‘हॉस्टेल लाइफ’चं आकर्षण ते न अनुभवणाऱ्यांना नेहमीच वाटत असतं. पण पहिल्यांदा घरापासून दूर राहताना नेमकं काय वाटतं? तरुणाईचे अनुभव..
कॉलेजचा पहिला दिवस सर्वच जणांना उत्सुकतेचा असतो. पण आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काहीजण केवळ शाळा आणि मित्र-मैत्रिणीच नाही तर घर आणि गावही सोडून नवीन वाटा धुंडाळण्यासाठी निघतात. फ्रेशर्सच्या गर्दीत थोडे जास्त बावरलेले, थोडे भिडस्त चेहरे अगदी सहज ओळखू येतात. बाहेरगावहून शिकण्यासाठी आलेली ही मंडळी असतात. त्यांच्या आयुष्यात हॉस्टेल लाइफ नावाचं नवं पर्व सुरू होतं. आपल्या कोशातून बाहेर येऊन जणू एक नवीन विश्व त्यांच्यासमोर उभं ठाकलेलं असतं. मिळालेलं स्वातंत्र्य हवंहवंसं वाटतं. सगळीकडे आपलंच राज्य नि आपलाच मनमानी कारभार! पण काही अवघड क्षणी, सणासुदीला, आजारपणात घरची ओढ वाटल्याशिवाय राहावत नाही. घरात मिळणारा आधार, आईच्या हातचं जेवण, जुन्या मित्र-मैत्रिणींच्यात वाटणारं मोकळेपण आठवत राहतं. घरापासून वेगळे राहणाऱ्या तरुणाईशी संवाद साधताना याच गोष्टी जाणवल्या.
शिक्षणासाठी प्रथम कोटाला आणि आता आय.आय.टी. मुंबईत राहणारा तुषार नारिंग्रेकर म्हणाला, ‘‘मी दहावीनंतर पुढच्या शिक्षणासाठी म्हणून गेली सहाहून अधिक र्वष घरापासून लांब राहतोय. नवीन गोष्टी शिकण्यासाठी, व्यक्तिमत्त्व घडवण्याची एक संधीच मला यामुळे मिळाली. नवीन ठिकाणी गेल्यावर तिथल्या गोष्टींशी जुळवून तर घ्यायचंच होतं, पण त्यासोबत अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं होतं. त्यामुळे जुन्या गोष्टी मागे पडल्याची खंत वाटते, पण स्वत:शीच नव्याने ओळख झाली, असं वाटतं.’’
शिक्षणासाठी अहमदाबादहून मुंबईला आलेली श्रद्धा शहा म्हणते, ‘‘मी गेली चार र्वष हॉस्टेलमध्ये राहतेय. सुरुवातीला माझ्यासोबत दोन रूममेट होत्या. नंतर मी एकटीच राहात होते. त्यावेळी एकटेपणाला कसं सामोरं जायचं हे शिकले. मला बाहेर खायला आवडतं म्हणून त्याविषयी इतकं काही नाही वाटलं. पण या काळात मानसिकरीत्या स्वतंत्र झाले नि बऱ्याच गोष्टी शिकले.’’
.. आणि मुंबईनं सामावून घेतलं
मृणाल दुसानीस
‘‘ मी २०१० मध्ये पहिल्यांदाच नाशिकहून मुंबईत आले. तेव्हा वर्षभर मी मालाडला एका गुजराती आंटीकडे पेईंग गेस्ट म्हणून राहात होते. नंतर मी आणि माझी मैत्रीण एकत्र राहायचो. मालाडला आम्ही तेरा जणी एकत्र राहायचो. त्यामुळे छोटीशी जागा मिळायची. सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या होत्या. मग सुट्टीच्या दिवशी आम्ही घरीच थांबायचो, गप्पा मारायचो, त्यांनी त्यांचे पदार्थ खाऊ घातले. नाशिकला मला प्रशस्त, शांत आणि निवांत राहायची सवय होती, त्यामुळे सुरुवातीचा काळ थोडासा अवघड होता. मुंबईतली गर्दी, अनोळखी माणसं, अनोळखी क्षेत्र.. चौकशी करून रस्ते शोधावे लागायचे, एकटीला स्ट्रगल करावा लागायचा. आई-वडिलांपासून लांब राहतोय त्यामुळे रडूही यायचं, पण इतक्या मुली आपल्या सोबत राहताहेत हे पाहून काही वाटायचं नाही. पण माझ्याभोवती खूप माणसं छान होती, त्यामुळे त्रास जाणवला नाही. इथे मी एक शिस्तबद्ध आयुष्य जगतेय. मुंबईची माणसं मला खूप आवडली. त्यांनी मला सामावून घेतलं असं मला वाटतं.’’
शेअरिंग शिकलो,
पैशाची किंमत कळली
सुव्रत जोशी -viva.loksatta@gmail.com
‘‘पुण्यात बी.ए. केल्यानंतर मग मी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश मिळवला. तिथे माझं हॉस्टेल लाइफ सुरू झालं. मी पहिल्यांदाच पुण्याबाहेर राहायला गेलो होतो. तो काळ मला समृद्ध करणारा होता असं मी समजतो. आपण प्रत्येक गोष्टीसाठी घरच्यांवर, मित्रांवर अवलंबून असतो. मात्र घराबाहेर गेल्यावर त्यांची खरी किंमत कळली. छोटय़ा छोटय़ा गोष्टी स्वत:च्या स्वत: करायला लागलो. एन.एस.डी.मध्ये आलेले मित्र हे वेगवेगळ्या प्रांतांतून, वर्गांतून आले होते. त्यांचं आयुष्य माझ्यापेक्षा वेगळं होतं. त्यांच्यामुळे मला वेगळा दृष्टिकोन मिळाला, माझ्या विचारधारेत बदल झाला. घरात नेहमीच मला पर्सनल स्पेस मिळायची. पण हॉस्टेलमध्ये मी शेअरिंग शिकलो. पैशांची किंमत कळली. तिथलं वातावरण खूप छान होतं. मला असं वाटतं की, प्रत्येकाने एकदा तरी घराबाहेर जाऊन शिक्षण घ्यायला हवं. कारण त्यातून खूप काही शिकायला मिळतं.’’
कॉलेजचा पहिला दिवस अविस्मरणीय
पूजा ठोंबरे
‘‘माझं बारावीपर्यंतचं शिक्षण बीडमध्ये झालं. पदवी शिक्षणासाठी बीड सोडून पुण्यात आले. पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात अॅडमिशन मिळवली. या केंद्राच्या प्रवेश परीक्षेसाठी आले तेव्हा मनात खूप भीती होती. सर्वस्वी नवीन वातावरण, वेगळा अभ्यास.. आणि बीडमध्ये असेपर्यंत माझं सर्कल खूप लिमिटेड होतं. तिथे सगळे ओळखीचे होते. याशिवाय इथे चंद्रकांत कुलकर्णी, अश्विनी गिरी यांच्यासारख्या कलाक्षेत्रातल्या दिग्गज मंडळींसमोर आपण बोलू शकू का? हा प्रश्नही पडला होता. पण या अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्रातल्या फक्त ८ जणांची निवड झाली आणि त्यात मी एक होते. त्यामुळे भीती थोडी कमी झाली. आत्मविश्वास वाढला. कॉलेजचा पहिला दिवस अविस्मरणीय होता. केंद्राच्या क्लासरूम्स, मार्गदर्शक बघून मी भारावून गेले होते. घरात अभिनयाच्या क्षेत्रात कुणी नव्हतं. पुण्यासारख्या शहरात नव्याने आलेली मी, पण बावरून गेले नाही. घरच्यांचा सपोर्ट होताच, इथल्या शिक्षकांकडूनही खूप काही मिळालं. शहरी वातावरणामुळे नुसतं भारावून जात ध्येयापासून दूर जाणं मात्र योग्य नाही, हेदेखील इथे समजलं.’’