राधिका कुंटे viva@expressindia.com
अहमदनगर ते इटली हा अमोघ औटी या सरासरी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा करिअर प्रवास अगदी लक्षणीय असून त्यातल्या काही महत्त्वाच्या टप्प्यांची ही नोंद. अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या ‘न्यू इंग्लिश स्कूल’मध्ये शालेय शिक्षण पूर्ण करून तो ‘न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज’मधून बारावी झाला. त्याचे आजोबा डॉ. यशवंत ऋषी हे अहमदनगर कॉलेजमध्ये बॉटनीचे प्राध्यापक होते. त्यांनी शिकवलेलं बायोलॉजी ‘ये हृदयीचे ते हदयी’ त्याच्यापर्यंत पोहोचलं. त्याची बायोलॉजिकल सायन्समधली रुची वाढली. बायोटेक्नॉलॉजीमधल्या करिअरसंदर्भातली कात्रणं त्याचे बाबा त्याला आवर्जून द्यायचे. त्याने पुण्याच्या गरवारे कॉलेजमधून बीएस्सी बायोटेक्नॉलॉजी केलं. त्या वेळी त्याने नॅनो पार्टिकल्सवर प्रकल्प केला होता, ‘इफे क्ट ऑफ कॅ प्ड सिरिअम डायऑक्साइड नॅनो पार्टिकल्स ऑन बॅक्टेरिअल ग्रोथ’ म्हणजेच सिरिअम ऑक्साइड हे एक जड धातूचं संयुग आहे. त्याचा सजीव पेशींवर वाईट प्रभाव पडतो. त्यावर अभिक्रिया करून (CeO2) चे मेदाल्मासहित अतिसूक्ष्म कण बनवून त्याचा विषारीपणा कमी होतो की नाही यावर संशोधन केलं. त्यात मेदाम्ल आवरण असेल तर या विषारीपणात थोडा फरक पडेल, असं आढळलं. त्याच्या मार्गदर्शक डॉ. मधुरा दामले यांचं या प्रकल्पासाठी मोलाचं मार्गदर्शन मिळालं. त्या प्रकल्पामुळे संशोधन कसं करावं, प्रयोगाची रचना, त्याचं निरीक्षण आणि समस्यानिवारण या गोष्टी त्याला उलगडल्या. शेवटच्या वर्षांनंतर एमएस्सी की एमबीए ही दुविधा होती. पण स्वत:ची आवड, पकड आणि समज लक्षात घेतल्यावर त्याला स्वत:चा संशोधनाकडे असलेला कल कळला. जेएनयूमधल्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षेनंतर तो ‘एमएस्सी इन बायोटेक्नॉलॉजी’च्या अभ्यासक्रमासाठी बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठामध्ये निवडला गेला होता. अल्प काळ तो तिथं होता. इथंच त्याच्या करिअरमध्ये एक हवंसं वळण आलं. पुण्याच्या ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी’मध्ये त्याला प्रवेश मिळाला. अमोघने विषाणुशास्त्रात (व्हायरस रिसर्च) पदव्युत्तर शिक्षण घेतलं.
‘आमचे सगळेच प्राध्यापक एक से एक होते. डॉ. डी. ए. गडकरी, डॉ. रमण गंगाखेडकर, डॉ. विक्रम घोले ही त्यातली काही नावं. त्यांची व्यक्तिमत्त्वं ऋषितुल्य आहेत. त्यांनी त्यांच्या विषयांचा जणू अर्कच काढून आम्हाला शिकवलं होतं. माझ्यातल्या संशोधक वृत्तीला इथंच अधिक खतपाणी मिळालं. एमएस्सीला शेवटचे सहा महिने प्रकल्प अनिवार्य होता. डॉ. आलोक चक्रवर्ती माझे मार्गदर्शक होते. त्यांच्या लॅबमधल्या वातावरणात प्रयोगशील व्हायची क्षमता मिळाली. ते स्वत: मोठे संशोधक असले तरी विद्यार्थ्यांच्या मनाची नस पकडून त्यांना समजावण्याची, समजून घ्यायची त्यांची हातोटी आहे. इन्फ्लुएन्झाच्या विषाणूंचे दोन स्ट्रेनचे (HrNr, HzNrr) न्यूक्लिओप्रोटिन (एनपी) या प्रकल्पामध्ये अभ्यासले. इन्फ्लुएन्झाच्या विषाणूंमधल्या एनपी प्रोटिनचा परिणाम फुप्फुसातील पेशींवर कसकसा होतो आणि पेशींचं वर्तन कसं होतं हे पाहिलं,’असं अमोघ सांगतो.
पुण्यात अॅग्रोटेकच्या दैनिकात आलेला लेख अमोघचा मित्र अंकुर गाडगीळच्या वाचनात आला. त्या लेखानुसार डाळिंबावर पडणारा तेल्या रोग जिवाणूंमुळे होतो. त्यावर उपाय म्हणून एक औषध तयार करण्यात आलं असून त्यामुळे झाडाला रोगप्रतिकारक क्षमता प्राप्त होऊ शकते. मग त्यांनी हे औषध शोधणाऱ्या डॉ. शेंडे यांच्याशी संपर्क साधला. या द्रव्याच्या योग्य उपयोजनासाठी तेल्या रोगाला सुरुवात होण्याआधीच लक्षात येईल आणि तो रोखता येईल, असं काही शोधता येईल का, हे अमोघ आणि अंकुरला पाहायचं होतं. या संधीत त्यांचं शिक्षण उपयोगी ठरलं. यासाठी ‘क्वांटिटिव्ह एलायझा’ ही टेस्ट तयार करून त्यांनी सखोल अभ्यास केला. झाडावरची जिवाणूंची मात्रा, रोग तयार होण्यासाठीची मात्रा कळल्याने औषध कधी फवारायचं आणि रोग नियंत्रणात मदत, ती मात्रा कशी कमी होते, तेही दाखवलं. आठ महिन्यांत केलेल्या या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना थोडासा मदतीचा हात मिळाला असेल.
कर्नाटकमधल्या ‘मणिपाल सेंटर फॉर व्हायरस रिसर्च’मध्ये त्याने रिसर्च असिस्टंट म्हणून दोन र्वष काम केलं. त्यादरम्यान एनआयव्हीचे संस्कार आणि शैक्षणिक अनुभवांमुळे तो चांगल्या रीतीने काम करू शकला. उदा. डायग्नोस्टिक रिसर्च करताना दक्षिण भारतातून सॅम्पल यायचे. त्यातून अँडिनो व्हायरस, डेंगू आणि चिकुनगुन्या व्हायरसवर संशोधन केलं. गोव्याच्या दक्षिणेकडील जंगलात आढळणारा क्यासनूर फॉरेस्ट डिसीजचा विषाणू आहे. तो पिसवांमार्फत पसरतो. त्यामुळे माकडताप येतो. त्या संदर्भात अमोघ आणि त्याच्या सहकाऱ्यांचा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. तिथल्या प्रा. एस. सबिना यांनी त्याचं खूप कौतुक केलं होतं. त्यांची संशोधक सहकारी डॉ. अश्वती यांना त्यांच्या पीएचडी संशोधनासाठी अमोघने बरीच मदत केली. तिथल्या एमएस्सी क्लिनिकल व्हायरॉलॉजी विद्यार्थ्यांना काही तांत्रिक गोष्टींविषयी मार्गदर्शन केलं. या दोन वर्षांच्या उडुपीमधील अविस्मरणीय वास्तव्यात जीवनातील अनेक पैलू शोधले आणि सदैव ऋणी राहावं असे वल्ली जिवलग त्याला भेटल्याचं तो सांगतो.
दरम्यान, तो गेट, टीआयएफआर आणि पुणे विद्यापीठाची सेट या परीक्षा उत्तीर्ण झाला. टीआयएफआरच्या जोरावर पीएचडीसाठी मुंबईतील ‘अॅडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, एज्युकेशन अँड रिसर्च इन कॅन्सर’ या खारघरमधील संस्थेत त्याने प्रवेश घेतला. पीएचडी करणं हे त्याचं स्वप्न होतं. त्याच्या मते, काहींसाठी ती केवळ एक पदवी असते. ते त्या पदवीसाठी पीएचडी करतात तर काहींना खरोखरच संशोधनात अधिक रस असतो म्हणून ते पीएचडी करतात. ‘एसीटीईआरसी’मध्ये कॅन्सर जेनेटिक्स लॅबमध्ये कर्करोगाच्या संदर्भातला संशोधन प्रकल्प होता. कॅन्सर बायोलॉजी अर्थात ‘ऑनकॉलॉजी’मधल्या संशोधनाला सध्या खूप वाव आहे असं दिसतं. ‘एसीटीईआरसी’ हा टाटा हॉस्पिटलचा संशोधन विभाग मानला जातो. तो सांगतो, ‘हे एक संक्रमण होतं विषाणुशास्त्रातून कर्करोगशास्त्रात. पदवीकाळातील जैवरसायनशास्त्र आणि मॉलिक्युलर बायोलॉजीचा पाया पक्का असल्याने हे संक्रमण समजायला फारसं जड गेल नाही.’ स्तनाचा व अंडाशयाचा कर्करोग आणि त्याच्या आनुवंशिकतेचा अभ्यास हा त्याच्या पीएचडीचा विषय होता. स्तनाच्या, गर्भाशयाच्या, प्रोस्टेट ग्रंथीचा आणि अन्य काही प्रकारच्या आनुवंशिक कर्करोगांचं निदान लवकर झालं तर त्यावर उपाय वेळीच योजता येतात. रुग्ण आणि कुटुंबांना जेनेटिक काऊन्सिलिंग केलं जातं. एचबीओसी असलेल्या कुटुंबांतील सदस्यांना होऊ शकणाऱ्या कर्करोगाचं जनुकीय चाचणीच्या आधारे निदान करण्यासाठी जवळपास हजार कुटुंबांचा अभ्यास केला गेला. त्यांनी केलेल्या चाचण्यांच्या संदर्भात सिंगापूरमध्ये आयोजित तिसऱ्या ‘आयबीआरसीएएफ २०१९’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहा जणांच्या टीमने सादरीकरण केलं. या संदर्भात अजूनही संशोधन सुरू आहे. काही काळाने काही वैयक्तिक कारणांमुळे त्याने हे पीएचडी करणं सोडलं. मात्र स्वप्नपूर्तीची आस कायम असल्याने त्या दिशेने प्रवास सुरूच होता. नंतर अमोघने पुण्याच्या ‘मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट, कॉमर्स अँड सायन्स’मध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काही काळ मॉलिक्युलर बायोलॉजी आणि व्हायरॉलॉजी शिकवलं. त्यादरम्यान सध्याचे विद्यार्थी आणि आपण शिकलेल्या अभ्यासक्रमातला फरक प्रकर्षांने त्याला जाणवला. सध्याच्या विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा जागृत करण्यात आपला अवाढव्य अभ्यासक्रमच मागे पडताना दिसतो. हे सारं जिज्ञासा उत्पन्न करण्यासाठी असून केवळ गुणपत्रकापुरतेच मर्यादित राहू नये, अशी कळकळ त्याला वाटते. आजही हे विद्यार्थी त्याच्या संपर्कात आहेत.
तो विविध देशांमध्ये पीएचडीसाठी प्रयत्न करत होता. तितक्यात गेल्या वर्षी करोनामुळे कडक लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली. अमोघ सांगतो की, ‘लॉकडाऊनचा काळ खूप काही शिकवून जाणारा होता. जुलैमध्ये इटलीत केलेल्या अर्जासाठी ऑगस्टमध्ये मुलाखत झाली नि पुढे नोव्हेंबरमध्ये प्रवेशपत्र मिळालं. त्याच काळात ‘नॅशनल केमिकल लॅब’मध्ये रिसर्च असिस्टंट म्हणून पाच महिने काम केलं. प्रकल्प होता -‘डेव्हलपमेंट ऑफ अॅप्टेमर बेस्ड रॅपिड डायनॉग्स्टिक किट टु आयडेन्टिफाय कोविड – १९’. एनसीएलची आणि पीएचडीसाठीची मुलाखत हे एकच संधान येईल की काय अशी भीती मनात वाटत होती, पण तसं झालं नाही नि दोन्हीत पास झालो. एनसीएलमध्ये रुजू होण्याआधी इटलीमध्ये केलेल्या अर्जाची कल्पना देऊन ठेवली. तिथे डॉ. कोटेश्वरा राव यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कामात कोविडच्या त्वरित निदानासाठी एक किट विकसित करायचं होतं. हे काम सुरू झालं आणि सप्टेंबरमध्ये मी बाबांना कायमचं गमावलं.. मोठाच मानसिक धक्का बसला होता, पण त्यातून सावरून किट तयार करणं आणि इटलीला जायच्या तयारीत मी स्वत:ला झोकून दिलं.’
अमोघ फेब्रुवारीमध्ये इटलीमध्ये नापोलीतील ‘युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्पानिया लुईगी व्हॅनव्हिटेली’मध्ये आला. आल्यावर इथल्या नियमाप्रमाणे विलग राहिला. त्या काळात फक्त वाचन सुरू होतं. कर्करोगग्रस्त रुग्णांच्या रोगप्रतिकारक क्षमतेचा सखोल अभ्यास हा त्याच्या संशोधनाचा विषय आहे. एकाच वेळी तो कर्करोग रुग्ण, विषाणुशास्त्र, विषाणू रोगप्रतिकार शक्ती यावर काम करतो आहे. ‘डिपार्टमेंट ऑफ प्रिसिजन मेडिसिन’मध्ये प्रा. लुसिओ क्वालिओलो यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन तो करतो आहे. प्रा. लुसिओ यांचा कॅन्सर बायोलॉजी विषयात हातखंडा आहे. या प्रकल्पाच्या मार्गातील अनेकविध अडथळ्यांवर अजूनही काम सुरू आहे. या प्रकल्पातून स्तनाच्या कर्करोगाचं निदान आणि रोगातील संभाव्य चढउतारावरील अनेक प्रश्नांची उकल होण्यास मदत होईल.
तो स्वानुभवावरून सांगतो, ‘इथं विद्यापीठात संशोधनासाठी म्हणून संशोधन केलं जातं. मार्चपासून लॅबवर्क सुरू झालं आहे. संशोधकांबद्दल आदर, आपुलकी आणि विश्वास आहे. आपले विचार आश्वासकपणे ऐकून घेतले जातात. रात्रंदिवस काम करणं अपेक्षित नाही, पण विषयातील आवड जपून काम करता येऊ शकेल, अशी मुभा आहे. संशोधन, बौद्धिक वाद-संवाद असले तरीही लॅबमध्ये ‘माणूस’ म्हणून वागणूक दिली जाते. आमच्या लॅबमध्ये कॅन्सरच्या विविध पैलूंवर काम केलं जातं. स्थळ- काळ- संस्कृतीनुसार कॅन्सरचं स्वरूप आणि रुग्णप्रमाण बदलतं. जगभरात स्तन, गर्भाशय आणि प्रोस्टेट हे कॅन्सर कॉमन असून माझं संशोधन प्रोस्टेट कॅन्सरशी संबंधित आहे. इटलीत सध्या कोविड पुष्कळ नियंत्रणात आहे. फक्त इटालियन लोकांनाच पर्यटनाची परवानगी आहे. संवादापुरती इटालियन शिकलो आहे. इथले लोक मदतीस तत्पर असतात. हळूहळू इथली संस्कृती- आचारविचार कळायला लागले आहेत.’
पीएचडी करणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांचा प्रवास हा सोपा नसतो. हे विद्यार्थी मानसिक आणि शारीरिक तणावाच्या कोणत्या ना कोणत्या पातळीवर लढत असतात. अमोघला त्याचे आईबाबा आणि जोडीदार मधुरा यांचा कायमच ठाम पाठिंबा मिळाला आहे. मधुरा जैव माहिती तंत्रज्ञान विषयातील संशोधक असल्याने अमोघच्या सर्व निर्णयांत ती महत्त्वाची सल्लागार असते. अमोघ एखाद्या निष्णात प्राध्यापकाप्रमाणे अनेकविध संदर्भ, उदाहरणं, प्रेरक वाक्यं बोलता बोलता पेरतो, सांगतो. त्याच्या मते विवेकी संशोधन केल्यावर अनेक प्रश्नांची उकल होते. इतर संशोधकांच्या अपयशातूनही खूप शिकायला हवं, त्यामुळे वेळ वाचतो. प्राध्यापक डॉ. आलोक चक्रवर्ती म्हणायचे की, ‘तुमच्या संशोधनात सत्तर टक्के संदर्भवाचन असलं पाहिजे आणि उरलेला प्रायोगिक स्वानुभव मांडायचा असतो.’ पुढे पोस्ट डॉक करायचा त्याचा विचार आहे. संशोधन क्षेत्रातच राहायचं असून त्याचबरोबर मुलांना शिकविण्याची संधी मिळाली तर अधिक उत्तम होईल, असं त्याला वाटतं. त्याला अनेक शुभेच्छा.