|| पुष्कर जोशी
शिक्षण संपल्यावर त्या क्षेत्रात काही संधी मिळणार आहे का, हेही चाचपायचं होतं. नेटवर्किंग फिल्डचा अभ्यास करायचा विचार करू लागलो. आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असलेले लॅपटॉप, मोबाइल आणि तत्सम सेवा सांभाळणं म्हणजे नेटवर्किंग.
छायाचित्रण हा माझ्या आवडीचा विषय खरं तर. आठवणींचं छायाचित्रण करता येत नाही. मात्र या सदराच्या माध्यमातून शब्दांच्या छायेत आठवणींचे क्षण पकडायचा प्रयत्न मी करतो आहे..
मी ‘यादवराव तासगावकर इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी’मधून बी.ई. (इलेक्ट्रॉनिक्स) केलं. पदवीनंतर नोकरीसाठी अर्ज करताना कळलं की, आपल्याकडे हार्डवेअरच्या क्षेत्रात नोकरी मिळणं, ही गोष्ट खूपच कठीण आहे. या पाश्र्वभूमीवर ‘रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड’मध्ये मी असिस्टंट मॅनेजर सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणून नोकरीला लागलो. वर्षभराच्या कामानंतर टेस्टिंग फिल्डची गोडी लागली. दरम्यान, डोक्यात अमेरिकेत शिकायला जाण्याचा विचार घोळत होता. मात्र माहिती काढताना उमगलं की, ज्या क्षेत्रात शिकायचा विचार करतो आहे ते अमेरिकेत मिळणार नाही. तो बेत रद्द करून शोध चालूच ठेवला. परदेशस्थ मित्रमंडळींशी संपर्क साधून माहिती काढत राहिलो. कारण फक्त शिकायची आवड आहे म्हणून परदेशी जावं, असं करायचं नव्हतं. तर ते शिक्षण संपल्यावर त्या क्षेत्रात काही संधी मिळणार आहे का, हेही चाचपायचं होतं. नेटवर्किंग फिल्डचा अभ्यास करायचा विचार करू लागलो. आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असलेले लॅपटॉप, मोबाइल आणि तत्सम सेवा सांभाळणं म्हणजे नेटवर्किंग. मग त्या दिशेने शोध घ्यायचं ठरवलं. घरच्यांनी या निर्णयाला ठाम पाठिंबा दिला. आपल्याकडे कितीही पैसा असला तरी तो पुरेसा पडत नाही, तर शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवता येऊ शकतं, असं मला वाटतं.
ऑस्ट्रेलियातील पाच विद्यापीठांमध्ये अर्ज केल्यावर चार ठिकाणांहून ऑफर लेटर आलं. त्यापैकी मेलबर्नच्या ‘स्वीनर्बन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी’मध्ये ‘मास्टर्स ऑफ सायन्स नेटवर्क सिस्टीम’ हा अभ्यासक्रम शिकायचा निर्णय घेतला. केवळ हा अभ्यासक्रम नावाजलेला आहे, याच मुद्दय़ाचा विचार न करता शहर, वातावरण, सोयीसुविधा, परिचित लोक आदी गोष्टींच्या मेळाचा विचारही केला. हा निर्णय आणि प्रत्यक्षात इथे येणं यात अनेक अडचणींच्या टेकडय़ा उभा ठाकल्या. ऑफर लेटर हाती पडलं तेव्हा रिलायन्सची नोकरी सुरू होती. शैक्षणिक कर्जासाठी महिन्याहून अधिक काळ लागला. कारण दोन बँकांकडून कर्ज मंजूर झालं नाही. पुढे तिसऱ्या बँकेचा मदतीचा हात मिळून शैक्षणिक कर्जाचा प्रश्न सुटला. त्यानंतर व्हिसा मंजूर व्हायची वाट बघत राहिलो. नोकरीतला एक सहकारी माझ्यासोबत इथे शिकायला येणार होता. त्याचा व्हिसा सहा दिवसांत मिळाला. ‘मेरा नंबर कब आएगा?’ असा सवाल पुसत नोकरी सुरू होती. नोकरी सोडण्यासाठी तीन महिन्यांची नोटीस द्यावी लागते. मात्र सगळी परिस्थिती सांगितल्याने वरिष्ठांचं आणि कार्यालयाकडून सर्वतोपरी सहकार्य मिळालं. दरम्यान, तिकीट काढलं तेही सहकाऱ्यापेक्षा महागच पडलं. नोकरीचा शेवटचा दिवस उजाडला तरी व्हिसा मिळाला नव्हता. जायच्या आधी जेमतेम दोन दिवस आधी व्हिसा मिळाला आणि जेमतेम शॉपिंग करून ऑस्ट्रेलियाला निघालो.
हा माझा पहिलाच विमानप्रवास. मनात संमिश्र भावनांचं काहूर माजलं होतं. एअरपोर्टवर भयंकर थंडीने स्वागत झालं. इमिग्रेशनच्या मोठ्ठय़ा रांगेतून बाहेर पडायला वेळ लागला. आमचे परिचित कुकडे कुटुंबीय न्यायला आले होते. त्यांच्या घरी जाताना एक गोष्ट लगोलग लक्षात आली की, रस्ताभर ना कुठे हॉर्नचा आवाज ना कुणी लेनची शिस्त मोडली. क्षणभर एखाद्या स्वप्नवत वाटलं होतं. सुरुवातीचे काही दिवस जेटलॅगमध्ये गेले. नंतर इथल्या गोष्टींची, नियमांची माहिती करून घेतली. आल्यापासून जवळपास तीन घरं बदलली आहेत. आल्यापासूनच घरशोध मोहीम सुरू केली आणि एक छोटं घर मिळालं. तिथे थोडय़ा अडचणी सोसून काटकसर करणारे मात्र शिक्षणाच्या ध्येयाने झपाटलेले आम्ही पाच मित्र राहात होतो. फार कठीण गेले ते दिवस. इथे स्थिरावयाला लागणारा काळ, स्वावलंबनाची सवय होणं, पार्टटाइम जॉब करणं वगैरे गोष्टी याच काळात घडल्या. त्यानंतर पुन्हा दुसरं घर शोधलं. पुढे मित्रांची संख्या वाढल्याने तिसरं चांगलं घर मिळालं आहे. हे घर विद्यापीठापासून जवळ आहे.
विद्यापीठात ओरिएंटेशन वीक होता. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना विविध गोष्टींची आणि विद्यापीठाची माहिती देण्यात आली. जवळपास ४००-५०० विद्यार्थ्यांना प्राध्यापक वर्ग, अभ्यासक्रम, सेमिस्टर पद्धतीची ओळख करून दिली गेली. आपले विषय आणि सेमिस्टर निवडीचं स्वातंत्र्य इथे आहे. वेबसाइटवर विषय निवडल्यावर टाइमटेबल मिळतं. त्यात व्याख्याने, प्रात्यक्षिकं, कार्यशाळा आदींचा समावेश असतो. त्याची आणि पार्टटाइम जॉबची सांगड कशी घालायची हे विद्यार्थ्यांच्या हातात असतं. शिकवण्याची पद्धत खूपच वेगळी आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षमता आणि वैविध्य लक्षात घेऊ न त्या त्या अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आलेली दिसते. एका वर्गातील जवळपास दीडशे-दोनशे विद्यार्थी दोन प्रोजेक्टरवर शिकतात. दोन तासांचं व्याख्यान रेकॉर्ड होऊ न ते ऑनलाइन अपलोड केलं जातं. प्राध्यापकांच्या प्रेझेन्टेशनच्या स्लाइड्स उपलब्ध होतात. त्यात जास्तीच्या माहितीचा भरणा नसतो, कारण शिकवताना विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून चर्चा घडवून आणत शिकवण्यावर त्यांचा अधिक भर असतो. साहजिकच विद्यार्थ्यांना तितकंच सजग राहावं लागतं आणि पुरेसा अभ्यास करून यावं लागतं. त्यामुळे कठीण वाटणाऱ्या संकल्पना चुटकीसरशी कळतात. प्रात्यक्षिकांसाठी पुरवली जाणारी साधनं-उपकरणं अत्यंत महागडी, चांगल्या दर्जाची असतात. त्यात तडजोड केली जात नाही. प्रात्यक्षिकं आणि सराव खूप करून घेतला जातो. त्यामुळे त्या त्या संकल्पना अधिक चांगल्या पद्धतीने उलगडतात. प्राध्यापक अतिशय स्नेहाने आणि मित्रत्वाच्या नात्याने वागतात. त्यांना वर्गात, व्याख्यानानंतर भेटून किंवा साइटवरच्या डिस्कशन फोरमवर अभ्यासातल्या शंका विचारता येऊ शकतात.
आमचं एक ग्रुप प्रोजेक्ट अजूनही लक्षात राहिलेलं आहे. ‘रुटिंग बेस्ड एसडीएन नेटवर्किंग’ हे त्याचं टायटल होतं. (एसडीएन – सॉफ्टवेअर डिफाइन्ड नेटवर्किंग) या विषयाच्या सुपरवायजरनी आम्हाला एक क्लाएंट नेमून दिला. प्रोजेक्टबद्दलचे मुद्दे क्लायंट सांगणार होता आणि त्याचा अभिप्राय देणार होता. त्यानंतर सुपरवायजर गुण देणार होते. क्लाएंटने आमच्या आणि दुसऱ्या ग्रुपला प्रोजेक्टचा भाग सांगितला. हे प्रोजेक्ट आमच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आणि हटके होतं. एखाद्या कंपनीत हे प्रोजेक्ट प्रत्यक्षात राबवायचं झालं तर त्याचा खर्च प्रचंड आहे. क्लाएंटने आमच्याकडून फक्त माहितीची अपेक्षा केली होती. म्हणजे आम्हाला समजलेल्या गोष्टींचं लिखाण करायचं होतं. दर आठवडय़ाला दोघे जण आमच्या कामातली प्रगती जाणून घ्यायचे. फक्त माहिती काढण्यापुरतं मर्यादित न राहता ते प्रत्यक्ष साधनात कसं वापरायचं ते शोधायला लागलो. ते वाटलं तितकं सोप्पं नव्हतं. भरपूर अडथळे आले. शेवटी क्लाएंटची मदत मागितल्यावर त्यांनी क्लू दिला. मग रात्रंदिवस त्यावर काम करत सहा महिन्यांनंतर ते आम्ही क्लाएंटला इम्प्लिमेंट करून दाखवलं. त्यांना अनपेक्षित काम आम्ही करून दाखवलं होतं. त्यानंतर तज्ज्ञांसमोर या प्रोजेक्टचं प्रेझेन्टेशन द्यायचं होतं. शिवाय या विषयाची माहिती नसलेले लोक-विद्यार्थीही तिथे होते. या सगळ्या जणांना प्रोजेक्टचं सहज आकलन होईल, अशा पद्धतीने ते समजावलं. आमच्या प्रोजेक्टच्या निष्कर्षांचा व्हिडीओही आम्ही स्लाइडमध्ये समाविष्ट केला. पॅनलसोबत प्रश्नोत्तरं झाली. क्लाएंट अगदी खूश झाले. सुपवायजर प्रेझेन्टेशननंतर हसल्यावर क्लिक झालं की, आम्ही एक भारी कामगिरी केली आहे.
विद्यापीठात भारतीयांचं प्रमाण विशेषत: पंजाबी आणि दाक्षिणात्य विद्यार्थ्यांचं प्रमाण लक्षणीय आहे. होळी, दिवाळी मोठय़ा प्रमाणात साजरी केली जाते. शहरातही विविध इव्हेंट्सचं आयोजन केलं जातं. भारतात एकदाच येऊन गेलो पाच आठवडय़ांसाठी. त्यानंतर मात्र इथेच राहून सुट्टीच्या काळात नोकरी केलेली चालत असल्याने पैसे कमावयाचा विचार केला. सेमिस्टर सुरू असताना ठरावीक तासच काम करता येतं. मी दहा-बारा ठिकाणी नोकरी केली आहे. मला छायाचित्रणाची आवड आहे. इथे काम केल्याने कॅमेरा घेता आला. काही काळाने गाडीही घेतली. इथे जॉब शोधण्यासाठी एक अॅप्लिकेशन आहे. त्यावर मी फोटोग्राफीचे जॉब शोधायला लागलो. अभ्यास, काम वगैरे गोष्टी सांभाळता एकाच वेळी जेवायची सवय लागली आहे. त्याबद्दल घरच्यांना साहजिकच चिंता वाटते. आम्ही मित्र गाडीने ग्रेट ओशन रोड, अॅडलेड आदी ठिकाणी फिरायला गेलो होतो. अॅडलेडच्या वायनरीला भेट दिली. तिथून जगभरात वाइनची निर्यात होते. मला स्टेज परफॉर्मन्सची आवड आहे. महाराष्ट्र मंडळाच्या युवा कार्यक्रमात मी लिखाण आणि सादरीकरण केलं. शिवाय अनेक बॉलीवूड सेलेब्रिटीजचे इव्हेंट्स, संगीताच्या कार्यक्रमांना आवर्जून जातो. वर्गातल्या चीन, जपान, नेपाळ, पाकिस्तानी मित्रांसोबत संस्कृती, चालू घडामोडी, चालीरीती, करिअर आदी विषयांवरच्या गप्पा रंगतात. सगळे जण एकमेकांच्या मदतीला धावून जातात. दोन वर्षांच्या या अभ्यासक्रमाचं शेवटचं सेमिस्टर सुरू आहे. त्यानंतर नोकरी शोधून शिक्षणकर्ज फेडायचा विचार आहे. मायभूमीला मिस करतो आहे. मात्र इथे स्थायिक व्हायचा विचार अद्याप केलेला नाही. मला साचेबद्धपणा आवडत नाही. इथल्या सकारात्मक वातावरणामुळे ध्येय साध्य करण्यासाठी अधिकच हुरूप येतो आहे. विश मी लक!
कानमंत्र
- भारतात बसून परदेशाविषयी तर्कवितर्क करणं योग्य नाही.
- विद्यार्थ्यांनी किमान स्वखर्च करता येण्यासाठी काही ना काही काम नि:शंकपणे करावं.
शब्दांकन : राधिका कुंटे
viva@expressindia.com