|| मानसी जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हृतिक रोशनच्या ‘काइट्स’ चित्रपटातील अथवा प्रभुदेवाचा ‘मुकाला मुकाबला’ गाण्यातील डान्स पाहिला आहे का? दोन्ही हातांवर तोल सांभाळणाऱ्या, डोक्यावर गिरक्या घेणाऱ्या, शरीरात जणू हाडेच नसावीत इतक्या लवचीकतेने के ल्या जाणाऱ्या या नृत्यप्रकारास ‘ब्रेकिंग’ अथवा ‘ब्रेक डान्स’ म्हणतात. आज या ब्रेकिंगविषयी लिहिण्याचे कारणही तेवढेच खास आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात जागतिक ऑलिम्पिक समितीने ‘ब्रेकिंग’ नृत्यप्रकारासोबतच ‘स्केट बोर्डिंग’, ‘क्लायम्बिंग’ आणि ‘सर्फिंग’ यांना खेळांचा दर्जा दिला आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या पॅरिस येथील ऑलिम्पिक क्रीडास्पर्धांमध्ये वरील क्रीडाप्रकारांचा समावेश होणार आहे. आतापर्यंत के वळ आवड किं वा छंद म्हणूनच तरुणाईने ही नृत्यशैली विकसित के ली होती, आता खेळात करिअर उभारण्याच्या दृष्टीने ‘ब्रेकिं ग’ला एक  वेगळेच वलय प्राप्त झाले आहे.

ऑलिम्पिक समितीने  एका नृत्यप्रकारास खेळाचा दर्जा देणे हा जगातील नृत्य क्षेत्रासाठी आनंद आणि अभिमानाचा क्षण आहे. या निर्णयामुळे ब्रेकिंग करणाऱ्या ‘बी बॉइज’ आणि ‘बी गल्र्स’चा आनंद गगनात मावेनासा झाला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आपल्या देशात ब्रेकिं गची ओळख तरुणाईला चित्रपट आणि टीव्हीच्या माध्यमातूनच झाली आहे. नृत्याचा बादशहा मायकल जॅक्सनला ब्रेकिंगचा गुरू मानले जाते. ब्रेकिंग हा हिप हॉप नृत्यप्रकाराचा एक भाग असून याचा अर्थ तोडणे अथवा थांबणे असा होतो. संगीताच्या तालावर मध्येच थांबून केलेल्या नृत्यास ‘ब्रेकिंग’ म्हटले जाते. शारीरिक चपलता, तसेच नृत्यकौशल्याचा कस पाहणाऱ्या या नृत्यशैलीचा उगम १९७० मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात झाला. अमेरिकेतील आर्थिक हलाखी, गौरवर्णीयांकडून होणारा अन्याय तसेच त्यांची पिळवणूक याविरुद्ध व्यक्त होण्यासाठी ब्रेकिं ग हे कृष्णवर्णीयांचे एक महत्त्वाचे माध्यम होते.

अमेरिकेत सत्तरच्या दशकात सुरू झालेले ब्रेकिंगचे वारे आपल्यापर्यंत पोहोचायला अगदी एकविसावे शतक उजाडावे लागले.  भारतात ब्रेकिंग करणारे ग्रुप्स, हिंदी चित्रपटातील गाणी तसेच नृत्याच्या रिअ‍ॅलिटी शोजमुळे ब्रेकिंग या नृत्यप्रकाराची ओळख तरुणाईला झाली. अमेरिकेतील हा नृत्यप्रकार तरुणांमध्ये लोकप्रिय करण्यात हिंदी चित्रपटसृष्टीचाही मोठ्या प्रमाणावर वाटा आहे. अभिनेता मिथुन चक्रवर्ती आणि गोविंदा यांनी आपल्या गाण्यात ब्रेकिंगचा समावेश केला. तर अभिनेता जावेद जाफरी आणि प्रभुदेवाने त्याला बॉलीवूड टच दिला. ‘बुगी वुगी’, ‘डान्स इंडिया डान्स’ मराठीत ‘एकापेक्षा एक’ या नृत्यावर आधारित कार्यक्रमांमुळे ब्रेकिंग हा नृत्यप्रकार सर्वसामान्य लोकांना समजला. मुंबईत ‘रोहन एन ग्रुप’, ‘फिक्टीशियस’, ‘किंग्स युनायटेड’, ‘यूडीके’, ‘फ्रीक अँण्ड स्टाईल’, ‘ब्रेक गुरूज’ या नृत्य समूहांनी आंतरराष्ट्रीय नृत्यस्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. यात मात्र गाण्यात अथवा रिअ‍ॅलिटी शोमध्ये जो हिप हॉप डान्स आपण पाहतो त्यात ब्रेकिंगच्या काही मूव्हचा समावेश असतो. त्यामुळे याचेही संमिश्र आणि बॅटलफिल्ड असे दोन प्रकार पडतात.

वीस वर्षांत या नृत्यप्रकाराच्या शैलीत बराचसा बदल झाल्याचे ‘यूडीके’ ग्रुपच्या परितोष परमारने सांगितले. या नृत्यप्रकाराने प्रेरित होऊन आमच्याबरोबर २००८ मध्ये  इतर काही नृत्यसमूहांनी मुंबईत याची सुरुवात केली. तेव्हा फेसबुकचा नुकताच जन्म झाला होता. पहिल्यांदा युट्यूबवरील व्हिडीओ पाहूनच आम्ही नृत्याचा सराव करत असू. एखादा मित्र अमेरिकेत राहत असल्यास त्याच्याकडून सीडी मागवत असू. कोणी मार्गदर्शक तसेच सांगणारे नसल्याने पहिल्यांदा शारीरिक दुखापती खूप झाल्या. या चुकांमधून शिकतच तरुणांनी आपली स्वत:ची वेगळी नृत्यशैली विकसित केली, असे परितोषने सांगितले. आमच्या गु्रपला एक वर्ष पूर्ण झाल्याने स्वत:च्या खिशातील पैसे टाकून आम्ही स्पर्धा आयोजित केली होती. आधीच्या तुलनेत हा नृत्यप्रकार शिकणे अत्यंत सोपे झाले आहे. परदेशातील नृत्यदिग्दर्शक इथे येऊन तरुणांना या नृत्यप्रकाराचे धडे देतात. आधीपेक्षा आता हिप हॉपच्या स्पर्धाही मोठ्या प्रमाणावर आयोजित केल्या जात आहेत, अशी आठवणही त्याने सांगितली.

ब्रेकिंगला ऑलिम्पिक  क्रीडास्पर्धांमध्ये खेळाचा दर्जा दिल्याने भारतात याचा प्रचार आणि प्रसार अधिक वेगाने होईल. पुढील दोन वर्षांत भारतातून एखादा बी बॉय अथवा बी गल्र्स ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी पात्रही ठरू शकतो, अशी आशा नृत्यदिग्दर्शक सॅड्रिक डिसूझाने व्यक्त के ली. तरुणाईला करिअरच्या दृष्टीने याचा कसा फायदा होईल याबद्दल बोलताना, या नृत्यप्रकाराला खेळाचा दर्जा मिळाल्याने केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून याला आर्थिक पाठबळ मिळेल. इतर क्रीडाप्रकाराप्रमाणे याला नियम लागू होतील. सरकारी नोकरी तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठीही या नृत्यकौशल्याचा उपयोग होईल. महाविद्यालयीन तसेच शालेय स्तरावर अधिक स्पर्धांचे आयोजन केले जाईल. भविष्यात या नृत्यप्रकाराचे व्यवस्थापन आणि नियमन करणारी संघटना अस्तित्वात येईल, असे सॅड्रिकने सांगितले. शिवाय नृत्यदिग्दर्शक तसेच कलाकारांची एक समिती यानिमित्ताने अस्तित्वात येईल. ब्रेकिंगच्या नृत्यस्पर्धांमध्ये जगभरात समान परीक्षण तसेच गुणांकनाची पद्धत लागू होईल. यामुळे नृत्यदिग्दर्शकांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोनही बदलेल, अशी आशा त्याने व्यक्त के ली. नृत्यवेडी तरुणाई आजही के वळ आपल्या आवडीसाठी या क्षेत्रात स्वत:ला झोकू न देते. मात्र नृत्यदिग्दर्शकांना आजही समाजात प्रतिष्ठेचे स्थान नाही किं वा त्यांना स्वतंत्र व्यवसायाच्या संधीही पुरेशा उपलब्ध नाहीत. हे वास्तव या निर्णयामुळे निश्चिातच बदलेल, असे मत सॅड्रिकसह या क्षेत्रातील जाणकार नृत्यदिग्दर्शक व्यक्त करतात.

भविष्यातील ‘ब्रेकिंग’

  • देशात या नृत्यप्रकाराचा प्रचार आणि प्रसार होईल.
  • नृत्यदिग्दर्शकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळेल.
  • या नृत्यप्रकारास सरकारी सोयीसुविधा तसेच आर्थिक पाठबळ मिळेल.
  •  या नृत्यप्रकाराच्या स्पर्धांचे परीक्षण, गुणांकन यात एकसंधता आणि सूसूत्रता येईल.