मन आणि शरीर दोन्हीही बळकट राहण्यासाठी आपल्याकडे पूर्वीपासूनच बरेच सामूहिक प्रयत्न केले. पण जिमचं फॅड तसं आपल्याकडे फार जुनं नाही. शहरी जगण्याला जिम लागतंच. कारण घरच्या घरी योगासनं आणि सूर्यनमस्कार घालणारा तरुण वर्ग आपल्याकडे कमीच. जिम संस्कृती आपल्याकडे नव्याने आली होती तेव्हा ‘मी जिमिंग करतो/करते’ या एका उद्गारातच वजन होतं. पण आता कपडय़ांचा ब्रँड ठरवावा तसं जिमिंगसुद्धा निवडक ब्रँंडपाशी होतं. जीमचं ब्रँडिंग सुरू झालं. आपण जिमिंग कोणाकडे करतो यावरून आपलं समाजातलं वजन ठरतं. अर्थात, कुठल्याही लोकल जिम इंस्ट्रक्टरकडे आपल्या फिटनेसची जबाबदारी सोपवण्यापेक्षा एखाद्या नामवंत आणि विश्वासू संस्थेने आपल्या फिटनेसची काळजी करावी असा देखील त्यामागचा उद्देश असतोच; पण ‘आम्ही मात्र अमुक जिममध्ये जातो’ किंवा ‘तमुक जिमच आमच्यासाठी बेस्ट’ असं लोक आवर्जून सांगतात. या जीमच्यासुद्धा शहरा शहरांतून, उपनगरांमधून शाखा असतात.
आपण ज्या जिममध्ये जातो त्यावरून कोणत्या प्रकारचं ट्रेनिंग घेतो हे समजतं. कारण त्या ब्रँडमागील व्यक्तीची छाप तिथे पडत असते. ‘व्हिवा’नं या जिमच्या ब्रँडमागच्या चेहऱ्यांशी संवाद साधला. जिम ट्रेनिंगमध्ये नवनवे प्रकार आले, स्पेशलायझेशन्स आली तसं ब्रँडिंग वाढलं. आता आपल्याला काय करायचंय ते आधी ठरतं आणि मग त्यानुसार जिम निवडलं जातं. मिकी मेहता म्हटलं, की जिमिंगसोबत ‘इक्विपमेंट फ्री ट्रेनिंग’सुद्धा आलंच. ‘हेल्थ बियाँड फिटनेस’ हे त्यांच्या ३६० डिग्री वेलनेस टेम्पलचं घोषवाक्य. योगासन, ध्यान (मेडिटेशन), विविध श्वसनप्रकार यांद्वारे शरीरिक, आध्यात्मिक व मानसिक स्वास्थ्य राखण्याचा त्यांचा फंडा आहे. मिकी मेहतांची ओळख आज केवळ एक जिम इंस्ट्रक्टर व ट्रेनर नसून लोक त्यांना उत्तम कोच, फिलॉसोफार मानतात. इथे अगदी गृहिणीपासून सिनेतारकांपर्यंत प्रत्येकाचं स्वागत केलं जातं.

पण लीना मोगरेंच्या जिममध्ये गेल्यावर मात्र तुम्हाला वेगळा अनुभव येतो. लीना मोगरे या सेलेब्रिटी फिटनेस ट्रेनर म्हणून नावलौकिकास आल्या आहेत. अनेक मोठे स्टार त्यांच्याकडे जिम ट्रेनिंग घेतात. ‘आय विल नॉट स्टोप व्हेन आय अ‍ॅम टायर्ड; आय विल स्टोप ओन्ली व्हेन आय अ‍ॅम डन’, असं चिअर अप करणारं वाक्य त्यांच्या जिममध्ये ठळक अक्षरांत दिसतं. एक्सरसाइझ करण्यामागची जिद्द तिथे जाणवल्यावाचून राहात नाही. ‘एक्सरसाइझ इज लाइक ब्रिशग युवर टीथ. ते रोज नाही केलं तर तुम्ही जे मिळवलंय ते गमावून बसाल,’ असं लीना मोगरे यांचं स्पष्ट मत आहे. तिथे केवळ जिमिंग नव्हे तर पॉवर योग, किक बॉक्सिंगसुद्धा नित्यनियमाने होतं. त्यामुळे याला फिटनेस मॅनेजमेंट न म्हणता त्या ‘लाइफस्टाइल मॅनेजमेंट’ म्हणतात. केवळ आरोग्य आणि तंदुरुस्तीपुरतं जिम मर्यादित राहात नाही तर त्या दर्जेदार जीवनशैली सुचवू पाहतात.
आरोग्य जपण्याची प्रत्येकाची तऱ्हा वेगळी. अंदाज अपना अपना.. तशीच शैलेश परुळेकरांची पद्धत निराळी. स्वछ प्रकाशणारं ऐसपस असं त्यांचं परुळेकर्स जिम. जिथे आपल्यासहित कुत्र्यांचंही मनापासून स्वागत होतं. पण ट्रेडमिलवर एखादा कुत्रा धावताना दिसला तर त्याच्याकडे आश्चर्याने पाहू नका. तो कदाचित तुमच्याहूनही जास्त फिट असेल. प्राण्यांचा सहवास आणि आपल्या मनाची सुदृढता यांचा संबंध ते चांगलाच जाणतात. त्यामुळे या कार्याला शैलेश परुळेकर ‘आधुनिक व्यायामशाळा’ म्हणतात. ही आधुनिक व्यायामशाळा काही चार भिंतींपुरती मर्यादित नव्हे. कारण माऊंटन बायकिंग, सायकिलग यातदेखील ते खंड पडू देत नाहीत.  दिवसेंदिवस वाढणाऱ्या स्पध्रेत स्वत:चा जम बसवण्यासाठी, आपल्या नावाचा ब्रँड तयार करण्यासाठी या सर्वानी केलेली प्रामाणिक धडपड तिथे प्रत्यक्षात गेल्यावर जाणवतेच. अर्थात् अंतिमत: निवड तुमचीच.

Story img Loader