पणतीच्या उजेडात उगवलेली एक प्रसन्न पहाट. पहाटे पहाटे मित्रमंडळींना भेटण्याचा ‘ऑफिशिअल डे‘ ! सॉरी, पहाट ! कारण एरवी फक्त ‘एफबी‘वरचं ‘गुड मॉर्निंग‘ आपल्याला माहित असतं ना. यानिमित्तानं एकत्र भेटल्यावर होतात मनसोक्त गप्पाटप्पा, खादाडी वगरे वगरे. या हॅपिनग सणाला तरुणाई काय करते, त्याची ही प्रातिनिधिक झलक.
आम्ही गडकरी रंगायतनजवळ भेटतो. इतर ग्रुपमधले ओळखीपाळखीचे अनेकजण भेटतात नि गप्पाष्टकं रंगतात. गेल्या वर्षी शाळेतले सगळे भेटलो होतो. यंदाही तसं ठरतंय. किंवा मग दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला जाऊ. मी गाणं शिकत असल्यानं दोन वर्षांपूर्वी दिवाळी पहाटचा कार्यक्रम केला होता.
भक्ती आठवले
झेव्हिअर्स इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन, मास कम्युनिकेशन, मराठी.
आमचा ग्रुप ‘शिवअस्मिता‘ दिवाळी अंक काढतो. हे आमचं दुसरं वर्ष आहे. दिवाळी पहाटेला अंकाचं प्रकाशन करण्यात येतं. शिवाजी महाराजांचा इतिहास, महाराष्ट्र, मराठी संस्कृती आणि सामाजिकता आदी विषयांशी निगडित लेखन यात असतं. शिवचरित्र सर्वांपर्यंत पोहचावं आणि आपली परंपरा-संस्कृती सगळ्यांना कळावी, हा यामागचा उद्देश आहे.
सिद्धेश ढोकरे
टी. वाय. बी. एससी., रुईया कॉलेज
सकाळी लवकर उठून आमचा ग्रुप नदीवर फेरफटका मारायला जातो. आमच्या एरियात संध्याकाळी फटाके उडत असल्यानं सकाळी थोडेसेच फटाके उडवतो. एकमेकांकडं जाऊन स्वादिष्ट फराळ करतो. यंदा आम्ही मत्रिणींनी धोती-टॉपच्या स्टाईलचे ड्रेसेस घेतले असून तेच घालून दिवाळी पहाटेला भेटून धमाल करणारोत.
दर्शना जाधव
एस. वाय. जे. सी., कॉमर्स, आदर्श कॉलेज
लफ्फेदार साड्या नेसून आणि पारंपरिक पोशाखात आम्ही स्कूल फ्रेंण्डस् फडके रोडवर एकत्र भेटतो. दिवाळी पहाट हे भेटण्याचं एक मोठं निमित्त ठरतं. आम्ही खूप वेळ गप्पा मारत फिरतो. पण कधी फारच गर्दी असेल तर मुव्हीला जातो. फिरल्यावर ‘मॉर्डन कॅफे‘, ‘संगम‘ वगरेंमध्ये जाऊन पेटपूजा करतो.
शमिका भावे
फॅशन डिझाईनिंग मास्टर्स प्रोग्रॅम, फस्ट इयर, लमार्क इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट.
यंदा मी फॅमिली नि फ्रेण्डससोबत ‘मी राधिका‘ या शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमाला जाणारेय. मी काम करत असलेल्या नाटकाच्या मुहुर्तालाही आम्ही जाणार आहोत. गेल्या वर्षी मी गाण्याचे प्रोग्रॅम्स केले होते. शिवाय फडके रोडवर फ्रेण्डससोबत सेलिब्रेशन नि फोटोसेशन करायचंय.
सुप्रिया शेटे
फस्ट इयर आर्टस्, बिर्ला कॉलेज
नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून अभ्यंगस्नान करतो. आईनं केलल्या फराळाची जस्ट टेस्ट घेऊन सोसायटीतल्या मित्रांसोबत फटाके उडवतो. मग आम्ही शिवाजी पार्कात जाऊन फिरतो, फटाके उडवतो आणि इतरांनी उडवलेल्या फटाक्यांची शोभा बघतो. घरी आल्यावर फराळावर ताव मारतो.
शंतनू पेंडसे
सेकंड इयर, इंजिनिअरिंग.
पहाटे पटापट सगळं आवरून मोठ्यांचे आशिर्वाद घेऊन नातेवाईक नि मित्रांना फोन्स-एसएमएसच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा देतो. फटाक्यांचं प्रदूषण टाळून आम्ही तयार केलेल्या किल्ल्यावर पणत्यांची रोषणाई करतो. मग उद्यान गणेशाच्या दर्शनाला जातो. तिथं आणखीन मित्र जॉईन होतात. मनसोक्त गप्पा मारून ‘आस्वाद‘ किंवा ‘प्रकाश‘मध्ये जातो. तिथून बाहेर पडल्यावर पुन्हा गप्पांचा राऊंड होतो. घरचा फराळ केव्हाचा वाट बघत असल्यानं घरून ‘फायनल हाक‘ येण्याच्या आत संध्याकाळी भेटायचं ठरवून घर गाठतो.
सागर पटवर्धन
एस. वाय. जे. सी., कॉमर्स, चेतना कॉलेज