तेजश्री गायकवाड – viva@expressindia.com
‘गुची’ या नावाचा उच्चारच गोंधळात टाकणारा असला तरी महती फार मोठी आहे. क्लासिक ब्रॅण्ड ही इटालियन ‘गुची’ची खरी ओळख जी आजही कायम आहे. इटलीत कोण्या एका गुचिओ गुची नामक वल्लीने सुरू केलेला हा ब्रॅण्ड जगभरात आज अभिजनांपासून ते ट्रेण्डी नव्या पिढीपर्यंत सगळय़ांवर गारूड करून आहे. क्लासिक ब्रॅण्ड हीच ओळख जपायची की नव्या पिढीच्या चवीनुसार स्वत:ला बदलायचं?, या प्रश्नाचं उत्तर हे फक्त क्रिएटिव्ह डिझाइन्सने सुटणारं नाही. त्यासाठी बाजाराची नसही अचूक पकडायला हवी हे लक्षात आल्यानंतर या ब्रॅण्डने कायापालट केला. आज क्लासिक ते ट्रेण्डी पॉपचा प्रभाव असलेली तरुण पिढी दोन्ही वर्गावर ‘गुची’चे वर्चस्व आहे.
फॅशनप्रेमींसाठी ‘गुची’ हा फक्त ब्रॅण्ड नाही, तो अॅटिटय़ूड आहे. प्रीमियम श्रेणीतील फूटवेअर, कपडे, सौंदर्य प्रसाधने आणि अॅक्सेसरीजच्या उत्पादनात आघाडीवर असलेला हा ब्रॅण्ड ‘केरिंग’ या बहुराष्ट्रीय रिटेलरचा भाग आहे. शतकोत्तर वाटचाल सुरू केलेल्या ‘गुची’ची कथा रंजकच नव्हे तर फॅशन आणि मार्केटिंगची समीकरणे कशी जुळवली जातात, या दृष्टीनेही अभ्यासावी अशी आहे. चामडय़ाच्या वस्तू ही या ब्रॅण्डची खासियत तिच्या कर्त्यांपासून जोडली गेली आहे. फ्लॉरेन्समध्ये १८८१ साली इटालियन चामडय़ाच्या वस्तू बनवणाऱ्या कारागिरांच्या एका साध्या कुटुंबात गुचिओ गुची यांचा जन्म झाला. गुचिओ यांनी १८९७ मध्ये लंडनच्या ‘सवॉय’ हॉटेलमध्ये हमाल म्हणून काम करण्यास सुरुवात केली. इथे येणाऱ्या उच्चभ्रू पाहुण्यांच्या सुंदर सुटकेस, बॅग्जपासून ते कोणकोणत्या गोष्टी वापरतात हे तासन् तास न्याहळत राहणं हे त्यांचं कामच होऊन गेलं होतं. अभिजनांची आवड लक्षात आलेले गुचिओ १९०२ मध्ये आपल्या गावी परतले. त्याआधी त्यांनी लेदरच्या वस्तू बनवणाऱ्या ‘फ्रांझी’ नावाच्या कंपनीत काम करता करता कारागिरीही शिकून घेतली आणि उत्कृष्ट लगेज बॅग्जची निर्मिती करण्यासाठी ते सज्ज झाले.
१९२१ मध्ये गुचिओ यांनी फ्लॉरेन्समध्येच दोन ठिकाणी ‘गुची’चे स्टोअर सुरू केले. कंपनीच्या सुरुवातीच्या काळात गुचिओ यांनी चामडय़ाची उत्पादने इटलीतील सर्वात श्रीमंत लोकांना विकली. लगेज बॅग्ज बनवणे हा त्यांच्या ब्रॅण्डचा एक भाग होता, परंतु त्यांनी काही उत्कृष्ट इटालियन चामडय़ापासून घोडय़ांसाठी खोगीरही बनवले. पुढे त्यांनी चामडय़ाच्या वस्तूंसह प्रीमियम निटवेअर, रेशीम प्रॉडक्ट्स, शूज आणि हँडबॅग्जचे उत्पादन सुरू केले. दुसऱ्या महायुद्धामुळे झालेल्या परिणामांचा फटका गुचीच्या निर्मितीलाही बसला आणि त्यांना माल तयार करण्यासाठी कॉटनचा मोठय़ा प्रमाणावर वापर करावा लागला. याच काळात ब्रॅण्डने त्यांचा विशिष्ट ‘डबल-जी’ मोनोग्राम आणि प्रतिष्ठित ‘गुची स्ट्राइप’ सादर केला. मध्ये लाल पट्टा आणि दोन्ही बाजूला हिरव्या रंगाचे पट्टे असलेला हा गुची स्ट्राइप ब्रॅण्डची ओळख ठरला.
गुचिओ गुची यांचे १९५३ मध्ये निधन झाले, परंतु त्यांची तीन मुलं अल्डो, वास्को आणि रोडॉल्फो यांच्या नेतृत्वाखाली हा व्यवसाय पुढे त्याच डामडौलात सुरू राहिला. साठच्या दशकात या ब्रॅण्डने उच्चभ्रू वर्गात आपले स्थान पक्के केले होते. गुचीची लोकप्रियता अगदी कमी वेळात इतकी वाढली की त्यांच्या प्रॉडक्ट्सची नक्कल गल्लोगल्ली उपलब्ध होऊ लागली. तर दुसरीकडे सेलिब्रिटी-कलाकार यांच्या आयुष्यात गुची या शब्दाचा एक वेगळाच अध्याय सुरू झाला. गुचीच्या क्लासिक वस्तूंचा वापर दर्शवण्यासाठीही श्रीमंतांकडून गुची या शब्दाचा विशेषणासारखा वापर होऊ लागला. याच दशकाच्या मध्यात ब्रॅण्डने त्यांची खासियत असलेल्या क्लोदिंग, शूज, बॅग्ज, हॅण्डबॅग्ज या उत्पादनांमध्ये चष्मा, घडय़ाळे आणि दागिने यांसारख्या लक्झरी अँक्सेसरीजचीही भर घातली; आज या वस्तू ब्रॅण्डची ओळख आहेत.
एकदा साम्राज्य उभे राहिले की त्याचे परिणाम कर्त्यांच्या कुटुंबावर होऊ लागतात आणि त्याचा फटका मार्केटमध्येही बसतो. नव्वदच्या दशकाचा काळ हा गुची परिवार आणि परिणामी ब्रॅण्डचे मार्केट दोघांनाही डळमळीत करणारा ठरला. १९८३ मध्ये रोडॉल्फो गुची यांचे निधन झाले आणि त्यांचा मुलगा मॉरेझिओकडे ब्रॅण्डची सारी सूत्रे आली. मॉरेझिओला ब्रॅण्डमध्ये फारसा रस नव्हता, मात्र तरीही त्याने आपल्यापरीने गुची टिकवण्यासाठी संघर्ष केला. कौटुंबिक वाद, कर चुकवल्याचा आरोप, मॉरेझिओची हत्या अशा लागोपाठ घडलेल्या घटना गुचीचे साम्राज्य संपवणार असे वाटत असतानाच कंपनीची सूत्रं बहुराष्ट्रीय रिटेलर कंपनीच्या हातात आली. इथून पुढे गुची परिवारातील कोणत्याच सदस्याचा कंपनीत सहभाग राहिला नव्हता. खऱ्या अर्थाने नव्वदच्या उत्तरार्धापासून फॅशनच्या मुख्य प्रवाहातील वेगवेगळे ट्रेण्ड गुचीने आपल्या अंतरंगात सामावून घेतले. हा गुचीचा दुसरा जन्म होता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या नव्या गुचीला आकार देण्याचं काम डिझाइनर टॉम फोर्ड यांनी केलं.
अमेरिकन डिझाइनर टॉम फोर्ड यांनी केवळ डिझाइन्सच्या बाबतीतच आमूलाग्र बदल केले असं नाही, तर त्यांनी सेलिब्रिटींपासून वेगवेगळय़ा माध्यमांचा वापर करत गुचीला उच्चभ्रू वर्गापलीकडे नेले. नव्वदचा हा काळ पॉप संस्कृतीचा गाढा प्रभाव असलेल्या तरुण पिढीचा होता. या तरुण पिढीची चव ओळखून टॉम फोर्ड यांनी खास या वर्गाला आवडेल असे गुची कलेक्शन बाजारात आणले. हा काळ ग्लॅमरस फॅशन क्लोदिंग आजच्या भाषेत फास्ट फॅशनचा आणि फॅशन अॅक्सेसरीजचा वरचष्मा असलेला होता. ‘क्लासी’वरून ‘सेक्सी’कडे झुकलेली तरुणाईच्या हृदयाची तार पुन्हा एकदा गुचीने सही सही पकडली. त्या वेळचे पॉप सेन्सेशन असलेले ब्रिटनी स्पिअर, स्पाईस गर्ल सगळय़ांच्या अंगावर कपडय़ांपासून अॅक्सेसरीजपर्यंत गुची झळकू लागलं. या मंडळींच्या ग्लॅमरने गुचीला सर्वदूर पोहोचवलं. सेलिब्रिटींचा थेट आणि व्यापक प्रभाव तरुणांवर होतो हे लक्षात घेऊन गुचीने मार्केटिंगची धोरणं बदलली तसंच जाहिरातींच्या बाबतीतही धक्कातंत्राचा वापर केला गेला. तोपर्यंत क्लासी, रॉयल शैलीतील गुचीच्या जाहिराती एकाएकी बोल्ड झाल्या. टॉम फोर्ड यांनी केलेले बदल २००४ मध्ये क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून आलेल्या फ्रिदा जान्निनी यांनीही लक्षात घेतले आणि गुचीचा आलेख चढवतच नेला. पण काळ बदलत राहतो आणि त्यानुसार आपली गणितं सुधारावी लागतात, याची जाणीव पुन्हा एकदा गुचीच्या कर्त्यांधर्त्यां झाली. ‘क्लासी’ ते ‘सेक्सी’च्या नादात क्लासिक ब्रॅण्ड ही गुचीची ओळख पुसली जाऊ नये, ही नवी जबाबदारी डिझाइनर अॅलसेन्द्रो मिकेले यांच्यावर सोपवण्यात आली. गुचीचा अभिजातपणा हेच त्याचं वैशिष्टय़ आहे. तो क्लासीनेस कायम ठेवून फॅशनच्या प्रवाहातील बदल टिपायला हवेत हा अॅलसेन्द्रो यांचा आग्रह पुन्हा एकदा गुचीला आपले मूळ स्वरूप देता झाला. गुचीच्या कार्यालयांपासून ते त्यांच्या क्लोदिंग, फर्निचर, हॅण्डबॅग्ज अशा प्रत्येक उत्पादनाच्या डिझाइनमध्ये पारंपरिक आणि नवता यांचा मेळ साधण्याचा प्रयत्न अलसेन्द्रो यांनी केला. मिकेले यांचे नेतृत्व एवढे प्रभावी ठरले की २०१५ नंतर गुचीने विक्रमी विक्री केली आणि या ब्रॅण्डची मूळ कंपनी केरिंगच्या नफ्यात ११ टक्के वाढ झाली. लोगोपासून उत्पादनांपर्यंत क्लासीनेस जपत ट्रेण्डी राहण्याची यशस्वी कसरत गेल्या शंभर वर्षांच्या वाटचालीत या ब्रॅण्डने साधली आहे. काळाचा पुढचा विचार करणारा ब्रॅण्ड असा लौकिक मिळवणाऱ्या या ब्रॅण्डच्या कोणत्याही उत्पादनाची खरेदी तुम्हाला फीलिंग गुचीचा स्वॅग देऊन जाईल यात शंका नाही.