ऑनलाइन शॉपर्सची संख्या वाढतेय तसा डिझायनर ब्रॅण्ड्सना ऊत येतोय. ऑनलाइन शॉपिंग करणारी मंडळी अधिक ब्रॅण्ड कॉन्शस असतात हे दिसून आल्याने आता शॉपिंग साईट्स नवनव्या डिझायनर ब्रॅण्ड्सना उत्तेजन देताना दिसताहेत.
लाइफस्टाइल आणि फॅशन यात सातत्याने बदल होत असतात. त्यामुळे मागील काही वर्षांत ग्राहकांच्या वृत्तीतसुद्धा बदल झाल्याचे दिसून येते. ब्रॅण्डेड गोष्टी वापरण्याकडे प्रामुख्याने शहरांतील तरुणाईचा कल दिसतो. ब्रॅण्डशी निगडित असलेली विश्वासार्हता आणि त्याच्यामुळे निर्माण होणारे सोशल स्टेटस ही त्यामागची कारणे.
ऑनलाइन शॉपिंग करताना कपडय़ांना स्पर्श करता येत नाही, कपडय़ाचा पोत जाणवत नाही आणि प्रत्यक्ष अंगावर कसा दिसेल याचा अंदाज येत नाही. अशा वेळी कपडय़ाची विश्वासार्हता, दर्जातलं सातत्य आणि साईझमधलंही सातत्य जपण्याचं काम ब्रॅण्ड्स करतात. आपल्या ओळखीचा किंवा वापरातला ब्रॅण्ड मुली अगदी बिनदिक्कतपणे ऑनलाइन शॉपमधून खरेदी करतात. ऑनलाइन शॉपिंगमधून केवळ ब्रॅण्डेड कपडय़ांचीच खरेदी त्यामुळे जास्त होते.
ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांची संख्या वाढली तसे ब्रॅण्डसही वाढले, असं आपल्या लक्षात येईल. आता याच्या पुढची पायरी म्हणजे ऑनलाइन शॉपिंग साईट्सच काही ब्रॅण्डस्ना लाँच करत आहेत किंवा त्यांच्यासाठी प्रसिद्धी करत आहेत. ऑनलाइन शॉपिंग साईट्सच्या वतीने ब्रॅण्डेट कपडय़ांच्या प्रदर्शनासाठी फॅशन शो आयोजित केले जात आहेत. या वर्षीच्या लॅक्मे फॅशन शोमध्ये जबाँग.कॉम ही शॉपिंग वेबसाईट महत्त्वाची पार्टनर होती. मिन्त्रा.कॉम या साईटनं दिवाळीच्या अगोदर ‘फॅशन वीकएण्ड’ नावानं एक मोठा फॅशन शो मुंबईत आयोजित केला होता. त्याला तिकीट लावलं होतं. सामान्य ग्राहकही या निमित्ताने फॅशन शोच्या झगमगीत सामील झाला होता. या शोमध्ये काही सेलिब्रिटींनी आपापली कलेक्शन्स सादर केली. सेलिब्रिटी फॅशन डिझायनर्सचा नवा ट्रेण्ड त्यात दिसला.
सेलिब्रिटींचे ब्रॅण्ड
व्हॅन ह्य़ुसेन या ब्रॅण्डच्या वुमेन्स लिमिटेड एडिशनची सहनिर्माती म्हणून दीपिका पदुकोण हिनेही डिझायनर म्हणून पदार्पण केले. ‘ओल्ड हॉलीवूड ग्लिट्झ’ अशी या कलेक्शनची थीम असून त्यात मोनोक्रोमटिक रंगछटा वापरल्या आहेत. तसेच स्त्रियांमधील भावनिक वृत्ती अधोरेखित करता यावी यासाठी डस्टी रोस पिंक या रंगाचा वापर केला गेला आहे. मंदिरा बेदीनेसुद्धा तिचे साड्यांचे कलेक्शन आणले आहे. तिच्या कलेक्शनमध्ये गोल्डन रंगाचा वापर प्रकर्षांने केलेला दिसतो.
कोणतीही वस्तू खरेदी करताना भारतीय ग्राहक त्या वस्तूची गुणवत्ता आणि किंमत यावर लक्ष केंद्रित करताना दिसतो. त्यामुळे ब्रॅण्डेड कपडय़ांवर वेगवेगळ्या सवलती देणाऱ्या ऑनलाइन स्टोअर्सकडे तरुणाईचे लक्ष लागून राहिलेले असते. एकूणच सध्या ब्रॅण्ड व्हॅल्युला महत्त्व प्राप्त झालेय आणि लोकांनी ते स्वीकारलेसुद्धा आहे. ऑनलाइन शॉपिंगमुळे आता या डिझायनर ब्रॅण्ड्सना बहार आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा