वेदवती चिपळूणकर
कवयित्री, निवेदिका आणि अभिनेत्री म्हणून सर्वाना परिचित असलेली विचारी कलाकार म्हणजे स्पृहा जोशी. इयत्ता नववीत असताना ‘बालश्री’ हा राष्ट्रीय पुरस्कार तिच्या सर्जनशील लेखन अर्थात क्रिएटिव्ह रायटिंगसाठी तिला मिळाला होता. तिच्यातली कवयित्री वेळोवेळी प्रेक्षकांनी अनुभवली आहे. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेतील ‘कुहू’ची कवितेची आवड आणि खऱ्या आयुष्यातलं स्पृहाचं कवितेवरचं प्रेम या दोन्ही गोष्टी अगदी मिळत्याजुळत्या होत्या.

लहानपणापासून विचारी आणि कलासक्त असलेल्या स्पृहाचा करिअर म्हणून पहिला प्रेफरन्स मात्र अभिनय किंवा लेखन नव्हता. स्पृहा म्हणते, ‘कॉलेजमध्ये असताना ‘मायबाप’ हा चित्रपट केला होता, ‘अग्निहोत्र’मध्येही काम केलं होतं. पण अभिनेत्री होईन असं कधी वाटलं नव्हतं आणि कधी मनातही आलं नव्हतं. माझ्या बाबांची इच्छा होती की मी यूपीएससी ची परीक्षा द्यावी. मलाही त्यात काही प्रॉब्लेम नव्हता, त्यामुळे मीही तयारी करत होते, अभ्यास करत होते.’ अभ्यासावर लक्ष केंद्रित केलेल्या स्पृहासाठी वेगळीच संधी वाट पाहात होती. ‘एकदा दसऱ्याच्या दिवशी आमच्या ग्रुपमधले सगळे शाळेत जाऊन शिक्षकांना भेटून आलो आणि शिवाजी पार्कच्या कट्टय़ावर गप्पा मारत बसलेलो. तेव्हा मला आनंद (इंगळे) दादा भेटला. त्याने मला निरोप दिला की सुनीलदादा (बर्वे) मला फोन करतोय, कॉन्टॅक्ट करतोय कारण त्याचं माझ्याकडे काम होतं. माझं सुनीलदादाशी बोलणं झालं तेव्हा तो ‘हर्बेरियम’साठी नवीन नाटकाची तयारी करत होता. ‘लहानपण देगा देवा’ हे नाटक तो पुन्हा स्टेजवर आणणार होता. त्याने मला सांगितलं की यशवंत नाटय़ मंदिरला तालीम असते तिथे जाऊन मंगेश कदम यांना भेटायचं. त्या नाटकाचे पंचवीसच प्रयोग होणार होते, असं आधीच ठरलं होतं. प्रयोग संपले की पुन्हा अभ्यासाला लागू असा विचार करून मी होकार दिला,’ अशी आठवण स्पृहा सांगते. स्पृहासाठी करिअरच्या दृष्टीने हा मोठा क्लिक पॉइंट ठरला, कारण या प्रयोगांच्या दरम्यान तिला याची जाणीव झाली की आपल्याला पूर्णवेळ हेच काम करायला आवडेल.

Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा
Bigg Boss Fame Marathi Actor Pushpa Style Dance
‘पुष्पा २’च्या ‘पीलिंग्स’ गाण्यावर मराठी अभिनेत्याचा जबरदस्त डान्स! सोबतीला आहे ‘ही’ अभिनेत्री, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
Namrata sambherao
“खूपच अभिमान वाटतो”, अभिनेत्री नम्रता संभेरावने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘या’ सहकलाकाराचे केले कौतुक
Marathi Actress Pooja Sawant Dance On radha song with Cousins watch video
Video: पूजा सावंतने भावाच्या संगीत सोहळ्यात धरला ठेका, भावंडांसह केला जबरदस्त डान्स
Actor Pankaj Tripathi statement about theatre Mumbai news
रंगभूमी हेच अभिनयाचे मूळ; अभिनेते पंकज त्रिपाठी यांचे ठाम प्रतिपादन
Women World, Feminist Thought ,
स्त्री ‘वि’श्व : लोकल भी, ग्लोबल भी!

‘लहानपण देगा देवा’ या नाटकाच्या संपूर्ण प्रक्रियेतून जाताना स्पृहाचा निर्णय जवळजवळ पक्का झाला होता. मात्र यूपीएससी सोडून एकदम इतक्या वेगळय़ा आणि अनिश्चित क्षेत्रात जाण्याचा निर्णय स्वीकारणं तिच्या कुटुंबालाही थोडं अवघड गेलं. स्पृहा सांगते, ‘बाबांचं म्हणणं बरोबर होतं की आपल्याला काम हवंय म्हणून आपल्याला काम मिळत नाही, असंच स्वत:हून आपल्याकडे काम चालून येत नाही. पण मला हेही माहिती होतं की मला हेच आवडतंय आणि हेच करायचंय. त्यामुळे मी बाबांना म्हटलं मला थोडा वेळ द्या. वर्षभर स्ट्रगल करू द्या, काहीच जमत नाही आहे असं वाटलं तर मी पुन्हा अभ्यासाला लागेन. त्या वेळी माझं यूपीएससी द्यायचं वयही उलटून चाललं नव्हतं आणि मी एकही अटेम्प्ट दिलेला नसल्याने अटेम्प्ट्सही संपत वगैरे नव्हते. त्यामुळे बाबांनाही ते पटलं, पण माझं नशीब याबाबतीत चांगलं होतं. मला लगेचच ‘मोरया’ हा चित्रपट मिळाला, त्याच वर्षी डिसेंबरमध्ये ‘नेव्हर माइंड’ हे व्यावसायिक नाटक मिळालं आणि ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मधली ‘कुहू’सुद्धा आपणहून माझ्याकडे आली. माझा या सगळय़ातला वावर, मेहनत आणि आवडीने मी करत असलेलं काम बघताना बाबांनाही हळूहळू लक्षात आलं की मला कामं मिळतायत आणि मी खरंच आनंदी आहे.’ कुहू या पात्राने मिळवून दिलेली लोकप्रियता स्पृहाच्या करिअरमध्ये खूप महत्त्वाची ठरली, असं ती सांगते.

अल्लड आणि मनमोकळी कुहू पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी स्पृहाची ‘उंच माझा झोका’मधली रमाबाईसुद्धा तितक्याच प्रेमाने पाहिली आणि स्पृहाचं भरभरून कौतुकही केलं. अनेक कलाकारांनीही स्पृहाची मनापासून पाठ थोपटली. स्पृहा म्हणते, ‘रमाबाई या भूमिकेने मला प्रेक्षकांकडून खूप आदर मिळवून दिला. एवढय़ा लहान वयात एवढा आदर मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. प्रेक्षकांच्या कौतुकासोबतच जेव्हा कोणी मोठी व्यक्ती सहज आपल्याला अप्रिशिएट करते ना.. तेव्हाही खूप समाधान वाटतं. मी ‘अग्निहोत्र’मध्ये काम केले होतं, तेव्हा मी कॉलेजमध्ये होते. तेव्हा एक दिवस मुक्ता बर्वे मेकअप रूममध्ये येऊन माझा हात हातात घेऊन मला म्हणाली होती की, खूप छान काम करते आहेस. ती तेव्हासुद्धा स्टारच होती, कदाचित तिला आठवणारही नाही, पण माझ्यासाठी ही शाबासकी खूपच महत्त्वाची होती.’ लॉकडाऊनच्या काळात सगळय़ाच कलाकारांना धडपड करावी लागली होती. तिची या काळातील आठवण सांगताना ती म्हणते, लॉकडाऊनमध्ये सगळेच धडपडत होते, मीही स्वत:ला एंगेज ठेवण्यासाठी प्रयत्न करत होते, यूटय़ूब चॅनेलवर मेहनत घेत होते. एक दिवस मला सई ताम्हणकरचा फोन आला, ती मला म्हणाली की तुझी धडपड बघते आहे मी, छान करते आहेस, करत राहा. मी तिची फॅन आहे, त्यामुळे तिचा हा फोन माझ्यासाठी खूपच ऊर्जा देणारा होता. आत्ता ‘मीडियम स्पायसी’ नावाच्या मूव्हीमध्ये मी कॅमिओ केला होता, अगदी लहानसा रोल तोही सिनेमाच्या अगदी सुरुवातीच्या भागात होता. त्याबद्दलही सोनालीताईने (कुलकर्णी) फोन करून माझं कौतुक केलं. आपण ज्यांना आदर्श मानतो, ज्यांचे फॅन असतो, त्यांनी अशी शाबासकी देणं ही खूप मोलाची गोष्ट असते, असं स्पृहा मनापासून सांगते. ‘सुर नवा ध्यास नवा’ या गाण्यांवर आधारीत रियालिटी शोची सुत्रसंचालक म्हणूनही स्पृहाला रसिकांचे भरभरून प्रेम मिळते आहे.

प्रत्येकाचा स्वत:चा वेगळा प्रवास असतो आणि ज्याने त्याने आपापला मार्ग स्वत: शोधला पाहिजे, असं म्हणणारी स्पृहा माणूस म्हणून स्वत:च्या संवेदना, सर्जनशीलता आणि प्रगल्भता यांना जपण्यासाठी सतत स्वत:वर मेहनत घेत असते. त्यामुळेच ती जे जे ठरवेल त्यात तिचे वेगळेपण उठून दिसेल, यात शंका नाही.
viva@expressindia.com

Story img Loader