सेलेब्रिटीज आणि त्यांची फॅशन हा जगभरातील तमाम फॅशनप्रेमींचा लाडका विषय. कोणाची फॅशन हिट ठरली आणि कोणाची फ्लॉप.. या सगळ्यावर दर आठवडय़ाला एक नजर टाकूया या व्हिवा फॅशन गॅलरीमधून..
नायिकांची फॅशन परेड केवळ अॅवॉर्ड नाइट, प्रीमिअर किंवा तत्सम रेड कार्पेट इव्हेंटपुरती मर्यादित नसते. तर प्रेस कॉन्फरन्सेसमध्येसुद्धा काही नायिकांचा फॅशनचा जलवा पाहायला मिळतो. अशा कार्यक्रमांमध्ये त्या कॅज्युअल लुक कसा कॅरी करतात, तेच महत्त्वाचं असतं. एका चित्रपटासंदर्भात नुकत्याच झालेल्या प्रेस कॉन्फरन्सला अनुष्कानं तो लुक छान कॅरी केला. ब्लॅक अॅण्ड व्हाइट हे कॉम्बिनेशन कधीच चुकू शकत नाही. अनुष्काचा हा ब्लॅक अॅण्ड व्हाइट चेक्सचा ड्रेस एका मस्त ‘डे ड्रेस’चं आदर्श उदाहरण आहे. फिटेड ड्रेसच्या हेमला असलेलं प्लिटिंग असो किंवा त्याखालून हळूच डोकावणारं नेट फॅब्रिक तिच्या बबली लुकला साजेसा इफेक्ट देताहेत. नुकताच तिने केलेला शॉर्ट हेअर कट आणि र्बगडी हायलाइट्स अप्रतिमच. सिम्पल मेकअप आणि बेबी पिंक लिप कलरने तिने तिचा लुक पूर्ण केला आहे. सो, तिच्या या परफेक्ट ‘लुक’ला ‘व्हिवा’कडूनही थम्स अप!
खूप दिवसांनी ईशा देओल फॅशन रॅम्पवर अवतरली होती. लग्नानंतर तिचा हा पहिलाच रॅम्प वॉक. शक्यतो लग्न झालेल्या नायिका साडय़ा, घागरा अशा पारंपरिक लुकमध्ये रॅम्पवॉक करताना दिसतात. पण ईशा या परंपरेला तडा देत खास वेस्टर्न आउटफिटमध्ये दिसते आहे. त्यासाठी आधी तिला थम्स अप. व्हाइट लेस फॅब्रिकचा शर्ट आणि व्हाइट शॉर्ट या कॉम्बिनेशनला तोडच नाही. त्यासोबत तिनं न्यूड बेल्ट कॅरी केला आहे. मुळात हा लुक तितक्याच स्पोर्टिग्ली कसा कॅरी करायचा, हे ईशाला नेमकं कळलं आहे. तीन गोल्ड बँगल्स आणि गळ्यात एक नाजुकशी चेन इतकेच दागिने तिचा हा लुक पूर्ण करण्यास पुरेसे ठरले. नखांना केलेलं ‘फ्रेंच मॅनिक्युअर’ हे तिने खास या लुकसाठी केलंय की योगायोगाने मॅच झालंय ठाऊक नाही. पण ते झकास दिसतंय. लास्ट बट नॉट लिस्ट, तिच्या केसांचा लूझ बन. तिच्या सावळ्या वर्णाला म्हणजे डस्की लुकला फोकसमध्ये आणण्यासाठी या हेअरस्टाइलनंच मुख्य भूमिका बजावली आहे.