वेदवती चिपळूणकर
‘मुळशी पॅटर्न’पासून ‘धर्मवीर’पर्यंतच्या सगळय़ा चित्रपटांतील त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनावर कोरल्या गेल्या. आता ‘झी मराठी’वरील ‘लोकमान्य’ या मालिकेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणारा हा तरुण अभिनेता म्हणजे क्षितीश दाते. त्याला स्वत:च्या आवडीबद्दल आणि क्षमतांबद्दल पूर्ण आत्मविश्वास आहे. या क्षेत्रात करिअर करण्याचा त्याचा उद्देश स्पष्ट आहे, तो म्हणतो, ‘मला हेच करता येतं, हेच करायला आवडतं, हेच जमतं.’
कॉलेजमध्ये असताना एकांकिकेच्या माध्यमातून क्षितीशची या क्षेत्राशी ओळख झाली आणि आपल्याला हेच करायचं आहे हा निर्णयही त्याचा हळूहळू पक्का झाला. तो म्हणतो, ‘१०-१२ वर्षांपूर्वी नाटक आणि एकांकिका यातून मी सुरुवात केली. या क्षेत्रात आर्थिक बाजू हासुद्धा मोठा फॅक्टर असतो. तुम्ही स्वत:ला किती सस्टेन करू शकता आणि हे क्षेत्र तुम्हाला किती सस्टेन करू शकतं अशा दोन्ही बाजूंनी विचार करावा लागतो. ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटानंतर मला हे लक्षात आलं की, मी या क्षेत्रात काही तरी चांगलं करू शकतो आणि तेही कोणताही प्लॅन बी न ठेवता करू शकतो.’ क्षितीशचं पदवी शिक्षण कॉमर्समधलं आहे आणि मास्टर्स त्याने कम्युनिकेशन स्टडीजमध्ये केलं आहे. त्याबद्दल तो म्हणतो, ‘कॉमर्सशी माझा आता तसा काही संबंध नाही, मात्र कम्युनिकेशन स्टडीजमधल्या मास्टर्सचा मला या क्षेत्रात खूप उपयोग झाला. व्हिडीओ प्रॉडक्शन, माध्यमं, बदलता समाज या सगळय़ाबद्दलची जाणीव विकसित झाली आणि प्रत्यक्षात उपयोगी आणता आली.’
कलाकार असलेला क्षितीश केवळ अभिनयच नाही तर दिग्दर्शन आणि जादूचे प्रयोगदेखील करतो. तो सांगतो, ‘अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही गोष्टी मला आपोआपच आल्या. दिग्दर्शन शिकायचं वगैरे म्हणून मी काही केलं नाही. माझी सुरुवातच दोन्ही करता करता झाली. कोविडच्या थोडंसं आधीपासून मी जादूचे प्रयोगही करायला लागलो. खरं तर इतकी माध्यमं बदलली आहेत, रोज आपण सोशल मीडियावर कसले तरी व्हिडीओ बघत असतो आणि तरीही जादूच्या प्रयोगांमधलं लोकांचं अप्रूप आजही टिकून आहे. प्रेक्षकांचा जो प्रतिसाद जादूला मिळतो तो अजूनही तितकाच उत्साही आणि ताजातवाना आहे. त्यामुळे मला जादूचे प्रयोग करण्यातही मजा येते’, असे सांगणारा क्षितीश मला ज्यात मजा येते तेच काम मी करतो, या त्याच्या मताचा पुनरुच्चार करतो. दहा वर्षांपूर्वी पुरुषोत्तम करंडकच्या एकांकिकेतून क्षितीशने सुरुवात केली. तो सांगतो, ‘प्राणिमात्र’ नावाची एकांकिका होती, त्यासाठी दिग्दर्शनाचं पहिलं पारितोषिक मला मिळालं होतं. त्यात मी वाघाची भूमिका करायचो. त्या कामाचंही खूप लोकांनी कौतुक केलं होतं. त्याचे प्रयोग आत्ता दोन वर्षांपूर्वीपर्यंत सुरू होते. केशवराव दाते हे माझे पणजोबा आणि त्यांच्याच नावाचं पारितोषिकही मला या एकांकिकेसाठी मिळालं. त्याच वेळी मला हे लक्षात आलं होतं की मला हेच करायचं आहे.
क्षितीशच्या करिअरमध्ये अनेक चांगली माणसं त्याला भेटली, ज्यांनी त्याचं कौतुक केलं आणि त्यातून त्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होत राहिला. ‘कौतुक करणारे लोक भेटत गेले हे मी माझं नशीब समजतो. मागे बोलणारे लोकही होते. खरं तर ते सगळय़ाच क्षेत्रांमध्ये असतात, पण अशा लोकांकडे मी फारसं लक्ष दिलं नाही, देत नाही. माझ्या पहिल्या फिल्ममध्ये मी नाना पाटेकर यांच्यासोबत काम केलं होतं. ते ज्या वेळी डिबगला गेले होते त्या वेळी त्यांनी माझे सीन पाहिले आणि माझं कौतुक केलं. प्रवीण तरडे माझ्या प्रत्येक एकांकिकेला यायचे, कौतुक करायचे. उपेंद्र लिमये यांना मी खूप मानतो. ‘मुळशी पॅटर्न’च्या त्यांच्या डिबगच्या वेळी त्यांनी माझं काम पाहिलं आणि मला एक कौतुकाचा मोठा मेसेज लिहून पाठवला. श्रीरंग गोडबोले, श्रीकांत मोघे, जब्बार पटेल अशा दिग्गजांनी माझं कौतुक वेळोवेळी केलं आहे. या त्यांच्या कौतुकातून मला नेहमीच प्रोत्साहन मिळत आलेलं आहे’, असं तो आवर्जून सांगतो.
कलाकाराच्या आयुष्यात यशाचे चढ-उतार येतच असतात. त्याविषयी बोलताना तो सांगतो की आजही असे अनेक क्षण येतात जेव्हा स्वत:च्या कामाबद्दल, निवडीबद्दल थोडीफार शंका येते. कधी कधी कामं वर्कआऊट होत नाहीत, प्रॉमिस देऊनही लोक आपल्याला कामं देत नाहीत, कधी आपणच केलेलं काम आपल्यालाच आवडत नाही, पण अशा वेळी खचून जाण्यात काहीच अर्थ नसतो, असं क्षितीश म्हणतो. ‘एखाद्या भूमिकेसाठी शंभर लोक ऑडिशनला आले तर नव्याण्णव लोकांना नकारच मिळणार आहे. त्यामुळे त्या सगळय़ांनी आशा सोडून देण्याची आणि खचून जाण्याची काहीच गरज नाही. मी प्रायोगिक नाटकातही काम करतो, त्या वेळीही उलटसुलट बोलणारे लोक भेटतात. आता मालिकेत काम सुरू करतो आहे तेव्हाही कोणाला तरी ते आवडणार नाहीच आहे. आपण प्रत्येकाला खूश करू शकत नाही. त्यामुळे आपण आपल्याला आवडेल ते काम करायचं आणि आनंद घेत राहायचा’ , असं तो सांगतो.
आपल्या क्षमतांवर आणि मेहनतीवर विश्वास ठेवून काम करणं हाच त्याचा स्वभाव आहे. त्यामुळे मनोरंजनासारख्या बेभरवशी क्षेत्रात पाऊल ठेवतानाही मला याशिवाय दुसरं कोणतंच काम येत नाही आणि त्यामुळे माझा काही बॅकअप प्लॅनही नाही, असं तो ठामपणे सांगतो. क्षितीश लवकरच ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लोकमान्य’ या मालिकेतून लोकमान्यांच्या भूमिकेत आपल्या भेटीला येणार आहे.