कॅनडाहून केवळ एका प्रोजेक्टसाठी ‘ती’ भारतात आली आणि भारतातच रमून गेली. सध्याच्या सर्वात लोकप्रिय मराठी ‘वेबकण्टेण्ट’ची ती ‘क्रिएटर’ आहे. मराठी शिकतेय, लिहितेय. ‘ती’ आहे तरुणाईच्या आवडत्या ‘भा.डि.पा.’ या वेबचॅनलचा पडद्यामागचा चेहरा. ‘भारतीय डिजिटल पार्टी हे स्टार्टअप एक ‘पॅशन प्रोजेक्ट’ आहे. त्यासाठी वेळेनुसार पडेल ते काम करायची माझी तयारी असते,’ असं ‘तिचं’ म्हणणं आहे. २७ फेब्रुवारीच्या जागतिक मराठी दिनाच्या पाश्र्वभूमीवर या अवलिया कल्लाकाराशी अर्थात पॉला मॅकग्लिनशी गप्पा..
सध्या तरुणाई वेबचॅनेल्सच्या माध्यमाला सर्वाधिक पसंती देते आहे. त्यामागचं उघड कारण आहे टी.व्ही.वरच्या त्याच त्या मालिकांमधून सुटका. या वेबचॅनल्सपकी मराठी वेबचॅनेल्समधलं बहुचíचत नाव म्हणजे ‘भा.डि.पा. म्हणजेच भारतीय डिजिटल पार्टी’. या टीममध्ये अमेय वाघ, सारंग साठय़े आणि निपुण धर्माधिकारी या कलाकारांसोबत परदेशी, पण आता मराठी मातीत रुजू पाहाणारी एक कलाकार आहे, पॉला मॅकग्लिन. व्हँकुवर या कॅनडाच्या पश्चिमेच्या शहरात पॉलाची जडणघडण झाली. तिनं ‘फिल्म मेकिंग’मध्ये पदवी घेतली आहे. ‘बी.बी.सी.’च्या प्लॅनेट अर्थसारख्या डॉक्युमेंटरी सीरीज तयार करायचं स्वप्न तिनं लहानपणापासून उराशी बाळगलं होतं.
पॉला कशी काय भारतात आली, याची एक कथाच आहे. तीही काहीशी नाट्यपूर्ण.. पॉला सांगते की, ‘मी भारतात येऊन शिकेन किंवा काम करेन, असा मी स्वप्नातही विचार केलेला नव्हता. पण आमच्या युनिव्हर्सटिीनं मला भारतीय फिल्म इंडस्ट्रीचा अभ्यास करण्यासाठी पाठवायचं ठरवलं होतं. ती एक पेड इंटर्नशिप असणार होती. एका थ्रीडी अॅनिमेशन कंपनीमध्ये काम करून अनुभव घ्यायचा होता. आयत्या वेळी त्या कंपनीनं बॅकआऊट केलं. मात्र माझं भारतात येणं नक्की झालं होतं, तिकिटं बुक झाली होती आणि त्यासाठी लागणाऱ्या पशांची व्यवस्थाही ग्रँटमधून आधीच झाली होती. त्यामुळं मी भारतात येऊन जनरल फिल्म इंडस्ट्रीचा अभ्यास करावा, असं माझ्या विभागप्रमुखांनी सुचवलं आणि मी भारतात आले.’ भारतात आल्यावर इथल्या फिल्म इंडस्ट्रीची ताकद पॉलाला जाणवली. या क्षेत्रात आपण फिट होऊ शकतो, असं तिला वाटलं. याच दरम्यान पुण्यात सारंग साठय़े आणि अनुषा नंदकुमार यांच्याशी तिची ओळख झाली. तेव्हा सारंग कािस्टग डायरेक्टर नि अॅिक्टग कोच म्हणून काम करीत होता, तर अनुषा चीफ असिस्टंट डायरेक्टर होती. या तिघांनी मिळून काहीतरी ‘क्रिएटिव्हगिरी’ करायचं ठरवलं. सुरुवातीला ‘गुलबदन टॉकीज’ ही प्रॉडक्शन कंपनी त्यांनी सुरू केली. या प्रॉडक्शनतर्फे त्यांनी इंटरनेटसाठी व्हिडीओज बनवायला सुरुवात केली. मागच्या वर्षी त्यांनी ठरवून मराठी वेबचॅनेल सुरू केलं ‘- भा.डि.पा’ अर्थात भारतीय डिजिटल पार्टी.
भा.डि.पा.बद्दल पॉला भरभरून बोलते. ‘आमच्याकडे वेगवेगळ्या कल्पना होत्या, पण त्या कुठंच प्रत्यक्षात येत नव्हत्या. त्या प्रत्यक्षात साकारल्या तर मराठी तरुण प्रेक्षकांना आवडू शकेल, याची खात्री होती; पण त्या सादर करण्यासाठी आम्हाला योग्य तो प्लॅटफॉर्म नव्हता. म्हणून मग आम्हीच आमचा प्लॅटफॉर्म तयार केला आणि भा.डि.पा. जन्माला आलं. तरुणाईनं या संकल्पनेला उदंड प्रतिसाद दिलाय. मात्र आमच्या डोक्यात असलेल्या सगळ्या कल्पना अजून प्रत्यक्षात उतरलेल्या नाहीत. अजूनही आम्ही आमचा १०० टक्के परफॉरमन्स दिलेला नाही,’ असं ती म्हणते. भाडिपाचा सर्वाधिक लोकप्रिय शो म्हणजे ‘कास्टिंग काऊच’. ‘सारंगची संकल्पना आणि अमेय वाघ-निपुण धर्माधिकारीची केमिस्ट्री भन्नाट आहे. कॉमेडी आणि सेलेब्रेटी अपिरिअन्स असूनही सेमी-फिक्शन, कॉमेडी सेलेब्रेटी इंटरव्ह्य़ू असा हा ‘कािस्टग काऊच’ शो आहे. राधिका आपटेच्या पहिल्याच एपिसोडला अनेक मराठी प्रेक्षकांनी तुफान पसंती दिली,’ पॉला उत्साहात सांगते.
पॉला स्वत सध्या शो डेव्हलप करणं, प्रॉडक्शन आणि पुढल्या प्रोजेक्ट्सची आणखी करते. सर्जनशीलता आणि उद्योजकता असे दोन्ही क्षेत्रांतले अनुभव तिच्या गाठी जमा होत आहेत. सुरुवातीला भाषेचा थोडासा अडसर तिला जाणवला. त्याबद्दल ती सांगते की, ‘गेली दोन र्वष नेटानं मराठी शिकल्यानं मला ही भाषा आता कळू लागली आहे. इतकी की, आमचे व्हिडीओज मी सबटायटल्सखेरीज बघते आणि त्यातल्या विनोदाला दाद देते. अर्थात अजून अस्खलित मराठी बोलणं तितकंसं जमत नाही. भाडिपाखेरीज मी लेखन करते. पहिल्या भारतवारीनंतर मी पटकथालेखनाच्या जणू प्रेमात पडलेय. सध्या चित्रपटांच्या पटकथांवर काम चालू आहे.’
‘प्रत्येक वेळी आपण आपल्याला इतर कोणी संधी द्यायची वाट पाहू शकत नाही. तेव्हा आपण आपली संधी स्वतच निर्माण करायची असते आणि ती आम्ही भा.डि.पा.च्या माध्यमातून तेच केलंय. लोकं वेबसीरिज बघतात तेव्हा ती त्यांची आवड आणि निवड म्हणून बघतात. टीव्हीवरच्या मालिकांमध्ये आणि सिनेमांमध्ये फारसे ऑप्शन उपलब्ध नसतात; मात्र इंटरनेटवर खूप पर्याय असतानाही लोकं आपल्या कलाकृतीला दाद देतात, तिचं कौतुक करतात, तिच्याबद्दल लिहितात, बोलतात तेव्हा ती आपल्या कलेला मिळालेली सर्वात मोठी दाद असते.’ असं पॉलाला वाटतं.
भारतीय संस्कृतीबद्दल पॉला आत्मीयतेने बोलते तेव्हा अर्थातच तिच्या मातृभूमीचा विषय निघतो. पॉला सांगते की, ‘मायदेशाबद्दल वाटणारं प्रेम म्हणजे केवळ आईनं मला तिथं जन्म दिला म्हणून! आई लंडनची आणि वडील स्कॉटलंडचे. त्यामुळं मी काही फारशी मायदेशी संस्कृतीशी जोडलेली नव्हते. अर्थात कॅनडामध्ये माझ्या शिक्षणामुळं खूप संधी मिळाल्या असत्या हे नक्की, पण भारत मला जास्त आपलासा वाटला. कितीही दोष असले, तरीही भारतात खूप चांगली माणसं राहतात. भारतातल्या संस्कृती, भाषेबद्दल मला नेहमीच आकर्षण आणि कौतुक आहे नि राहील. मी गेली दोन र्वष मराठी शिकण्यासाठीही खूप मेहनत घेते आहे. गेल्या पाच वर्षांत भारतातल्या मनोरंजन क्षेत्रातले खूपसे बदल न्याहाळायला मिळालेत. भारतीय चित्रपटांच्या स्क्रिप्टचं बलस्थान म्हणजे त्याला लाभणारे संवाद लेखक नि पटकथाकार. मी स्वत मराठी, हिंदी, हिंदी-फ्रेंच चित्रपटासाठी सहलेखन-संवादलेखन केलंय. अर्थात मी मूळची भारतीय नसल्यानं मला अनेकदा त्या त्या व्यक्तिरेखा, संकल्पना आदी गोष्टी समजून घ्याव्या लागल्या. त्यामुळं माझा आयुष्याकडं बघण्याचा दृष्टिकोन अधिकच विस्तारला. हा लेखनानुभव खूप समृद्ध करून गेला. त्यामुळं आताशा हॉलिवूड किंवा इंग्रजी निर्मात्यांचे चित्रपट पाच-दहा मिनिटांच्यावर मी बघूच शकत नाही. त्यांची त्यातली चौकटीतली आणि काहीशी संकुचित विचारसरणी मला खटकतेच.’
पॉलाशी बोलताना ‘रंग दे बसंती’मधल्या ‘सु’ची आवठण हटकून होतेच. पॉलाला भारतच इतका आवडलाय की, आता इथंच राहून काम करण्यावर ती ठाम आहे. भारत, भारताची आणि महाराष्ट्राची संस्कृती, मराठी भाषा, इतिहास याबद्दल तिला आपुलकी आहे. प्रेक्षकांची दाद मिळत राहिली की, काम करायला हुरूप येतो, असं पॉलाला वाटतं. तिच्या ‘कल्ला’कारकिर्दीसाठी भरभरून शुभेच्छा !
एखाद्या भिंतीला स्वत रंग देणं म्हणजे प्रॉडक्टिव्हिटी आणि त्या भिंतीला कोणता रंग, किती द्यायचा, कोणतं डिझाईन काढायचं, रंग द्यायचा की वॉलपेपर लावायचा, यासाठी डोकं लढवणं म्हणजे क्रिएटिव्हिटी. स्वतसाठी कपडे निवडून विकत घेण्यापासून ते एखाद्या पदार्थाला स्वतचा वेगळा टच देण्यासाठी केलेली मेहनत म्हणजे क्रिएटिव्हिटी. लेखनाच्याबाबतीत म्हणायचं तर स्क्रिप्टमध्ये कोणती परिस्थिती असावी, पात्रं किती असावीत, त्यांचे स्वभाव कसे असावेत, व्यवसाय काय असावेत, हे सगळं ठरवणं म्हणजे क्रिएटिव्हिटी. वेबकण्टेण्टमध्ये या क्रिएटिव्हिटीला सर्वाधिक महत्त्व आहे.’
– पॉला मॅकग्लिन
(संकलन- राधिका कुंटे)
वेदवती चिपळूणकर