काही माणसे चौकटी मोडायचे ठरवतात. आपल्या चौकटी आपणच आखतात. स्वप्ने पाहतात. ती जगतात. आणि स्वप्न पूर्ण करूनही दाखवतात. त्यासाठी सामाजिक आयुष्यात एकटेपणाची किंमत मोजतात. पण जिद्द सोडत नाहीत. याचेच वर्णन करणारी एक रूपककथा म्हणजे, जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल हे पुस्तक.
रूढार्थाने ज्याला व्यक्तिमत्त्व विकासाचे म्हणता येईल असे हे चौकटीतील पुस्तक नाही. एका समुद्रपक्ष्याची ही रूपककथा आहे. रोज सकाळी उठायचे, पंख पसरायचे, आकाशात उडायचे आणि कशासाठी तर फक्त आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी. हेच इतर समुद्रपक्ष्यांसारखं जोनाथन नावाच्या समुद्रपक्ष्याचंही जीवन असतं. पण आपल्या या जीवनशैलीबद्दल तो समाधानी नसतो. त्याची सतत तगमग होत असते, प्रत्येक बहुमोल क्षण फुकट घालवल्याबद्दल. त्याला ओढ असते ती जीवनाचा अर्थ शोधण्याची, उडण्यासाठी पोटाची खळगी भरण्यापेक्षाही अधिक प्रेरणादायी उद्दिष्ट शोधण्याची. म्हणून तो ठरवतो, नवनवीन क्षितिजे शोधायची. अगदी पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल.. जोनाथन हे पुस्तक म्हणजे या प्रवासाचे वर्णन आहे.
बदल ही जगातील एकमेव शाश्वत गोष्ट आहे, असे म्हटले जाते. मानवी स्वभावाचे वैशिष्टय़ हे की आपण बाकी काहीही स्वीकारायला तयार असतो, मात्र बदल स्वीकारण्यास आपण फारसे अनुकूल नसतो. इथेच सातत्याने विजयपथावर चालणारे वेगळे ठरतात. नवी गोष्ट शिकणे – तिचा सराव करणे आणि त्यामध्ये पारंगत होणे ही एक साधना आहे. साधनेत सातत्य असले की त्यात सहजता येते आणि सहजतेतूनच आयुष्याची उत्तमता साधता येते, या सूत्राभोवती पुस्तक लिहिले गेले आहे.
आपला गोष्टीतील हीरो- जोनाथन, जीवनाच्या उद्दिष्टाच्या शोधाच्या वाटेवर कसा निघतो, त्या वाटेवर त्याच्यात काय-काय बदल होतात, त्याला कसला साक्षात्कार होतो, जीवनाच्या या वाटेवर जोनाथन एकटाच असतो की आणखी कोणी असे अनेक प्रश्न आपल्याला पडत जातात आणि पुस्तकाच्या वाचनाच्या ओघात आपण या कॅरॅक्टरशी कधी एकरूप होत जातो ते कळतही नाही. अनेकदा प्रस्थापित चौकटींच्या विरोधात काही करायचे म्हटले की कळपाचे सिद्धांत अनुभवावे लागतात. बहिष्कृत व्हावे लागते, एकटेपणा सोसावा लागतो, मात्र शरीराच्या मर्यादा ओलांडून पुढे जायचेच हा ध्यास आपल्याला नतिक पाठबळ पुरवतो याचे प्रत्यंतर आपल्याला रोजच्या आयुष्यातही येत असते. फक्त आपण त्याचा श्रद्धेने पाठपुरावा करू शकतो का, हा प्रश्न असतो. निवडलेल्या क्षेत्रांत पारंगतता येत जाणे म्हणजेच मर्यादांच्या शृंखला मोडणे असते. आपल्याच मर्यादांचा विसर पडण्यातील आनंद म्हणजे स्वातंत्र्य ही जोनाथनच्या आयुष्याची विचारसरणी आहे.
जोनाथनच्या स्वातंत्र्याचं – मर्यादा ओलांडण्याच्या कसबाचं समुद्रपक्ष्यातील तरुणांना आकर्षण कसं वाटू लागतं, त्यातले काही जण कळपाच्या मनाविरुद्ध बंडखोरी कशी करतात, तिथे जोनाथन एकाच वेळी मार्गदर्शक आणि विद्यार्थी अशा दोन्ही भूमिका कशा वठवतो, मेहनतीचा ध्यास आणि जे मनापासून करायची तळमळ आहे तीच गोष्ट करण्यातील आनंद, जोनाथनला स्वातंत्र्याच्या अनुभवातून हाती लागणारं अंतिम सत्य असा सगळा प्रवास मुळातून वाचावा आणि तसा जगण्याचा प्रयत्न करावा असाच आहे.
आपण उघडय़ा डेाळ्यांनी आपल्या ध्यासाकडे चिकाटीने प्रवास केला तर उत्तमतेचा वेध घेता येतो, सर्वोच्च शिखर सर करता येते हेच जोनाथनच्या कथेचं प्रयोजन आहे. म्हणूनच या पुस्तकाचं वाचन हा एक जिवंत आणि प्रेरणादायी अनुभव ठरतो.
पुस्तकाचे नांव – जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल
मूळ लेखक- रीचर्ड बाख
अनुवाद – बाबा भांड
प्रकाशन – साकेत प्रकाशन
पृष्ठे – १२५; मूल्य – १०० रुपये 

Story img Loader