प्रत्येक वर्षी कॉलेज सुरू झाल्याच्या बातम्या आल्या, अकरावीच्या अॅडमिशनचे घोळ मिटले की, कॉलेज जीवन उपभोगलेल्या सगळ्यांना त्या दिवसांची हटकून आठवण होतेच. कॉलेजच्या काही ‘स्पेशल’ आठवणींविषयी..
लीना दातार
‘दे से, नेवर लुक बॅक, बट, समटाइम्स लुकिंग बॅक इज वर्थ अ ग्लान्स’ हा उलटा प्रवास करणंसुद्धा ट्रीट असते कधी कधी. पंचविशीतल्या आयुष्यात सेटलमेंटचं रामरगाडं स्थिरस्थावर झालं आणि भविष्याच्या तरतुदींची चिंता वगैरे वाटायला लागलेली असली तरी उनाड दिवसांचं उधाण वारं मनात खूप खोलवर साठवून ठेवलेलं असतं. या उलटय़ा प्रवासात जुन्या वळणांवर नव्याने घेऊन जाणारं काही तरी स्पेशल प्रत्येकाने मनात जपलेलं असतं. कामाच्या व्यापात जबाबदारीने वागताना पूर्वीचा स्वच्छंद खरंच दूर होतो का आपल्यापासून? ऑफिसला जाताना लेटमार्क नको म्हणून घाईघाईने सकाळी ६.१३ पकडताना झोपेच्या प्रेमापुढे बुडालेली लेक्चर्स आठवली की ते जुने दिवस पुन्हा जगायला मिळावेत असं वाटतंच ना! जूनच्या पंधरवडय़ात पुन्हा आठवतोच की तो जुना कट्टा, कॅन्टीन आणि रुटीनलेस रुटीन. कॉलेज म्हटलं की या सगळ्या गोष्टी आल्याच. पण, तरी पटकन डोळ्यासमोर येणारी एखादी गोष्ट प्रत्येकासाठी वेगळी तरी अनेकांना रिलेट करता येण्याजोगी असते. लायब्ररीपासून कट्टय़ापर्यंत आणि वाङ्मय मंडळापासून एकांकिकांपर्यंत कुठल्या न कुठल्या गोष्टीशी आपलं फॉरेव्हर कनेक्शन असतं. पुढच्या अनेक वर्षांनंतर कॉलेज जरी फ्लॅशबॅकचा भाग झालेलं असलं तरी कॉलेजमधली ती स्पेशल गोष्ट मनात कायमच जिवंत राहते.
त्या काळात माणसांइतकंच वस्तूंशी आणि वास्तूंशी कनेक्ट व्हायला सुरुवात झालेली असते. कदाचित म्हणूनच कधी तरी अस्वस्थ होऊन घेतलेला कटिंग मित्राच्या हाकेपेक्षा आणि खांद्यावर विश्वासाने ठेवलेल्या हातापेक्षा जास्त आश्वस्त करतो. कॉलेज सुरू होऊन तीन महिने उलटून गेल्यावरही एकही मित्रमैत्रीण झाली नाही म्हणून मुसमुसणाऱ्या एखादीला रिकाम्या रीडिंग हॉलचाही खूप खूप आधार वाटून गेलेला असतो. दोस्तांपलीकडले हे जिगरी दोस्त साथ देतात ती अखेपर्यंत.
कॉलेज म्हटलं की पुष्पाला सगळ्यात आधी आठवतं ते कॉलेजजवळ मिळणारं सँडविच. कॉलेज संपून ३ वर्षे झालेली असली तरी एकत्र खाल्लेल्या सॅण्डविचची चव जिभेवर तशीच आहे, असं ती म्हणते. जून उजाडला की पुष्पाला आठवतं, छत्री असूनही ती न उघडता मित्रमैत्रिणींसोबत पावसात भिजणं. विदाऊट छत्रीचा तो झिम्माड पाऊस पुन्हा अनुभवावासा वाटतो, असं ती म्हणते.
पाऊस म्हटला की मैत्री, प्रेम आलंच आणि ओघाने जोडय़ा जुळणं आणि जुळवणंही. कट्टय़ावरती चकाटय़ा पिटताना कट्टय़ावरच्या आणि कट्टय़ाबाहेरच्या जोडय़ांवरची रिकामटेकडी चर्चा हमखास रंगतेच. योगीताच्या बाबतीत ‘कॉलेज इज इक्वल टू जोडय़ा’ असं अतरंगी कनेक्शन. ‘कॉलेजचं नवं वर्ष सुरू झालं की जुन्या वर्षांत आम्ही ज्यांच्या ज्यांच्या जोडय़ा जुळवलेल्या असायचा त्या सगळ्या बदलायचो. ग्रुपमध्ये नसलेल्यांना याची साधी कुणकुणही नसायची. त्यात आमच्या ग्रुपमध्ये मुलं जास्त असल्यामुळे अशा उद्योगांना बराच ऊत यायचा,’ योगीता म्हणते. ग्रुपमधली हीच तिरकस डोकी वर्षभर कितीही वितंडवाद झाले तरी वाढदिवस म्हटला की अगदी १५ दिवस, १ महिना आधीपासूनच सेलिब्रेशनचे फंडे ठरवायची. संकेतला आठवतात ते कॅन्टीनमध्ये साजरे केलेले वाढदिवस. ‘दुनिया आर या पार, दुश्मन हो या यार, वाढदिवसाच्या दिवशी सगळेच दोस्त. सगळ्यांचाच वाढदिवस कायमच स्मरणात राहील,’ संकेत म्हणतो.
एव्हाना वर्गात दिसणारी डोकी कॉलेजबाहेर दिसायला सुरुवात झालीये. कटिंगच्या प्रत्येक घोटाबरोबर रिचवलेल्या गप्पा, पचवलेली सिक्रेट्स सगळंच एका क्षणात आपलंसं होऊन क्षणभंगूर होईल. क्षणातीत असेल त्या त्या गोष्टींशी जुळलेलं नातं. आपलं आपलं म्हणताना दूर झालेलं आणि नव्याने पुन्हा आपलंसं होणारं!
viva.loksatta@gmail.com
तुमच्याही अशा कॉलेजच्या आठवणी, गमती-जमती आमच्याशी जरूर शेअर करा. सब्जेक्टलाइनमध्ये ‘कॉलेज डेज’ असं लिहा. आमचा पत्ता- viva@expressindia.com