सध्या सगळीकडे फक्त निवडणुका, मतदान आणि सत्ता याबाबतच चर्चा सुरू आहेत. तरुणाई या निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार असं बोललं जातंय. त्यातच सेलिब्रिटीजच्या उमेदवारीचाही गंध आहे. याआधीही कलाकार मंडळींना निवडणूका लढवताना आपण पाहिलं आहे, यातील कित्येकजणांना निवडणूकीत हार पत्करावी लागली आहे. अर्थात निवडून आल्यावर ते राजकारणात किती सक्रिय असतात हा चर्चेचा मुद्दा आहे. येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये आजच्या तरुणपिढीला आकर्षति करण्यासाठी सोशल मिडिया, कॉलेज कॅम्पस डिबेट्स, चर्चा सत्रं अशा विविध माध्यमांचा वापर राजकीय पक्ष करत आहेत. सर्वाबरोबरच तरुणांच्या लाडक्या सेलिब्रिटीजना उमेदवारी द्यायचा किंवा प्रचारात त्यांचा वापर करायचा पक्षांचा फंडा खरंच तरुणांवर मोहिनी घालेल का? हा खरा प्रश्न आहे.

गुल पनाग, किरण खेर, स्मृती इराणी, रवी किशन, परेश रावल, बप्पीदा, दीपाली सय्यद, नंदू माधव, महेश मांजरेकर अशी बरीच मोठी कलाकारांची मंदियाळी राजकारणात नशीब आजमावात आहेत; पण कलाकार निवडून आल्यावर खरंच पोटतिडकीने त्यांच्या शुटींगमधून वेळ काढून जनतेचे प्रश्न सोडवतील का अशी शंका तरुणांच्या मनात आहे. याविषयी बोलताना औरंगाबादच्या एमआयटी महाविद्यालायचा नागेश डोंगरे म्हणाला, ‘यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये कलाकार मंडळी निवडून आल्यावर त्यांनी कोणत्याही विकास कामासाठी प्रश्न उपस्थित केले नाहीत. तरुण मोठ्या प्रमाणात आपल्या कलाकारांचे चाहते असतात हे ओळखून विविध पक्षांनी वेगवेगळ्या कलाकाराला फक्त मतांच्या संख्येसाठी आणि स्वतचा पक्ष सत्तेच यावा यासाठी पुढे केलं आहे.’
आजच्या तरुणाची राजकारणाकडे पहायची दृष्टी व्यापक झाली आहे. ‘सेलिब्रिटी’ आहेत म्हणून तरुण यांना मत देतील असा समज राजकीय पक्षांनी करु नये, असा तरुणांचा सूर आहे. या संदर्भात सांगलीच्या सीआयएमडीआर महाविद्यालयाची आर्या खाडिलकर म्हणते, ‘सेलिब्रेटींना राजकारणात उतरवण्यात काही वावगं नाही; पण सध्या फक्त मतांच्या राजकारणासाठी कलाकारांच्या प्रसिद्धीचा वापर केला जातोय.निवडून आल्यावर ते कितपत जनतेची कामं करतील याबद्दल अजूनही आम्ही साशंक आहोत.’ आज राजकारण कोईभी आओ जाओ या तत्वाखाली फोफावत जातंय असं मुंबईच्या इंजिनिअिरग कॉंलेजचा विद्यार्थी गौरव केळकर याच मत आहे. ‘देश चालवण्यासाठी खंबीर, हुशार आणि अभ्यासू नेतृत्वाची आज समजाला गरज आहे. राखी सावंतसारखे चच्रेत राहण्यासाठी वाट्टेल ती वक्तव्य करणारे लोक राजकारणात येऊन स्वतचा पक्ष काढणार असतील तर त्याला काहीच अर्थ नाहीये; उलट तरुण वर्गामध्ये कोणाला निवडून द्यायचं,कोण खरंच पात्र आहे याची चर्चा गंभीरपणे होतेय त्यामुळे अशा नावापुरत्या वलयांकित व्यक्तींना तरुण कदापीही मत देणार नाहीत.’ सम्यक संकल्प आíकटेक्चर महाविद्यालयाची अनिशा थिगळे म्हणते, ‘सेलिब्रिटी सिनेमा,नाटक या माध्यमांतूनदेखील देशासाठी चांगलं काम करू शकतात; पण राजकीय पक्षांना कलाकारांच्या फेस व्हॅल्यूचा उपयोग होणार असल्यामुळे कलाकारांना राजकारणात आणलं जातंय.आत्ता निवडणुकांना उभ्या असलेल्या कलाकारांनी जनतेचे प्रश्न सोडवावेत अशी अपेक्षा आहे; पण मतदान करतांना तो एक कलाकार आहे, यापेक्षा तो काम करू शकेल की नाही याचा विचार करून तरुण मतदान करतील.’ पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर निदान कलाकारांमुळे मतदान करण्यासाठी लोकं बाहेर पडतील असा यामधला ०.१ टक्के भाग सकारात्मक असू शकतो असं बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या अमृता ढालकर हिचं म्हणणं आहे. तरीसुद्धा कलाकारांकडून जास्त होप्स नाहीत कारण मुळात राजकारण ही त्यांची पाश्र्वभूमी नाही, असंही ती म्हणते.
लोकप्रियतेच्या जोरावर पक्षाचा प्रचार करण्यासाठी आणि आवडत्या कलाकराला पुढे करून तरूणांकडून जास्तीत जास्त मत घेण्यासाठी कलाकारांना पक्ष निवडणुकांच्या जाळ्यात अडकवतायेत अशी शंका तरुणपिढीच्या मनात आहे. निवडून आल्यावर हे कलाकार खरोखरच जनतेच्या प्रश्नांसाठी कसा आणि किती वेळ देऊ शकणारेत, या सगळ्या प्रश्नांची चिंता कलाकारांपेक्षा तरुणांनाच आहे.

फर्स्ट टाईम व्होटर्स


‘‘मी यंदा पहिल्यांदाच मतदान करणार आहे त्यामुळे मतदानाची उत्सुकता आहे. सर्व तरुणांनी योग्य व्यक्तीला मतदान करून निवडून द्यावं. फक्त भाषणांमुळे आकर्षित न होता प्रॅक्टीकली विचार करूनच निर्णय घेणारी आजची तरुणपिढी आहे. आज देशात भ्रष्टाचारासारख्या अनेक गंभीर समस्या आहेत आणि या           सगळ्या समस्यांचं उच्चाटन होण्यासाठी योग्य व्यक्ती निवडून येणं आवश्यक आहे.’’

-केतकी माटेगावकर

‘‘माझं हे पहिलं मतदान आहे. त्यामुळे मतदानाची उत्सुकता आहे.यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये तरुणांचादेखील तेवढाच सहभाग असेल.माझ्या कॉंलेजमध्ये देखील फावल्या वेळात आम्हा विद्यार्थ्यांमध्ये राजकारणावर चर्चा होतात. त्यामुळे तरुणांमध्ये निवडणुकांच महत्व,कोणाला मत दिल पाहिजे याबद्दलची जागरुकता आली आहे. आपण सर्वानी मतदान करतांना त्या उमेदवाराची माहिती करूनच जबाबदारीने व विचारांती        आपलं मत योग्य व्यक्तीला दिलं पाहिजे.’’
-प्रथमेश परब

‘‘मतदान करणं हा आपल्या सगळ्यांचा हक्क आणि कर्तव्य आहे. मतदान करत असतांना आपण कोणाला निवडणून देणार आहोत त्या उमेदवाराबद्दल आधी माहिती करून घ्या आणि मगच मतदान करा.तरुण मतदारांचे सर्वाधिक प्रमाण यंदाच्या निवडणुकांच वेगळेपण आहे.अनेक तरुण सकारात्मकतेने राजकारणाकडे पाहू लागले आहेत. आज  देशासाठी युवा नेते तयार होणं आवश्यक आहे.’’
– सक्षम कुलकर्णी

Story img Loader