आसिफ बागवान

‘कॅशबॅक’ही संज्ञा आता नवीन राहिलेली नाही. पण अजूनही अनेकांना त्यातील गुंतागुंत कळत नाही. अनेकदा तर ‘कॅशबॅक’च्या लालसेने आवश्यक नसतानाही खरेदी केली जाते आणि मग जेव्हा ‘कॅशबॅक’चा वापर करण्याची वेळ येते, तेव्हा त्यातील अटी-शर्ती पाहून फसवणूक झाल्याची भावना होते. सर्वसामान्यांना खरेदीसाठी अधिकाधिक उद्युक्त करणारं हे ‘कॅशबॅक’ तंत्र व्यवस्थित जाणून घेतलं तर त्याचा पुरेपूर फायदा घेता येऊ शकतो.

पूर्वी एखादी वस्तू खरेदी करायची असली तर बाजारात जायचं, तिथली दहा-बारा दुकानं हिंडायची, वेगवेगळय़ा कंपन्यांची उत्पादनं पारखून-तपासून पाहायची, आपल्याला परवडेल अशा दरात वस्तू मिळावी, यासाठी किमतीत घासाघीस करायची, अशी मोठी प्रक्रिया असायची. ऑनलाइन शॉपिंगने हे काम काही क्लिकइतकं सहज करून टाकलं. वेगवेगळय़ा ई कॉमर्स संकेतस्थळांवरील हव्या त्या वस्तूच्या दरांची तुलना करून ज्या संकेतस्थळावर ती वस्तू स्वस्त मिळेल तेथून आपण ती बसल्या जागेवरून खरेदी करतो आणि ती वस्तू आपल्याला घरपोच मिळते. साहजिकच या पद्धतीमुळे ऑनलाइन शॉपिंगकडे ग्राहकांचा ओढा वाढत चालला आहे. ऑनलाइन शॉपिंगला पसंती मिळण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे, संकेतस्थळांवर खरेदीवर मिळणाऱ्या सवलती आणि कॅशबॅक.

‘कॅशबॅक’चं नाव काढलं तर अनेक ग्राहकांचे डोळे चमकतात. आपण एखादी वस्तू खरेदी करतो, तेव्हा आपल्या खिशातून पैसे जात असतात. परंतु, ‘कॅशबॅक’ म्हटलं की, खरेदीवर आपल्यालाच पैसे मिळण्याची संधी. अशी ऑफर कोण नाकारणार? ‘कॅशबॅक’चा शब्दश: अर्थ रोख परतावा असा होतो. पण व्यवहारातला ‘कॅशबॅक’चा असा अर्थ मुळीच नाही. येथेच अनेक ग्राहक गंडतात. आपल्याला खरेदीवर अमूक टक्के ‘कॅशबॅक’ मिळणार म्हणजे तेवढे पैसे आपल्याला परत मिळणार असा विचार करून केवळ ‘कॅशबॅक’च्या लालसेने अनेक जण खरेदी करतात. पण प्रत्यक्षात त्यांच्या हातात थेट पैसे कधीच मिळत नाहीत. त्यांच्या हातात एखादं कूपन सोपवलं जातं, ज्यावर ‘कॅशबॅक’च्या रकमेइतक्या रकमेची नोंद असते आणि भारंभार अटी असतात. त्यात ‘कॅशबॅक’ मिळालेली रक्कम त्याच संकेतस्थळ किंवा अ‍ॅपवरच वापरता येईल, अमूक इतक्या रकमेच्या खरेदीवरच या ‘कॅशबॅक’चा वापर करता येईल, अमूक उत्पादनांच्या खरेदीसाठीच ‘कॅशबॅक’ वापरता येईल, अमूक कालावधीपर्यंतच ‘कॅशबॅक’ वैध राहील, ही कॅशबॅक एकरकमी वापरता येणार नाही, अशा एक ना अनेक अटी ग्राहकांसमोर ठेवल्या जातात. अनेकदा असे ‘कॅशबॅक’ कूपन किंवा व्हाऊचर स्वीकारल्यानंतरही ग्राहक त्यात नमूद केलेल्या अटी वाचत नाहीत, तपशील वाचत नाहीत आणि प्रत्यक्षात जेव्हा ते पुन्हा खरेदी करायला जातात, तेव्हा त्या कॅशबॅकचा फोलपणा त्यांच्या लक्षात येतो.

‘कॅशबॅक’ हे ग्राहकांना अधिकाधिक खरेदीसाठी आकर्षित करण्यासाठी वापरलं जाणारं नवं मार्केटिंग तंत्र आहे. नव्वदच्या दशकात अमेरिकेतील बँकांनी ही ‘कॅशबॅक’ची टूम काढली. बँकेच्या कार्डवरून खरेदी केल्यास ग्राहकांना अमूक इतकी रक्कम परत मिळेल, अशा स्वरूपाच्या ऑफर तेव्हा दिल्या जाऊ लागल्या. विशेषत: क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी बँकांनी ‘कॅशबॅक’च्या पायघडय़ा घालण्यास सुरुवात केली. तोपर्यंत खरेदीवर घासाघीस करून मिळणारी सवलत किंवा दुकानदारानेच जाहीर केलेला ‘सेल’ या गोष्टींबाबत ग्राहक चोखंदळ असत. ‘कॅशबॅक’च्या ऑफर आल्यानंतर त्यांना ते सवलतीपेक्षाही मोठं वाटू लागलं. प्रत्यक्षात १०० रुपयांची वस्तू ७० रुपयांना मिळत असेल किंवा १०० रुपयांच्या वस्तूवर ३० रुपयांची ‘कॅशबॅक’ मिळत असेल तर एकूण एकच. परंतु, खरेदीवर मिळणारा रोख परतावा ग्राहकांना अधिकाधिक आकर्षित करू लागला. त्यानंतर मोठमोठय़ा डिपार्टमेंटल किंवा रिटेल स्टोअर्सनीही आपापल्या कॅशबॅक ऑफर आणल्या. परंतु, ‘कॅशबॅक’चा प्रभाव वाढला तो ऑनलाइन शॉपिंग आणि अ‍ॅपच्या माध्यमातून केल्या गेलेल्या व्यवहारांत वाढ होऊ लागल्यानंतरच.

मघाशी म्हटल्याप्रमाणे ‘कॅशबॅक’मधून ग्राहकांना क्वचितच रोख परतावा मिळतो. काही बँका असा परतावा देऊ करतात. मात्र, त्यासाठीची खरेदीची रक्कम जास्त असते किंवा त्यातील अटी आणखी कडक असतात.

भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर, नोटबंदी झाल्यानंतर देशात डिजिटल व्यवहारांचे जाळे विस्तारू लागले. अधिकाधिक ग्राहक मोबाइल अ‍ॅप किंवा वेबसाइटच्या माध्यमांतून आर्थिक व्यवहार किंवा खरेदी करू लागले आहेत. मोबाइल, डीटीएच, वीज, पाणी, गॅस अशा सुविधांच्या देयकांचा भरणा करण्यासाठीही अ‍ॅपचा वापर होऊ लागला आहे. रेल्वे, बसची तिकिटे असो की अ‍ॅपद्वारे मिळणारी कॅबसेवा असो मोबाइलद्वारे या सेवांचा वापर करण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे अशा सुविधा पुरवणारे अनेक अ‍ॅप सध्या बाजारात येत आहेत. साहजिकच आपल्या अ‍ॅपचा वापर वाढवण्यासाठी ‘कॅशबॅक’च्या वेगवेगळय़ा ऑफर वापरकर्त्यांना दिल्या जात आहेत. अशा कॅशबॅक ऑफरचा व्यवस्थित अभ्यास केल्यास वापरकर्त्यांना त्याचा फायदा घेता येऊ शकेल.

कोणत्याही ‘कॅशबॅक’च्या ऑफरवर लगेच उडी मारण्यापूर्वी त्याच्या अटींचे वाचन करणे आवश्यक आहे. वर सांगितल्याप्रमाणे अनेक अटींची जंत्री ऑफरसोबत जोडलेली असते. त्या अटी समजून घेतल्या पाहिजेत. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या अ‍ॅपवरून विजेचे बिल भरल्यावर २० टक्के कॅशबॅक मिळणार असेल तर त्यामध्ये कमाल कॅशबॅक किती रकमेची आहे, हे जाणून घेतले पाहिजे. कारण २ हजार रुपयांचे वीजबिल भरल्यावर तुम्हाला जास्तीत जास्त २०० रुपयांची ‘कॅशबॅक’ मिळणार असेल तर, ती बिलाच्या रकमेच्या दहा टक्केच होते. मिळालेली कॅशबॅक संबंधित अ‍ॅपवरूनच वापरण्याची अट घालण्यात येते. तुम्ही विविध सुविधांची बिले ऑनलाइन भरत असाल तर, या अटीचाही तुम्हाला आपल्या फायद्यासाठी वापर करता येऊ शकतो. म्हणजे दोन हजार रुपयांचे वीजबिल भरल्यानंतर मिळणाऱ्या २०० रुपयांच्या कॅशबॅकचा वापर तुम्ही तुमचे मोबाइल किंवा डीटीएच रिचार्जसाठी करू शकता. मात्र, अनेकदा अ‍ॅपवर कॅशबॅकची मासिक मर्यादाही निश्चित करण्यात आलेली असते. म्हणजे, तुम्हाला एका महिन्यात जास्तीत जास्त किती ‘कॅशबॅक’ मिळू शकते, याचाही अंदाज बांधणे आवश्यक आहे. खरेदीवर मिळालेल्या कॅशबॅकचा वापर खरेदीवरच करण्याची अट अ‍ॅपवर असते. अशा वेळी ज्या वस्तूंच्या खरेदीसाठी ही ‘कॅशबॅक’ वापरता येणार आहे, त्या वस्तू खरोखरच आपल्या गरजेच्या आहेत का, हेही जाणून घेतले पाहिजे. मिळालेली कॅशबॅक किती मुदतीत वापरायची आहे, हे तपासूनही तुम्हाला संबंधित ऑफर तुमच्यासाठी लाभदायक आहे का, याचा निर्णय घेता येईल.

थोडक्यात काय तर, ‘कॅशबॅक’च्या ऑफर कंपन्यांनी स्वत:च्या फायद्यासाठीच बनवलेल्या असतात. ग्राहकांनी आपल्याच संकेतस्थळावरून किंवा अ‍ॅपवरून जास्तीत जास्त खरेदी करावी, असा त्यामागील हेतू असतो. अशा वेळी ग्राहकांनी जर व्यवस्थित अभ्यास करून त्या कॅशबॅकचा वापर केला तरच, ‘कॅशबॅक’चे कौतुक करता येईल.

viva@expressindia.com