– सरिता.
हाय सरिता, तू खूप सेन्सिटिव्ह दिसतेस. तुझं हे विचार करत बसणं आणि वाईट वाटून घेणं पूर्वीपासूनच आहे की आता वाढलंय?
नुकतीच घडलेली एक गोष्ट सांगते. अमेरिका सध्या कोल्ड वेव्हमध्ये कुडकुडतेय हे तुला माहितीच असेल. इतकी प्रचंड थंडी पडलीय की नायगारासुद्धा गोठलाय. पेपरमध्ये आलेला एका गोठलेल्या नदीचा फोटो दोन मैत्रिणी पाहत होत्या. एक जण म्हणाली, ‘बाप रे, काय भयंकर आहे हे!’ दुसरी म्हणाली, ‘अरे, आता त्यांना नदी क्रॉस करायला काहीच प्रॉब्लेम नाही, स्नो-बूट्स घातले की, झालं!’ दोघींनीही एकच फोटो पाहिला, पण विचार मात्र वेगवेगळा केला.
अल्बर्ट एलिस नावाच्या सायकॉलॉजिस्टनं हे फार छान समजावून दिलंय. त्यांचं म्हणणं असं की कुठलीही घटना घडली की, प्रत्येकाची त्यावर वेगवेगळी रिअॅक्शन असते. आणि त्याचं कारण म्हणजे मनात येणारे निरनिराळे विचार. उदा. तुझं मैत्रिणीशी भांडण झालं की, तुला वाईट वाटतं. पण त्याआधी नकळत तू यावर खूप विचार केलेला असतोस, स्वत:वर आणि परिस्थितीवर अनेक आरोप केलेले असतात की असं कसं माझं भांडण झालं? आता तिला काय वाटलं असेल? ती चिडली असेल का माझ्यावर? बापरे, मग मैत्रीही तुटेल कदाचित! आणि तिनं बाकीच्यांशी हे शेअर केलं तर? माझंच चुकलं, उगीच भांडले मी. मला ना, माणसं जोडायला जमतच नाही. अशानं कोणी मैत्रिणी राहणार नाहीत मला. कसं होईल माझं आता?
एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा विचार! पुढचा विचार आधीच्या विचारांहून अधिक-अधिक भयंकर! विचारांच्या या गुंत्यात आपण अडकत जातो आणि डिप्रेस होतो. ही चेन तोडायची कशी मग?
अशा वेळी स्वत:लाच काही प्रश्न विचारायला लागतात. मी नेहमीच आणि प्रत्येकाशीच भांडते का? एखाद्या भांडणानं मैत्री तुटते का? तसं असतं तर आतापर्यंत मला कोणीच मैत्रिणी राहिल्या नसत्या. या एका घटनेवरून मी मैत्रीण म्हणून, त्याहीपेक्षा माणूस म्हणून अगदीच वाईट आहे, असं म्हणता येईल का? नाही ना असं? मग यावरून माझं सगळं भविष्य भीषण असेल असं मी समजणार नाही. शक्यतो भांडण होऊ नये आणि झालं तर ते मिटावं यासाठी आवश्यक त्या स्टेप्स मी घेईन. आणि भांडणं संपलं की तो कप्पा मी बंद करीन.
गुरू-शिष्यांची एक गोष्ट आहे. एकदा ते नदी क्रॉस करत असताना एक सुंदर स्त्री तिथे येते आणि तिला पलीकडे जायला मदत करायची विनंती करते. पंथाच्या शिकवणीप्रमाणे स्त्रीला स्पर्श करायचा नाही म्हणून गुरुजी चक्क नकार देतात. पण शिष्याला तिची दया येते म्हणून तो तिला खांद्यावर बसवून पलीकडे सोडतो. गुरुजींच्या मनात घालमेल! शेवटी ते शिष्याला म्हणतातच, ‘असं कसं उचललंस तू तिला?’ शिष्य म्हणतो, ‘गुरुजी, मी तर तिला केव्हाच खांद्यावरून उतरवलं, पण अजून ती तुमच्या डोक्यातून उतरलेली दिसत नाही!’
सरिता, गुरुजींसारखं विचाराचं ओझं वाहत राहून कष्टी व्हायचं की शिष्यासारखं मोकळं व्हायचं याचा निर्णय सर्वस्वी आपला असतो.
ओपन अप : विचारांचं ओझं…
मी एस.वाय.ला आहे. मला कुठल्याही गोष्टीचा फार विचार करत बसायची सवय आहे. कुणी काही बोललं की मला खूप वाईट वाटतं. आईशी वाद झाला किंवा मैत्रिणींशी भांडण झालं तर माझा सगळा दिवस त्यावर विचार करण्यातच जातो. माझा अभ्यासपण होत नाही मग …
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-01-2014 at 01:09 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Burden of thoughts