ऑगस्ट महिना लागला की, कँपसला ’फ्रेंडशिप डे’चे वेध लागतात. मैत्री सेलिब्रेट करण्याचा हा दिवस. मुंबईतल्या काही कॉलेजेसमध्ये तर अगदी डीजे बोलावून नाच- गाणी रंगतात. कट्टय़ावरच्या सेलिब्रेशनला या दिवशी ऊत येतो. फ्रेन्डशिप डे साजरा करण्याची प्रत्येक कॉलेजची आपापली तऱ्हा वेगळी असते. कसं असतं हे सेलिब्रेशन?
नुकतीच झालेली चांगली ओळख असो वा ‘चड्डी-बड्डी’वाली मत्री, ‘फ्रेन्डशिप डे’ला सगळ्यांबरोबर फूल टू कल्ला करायला अगदी मज्जा येते. खरं तर मत्री करायला वा ती व्यक्त करायला विशेष दिवसाची गरज नसते. आपली मत्री आपण नकळतच दिवसेंदिवस वृध्दिंगत करत जातो. या दिवसाची गरज असते ती मत्री साजरी करण्याकरिता! ‘सेलिब्रेशन’ या शब्दातच उत्साह दडलेला आहे.मग  या उत्साहासाहित धिंगाणा घालायला कोण मागे पडतो?
मुंबईतल्या काही कॉलेजेसमध्ये हा दिवस फारच उत्साहात साजरा होतो. ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा होत असला, तरीही ऑगस्टचा अख्खा पहिला आठवडा सातही दिवस मैत्रीदिवसच साजरा होत असतो. अशा वेळी डी.व्हाय.पाटील, रुईया यांसारख्या महाविद्यालयांतलं वातावरण खुलतं, ते डी.जे.च्या तालावर मग्न होऊन नाचणाऱ्या तरुणांमुळे! विविध रंगाच्या-रुपेरी फ्रेंडशीप बँडची देवाणघेवाण करण्याचं जे वेड शाळेपासून लागलंय ते आजही सुटलेलं नाहीय.
ही मत्री साजरी करण्याची सुद्धा विविध रूपं आहेत बरं का! विल्सन कॉलेज, ठाणे कॉलेज यांसारख्या ठिकाणी  ’आपला देव, मार्कर पेन’ असं समजून हात व चेहेरे रंगवतात. कोरडी रंगपंचमीच जणू! त्यात भर म्हणून एका नवीन ट्रेंडचं स्वागत झालंय गेल्या वर्षीपासून. पांढरे कपडे घालून, आपण ’व्हाईट बोर्ड’ बनून मुक्तसंचार करावा व सर्वाना पाठीवर आपापले मजकूर रंगवण्याचा आनंद द्यावा.(या मजकुरात असतात कधी नावं, टोपण नावं, प्रेमाच्या गोष्टी तर कधी झणझणीत शिव्या!)
एस आय ई एस, रुपारेल अशा महाविद्यालयांत चॉकलेट्स देण्याची प्रथा आहे. जसा फ्रेन्डशिप  बँडच्या रंगानुसार त्या नात्याचा अर्थ ठरतो. त्याचप्रमाणे प्रत्त्येक प्रकारच्या चॉकलेटचा वेगळा अर्थ असतो. गर्लफ्रेंडकरता वेगळं चॉकलेट आणि तर दोस्तांकारिता वेगळं! इथं चॉकलेटपप्रमाणे फुलांची सुद्धा हीच गम्मत. त्यानिमित्ताने अनेक ठिकाणी ’रोझ दे’ सुद्धा साजरा होतो. त्या फुललेल्या गुलाबांची रंगत काही औरच!
याच सुमारास महाविद्यालयांमधून विविध प्रकारचे खेळ, छोट्या-मोठ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. यामुळे कॉलेज मध्ये नुसता धुमाकूळ सुरू असतो. अशा गोष्टींचं आयोजन करण्यात डी.व्हाय. पाटील कॉलेजचा तर हातखंडा आहे. व्हॅलेंटाईन डेला ‘बेस्ट कपल’ काढावं तसं या दिवशी ‘बेस्ट पेयर ऑफ फ्रेंड्स’ काढण्यात येते. त्यांना छान छान बक्षिसं मिळतात. अगदी फुल ऑन धमाल!
फ्रेन्डशिप डे साजरा करण्याची प्रत्येक कॉलेजची आपापली तऱ्हा असते. त्यातूनच जन्माला येतात ’सेलिब्रेशन’ च्या निरनिराळ्या पद्धती. सर्वातून मिळतो तो आनंदच! पण आनंद वाटण्याच्या प्रक्रिया मात्र वेग-वेगळ्या असतात. फ्रेंडशीप डे साजरा करण्याच्या पद्धती विचारताना प्रत्येक कॉलेज कडून वेगवेगळे उत्तर मिळाले.
रुपारेल कॉलेजचा रचित म्हणाला, ‘आम्ही फ्रेंडशीप बँड ऐवजी चॉकलेट्स देतो. प्रत्येक  चॉकलेटचा अर्थ वेगळा असतो पण जवळच्या फ्रेंड्सनां मी डेअरी मिल्क देतो.’
‘एसआयईएस’चा तन्मय म्हणाला, ‘कॉलेजच्या बाहेर जो फुलवाला बसतो, त्याच्याकडून फुलं घेऊन आणि ती वाटून आमचा फ्रेंडशीप डे साजरा होतो. मग कुठेतरी जाऊन खाद्यंती करायची.  त्यादिवशी इतकी गर्दी असते की तिथल्या प्रत्त्येक फूड कॉर्नरचा आमच्यामुळे चांगलाच धंदा होतो.’
गिरगावच्या विल्सनची गौरी म्हणाली, ‘आमच्या एका मित्राचासुद्धा त्याच दरम्यान बर्थडे येतो. त्यामुळे चेहेरे रंगवायला केक सुद्धा असतो. त्यात गेल्या वर्षी आमचा टॅटू काढणारा एक मित्रसुद्धा होता. एकदम बाप टॅटू काढायचा. वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये आमच्या आणि आमच्या क्रशेसच्या नावांचे इनिशिअल्स त्यांत असायचे. पूर्ण पाठीवर! भारी दिसायचं!’
जोशी – बेडेकर (ठाणे कॉलेज)च्या अनुरागने सांगितले की, आमच्याकडे नावं फार क्वचित लिहितात. बाकी हात आणि टीशर्टवर ’भ’ ते ’ल’ सगळं चालता.
रुईयाच्या श्रावणीने सांगितलं की, आम्ही गेल्या वर्षी फ्रेंडशीप डे तर रोझ डे सोबत साजरा केला होता. पण डीजे बोलावला असल्यामुळे प्रत्त्येकांनी फुलं ठेवली बाजूला आणि आपापल्या ग्रुप सोबत नाचू लागले. आम्ही तर तब्बल तीन तास नाचलो. आणि मग ‘पोदार’च्या कट्ट्यावर जाऊन ‘सुभाष’च सँडवीच खाल्लं.
डी व्हाय पाटीलचा आदित्य म्हणाला, ‘आमच्याकडे फ्रेंडशीप डे संपूर्ण दिवसभर होतो. दिवसभर वेगवेगळे गेम्स असतात. त्यात तुम्हाला तुमच्या खास फ्रेंडबरोबर एकादा अवघड टास्क पूर्ण करावा लागतो. मग आम्ही बेस्ट फ्रेंड्सची पेअर निवडतो. त्यानंतर डीजे. वेड्यासारखे नाचतो तेव्हा! कॉलेज मधून निघायला त्या दिवशी दहा तरी वाजतातच.’