मुंबईकरांमध्ये सेंट्रल – वेस्टर्न हा भेदभाव अगदी जुना आहे. निवृत्त माणसांपासून ते कॉलेजमधल्या मुलांपर्यंत सगळेच हा वाद एन्जॉय करतात. एखादी मुलगी सेंट्रलवाली की वेस्टर्नवाली हे पोर बघताक्षणी ओळखतात.. ओळख नसतानाही कसं?
काही वाद अनादिकाळापासून सुरू झालेत की काय, असं वाटावं इतके पारंपरिक असतात. तरीही ते वाद, ते द्वंद्व अगदी आजही ताजं असतं. त्यावर ताज्या दमानं चर्चा घडत असतात. जसं – पुणेकर विरुद्ध मुंबईकर, शहरी विरुद्ध ग्रामीण, पाळीव प्राण्यांचे मालक विरुद्ध त्यांचं कौतुक ऐकणारे श्रोते इत्यादी इत्यादी तसाच एक आद्य आणि लोकप्रिय वादाचा विषय आहे – सेंट्रल विरुद्ध वेस्टर्न. मुंबई बाहेरच्यांना हे एवढंच सांगून काही कळणार नाही कदाचित, पण अस्सल मुंबईकर नुसत्या विषयानेच आपली बाजू घेत बाह्य़ा सरसावायला लागले असतील, अगदी खात्रीने!
तर बाकीच्यांसाठी थोडी प्रस्तावना.. शहरांतलं सर्वात स्वस्त आणि मस्त सार्वजनिक वाहतुकीचं माध्यम म्हणजे ‘लोकल ट्रेन’! ‘लोकल बस’ असा प्रकार येथे अस्तित्वातच नाही, जे आहे त्याला त्यांना बेस्ट वा टी. एम. टी. म्हणतात. त्यामुळे लोकल म्हटल्यावर ट्रेनच येणार. ‘मी लोकलमधून आले’ म्हणजे ‘मी लोकल ट्रेनमधून आले’ हे गृहीतच धरायचं. आता या लोकल्स म्हटलं, की मुंबईकरांची आपापसांतली स्पर्धा आलीच. त्यात सेंट्रल लाइन आणि वेस्टर्न लाइन हा वाद कधीच न संपणारा! म्हणजे मध्य रेल्वेने प्रवास करणारे आणि मध्य रेल्वेच्या हद्दीत राहणारे विरुद्ध पश्चिम रेल्वेने प्रवास करणारे आणि त्याच परिसरात राहणारे. मुंबईत खरं तर सेंट्रल – वेस्टर्नखेरीज इतर लाइन्स आहेत. पण त्या या आद्य वादात कधी पडतच नाहीत. कारण त्यांना सेंट्रल-वेस्टर्नसारखी परंपरा नाही. समस्त मुंबईकर या वादापासून कधीच वंचित राहिले नाहीत. दिवसभर कितीही दमून आलेला माणूस असला तरीही या वादात काही त्याचा उत्साह कमी होत नाही.
या वादात काही ठरलेले निष्कर्ष असे निघतात, की वेस्टर्न लाइन ही पूर्णपणे अतिशय श्रीमंत, हुशार आणि सोफिस्टिकेटेड लोकांनी भरलेली असून ते कधी कधी त्यांच्या नसलेल्या सोफिस्टिकेटेड आयुष्याची प्रचंड मिजास दाखवतात. अर्थात, हे सेंट्रलच्या टीकाकारांचं मत आहे. आधुनिक यंत्र, सर्व उत्तम दर्जाच्या सेवा-सुविधा आणि मुंबईकरांची क्षमता ओळखणाऱ्या लोकल्स या सर्वच गोष्टी वेस्टर्न लाइनच्या नशिबी आधी येत असल्यामुळे सेंट्रल लाइनवर अप्रगत आणि गरिबीचा शिक्काच बसलाय. उभ्या उभ्या पेटणाऱ्या लोकल्स, फटके फुटल्यासारख्या सिग्नलमधून उडणाऱ्या ठिणग्या, चालता चालता बंद पडणाऱ्या ट्रेन्स, चुकीची वेळ आणि ट्रेन दाखवणारे इंडिकेटर्स आणि मनात येईल तेव्हा जगाशी संपर्क तोडून आराम करणारे पेंटोग्राम यांच्या कृपेने सेंट्रलच्या मंडळींचं जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात व कोणत्याही परिस्थितीत जगायचं ट्रेिनग पूर्ण झालंय. त्यामानाने वेस्टर्न रेल्वेची मंडळी आपण अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व काटेकोरपणे जगतो असे अतिशय गर्वाने सांगतात.
सेंट्रल रेल्वेने प्रवास करणारी वेस्टर्नची बाई आणि वेस्टर्नला प्रवास करणारी सेंट्रलची बाई कोणती हे ओळखण्याची काही अलिखित समीकरणं आहेत. अतिशय अस्थिर, सतत कोणाशी तरी बडबड करणारी (कधी कधी फार कान चावणारी) बाई दिसली की, ती सेंट्रलची आणि आकाश कोसळलं तरी ढिम्म न हलणारी बाई ही सहसा वेस्टर्नची असते. आपल्याकडे कॉलेजमधली काही मंडळी तर पफ्र्युमच्या गंधावरूनसुद्धा व्यक्ती कोणत्या बाजूची आहे हे ओळखू शकतात. अर्थात, उच्च दर्जाचा मान वेस्टर्नचा असतो, हे सांगणं न लगे. (लेख लिहिणारी व्यक्ती कोणत्या बाजूची आहे हे सांगणे न लगे..) इथे भांडण्याची तऱ्हासुद्धा निराळी.. प्रचंड शब्दसंपदा असलेली, विविध प्रकारचे वाक्प्रचार वापरणारी आणि एकाच वेळी गाढवपासून डुकरापर्यंत प्रत्येक प्राण्याचा उद्धार करणारी बाई ही सेंट्रलचीच असते आणि मिळेल तिथून दुसरीला ढकलणारी, वाटलंच तर एखादी चापटी व चिमटा काढणारी बाई ही वेस्टर्नचीच असते, असा एक सर्वसाधारण समज आहे. (पुन्हा ओळखा पाहू आम्ही कोण?)
सेंट्रलविषयी बोलायचं झालं तर इथलं वैशिष्टय़ म्हणजे एकोपा आणि मिळून-मिसळून राहण्याची सवय. पाश्चिमात्यांचा अजून तितकासा प्रभाव इथे नाहीये. तुलना करून स्पष्ट करायचं तर सेंट्रलकडे वेस्टर्नप्रमाणे ‘बोरीवली-विरार’सारखे वाद नाहीयेत. बोरिवलीच्या माणसांनी विरार लोकलमध्ये चढणं हा अक्षम्य गुन्हा असतो आणि या गुन्ह्य़ाची शिक्षा म्हणजे त्या व्यक्तीला बोरिवलीला उतरू न देणं. त्यात शिव्या-शापांची भर असतेच म्हणा. अगदी वाटलंच तर फटकेसुद्धा पडतात. विरार लोकलचा हा वारसा आता डहाणूकरसुद्धा चालवू लागले आहेत. पण सेंट्रलला मात्र असं कोणत्याच प्रकारचं युद्ध नसतं. कोणालाही, कोणत्याही लोकलमध्ये चढण्याचं नि उतरण्याचं स्वातंत्र्य आहे. (गर्दी लक्षात घेऊन आपणच योग्य लोकल पकडणं बरं) पण ठाणेकरांनी कल्याण लोकल पकडल्यास कल्याणकरांना तसा आक्षेप नसतो.
और जब बात हुई वेस्टर्न की, तर अचूक वेळेवर योग्य ठिकाणी पोहोचणाऱ्या यांच्या लोकल्स! सर्वच्या सर्व नव्या-कोऱ्या..तंत्रज्ञाच्या बाबतीत ते सदैव अग्रेसर (इतर लाइनच्या तुलनेत). ९ डब्यांच्या लोकल्सचा जमाना ओलांडून हे कधीच १५ वर आलेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीत थोडं मागे राहणं हे सेंट्रलकरांचं सर्वात मोठं दु:ख आहे. वेस्टर्नवरील सर्व इंडिकेटर्स बऱ्यापकी उत्तमरीत्या चालतात हे जाणून आश्चर्याचा धक्का बसणारे कित्येक सेंट्रलकर आम्ही पाहिलेयेत. इथे असं तर वेस्टर्नकरांचं दु:ख तर याहून वेगळं आहे. ते म्हणजे भारतातील पहिली ट्रेन आपल्या इथून धावल्याचा मान न मिळ्ण्याचं. ‘ठाणे-मुंबई ही पहिली ट्रेन आमच्या इथून धावली’ हे कोणीही न विचारता सेंट्रलकर उगाच अभिमानाने सांगतात. अर्थात, इतिहासात जागा मिळाल्याचा आनंद असतो तो.
पण इन सबका शहेनशहा है दादर स्टेशन! दादर हे अतिशय गजबजलेलं, दिशाभूल करणारं, कुठून कुठपर्यंत आहे हे अजिबात न समजणारं आणि विक्रेत्यांना आश्रय देणारं बऱ्यापकी जुनाट, मळकट असं स्टेशन असलं तरी दादरविरुद्ध एक चकार शब्द काढायला कोणी धजत नाही. कारण अर्थातच असं की ते सेंट्रल, वेस्टर्नचा तो एकमेव दुवा आहे. त्यामुळे पूर्वीपासूनच दादरला स्वत:ची ओळख आहे.
आता कोपऱ्यात पडलं हार्बर! तसं ते बाळच आहे अजून. नुकतंच जन्माला आलेलं! कोणाच्या ना अध्यात-मध्यात. स्वत:च्या धुंदीत मश्गुल! पण स्वत:चं अस्तित्व जाणवू देणारं. या सगळ्या रणधुमाळीत दादरची मंडळी हा सेंन्ट्रल-वेस्टर्न वाद मस्तपकी एन्जॉय करत बसते आणि शेवटी हे दोघंही ‘जाऊदे रे..कोणीच परफेक्ट नसतं! सगळी चूक सरकारची!’ असं म्हणून हा वाद थांबवून गाढ झोपून जातात. अर्थात, दुसऱ्या दिवशी पुन्हा याच मुद्दय़ांवर त्यांची चर्चासत्रं भरतात आणि पुन्हा या गमतीचा होतो नवा प्रारंभ.