‘सिक्रेटस् ऑफ सक्सेस’ हा म्हटलं तर साधासा लेखसंग्रह किंवा म्हटलं तर अवघ्या ९०-९५ पानांमध्ये माणसाने यशस्वी होण्यासाठी काय-काय करावे याची मांडलेली समीकरणे आहेत. ‘मन षष्ठाणि इंद्रियाणि’ हा भारतीय तत्वज्ञानाचा गाभा आहे. या मनाचा वेध कसा घ्यावा आजवर अनेक जणांनी पानेच्या-पाने लिहिली आहेत. मात्र इच्छा म्हणजे काय, तिचे उगमस्थान कोणते, इच्छांवर नियंत्रण मिळवता येते का, मिळवायचे झाल्यास कसे मिळवायचे अशा उत्स्फुर्त शंकांची उत्तरे देणारा एक स्तंभ ई.आर. थॉमसन नियमितपणे लिहित होते. अवघ्या २०० ते २५० शब्दांमध्ये एखाद्या मूलभूत प्रश्नाच्या मूळापर्यंत जाणे, त्या समस्येवरील उपाय शोधणे आणि तो उपाय सामान्य माणसाला समजेल इतक्या सोप्या भाषेत मांडणे हे सारे थॉमसन यांनी सातत्याने आणि सहजसुलभ शैलीत केले आहे. ‘सिक्रेटस् ऑफ सक्सेस’ हा याच लेखांचा संग्रह आहे.
मन एकाग्र करण्याची सोपी क्लृप्ती कोणती या प्रश्नाचे उत्तर एकूण चार लेखांमध्ये देण्यात आले आहे. आत्मपरीक्षण, कोणतीही गोष्ट रंजक करण्याची वृत्ती आणि प्रयत्नामागील सातत्य अशी साधी-सोपी आणि व्यावहारीक त्रिसूत्री थॉमसन यांनी दिली आहे. युद्ध जिंकणारे आधी ते युद्ध मनांत जिंकतात आणि नंतर त्या मानसिक विजयाची पुनरावृत्ती ते प्रत्यक्ष रणांगणावर करतात असं म्हटलं जातं. थॉमसन यांनी ‘चिंतनात यशाचे चित्रिकरण’ या मंत्राद्वारे हेच सुचविले आहे. मात्र अनेकदा आपल्याला भविष्यात मिळणाऱ्या यशाचे चित्रिकरण (आधुनिक मानसशास्त्रातील व्हिज्युअलायझेशनचे तंत्र) करताना आपण स्वप्नरंजक होण्याची शक्यता दाट असते. ती कशी टाळावी हे सुद्धा समजणे महत्त्वाचे असते. थॉमसन यांनी या अनुषंगाने दैनंदिन व्यवहारातील उदाहरणे घेत स्वप्नरंजकता टाळण्याचा मुद्दा स्पष्ट केला आहे.
आपल्यात गुणवत्ता असूनही केवळ संकोची स्वभावामुळे ते समाजासमोर येऊ शकत नाहीत. कित्येकदा आपली मते मांडण्याच्या ओघात आपण दुसऱ्यांचे मत पूर्ण एकाग्रतेने ऐकून घेत नाही. आपल्याला अनेक गोष्टी ‘दिसतात’ मात्र आपण त्याच गोष्टी ‘पहात’ नाही. अशा मानवी स्वभावातील विविध व्यंगावर अचूक बोट ठेवत त्यापासून थॉमसन आपल्याला परावृत्त करतात.
काही वेळा सातत्याने यश मिळू लागते. पण त्याचाही मानसिकतेवर वेगळाच परीणाम होण्याची शक्यता असते. ती म्हणजे अती यशाने येणारे वैफल्य. क्षणभर थोडा चौकटीबाह्य़ वाटणारा हा विचार पण याचे मानसशास्त्रीय विश्लेषण करीत लेखकाने यश मिळणे आणि ते टिकवणे किती अवघड असते याचे भान आल्यावाचून रहात नाही.
परीक्षांचा ‘मोसम’ आला की विद्यार्थी देहभान हरपून वाचन, पाठांतर आणि सरावाच्या मागे लागताना आपण पहातो. अभ्यासाचे हे प्रमाण इतके विसंगत असते की अनेकदा परीक्षा कठीण असो किंवा सोपी, पण विद्यार्थी स्वतसाठी मोकळा वेळही ठेवत नाहीत. या पुस्तकामध्ये स्वतचे छंद – स्वतच्या आवडीनिवडी यांच्यासाठी वेळ ठेवण्याचे शास्त्रीय कारण सांगितले गेले आहे. आयुष्यातील ‘सुट्टीचे’ यशाशी असलेले गणित लेखकाने सहज उकलून दाखविले आहे.
एकूणच स्वतविषयी अंतर्मुख करावयास लावणारे आणि त्याचवेळी यशाची सूत्रे मांडणारे असे हे सुंदर पुस्तक.

पुस्तक – सिक्रेटस् ऑफ सक्सेस
लेखक – ई.आर. थॉमसन
पृष्ठे – ९२

Story img Loader