्याचे दिसून येते.
अनेकदा निवडलेल्या पुस्तकांपेक्षा न निवडलेल्या पुस्तकांबाबत वादंग निर्माण होतात. पण निवडकर्ते स्वतच आपण कोणती पुस्तके निवडू शकलो असतो पण निवडली नाहीत यावर भाष्य टाळतात. शरद जोशींनी मात्र पुस्तकात ‘सेल्फिश जीन’ आणि ‘गॉड जीन’ या दोन पुस्तकांचा समावेश करायची इच्छा होती, मात्र ती अपूरीच राहिली, असे प्रांजळपणे नमूद केले आहे. एकूणच वैचारीक पण त्याचवेळी सामान्य माणसाच्या ज्ञानाचे क्षितीज विस्तारणारे असे हे पुस्तक !
पुस्तक – जग बदलणारी पुस्तके
लेखक – शरद जोशी
पृष्ठे – १३०
मूल्य – १००/-
प्रकाशक – जनशक्ती वाचक चळवळ

Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Rare book Exhibition organized by BNHS
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त
Chandrakant Patil appeal to Pune residents regarding the book festival Pune news
नागपूरचा की पुण्याचा पुस्तक महोत्सव मोठा करायचा हे तुम्ही ठरवा- चंद्रकांत पाटील यांचे पुणेकरांना आवाहन
pune pustak Mahotsav latest news
‘लिटफेस्ट’च आता ग्रंथतारक…
pune pustak Mahotsav marathi news
‘पुणे पुस्तक महोत्सव’ का गाजला?
Loksatta chaturang Life Power Center Pleasure school Fear of Pain
सांधा बदलताना : जग हे आनंदशाळा
Story img Loader