|| मितेश जोशी

चार गप्पिष्ट माणसं एकत्र आली, की विविध विषयांवर घडणाऱ्या चर्चा विचारांना कलाटणी नक्कीच देतात; पण याच गप्पा व्यक्तीच्या करिअरला, आयुष्याला संपूर्णपणे कलाटणी देणाऱ्यासुद्धा ठरू शकतात. त्यातीलच एक उदाहरण म्हणजे प्रणीत. वय वर्षे फक्त २४. शिक्षण फक्त दहावी पास. प्रणीतच्या कॉलेज दिवसांमध्ये त्याचे बाबा रिक्षा चालवायचे, तर आई नोकरी करायची. केवळ आईबाबांच्या समाधानासाठी, पण अभ्यासाची विशेष रुची नसलेल्या प्रणीतने डिप्लोमाला अ‍ॅडमिशन घेऊनसुद्धा तो पूर्ण केला नाही. कॉलेजमध्ये असताना त्याला डान्सचं भलतंच वेड होतं. मेहनतीच्या बळावर त्याने तरुणाईत एक उत्तम कोरिओग्राफर अशी छबी निर्माण केली होती; पण कोरिओग्राफी हे आपलं करिअर होऊ  शकत नाही हे त्याच्या सुरुवातीलाच लक्षात आलं. त्याला त्या कामातून समाधान मिळत नव्हतं. मग माझं करिअर कशात होऊ  शकतं? तर त्याचं उत्तर त्याला सापडलं ते म्हणजे ‘फिटनेस’.

घरातील परिस्थिती कितीही बेतास बात असली तरीही कॉलेजमध्ये असताना प्रणीतने जिम जॉइन केली होती. त्याच जिमच्या ट्रेनरशी- किरणशी प्रणीतची ओळख झाली ज्याला प्रणीतने आपल्याला या क्षेत्रातील प्राथमिक धडे देण्याची गळ घातली. किरणकडून प्रणीत स्पिनिंग शिकला. हळूहळू त्याचा आत्मविश्वास वाढल्याने त्याला त्याच गोल्ड जिममध्ये आणि कालांतराने लॉ कॉलेज रोडच्या गोल्ड जिममध्ये स्पिनिंग ट्रेनरची संधी चालून आली आणि त्याने ती संधी घेतली. या काळात प्रणीतने कोरिओग्राफीला पूर्णपणे रामराम ठोकला नव्हता. सकाळी स्पिनिंग ट्रेनर, तर दुपारी कोरिओग्राफरची भूमिका तो बजावत होता. सगळ्या कामांतून मिळणारे पैसे प्रणीत साठवत होता, कारण त्याला पर्सनल ट्रेनिंगचा कोर्स ‘के ११ फिटनेस अ‍ॅकॅडमी’ येथे करायचा होता. त्याचा हा कोर्स पूर्ण झाल्यावर पुण्यातील नामांकित एन्डय़ुरन्स जिमने ट्रेनर या पदासाठी प्रणीतला संधी दिली जी प्रणीतच्या आयुष्यातली सर्वात मोठी संधी होती. एकदा आपल्या आवडीचं क्षेत्र सापडलं, की त्यात जास्तीत जास्त शिकण्याची ओढ माणसाला स्वस्थ बसू देत नाही. तेच प्रणीतच्या बाबतीतही झाले. एकीकडे पर्सनल ट्रेनर म्हणून काम करणाऱ्या प्रणीतचा न्यूट्रिशियनचा कोर्सही पूर्ण झाला. त्यामुळे पर्सनल ट्रेनिंग अधिक न्यूट्रिशियन असं पॅकेज जिममध्ये आपल्या स्टुडंट्सना द्यायला त्याने सुरुवात केली. तरीही त्याचं या क्षेत्रातील शिक्षण थांबलं नव्हतं.

‘के ११ फिटनेस अ‍ॅकॅडमी’चा ‘मास्टर ट्रेनर’ हा कोर्स २०१३ साली लाँच झाला. या कोर्ससाठी पुण्यातून १५ मुलांची पहिल्या राऊंडसाठी निवड झाली. शेवटच्या राऊंडमध्ये त्यातील आठच मुलं निवडली गेली ज्यात पहिल्या पाचमध्ये प्रणीतचा नंबर होता. त्या वेळी तो अवघा १९ वर्षांचा होता. मास्टर ट्रेनरसाठी सर्वात कमी वयाचा हुशार मुलगा म्हणून प्रणीत चांगलाच लोकप्रिय ठरला. या कोर्समुळे तो खऱ्या अर्थाने मास्टर ट्रेनर झाला. ‘‘या कोर्समुळे माझ्या मानधनापासून ते समोरच्या व्यक्तीला ट्रेनिंग देत असताना त्याच्याशी बोलण्यापर्यंत सर्वच स्तरांत प्रगती झाली. गप्पा मारण्याची कला मला इथेच उपयोगी ठरली. दुसऱ्या ट्रेनरचा स्टुडंट माझ्याशी सहज जरी बोलला तरी तो त्या दिवसापासून माझ्याकडे ट्रेनिंग सुरू करायचा. त्यामुळे माझ्याकडे पर्सनल ट्रेनिंगसाठी येणारे स्टुडंट्स वाढतच गेले. त्या वेळी खरं म्हणजे माझी शरीरयष्टीही कमावलेली नव्हती. त्यामुळे माझी बॉडी बघून नव्हे तर माझ्याजवळ असलेल्या सखोल ज्ञानामुळे ते माझ्याकडे खेचले जात होते,’’ असं प्रणीत सांगतो.

मागणी वाढल्यानंतर स्वतंत्र होण्याचा त्याचा निर्णय काहीसा फसला आणि पुन्हा एकदा जिमचा मॅनेजर म्हणून आलेली संधी त्याने आपल्या कल्पकतेच्या बळावर बिझनेस पार्टनर म्हणून रूपांतरित केली; पण त्याला जिम चालवायची कशी? मेंबर कसे गोळा करायचे? याचं काहीच पूर्वज्ञान नव्हतं. म्हणजेच या क्षेत्रातील मार्केटिंग, मॅनेजमेंटची माहिती त्याला नव्हती. म्हणून त्याने या क्षेत्राचा गेली २२ वर्षे गाढा अनुभव असणाऱ्या वीरधवल चोरगे यांच्याकडून मार्केटिंग आणि मॅनेजमेंटचे धडे गिरवले. फिटनेसबद्दल बोलणं आणि फिटनेस विकणं यात मोठी तफावत आहे हे तेव्हा लक्षात आल्याचं प्रणीत सांगतो. पूर्णपणे मॅनेजमेंटचं ज्ञान घेऊन पुन्हा जिम वाढवण्यासाठी कामाला लागलेल्या प्रणीतवर पुन्हा संकट कोसळलं. जिम बंद झाली आणि तो पूर्णपणे रस्त्यावर आला.

प्रणीतवर एकदम संकटांची मालिका चालून आली होती. ‘‘जेव्हा आपण आपलं लाइफस्टाइल एक पायरीवर नेऊन ठेवतो आणि कठीण प्रसंगी आपल्याला नाइलाजाने ती पायरी सोडून परत खाली यावं लागतं तेव्हा ते एक पायरी खाली आणणं अधिकच आव्हानात्मक असतं. या कठीण परिस्थितीत मला माझं अस्तित्व टिकवायचं होतं. एके दिवशी असाच निराश होऊन विचार करत होतो की, आपण इतकी वर्ष काय कमावलं तर ते म्हणजे ‘फिटनेस’. आणि अखंड आयुष्य आपण सतत काय करू शकतो तर ते म्हणजे ‘बडबड’. फिटनेस आणि बोलणं या दोन गोष्टी एकत्र करून वेगळंच सुरू करण्याचा विचार तेव्हा मनात चमकला आणि खऱ्या अर्थाने ‘फिटनेस टॉक्स’ची सुरुवात झाली’, असं प्रणीतने सांगितलं. सुरुवातीला पाच-सहा जणांचा चमू गोळा करून तो फिटनेस टॉक्स करायचा. हळूहळू पाचाचे पंधरा, पंधराचे वीस अशी संख्या वाढत गेली. २६ जानेवारी २०१७ ला पुणे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन १२० पोलिसांबरोबर फिटनेसबाबत गप्पा मारल्या. फिटनेस मॅनेजमेंटचे जे धडे घेतले होते ते तेव्हा खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरले होते, असं प्रणीत म्हणतो.

हळूहळू ‘फिटनेस टॉक्स’चा प्रसार होऊ लागला होता. त्याने सुरुवातीला फिटनेसचा ‘सेव्हन डेज चॅलेंज’ हा प्रकार लाँच केला. हा उपक्रम सुरुवातीचे दोन महिने सर्वासाठी मोफत होता. ‘तुम्ही माझ्याकडून डाएट प्लॅन घ्या. सात दिवस तो फॉलो केल्यानंतर तुमच्या शरीरात काय बदल होतो ते मला येऊन सांगा’, अशी त्यामागची संकल्पना होती, असं तो म्हणतो. त्याची ही संकल्पना पूर्णपणे यशस्वी झाली. तिसऱ्या महिन्यापासून ९९ रुपयांत, तर पाचव्या महिन्यात ४९९ रुपयांत ‘सेव्हन डेज चॅलेंज’ अशी त्याची प्रगती झाली. पाचशे लोकांना याचा फायदा झाला आणि माझा आत्मविश्वास वाढला, असं प्रणीत सांगतो. हळूहळू त्याच्या या चॅलेंजमध्ये मराठी सेलेब्रिटीही सहभागी झाले. मिताली मयेकर, श्रुती मराठे आणि अमेय वाघ या तिघांनी पहिल्यांदा यात सहभाग घेतला होता, अशी आठवण तो सांगतो. त्यांच्या समाजमाध्यमांवरच्या पोस्टमुळे आणखी सेलेब्रिटी जॉइन झाले. सध्या त्याच्याकडे ६० सेलेब्रेटी फिटनेस ट्रेनिंग घेत आहेत.

हे वर्ष प्रणीतसाठी खऱ्या अर्थाने भरभराटीचं ठरलं आहे. गेली पाच वर्ष  केलेली मेहनत आणि त्यातून कमावलेला अनुभव या सगळ्याचं यशात रूपांतर झालं आहे. प्रणीतसाठी एकूणच यशाची व्याख्या वेगळी आहे. ‘‘माझ्या दृष्टीने इतरांसारखं रोटी, कपडा, मकान आणि मग घरसंसार हे असं यशाचं समीकरण नाही. फिटनेस किंवा शारीरिक सुदृढता माझ्यासाठी महत्त्वाची आहे. जगभर फिटनेसबद्दल जागरूकता वाढणं महत्त्वाचं वाटतं आणि त्या वेळी जगातून कुठूनही मला फिटनेससाठी विचारणा झाली तर त्यांना ट्रेनिंग देणारं कुणी तरी माझ्याकडे तयार असायला हवं हे माझं ध्येय आहे,’’ असं तो सांगतो.

क्षणिक आनंद देणारे डाएट काय कामाचे?

डाएटच्या सध्याच्या फॅ डबद्दल बोलताना तो म्हणतो, आपल्या आजोबांच्या किंवा वडिलांच्या लाइफस्टाइलकडे बघा. त्यांचं खाण्यापिण्याचं रुटीन बघा. त्यांच्या ताटात तुम्हाला रोज चटणी, पापड, कोशिंबीर, पोळी भाजी, वरणभात असा चौरस आहार दिसेल. आता आपली लाइफस्टाइल बघा. आपण दोन मित्र खूप दिवसांनी भेटलो तर हमखास कुठे तरी कॅफेमध्ये जाऊन अनहेल्दी पिझ्झा किंवा बर्गरसारखे पदार्थ खाणार. आपला चौरस आहाराचा पूर्वापार चालत आलेला डाएटच प्रत्येकाने स्वीकारला पाहिजे. आपल्या शरीराची क्षमता ओळखून आपल्याला काय हवंय, काय नकोय ते पाहावं. आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या जेवणाच्या वेळा फिक्स ठरवून घ्याव्यात, असं तो सांगतो. आजकाल अनोखे डाएट प्रकार आले आहेत. तुम्हाला डाएट म्हणून निव्वळ अंडीच खायचा सल्ला दिला तर तुम्ही किती दिवस खाल? फारफार तर वीस दिवस. एकविसाव्या दिवशी परत ये रे माझ्या मागल्या. मग हे असे क्षणिक डाएट काय उपयोगाचे? म्हणून डाएट हा आपणच अभ्यासपूर्वक ठरवावा किंवा योग्य अनुभवी डाएटिशियनचा सल्ला घ्यावा, असं तो सांगतो.

viva@expressindia.com