‘सर्व पद्धतींचा पाया, मग त्या सामाजिक असोत किंवा राजकीय, हा चांगुलपणावर आधारलेला असतो. देशाच्या संसदेने अमका-तमका कायदा पास केला म्हणून कोणताही देश महान किंवा चांगला ठरत नाही, तर त्या देशातील माणसे महान आणि चांगली असतील तरच त्या देशाला थोरवी प्राप्त होते’, पुस्तकाची सुरुवातच या शब्दांनी.. अत्यंत मोजक्या-स्पष्ट आणि प्रेरक शब्दांत भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.कलाम यांनी अदम्य जिद्द हे पुस्तक लिहीले आहे. आपल्या प्रत्येकातीलच ‘मला’ या देशासमोरच्या समस्या ज्ञात असतात, त्यांची मुळेही विचार करता दिसू लागतात, त्या प्रश्नांच्या निर्मात्यांमागील हेतूही कधी जाणवतात.. मग एक औदासीन्य येत जातं, की जाऊ देच , मी काही ही व्यवस्था बदलू शकत नाही. मी एकटा काय करणार? अदम्य जिद्द हे या प्रश्नाचं नेमकं उत्तर मांडतं.
एकूण १४ प्रकरणांमध्ये हे पुस्तक मांडले आहे. स्फूर्तिदायी व्यक्तित्वे, माझे शिक्षक, शिक्षण अभियान, सर्जनशीलता आणि नव उपक्रम, कला व साहित्य, चिरंतन मूल्ये, विज्ञान आणि अध्यात्म अशा नानाविध प्रकरणांमधून डॉ.कलामांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या ऋजुतेमागील- परिणामकारकतेमागील आणि आकर्षकतेमागील रहस्य उलगडले आहे. कोणत्या व्यक्तींपासून स्फूर्ती घ्यायची, नेमकी का घ्यायची, स्फूर्तिदात्याची निवड कशी होत जाते अशा प्रश्नांची उत्तरे पहिल्या प्रकरणात मिळतात.
आपल्या शिक्षकांचे आपल्या जडणघडणीतील योगदान डॉ.कलामांनी दुसऱ्या प्रकरणांत कृतज्ञतेने नोंदविले आहे. तिसरे प्रकरण शिक्षक या पेशातील व्यक्ती देशासाठी काय करू शकते याचा तपशील त्यांनी मांडला आहे. सर्जनशीलता आणि नवउपक्रम या प्रकरणांत कलाम म्हणतात, ‘सर्जनशीलता म्हणजे सर्वाना दिसते तीच गोष्ट पाहणे पण त्या संदर्भात थोडा वेगळा विचार करता येणे – वेगळी दृष्टी समाजाला देता येणे’. आपल्या प्रत्येकातच सर्जनशीलतेचा झरा वहात असतो, पण आपल्याला तो का सापडत नाही अन् तो कसा शोधावा याचा विचार कलाम देतात.
बदलत्या वैश्विक परिस्थितीत प्राचीन अन् चिरंतन मूल्यांचे महत्त्व जराही कमी झालेले नाही. आजही समाज आणि देश यांची प्रगती या शाश्वत मूल्यांवर अहलंबून आहे असे सांगत कलाम आजही पापभीरूपणे आयुष्य जगणाऱ्या सामान्य नागरिकांचे मनोबल उंचावतात किंबहुना आपण योग्य दिशेत आहोत याचा आत्मविश्वास तयार करतात. याच अनुषंगाने कलामांनी लिहिलेले काव्य अंत:करणावर कोरून ठेवावे असेच आहे.
विकासाच्या प्रक्रियेबाबात हल्ली आपण प्रत्येकच जण तज्ज्ञ असल्यासारखे बोलतो, पण त्या पलीकडे जात ‘उद्याच्या नागरिकां’ची ताकद आणि देशाची भिस्त त्यांच्यावरच का आहे, याची सकारण मांडणी आणि ही ताकद प्रवाहित करण्यासाठी काय करायचे याचा कृती कार्यक्रम कलामांनी मांडला आहे. सातत्याने राजकीय पक्षांचेच जाहीरनामे ऐकणाऱ्या आपल्या मनाला प्रथमच नागरिकांचा जाहीरनामा असू शकतो याचे भान कलाम तो मांडत देतात. विद्यार्थ्यांसाठी प्रतिज्ञा, युवा गीत ही काव्ये आपल्याला ‘मी काय करू’ याचे थेट उत्तर देतात.
जगाचा प्रवास ज्ञानाधिष्ठिततेकडे होऊ लागला आहे. अशा ज्ञानसंपन्न समाजाच्या निर्मितीसाठी नेमके काय करावे लागेल, ज्ञानसंपन्न समाज कोणाला म्हणता येईल, त्याचे घटक कोणते, पारंपारीक ज्ञान आणि तंत्रज्ञान याची सांगड कशी घालायची याची उत्तरे डॉ.कलाम आपल्याला देतात. विशेष म्ह़णजे यात कोठेही अहंगंड नाही, क्लिष्टता नाही आणि ‘हे मला जमणार नाही’ असं वाटावं असं एकही आव्हान त्यात नाही. विकसित भारताची उभारणी आणि सुजाम नागरिकत्व या प्रकरणांमध्ये त्यांनी या परस्परांतील संबंध उलगडून दाखवला आहे. समृद्ध देश आणि समृद्ध नागरिक यांच्यातील सेतू त्यांनी जोडला आहे. गरज आहे ती फक्त आपण जाणीवपूर्वक हे करण्याची. आपल्या जाणिवा टोकदार करीत जाणारे आणि संवेदनशीलतेला खतपाणी घालणारे म्हणूनच व्यक्तिमत्त्व विकासाचे हे अप्रतिम पुस्तक.
पुस्तक – अदम्य जिद्द
लेखक – डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम
प्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठे – २२८
मूल्य – २०० रु.