‘सौंदर्य’ या संकल्पना बहुतेक वेळी ‘निसर्गसौंदर्य’ आणि ‘स्त्रीसौंदर्य’ या दोनच बाबतीत बहुतेक जण वापरतात. कवी, लेखक, कलाकार मंडळी कल्पनाप्रधान वृत्तीकडे झुकत असले, तरी कल्पनेतसुद्धा या दोन सौंदर्यापुढे कल्पना करण्यास फार ‘स्कोप’च मिळत नाही. पुरुषाचं सौंदर्य वर्णन करणारे काव्य विरळाच. हे पुरुषाचं सौंदर्य प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एक घटक मोठं काम करतो- दाढी! (आता दाढीलासुद्धा ‘ती’ दाढी म्हणणं म्हणजे या सौंदर्यवर्धक घटकाला स्त्रीलिंगी वचनात मोडून स्त्रीसौंदर्याची झालर दिली गेली आहे.. असो.. पण दाढी ही पुरुषसौंदर्याचा भाग बनली हे नक्की!)
हल्ली कोरीव दाढीची फॅशन पुन्हा तरुणांमध्ये लोकप्रिय झाली आहे. पूर्वीच्या काळी राजे-महाराजे आवर्जून दाढी ठेवत असत. त्यांच्या शूरतेचं, वीरतेचं ते प्रतीक होतं. दाढी ठेवणाऱ्या पुरुषात हा एक प्रकारचा ‘रॉयल चार्म’ असायचा. पण मध्यंतरी रॉयलनेसची आपली संकल्पना थोडी बदलली आणि त्यात दाढी अगदी हद्दपार झाली. व्यवस्थित, टापटीप राहण्यात वाढलेली दाढी अडचण ठरू लागली. अजूनही कुठे नोकरीच्या इंटरव्ह्य़ूला जायचं झालं किंवा कुठल्या समारंभाला जायचं झालं तर टापटीप असलं पाहिजेच. टापटीप म्हणजे भांग पाडलेले, विंचरलेले केस आणि क्लीन शेव्हड्.. असं समीकरण होतं.
ही सगळी समीकरणं आता बदलत चालली आहेत. हल्ली जी फॅशन इन आहे ती म्हणजे, ऐटबाज दाढी राखण्याची अगदी थेट छत्रपती शिवाजी महाराजांसारखी! इतक्या वर्षांनंतर पुन्हा दाढी राखण्यामागे काय कारणं असतील याचा विचार केला असता आणि तरुणांच्या मानसिकतेचा विचार करता पहिलं कारण सापडतं ते म्हणजे- कंटाळा! तरुणांना दाढी करण्याचा प्रचंड कंटाळा येतो. एक तर ती रोज करावी लागते आणि दुसरं म्हणजे घाईगर्दीच्या वेळेतील ती सगळ्यात वेळखाऊ प्रक्रिया! पुन्हा घाईने केल्यास हनुवटीचा वध होण्याची भीती. इतकी सगळी कसरत लक्षात घेता, ती न केलेलीच उत्तम! वेळेचीही बचत, छानही दिसते आणि काही‘जणीं’ना ती आवडतेसुद्धा!
दाढी राखण्याच्या फायद्यांमधील एक अत्यंत फायदेशीर गोष्ट म्हणजे, मुलींना दाढी राखलेली मुलं आवडतात म्हणे! आता इतकी महत्त्वाची गोष्ट असल्यावर मुलं ती टाळणं शक्यच नाही. मुलींचाही त्यात फारसा काही दोष नाही म्हणा. ‘अ बॉयफ्रेंड विदाऊट अ बिअर्ड इज युअर गर्लफ्रेंड’ अशा प्रकारची विधानं सोशल मीडियावर पसरत असता कोणती मुलगी दाढीवाला मुलगा आवडून नाही घेणार? याबाबत आम्ही काही जणींच्या प्रतिक्रिया घेतल्या. सुकन्या नाईक असं म्हणते, ‘जो तरुण दाढी राखतो, त्याची निगा राखतो, त्यावर कलाकुसर करतो म्हणजे एकूणच त्याचं स्वत:कडे लक्ष असतं आणि ते जास्त भावतं. त्यावरून आपण त्याचं व्यक्तिमत्त्व ओळखू शकतो.’ म्हणजे आता मुलांचं व्यक्तिमत्त्व त्यांच्या दाढीमुळे खुलतं असं काही जणींचं स्पष्ट मत आहे. ‘नुसत्या पिळदार मिशा असून चालत नाही, त्या अधिक उठून दिसतात दाढीमुळे! दाढीमुळे तरुण मॅच्युअर दिसतो.. ‘दिसतो’वर जोर!’ असं रसिका पाळंदे म्हणाली. तरुणींच्या इतक्या दाढीसमर्थक प्रतिक्रिया लक्षात घेता, काही तरुणांनी फेसबुकवर ‘इन अ रिलेशनशिप विथ बिअर्ड’ असं स्टेट्स ठेवायला सुरुवात केली आहे.
खरं तर दाढी करणं हा प्रकार जितका सोपा वाटतो तितका तो मुळीच नाही. शेती राखणं जितकं कठीण तितकंच दाढी राखणंही! दाढीची पेरणी तरुण वयातच होते, पण एकदा पेरणी झाल्यावर ‘पीक’ भरघोस घ्यायचं असेल तर त्याची खुरपणी, नांगरणी आणि कापणी अशी व्यवस्थितच निगराणी करावी लागते. त्यासाठी आपल्यासमोर बऱ्याच दाढीकरी बंधूंची उदाहरणं आहेत. हॉलीवूडमध्ये ब्रॅड पीट, जेअर्ड लेटो किंवा हँगओव्हरमधला हिरो, बॉलीवूडमध्ये अमिताभ बच्चन, आमिर खान ते मराठीमधील स्वप्निल जोशी आणि अगदी लेटेस्ट सुव्रत जोशी इथपर्यंत दाढीची फॅशन आहे. एक फॅशन काही काळाने जुनी होऊन पुन्हा नव्याने जन्म घेते, त्याप्रमाणे दाढीची ‘वाढता वाढता वाढे’ असणारी फॅशन ‘संभवामि युगे युगे’ आहे. ल्ल
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा