दिवाळी म्हणजे दिवे उजळून, फराळ करून कुटुंबीयांसमवेत घरात राहून साजरा करण्याचा उत्सव. पण बदललेल्या प्रायॉरिटीजनुसार उत्सवाचं स्वरूप बदलतंय. एक मित्र आदिवासी पाडय़ात दिवाळी साजरी करतोय, कुणी याच हक्काच्या सुट्टय़ांना पर्यटनाला जातंय, तर कुणी जुन्या मित्र-मैत्रिणींसोबत कट्टय़ावर भेटतंय तर कुणी ‘दिवाळी पहाट’च्या सुरांत रमतंय.. दिवाळीच्या बदलत्या स्वरूपाविषयी..
भारतीय संस्कृतीत सण आणि उत्सवांची परंपरा तशी फार जुनीच. हवामानातील आणि निसर्गातील बदलांनुसार साजऱ्या केल्या जाणारया सण-उत्सवांचं मूळ कारण म्हणजे हे सगळे बदल लक्षात घेऊन, आप्तेष्टांशी ‘शेअिरग’ वाढवणं. पूर्वीच्या काळात लोकसंख्या तुलनेनं कमी असल्यानं सण-उत्सव साजरे करणं सोप्पं होतं. पण आजकालच्या वाढत्या उद्योगधंद्यांमुळे म्हणा, लाइफस्टाइल मुळे म्हणा, किंवा लोकांच्या बदलत्या प्रेफरन्सेसमुळे म्हणा, एकूणच या सण-उत्सवांमध्ये ‘मॉडिफिकेशन्स’ यायला लागलेयत. या सण-उत्सवांचं मूळ कारण हे समाधान हे जरी असलं तरीसुद्धा गेल्या काही वर्षांपासून वर्षांनुर्वष चालत आलेल्या परंपरांमध्ये मॉडिफिकेशन्स करून, एस्थेटिक व्हॅल्यूज जपत सण साजरे केले जाताहेत. बदलत्या लाइफस्टाइल मुळे आप्तेष्टांना वेळ देणं जमत नसलं, तरी सण-समारंभांनिमित्त नात्यांना टिकवण्याची परंपरा चालू आहे. पण कुठे तरी पूर्वी दिवाळी म्हटलं की घरी बसून, नातेवाईकांना भेटून साजरा केला जाणारा सण ही पद्धत दिसून यायची. अजूनही काही घरात ही परंपरा पाळली जाते. दिवाळीच्या दिवशी घराला कुलूप लावून कुठे जायचं नाही, सगळ्यांनी घरात थांबायचं, असा प्रघात पाळला जातो पण काही घरांमध्ये मात्र बदलत्या लाइफस्टाइलमुळे, सामाजिक जागरूकतेमुळे किंवा एकूणच बदलत्या प्रायोरिटीजमुळे हा ट्रेंड बदलत असल्याचं जाणवतंय.
इंडिया आणि भारत या दोन टम्र्समधील वाद आणि फरकसुद्धा तरुणाईला माहीत नसतो, अशी आरोळी आजकाल हमखास ठोकली जाते. पण याच स्टेटमेन्टला एक्सेप्शन ठरतंय ते चिराग पत्की आणि त्याच्या मित्रपरिवाराने सुरू केलेल्या उपक्रमाचं. चिरागच्या म्हणण्यानुसार, दिवाळी म्हणजे फक्त पसे खर्च करण्याचा सण असा कित्येकांचा दृष्टिकोन असतो. पण हा दृष्टिकोन दूर करत, लोकांमध्ये सामाजिक जाणीव जागृत करण्यासाठी म्हणून चिराग आणि त्याचा मित्रपरिवार दरवर्षी दिवाळीला पनवेलमधील आदिवासी पाडय़ांना भेट देतात. तेथील नागरिकांसाठी घरा-घरातून फराळ गोळा करतात. या उपक्रमात त्यांना पनवेलमधील एक गणपती मंदिरदेखील मदत करतं. सगळ्या ठिकाणांहून फराळ गोळा करून, तो आदिवासी पाडय़ांमधील मुलांना ते स्वत: वाटतात. जनहितसंवर्धन मंडळाच्या वतीने चिराग गेली पाच- सहा र्वष हा उपक्रम राबविण्यात मदत करतोय. त्याच्या म्हणण्यानुसार शहरातल्या मुलांना सर्व काही मिळत असल्यामुळे कधी-कधी फराळ तितकासा खाल्लाही जात नाही. पण जिथे काहीही सोयी-सुविधा उपलब्ध नाहीयेत आणि फराळ करण्याइतपतही ज्यांची परिस्थिती नाहीये अशा लोकांसाठी हे काम करण्यात खूप समाधान मिळतं, असं चिरागचं म्हणणं आहे. काही काही लोक चिराग आणि त्याच्या मित्रपरिवाराच्या या उपक्रमावर खूश होऊन स्वत:ची परिस्थिती नसतानाही काही रुपये देण्यास तयार होतात. यावर्षी चिराग आणि त्याचा मित्रपरिवार हा उपक्रम काहीसा मोठय़ा प्रमाणावर अमलात आणण्याच्या विचारात आहेत. पण एकूणच सामाजिक भान जपणाऱ्या या तरुणांनाचा हा उपक्रम स्तुत्य आहे असं म्हणावं लागेल.
बदलत्या लाइफस्टाइलमुळे किंवा नोकरी धंद्यांमुळे कित्येक परिवारातील लोकांना इतर वेळी न मिळणारी सुटी फक्त दिवाळीतच मिळते. अशाच सुटी न मिळणाऱ्या गरिमाचं म्हणणं असं की, दिवाळी पारंपरिकरीत्या साजरी करण्याचा ट्रेंड बरोबर आहे. पण इतर दिवशी सुटी नसल्यानं दिवाळीच्या दिवसांमध्ये परदेशवारी करणं किंवा भारतातही इतरत्र फिरून येणं हे खूप प्रॅक्टिकल वाटतं. काही अंशी दिवाळी अगदी टिपिकलरीत्या साजरी करणं ती थोडंफार मिस करत असली, तरी ती तिच्या दिवाळीतल्या परदेशवाऱ्यांचा आनंदही दरवर्षी तितक्याच उत्साहाने लुटतेय. या वर्षीची दिवाळी परिवारासोबत ऑस्ट्रेलियामध्ये साजरी करण्याचा तिचा मानस आहे. कित्येक टुरिस्ट कंपन्या दिवाळीसाठी कित्येक पॅकेजेस् तयार करतात. ते पॅकेजेसही काही उच्च मध्यमवर्गीयांना परवडत असल्यामुळे त्यांच्याकडून खरेदी केले जात आहेत. अशा टुरिस्ट कंपन्यांसोबत मग प्रत्येक वेळी नवनवीन लोकांसोबत दिवाळी एका वेगळ्याच पद्धतीनं साजरी करण्याचा अनुभव कित्येक प्रवासप्रेमींना मिळत असतो. शिवाय ‘दिवाळी पहाट’सारखे कार्यक्रम असतातच. घरी बसून स्वत:चंच विश्व तयार करून त्यात रमण्यापेक्षा, बाहेर जाऊन असे कार्यक्रम अटेंड करून, उत्सव साजरे करण्याची लोकांची मानसिकताही तितकीच वाढतेय.
दिवाळी साजरी करण्यातला हा फरक कित्येक टीनएजर्समध्येही दिसायला लागलाय. कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुला-मुलींसाठी तर दिवाळी म्हणजे सगळ्या जुन्या, खासकरून शाळेच्या मित्र-मत्रींणींना (काही ठिकाणी कपल्सनासुद्धा!) भेटण्याचा दिवस ठरतोय. या सगळ्याचं उत्तम उदाहरण म्हणजे डोंबिवलीतील ‘फडके रोड’. डोंबिवलीतच राहणाऱ्या पल्लवीचं म्हणणं असं की, दिवाळीच्या दिवशी फडके रोडवरचं वातावरण काही औरच असतं. त्या वातावरणात मग सकाळ-सकाळी सर्वप्रथम तिथल्या जुन्या गणपती मंदिराला भेट देणं ही दरवर्षीची प्रथा. ती म्हणते, सकाळी पाचला सुरू होणारी ‘यात्रा’ आजपर्यंत कधी अनुभवलेली नाहीये; पण या वर्षी मात्र त्या यात्रेला फ्रेंड्ससोबत नक्की जाणार आहे. पण दिवाळीच्या दिवशी फडके रोडवर जाणं म्हणजे सगळ्या जुन्या मित्र-मत्रिणींची भेट ठरलेली. एरवी स्वत:च्या शेडय़ूलमध्ये बिझी असणारे फ्रेंड्स यादिवशी हमखास भेटतात. मग कधी फराळ एकमेकांना दिला जातो, तर कधी तिकडच्याच अंबिका हॉटेलमध्ये पाव-भाजी खाण्याचा बेत असतो, असंही ती पुढे म्हणाली.
अस्मिता नामक मत्रिणीची इंग्लंडमध्ये राहणारी आत्या अजूनही न चुकता दिवाळी साजरी करते. कधी ती स्वत: फराळ बनवते, तर कधी तिकडच्या मार्केटमध्ये विकल्या जाणाऱ्या फराळावर ती दिवाळी साजरी करते. थोडक्यात, मॉडिफिकेशन्स जरी होत असले, तरीही दिवाळी साजरा करण्याचा प्रत्येकाचा उत्साह अजूनही कायम आहे. स्वरूप बदललं असलं, तरीही परंपरा जपल्या जाताहेत. गृहिणी ते सुपरमॉम एवढा बदल जरी झाला असला, तरी या बदलांमुळे समाजात इतरही पॉझिटिव्ह बदल झालेले आहेत आणि ते बदल दिवाळीसारख्या सणांमधूनही जाणवायला लागलेयत. एकूणच पूर्वी निसर्ग आणि हवामानाशी जोडले गेलेले या सण उत्सवांचे संबंध अजूनही बदलत्या जीवनशैलीनुसार प्रत्येक हौशी भारतीयाकडून जपले जाताहेत, हेच या बदलांचं वैशिष्टय़ म्हणावं लागेल.
छाया : दीपक जोशी
बदलता उत्सव बदलतं सेलिब्रेशन
दिवाळी म्हणजे दिवे उजळून, फराळ करून कुटुंबीयांसमवेत घरात राहून साजरा करण्याचा उत्सव. पण बदललेल्या प्रायॉरिटीजनुसार उत्सवाचं स्वरूप बदलतंय. एक मित्र आदिवासी पाडय़ात दिवाळी साजरी...
आणखी वाचा
First published on: 01-11-2013 at 01:09 IST
TOPICSदिवाळी सणDiwali Festivalदिवाळी २०२४Diwali 2024मराठीMarathiमराठी बातम्याMarathi NewsविवाViva
+ 1 More
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Changes in diwali celebration