थंडीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रत्येक तरुणाच्या आयुष्यात गुलाबी थंडी अशीच बिलगून येत असते आणि मग या नटखट थंडीची स्वारी तरुणांसोबत घरापासून थेट कॉलेज कॅम्पसमध्ये अवतरल्यावर ती एकटय़ा-दुकटय़ात नाही तर समूहांमध्ये दणक्यात साजरी होते.
‘विंटर’ प्रेमींना सध्या चांगलीच हुडहुडी भरलीये. कॅम्पसमध्ये कॉलेजिअन्स धुक्यांनी दाटलेल्या थंडगार वातावरणात पिवळ्या-नारंगी प्रकाशात शेकोटीभोवती बसून हातावर हात चोळत गप्पांची मफल रंगवू लागले आहेत. गुलाबी थंडीच्या नशेत टपरीवरचा उकाळा आणि गरमागरम  सोया-चिलीवर ताव मारणारे हे विंटरप्रेमी जणू कॅम्पसमधील थंडीच्या धुक्यात हरवलेत..
 झोंबणाऱ्या वाऱ्यासह का कोण जाणे कशी ती एकांतात लाडिक चाळे करत आली. मी लपण्यासाठी इकडे-तिकडे आडोसा शोधू लागलो. मग तिला टाळण्याचाही खूप प्रयत्न केला. सार अंग रोमांचित झालं अन् काया शहारली, पण तिच्यातील कातील अदेने सारे प्रयत्न वाया गेले. ती येऊन तडक बिलगली. क्षणात मिठीत घेऊन तिने बाहुपाश आवळले. तिच्या स्पर्शाने मी क्षणभर ओशाळलो. मानेवर चुंबन घेऊन तसं तिने मला गोंजारलं. मला कळेच न काय होतंय. तिनं विचारू दिलंच नाही! ती कशी अवेळी आली इथे! ती लाडिकच हसत म्हणाली..असा घाबरतोस का जरा जवळ ये, का दूर करतोएस मला! अक्षरश तिनं हुडहुडी भरवून माझी दांडी उडवली आणि मिठीत घेत मला म्हणाली, अरे मी गुलाबी थंडी..
थंडीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रत्येक तरुणाच्या आयुष्यात गुलाबी थंडी अशीच बिलगून येत असते आणि मग या नटखट थंडीची स्वारी तरुणांसोबत घरापासून थेट कॉलेज कॅम्पसमध्ये अवतरल्यावर ती एकटय़ा-दुकटय़ात नाही तर समूहांमध्ये दणक्यात साजरी होते.
शारदाच्या थंडीनं..गारवा..ही गाणी नुसती ऐकली तरी थंडी हवीहवीशी वाटू लागते. म्हणूनच नोव्हेंबर-डिसेंबर महिने कधी येणार याची आपण आतुरतेने वाट पाहात असतो. कारण हा मौसम म्हणजे मस्त गुलाबी मौसम. प्रत्येक ऋतूची आपली एक आगळी मजा असते त्यातही थंडी म्हंटलं की लगेच अंगावर शहारे येतात. थंडी म्हणजे एकीकडे खाण्यापिण्याची रेलचेल,स्वेटर-मफलरचे रंगीत वातावरण जे थंडीला दूर पळवतात तर दुसरीकडे याच थंडीमुळे तरुणाई सर्वाधिक
खूश असते. पहाटे धुक्यांमध्ये हरवलेल्या वाटा, शेकोटीच्या आडोशाने फुलणाऱ्या गप्पा सारं काही अनुभवण्यासाठी शाली आणि स्वेटर्स घालून सकाळी कॉलेजला निघालेली मंडळी गुलाबी थंडीच्या वातावरणात भलतीच एक्सायटेड आहेत. एरवी कॉलेजला जाताना उशीर झाल्यावर घामाने ओलाचिंब होणाऱ्या कॉलेजिअन्सच्या अंगाला गेल्या काही दिवसांपासून मस्त गारवा झोंबतोय. सकाळचे कॉलेज लेक्चर बंक करून आसपासच्या तलावाच्या कट्टय़ांवर थंडीच्या कुशीत शिरून प्रेमाच्या गुजगोष्टी करणारी अनेक कपल्स पाहायला मिळताएत. थोडक्यात प्रेमी युगुलही या गुलाबी थंडीचा मनमुराद आनंद लुटताना दिसतात. कॉलेज कॅम्पस, कॅन्टीन, लायब्ररी इवन कोलेजच्या लेडीज-जेन्ट्स कॉमन रूममध्येही थंडीचीच चर्चा अधिक जाणवतेय.अनेकजण सकाळी धुक्यांमध्ये हरवलेली कॉलेजची वाट चढताना ‘विंटर’ क्लायमेट एन्जॉय करण्यासाठी विकेंडला पिकनिकचे बेत रचायला लागलेत.
 थंडीने झक्कपकी हातपाय पसरल्यावर स्वेटर-शालीची ऊब असली तरी या थंडीत पोटातली ऊब वाढवण्यासाठी, तरतरी आणण्यासाठी गरमागरम चहा हवाच..कोणत्याही ऋतूत चालणाऱ्या पण गुलाबी थंडीत हवाहवासा वाटणाऱ्या चहाची तलप िवटर प्रेमी कॉलेजिअन्सना लागते आणि तितक्यातच कॉलेज शेजारच्या टपरीहून ‘चाय गरम’ अशी आरोळी ऐकू येते. प्रत्येकाचा चेहरा फुलतो, शोधक नजरेने पुरी फलटण आपला मोर्चा टपरीकडे वळवते. चहावाल्यानं दिलेला गरमागरम चहा सुर्रकन पिताना प्रत्येकाचीच ब्रम्हानंदी टाळी लागते. आकाश कसं स्वच्छ असत. मधून मधून धुक्यांच्या आड लपलेली ढगांची रांगोळी दिसते. अशी ही आभाळात उमटलेली रांगोळी प्रत्येकाच्या मोबाइलच्या कॅमेऱ्यातून क्लीक केली जाते. चहा विथ गप्पा झाल्या की तिथेच छोटीशी शेकोटी करून कॉलेजिअन्स त्याभोवती गोळा होऊन हात शेकत बसतात. शेकोटी भोवतीची ऊब आणि गर्दी जसजशी वाढू लागते तसतशा गप्पा रंगात येतात, मधूनच हास्यांचे फवारे उडतात. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतच्या गप्पा झडतात. शेकोटीभोवती जास्त वेळ रंगणाऱ्या गप्पा म्हणजे ब्रेकअप आणि यांतूनच सवड मिळाली तर चित्रपट आणि कॉलेज इव्हेंट्सच्या गप्पाच अधिक होतात.
सोया-चिलीची वाफाळती डिश अन् शेकोटीच्या उबेची हवीहवीशी साथ या स्वर्गीय आनंदाची बात काही न्यारीच असते. भोवताली फेर धरून हसणारा दंविबदू तरुण मनाला प्रसन्न करत असतो.त्यात धुक्यांचा गालिचाही मग आपले रंग भरून विंटर सेलीब्रेशनचा आनंद द्विगुणीत करतो. ऊन डोक्यावर आलं तरी हवेत सुखद गारवा असतो, कुणी काहीही म्हटलं तरी कॅम्पसमधला आगळा विंटर प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो. हिवाळ्यात कॅम्पसमध्ये सर्वाधिक उठून दिसण्यासाठी वॉर्डरोब कलेक्शनची जोरदार तयारी कॉलेजिअन्सकडून केली जाते. बोचणाऱ्या थंडीपासून बचावासाठी नव्हे तर इतरांपेक्षा आपण वेगळे दिसावे यासाठी शोभेल आणि थंडीही वाजणार नाही, असे हायनेक स्वेटर्स, स्कर्ट्स, थर्माकोट, मफलर्स घालून विंटर प्रेमी कॅम्पसमध्ये आपलं स्टाइल स्टेटमेंट कायम ठेवताएत.
कॉलेज कॅम्पसमध्ये प्रत्येकालाच हवीहवीशी थंडी काहींना परीक्षेचे पेपर्स कठीण गेल्यामुळे तर काहींचे प्रेयसीशी ब्रेकअप झाल्यामुळे नकोनकोशी वाटते. कॉलेजमधील  काहीशी अरसिक डोकी यावर इतकंच म्हणतात की, हल्ली थंडी काही तितकीशी गुलाबी वाटत नाही. या महाशयांना साखरझोपेऐवजी पहाटेच्या थंडीत उठून व्यायाम करावासा वाटतो. पूर्वीसारखी अंथरुणाची ओढ त्यांना वाटत नाही. ऐन हिवाळ्यात त्यांना उगाचच आईस्क्रीम खावंसं वाटत नाही. दोघांनी मिळून खायचं यापेक्षा सर्दी झाली तर काय करायचं असा बोिरग विचार काही केल्या यांच्या मनातून जात नाही. नव्या वर्षांच्या सुरुवातीला पहाटेच्या थंडीत कोलेजच्या स्पोर्ट्स टीममधील संकल्पवीरांची झुंड कॅम्पसमध्ये एक्सरसाइज आणि मोìनगवॉकसाठी निघालेली दिसते. एका मोगोमाग एक असे सरस उत्साही हेल्थ कॉन्शस थंडीमुळे जोशात येऊन झपाझप हात खांद्याच्याही वपर्यंत स्विंग करत आपल्याकडे एकातरी मुलीनं नजर रोखून पाहावं,आपलं कौतुक करावं म्हणून झपाझप चालत शायिनग मारत असतात. गेली कित्येक वर्ष नियमाने वागणारी ही स्पोर्टीमंडळी एका लयीत आणि थंडीच्या तंद्रीत पावलं टाकून कॅम्पसमधला अनोखा विंटर माहौल सेलिब्रेट करताएत.
कॉलेज कॅम्पसमध्ये रेंगाळणारी  नवीकोरी गुलाबी थंडी थोडेच दिवस असेल. पहाटेची ती साखरझोपही थोडेच दिवस असेल. थंडीच्या या काही हुडहुडणाऱ्या क्षणांत पहाटे थंडीत कुडकुडताना उन्हाचा शोध सुरू होईल. दिवसा अनेकदा प्रेयसीच्या स्पर्शामध्ये जादू जाणवू लागेल. रोज सकाळी शेकोटी सोबत नवनवीन विषय निघू लागतील. किपिंग माय फिंगर्स क्रॉस्ड विंटर प्रेमींची गुलाबी थंडी कॉलेज कॅम्पसमध्ये गोड आठवण म्हणून सदैव रेंगाळेल.
फोटो : आशिष सोमपुरा
मॉडेल : पत्रलेखा पॉल आणि पिया बाजपेयी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा