श्रीगणेशाय नम: असो किंवा ए, बी, सी, डी असो किंवा आणखी कोणती भाषा असो.. या अक्षरांशी आपली मैत्री होते. ती गिरवल्यावर पुढय़ात येतं ते पुस्तक.. कदाचित ते बाराखडीचं असेल किंवा चित्रमय ओळखीचं असेल.. या पुस्तकांनी आपला पुढं केलेला हात आपण घट्टपणं पकडून ठेवतो. विविध टप्प्यांवर भेटलेल्या या पुस्तकांच्या माध्यमातून आपण असंख्य गोष्टी कळत-नकळत शिकतो. या शब्दांचं नि ओघानंच पुस्तकांचं महत्त्व सगळ्यांच्या मनात ठसण्यासाठी नि अधिक जणांनी वाचनाकडं वळावं म्हणून ‘युनेस्कोतर्फे २३ एप्रिल हा दिवस ‘जागतिक पुस्तक दिन’ आणि ‘जागतिक प्रताधिकार दिन’ (कॉपीराइट्स डे) म्हणून आयोजित करण्यात येतो. त्यानिमित्त याविषयी जाणून घेऊया..
विल्यम शेक्सपिअरसह आणखीही काही नामवंत साहित्यिकांचे जन्मदिन किंवा मृत्युदिन २३ एप्रिल रोजी असल्यानं हाच दिवस जागतिक पुस्तक दिन आणि कॉपीराइट्स डे  म्हणून युनिस्कोनं निश्चित केला. वाचन, प्रकाशन जगत नि कॉपीराइटसंबंधी कायद्याची जाणीव लोकांना यानिमित्तानं होते. पुस्तक हा वाचक-लेखक नि भोवतालच्या जगातला एक प्रकारचा संवाद मानायला हवा. बरं, हा संवाद साधण्यासाठी कोणत्याही अटीतटी अजिबात नाहीत. फक्त वाचा नि त्या वाचनाचा आनंद घ्या. समजा, एखादी भाषा येत नसेल, तरी खट्टू व्हायचं कारण नाहीये. कारण मग मदतीला येतो तो अनुवादाचा पूल.. तो पार करताना जाणवतात ती आपल्या चौकटीपलीकडची सुखदु:खं.. मग संवेदना जागृत न झाली तरच नवल.. पुस्तकं वाचता वाचता वाचनाची भूक अधिकाधिक चाळवते. नवीन कल्पना नि सर्जनशीलतेला आपोआप दाद द्यायची सवय लागते. अशी दाद घेणारी पुस्तकं आताशा वाचायला मिळताहेत. त्याचबरोबर आधुनिक तांत्रिक सोयींमुळं कॉपीराइट्स संदर्भातले प्रश्न निर्माण होताहेत.
पुस्तक दिवसानिमित्तानं साहित्याशी निगडित स्पर्धा, पुस्तक प्रदर्शनं, मुलाखती आदी अनेक उपक्रम आखले जातात. त्यामुळं पुस्तकांचं मोल सतत अधोरेखित व्हायला मदत होते. ‘देअर इज नो फ्रेण्ड अ‍ॅज लॉयल अ‍ॅज ए बुक,’ असं अर्नेस्ट हेमिंग्वे यांनी म्हटलंय. ते एकदम करेक्ट आहे. आवडीचं पुस्तक झोपाळ्यावर बसून वाचताना किंवा कितीतरी दिवस शोधत असणारं पुस्तक अचानक लायब्ररीत दिसल्यावर होणारा आनंद अवर्णनीय असतो. शब्दांच्या या ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसेडरमुळं कितीतरी गोष्टी सोप्या होतात.
फ्रेण्ड्स, हे सगळं लिहिताना जाणवतंय की, आपण पुस्तक वाचनासाठी खरंच किती वेळ काढतोय आपल्या बिझी शेडय़ुलमधला? ही पुस्तकं फक्त तासाभराचा वेळ मागतायत. ती आपलंच जीवन समृद्ध करू पाहताहेत. ती आहेत अखंड माहितीचा स्रोत, इतिहासाचा ठसा, वर्तमानाचा आरसा नि भविष्याचा वारसा.. फ्रँक झाप्पा म्हणतात की, सो मेनी बुक्स, सो लिटिल टाइम.. हे अगदी खरं आहे. म्हणूनच मन:पूर्वक पुस्तकं वाचायलाच हवीत.

उचला नि वाचाच…
नव्याकोऱ्या पुस्तकांचा हवासा वाटणारा कोरा-करकरीत वास, मिडल एज पुस्तकांशी होणारी मैत्री नि जुनं ते सोनं असं आपण म्हटल्यावर त्या पुस्तकांनी फिरवलेला मायेचा हात.. खरंच पुस्तक कोणतंही असलं तरीही ते वाचून मिळणारा आनंद, त्यातलं ज्ञान-शिकवण किंवा मनोरंजन असे नाना कंगोरे त्यामुळं कळतात. त्याअनुषंगानं आजची तरुणाई काय वाचत्येय, याचं हे प्रातिनिधिक चित्र पाहूया.
पुस्तक मांडणीवर आकर्षक रीतीनं मांडलेली पुस्तकं.. आपल्या आवडीच्या पुस्तकाच्या शोधात असतानाच कानावर पडणारं हळू आवाजातलं सुरेल संगीत.. पुस्तक मिळताच होणारा आनंद.. अशा वातावरणात मुलं पुस्तकांच्या जगात न रमली तर नवल. कोणत्या पुस्तकांना त्यांनी आपलं म्हटलंय? ‘ओथ ऑफ द वायुपुत्राज, इम्मॉर्टल्स ऑफ मेलुहा, द सिक्रेट्स ऑफ द नागाज’ ही अमिष त्रिपाठी यांची सीरिज, सुदीप नगरकर यांचं फ्यु थिंग्ज लेफ्ट अनसेड हे पुस्तक, रिव्होल्युशन २०२०सह चेतन भगत यांची अन्य सगळी पुस्तकं, जे. के. रोलिंग यांची हॅरी पॉटर सीरिज मुलं अधिकांशी वाचताहेत. ती ऑन डिमांड असतात. पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, शिवाजी सावंत, वि. स. खांडेकर यांची सगळीच पुस्तकं वाचताहेत. त्याखेरीज शाळा मिलिंद बोकिल, वाइज अदरवाइज – सुधा मूर्ती, वनराज मालवी, शिव खेरा यांची यश-करिअरसंबंधी आणि बरीच अनुवादित पुस्तकंही वाचण्याकडं मुलांचा कल आहे.
महाविद्यालयीन तरु णांमध्ये नवं-जुनं, मराठी-इंग्रजी वाचायची गोडी दिसून येत्येय. पु. ल. देशपांडे, व .पु. काळे, वि. स. खांडेकर यांचं साहित्य, रणजित देसाई यांची श्रीमानयोगी, शिवाजी सावंत यांचं मृत्युंजय नि भालचंद्र नेमाडे याचं कोसला या पुस्तकांनी मुलांचा बेस तयार होतो. कथा-कादंबऱ्यांसोबत मुलं एकांकिका सादर करण्याच्या दृष्टीनं नाटकंही वाचतात. आमच्या आजीव सभासदांची नातवंडं ऑथॉरिटी लेटर घेऊन आपलं वाचन कंटिन्यू करतात. शाळा-कॉलेजला असणाऱ्या सुट्टीच्या काळात मेंबर्स वाढतात, असं दादर सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल अश्विनी फाटक सांगतात. तर दादरच्या मॅजेस्टिक ग्रंथदालनाचे साठे म्हणतात की, जयवंत दळवी, अनिल अवचट यांच्या पुस्तकांना मागणी आहे. राजा शिवछत्रपती  बाबासाहेब पुरंदरे, अग्निपंख  डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, एक होता काव्‍‌र्हर वीणा गवाणकर ही प्रेरणादायी-चरित्रपर पुस्तकं वाचली जातात. कर्मधर्मसंयोग आणि मनोगती ही डॉ. आनंद नाडकर्णी यांची मानसशास्त्राशी संबंधित, रामदासांची व्यवस्थापन नीती आणि एक असतो बिल्डर ही सुधीर निरगुडकर यांची, इडली, ऑर्किड आणि मी विठ्ठल कामत, शिवाजी महाराज – गजानन मेहंदळे, करिअर वाटा किरण जोग ही पुस्तकंही अनेक जण वाचतात. त्याखेरीज नाटक, चित्रपट नि मालिकांशी संबंधित असणारं साहित्यही वाचलं जातं.
माहीम सार्वजिनक ग्रंथालयाच्या ग्रंथपाल
रुक्मिणी देसाई सांगतात की, सुहास शिरवळकर, रामचंद्र सडेकर, शोभा राऊत यांच्या कादंबऱ्या मुलं वाचतात. गिरीश कुबेर यांची पुस्तकं वाचतात. शेरलॉक होम्सच्या कथा आणि अगाथा ख्रिस्तीच्या पुस्तकांचे मधुकर तोरडमल यांनी केलेले अनुवाद अधिकांशी वाचले जातात. टिनटिनची सीरिजही आवर्जून वाचली जाते. त्याखेरीज जेम्स पॅटरसनच्या थ्रिलर-सायन्स फिक्शन आणि डॅनिअल स्टील, नूरा रॉबर्ट यांच्या कादंबऱ्या वाचल्या जातात. तर चर्चगेटच्या ऑक्सफर्ड बुक स्टोअरमध्ये विचारणा केली असता त्यांच्या मते, पर्क्स ऑफ बिइंग वॉटरफॉल – स्टिफन चोबोस्की, द हंगर गेम्स सुझेन कॉलीन्स, अल्केमिस्ट पाउलो कोएलो, पीएस आय लव्ह यू सिसिलिया ???अहेर्न, आय टू हॅण्ड अ लव्ह स्टोरी रविंदर सिंग, रिच डॅड पुअर डॅड – रॉबर्ट कायोस्की ही पुस्तकं घेण्याकडं तरु णाईचा कल असतो.
आजची तरु ण पिढी वाचत नाही हो अशी तक्रार सर्रास केली जाते. पण ते वाचताहेत, त्यांची आवड-निवड भिन्न आहे, असं वरील पुस्तकांच्या नावांवरून लक्षात येतंय. तरु णाईच्या वाचनाच्या आशेचा कोवळा किरण दिसतोय, हा किरण झाकोळू न देता तो झळाळता राहू देण्याची जबाबदारी पार पाडायला हवी..

वाचू आनंदे…
वाचनानंद ही कन्सेप्ट लई भारी आहे. हा आनंद लुटताना आपल्याला आवडलेल्या पुस्तकांबद्दल तुमच्यासोबत शेअर करणारी ही काही प्रातिनिधिक मनोगतं…

नेहा लाड
मी बहुतांशी पुस्तकं वाचनालयातून आणून वाचते. त्यातील मला भावलेल्या काही पुस्तकांची ही यादी.
द ब्रेडविनर – डेबोरा एलिस
ही एका अकरा वर्षांच्या मुलीची गोष्ट आहे. अफगाणिस्तानात तालिबान्यांची दहशत असताना आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी ती मुलाचे कपडे घालून उपजीविका करू पाहते. विपरीत परिस्थितीला तोंड देत पुढं सरकते. ही चित्तथरारक कथा प्रेरणादायी आहे.
श्यामिनी – तारा वनारसे
सोनाली कुलकर्णी यांच्या सो कुल या सदरातील एका लेखात या पुस्तकाचा उल्लेख होता. त्यामुळं या पुस्तकाविषयी उत्सुकता वाटून ते वाचलं नि मनोमन आवडलं. रामायणावर आधारित या पुस्तकात श्यामिनी अर्थात शूर्पणखेची कथा असून तटस्थपणं दोन्ही बाजूंची गोष्ट सांगितल्येय. तरीही शूर्पणखेबद्दल मनात कुठंतरी हुरहुर वाटत राहते. 

मार्गिका कदम
मनात – अच्युत गोडबोले

मला मानसशास्त्र विषय असल्यानं त्यावर आधारित पुस्तकं मी वाचते. हे पुस्तक मानसशास्त्र सोप्या भाषेत सांगते. हे अभ्यासासाठी फारच उपयोगी पडले. यात मानसशास्त्रातील अनेक कंगोरे उलगडल्येत.
नेगल – डॉ. विलास मनोहर
या पुस्तकात हेमलकशामध्ये ‘नेगल’ला (वाघ) आणलं जातं. त्याअनुषंगानं वाघाबद्दलचे जनमानसातले गैरसमज सांगितले असून ते कसे दूर केले गेले हे लिहिलं गेलंय.
चिपर बाय द डझन फ्रँक बंकर गिलब्रेथ ज्यु. आणि अर्नेस्टाइन गिलब्रेथ कॅरे
हे पुस्तक १९५०मध्ये प्रकाशित झालं असून त्यात अमेरिकेतील एका कुटुंबाची कथा आहे. या कुटुंबप्रमुखाला तब्बल बारा मुलं असतात. त्यांची परिस्थिती बेताचीच असूनही मुलांच्या पालनपोषणात गिलब्रेथ पती-पत्नी कुठलीही उणीव न ठेवता त्यांना चांगलं वाढवतात. कौटुंबिक एकजूटच दाखवली असून ही हलकीफुलकी कथा मनाला भावते नि लक्षात राहते.
मला फिक्शन वाचायला जास्त आवडतात. पण मी नॉनफिक्शनही वाचते. पुस्तकं विकत घ्यायला आवडतात पण मी लायब्ररीतून घेणं प्रिफर करते.
हॅरी पॉटर अ‍ॅण्ड गॉब्लेट ऑफ फायर जे. के. रोलिंग
हॅरी पॉटर सीरिजची मी खूप मोठी फॅन आहे, असं म्हटलं तरी चालेल. त्यातल्या त्यात खूप आवडलेलं पुस्तक म्हणजे गॉब्लेट. त्यातील कथेची मांडणी आवडली. ती इतकी मस्त आहे की, पुढं काय होणार ही उत्सुकता वाढतेच नि शेवटपर्यंत टिकून राहते. ते वाचताना त्यात आपण इन्व्हॉल्व्ह होऊन जातो.
इम्मॉर्टल्स ऑफ मेलुहा – अमिष त्रिपाठी

मी भारतीय लेखकांची पुस्तकं एवढी विशेष वाचत नव्हते. पण अमिष त्रिपाठीनं माझं मत बदललं. या पुस्तकात देवाला म्हणजेच भगवान शंकराला एखाद्या सामान्य माणसासारखं कन्सिडर केलंय. त्यानंतर त्याचं स्ट्रगल आणि त्याला कसं देवपण मिळालं त्याची कथा सुंदररीत्या मांडल्येय. देवही आपल्यासारखा स्ट्रगल करतो नि प्रॉब्लेम्स फेस करतो, हे वाचून इन्स्पिरेशन मिळतं.
मृत्युंजय – शिवाजी सावंत
या पुस्तकाबद्दल काय बोलू नि काय नाही.. महाभारतातली कर्ण ही माझी आवडती व्यक्तिरेखा आहे. त्याची जीवनकथा वाचून मन एकदम हळहळतं. या पुस्तकामुळं माझा कर्णाकडं बघण्याचा दृष्टिकोनही बदलला. मुळात माणूस हा वाईट नसतो, तो परिस्थितीमुळं गांजला जातो, हे या पुस्तकातून कळतं.
श्यामची आई – साने गुरुजी
मी मुळात इंग्रजी माध्यमामध्ये शिकले. पण बाबांनी मला नेहमी मराठी वाचायला प्रोत्साहन दिलं. त्यामुळं पहिलं मराठी पुस्तक वाचलं ते म्हणजे श्यामची आई. आईचं प्रेम, माया याला खरंच तोड नसते, असं हे पुस्तक वाचताना वाटलं. हे पुस्तक वाचताना मी खरंच खूप रडले.
गॉडफादर मारिओ पुत्झो
डॉन, माफिया यांसारखे शब्द मला या पुस्तकामुळं कळले. इटालियनमाफिया केवढा रिव्हेन्जफुल असू शकतो, तसंच माफिया हा कुठल्या कुठल्या क्षेत्रातील असू शकतो, तेही कळलं. फुल टू मस्तकलंदर विथ राइट अमाऊंट ऑफ पॉलिटिक्स असं या पुस्तकाचं वर्णन मी करेन.  

सई पटवर्धन
आतापर्यंत खूप पुस्तकं वाचल्येत. पण त्यातून आवडीची पुस्तकं शॉर्टलिस्ट करण्याचं काम कठीण आहे.. पण मी ते केलंय..   
हॅरी पॉटर – जे. के. रोलिंग
हॅरी पॉटरचं कॅरॅक्टरायझेशन एवढय़ा अनोख्या काल्पनिक पद्धतीनं केलं गेलंय की, हॅरी पॉटर वाचायला मला अजूनही आवडतं. लोक भले हॅरी पॉटरच्या सीरिजला लहान मुलांची कादंबरी म्हणू देत, पण त्यांचं हे मत मला मान्य नाही. या भन्नाट काल्पनिक सीरिजसारखा नामी शाब्दिक खजिना आपल्याकडं असावा, म्हणून मी त्याचा सेटच विकत घेतलाय.
मालगुडी डेज- आर. के. नारायण
इंग्रजी वाचनाची सुरुवात नि संग्रह करणाऱ्यांसाठी हे एकदम फॅब्युलस पुस्तक आहे. त्याची साधी-सोपी नि सहज भाषा आणि त्याच्या आगळ्यावेगळ्या व्यक्तिरेखांच्या आपण प्रेमातच पडतो. ही सीरिज मी शाळेच्या लायब्ररीतून आणून वाचल्याचं मला आठवतंय.
मेलुहा ट्रायोलॉजी -अमिष त्रिपाठी
मी सध्या ही सीरिज वाचत्येय. यात कथन करण्यात आलेले कितीतरी प्रसंग एवढे हुबेहूब आहेत की, ते खिळवून ठेवतात. ऑनलाइट साइट्सवरच्या चांगल्या ऑफर्समुळं मी ही सिरीज विकत घेतल्येय.
तोत्तोचान – तेत्सुको कुरोयानागी
आतापर्यंत वाचलेल्या पुस्तकांतलं हे माझं ऑलटाइम फेव्हरेट पुस्तक आहे. त्याचं इंग्रजी भाषांतर शोधण्यासाठी मी मुंबईतली कितीतरी पुस्तकांची दुकानं पालथी घातली होती. पण सारे प्रयत्न निष्फळ ठरले. मग मी ते परदेशातून मागवायचीही तयारी केली होती. कारण ते एवढी पराकाष्ठा करून वाचण्यासारखंच आहे. हे पुस्तक प्रत्येकानं आपल्या आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर वाचावं, असं मला वाटतं. दर वेळी काहीतरी नवीन गवसल्याशिवाय राहणार नाही, हे खात्रीनं सांगते.

वर्षा ब्रम्हे
वाचनालय आणि पुस्तकसंग्रह करून मी माझी वाचनाची आवड जोपासत्येय.
आमचा बाप आणि आम्ही – डॉ. नरेंद्र जाधव
या प्रेरणादायी पुस्तकात इच्छाशक्ती आणि शिकायची जिद्द असेल तर आपण आयुष्यात विजयी होऊ शकतो, ते सांगितलंय. जाधव आणि त्यांच्या भावंडांनी आर्थिक परिस्थितीवर केलेली मात आणि त्यांना मिळालेली वडिलांची साथ, हे सारं नक्कीच वाचण्यासारखं आहे.
 नॉट विदाउट माय डॉटर-  बेट्टी मेहमूदी
लेखिका आणि तिची चार वर्षांची मुलगी नवऱ्याच्या फॅमिलीला भेटायला इराणला जातात. तिथं दोघी जणी बंदी होतात. शेवटी अतिशय खडतर मार्गानं कशी आपली सुटका करून घेतात नि अमेरिकेला पळून येतात, याचं चित्तथरारक वर्णन यात केलंय.
लाइफ इज व्हॉट यू मेक इट-  प्रीती शेणॉय
हे पुस्तक बिपोलार डिसऑर्डरची पेशंट असलेल्या अंकिता नावाच्या मुलीची टचिंग स्टोरी आहे. बिपोलार डिसऑर्डर ही कॉमन, पण फार कमी लोकांना माहीत असलेली डिसऑर्डर आहे. त्याची माहिती यात दिल्येय.
कॉलनी-  सिद्धार्थ पारधे
साहित्य सहवास म्हणजे साहित्यिक मंडळी राहतात ती कॉलनी. तिथल्या बांधकामाच्या वेळी लेखकाचे वडील कामगार होते. अतिशय गरीब असतानाही या संवेदनशील सोसायटीतल्या लोकांच्या मदतीनं आणि शिकण्याच्या प्रबळ इच्छेमुळं लेखक कसे घडत गेले, याची ही कहाणी वाचण्यासारखी आहे.
इडली, ऑर्किड आणि मी – विठ्ठल कामत
भारतातील प्रसिद्ध कामत हॉटेल्सचे मालक असलेले विठ्ठल कामत यांनी जगातील एकमेव इकाफ्रेण्डली हॉटेल ऑर्किड बांधलं. त्यांचा एका सामान्य हॉटेलमालकापासून ते एका जगप्रसिद्ध हॉटेलमालक होण्यापर्यंतचा प्रवास या पुस्तकात मांडलाय.