वेदवती चिपळूणकर
त्याने टीव्हीवरच्या मालिकांमध्ये काम केलं, चित्रपटांमध्ये काम केलं आणि आता व्यावसायिक नाटकातूनही तो आपल्याला भेटणार आहे. ‘अमर प्रेम’पासून अगदी आताच्या ‘बापमाणूस’पर्यंत त्याची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेली आहे. लहानपणीच मनाशी ठरवून मनोरंजन क्षेत्राकडे वळलेला व्हर्सेटाईल अभिनेता म्हणजे सुयश टिळक. ‘पुढचं पाऊल’ मालिकेतील रोहित सरदेशमुखपासून ते ‘का रे दुरावा’मधल्या जयपर्यंत अनेक वेगवेगळय़ा प्रकारच्या भूमिका सुयशने केलेल्या आहेत.
सुयशने लहानपणी शाळेत असताना नाटकांमध्ये काम केलं होतं. आपल्याला अभिनयाचं हे क्षेत्र आवडतंय हेही त्याला माहिती होतं. सुयश म्हणतो, ‘इयत्ता चौथीत असताना शाळेतल्या अनघा देशपांडे बाईंनी इतिहासाच्या पुस्तकावर आधारित नाटक बसवलं होतं. त्यावेळी मी त्यात काम केलं होतं. शाळेत असताना आंतरशालेय स्पर्धामध्ये मी भाग घ्यायचो. त्यावेळी फक्त नाटक नव्हे तर मी स्पोर्ट्समध्येही खूप अॅआक्टिव होतो. स्विमिंगसाठी जवळजवळ नॅशनलपर्यंत माझं सिलेक्शन झालं होतं, पण हे जे सगळं मी करत होतो ते दहावीच्या वर्षी मला बंद करायला लागलं. त्याने मला काहीतरी पोकळी आहे असं जाणवत राहायचं. अचानक या सगळय़ा अॅलक्टिव्हिटीज बंद झाल्या आणि मला एम्प्टिनेस जाणवायला लागला. ती भावना कॉलेजच्या फस्र्ट इयपर्यंत राहिली. मग मात्र मी विचार केला की आता आपल्याला काहीतरी नेमकं ठरवावं लागेल.’ मनोरंजन क्षेत्र पुढे कशी वळणं घेईल, कसं त्याचं स्वरूप बदलेल अशी कोणतीही चिंता न करता सुयशने या क्षेत्रात काम करायचा निर्णय घेतला. त्याने अभिनय ‘मिस’ करणं आणि त्यातून त्याच्या स्वत:च्याच लक्षात आलेली त्याची या क्षेत्राची ओढ हा त्याच्या करिअरमधला पहिला क्लिक पॉइंट म्हणायला हरकत नाही.
एकदा ठरवल्यानंतर मात्र त्यासाठी पूर्णपणे स्वत:ला झोकून देऊन काम करायला सुयशने सुरुवात केली. फग्र्युसन महाविद्यालयात आर्ट सर्कलमध्ये त्याचा नियमित वावर असायचा. शिकण्याच्या त्या काळात भेटलेल्या व्यक्तींबद्दल सुयश भरभरून बोलतो. तो सांगतो, ‘फग्र्युसनमध्ये मला धर्मकीर्ती सुमंत हा लेखक मित्र भेटला. तेव्हापासून माझ्या अशा विचारी आणि ऑफ-बीट माणसांसोबत चर्चा, वादविवाद, विचारांची देवाणघेवाण अशा गोष्टी नियमितपणे व्हायला लागल्या. त्याच काळात माझी सारंग साठय़े, मोहित टाकळकर यांच्याशी ओळख झाली. त्यांनी मला प्रायोगिक रंगभूमीची ओळख करून दिली. तर ‘महाराष्ट्र कल्चरल सेंटर’च्या माध्यमातून शुभांगी दामले, श्रीरंग गोडबोले यांच्याशी ओळख झाली. हेमंत ढोमे, शशांक शेंडे, किरण यज्ञोपवित अशा अनेक जणांनी त्यावेळी मला प्रायोगिक रंगभूमीच्या वेगवेगळय़ा बाजू दाखवल्या, अनेक बाबतीत मला त्यांचं मार्गदर्शन मिळालं.’ अशा सगळय़ा मित्र आणि मार्गदर्शकांमुळे सुयशच्या या क्षेत्रातल्या कामाची सुरुवातच खूप सकारात्मक झाली.
मात्र व्यावसायिक दृष्टिकोनातून मनोरंजन क्षेत्रातलंच काहीतरी वेगळंही करणं आवश्यक आहे असं सुयशला जाणवलं. त्यावेळी त्याने हिंदूी आणि मराठी मालिकांच्या ऑडिशन द्यायला सुरुवात केली. जाहिरातींच्याही ऑडिशन सुयशने दिल्या. बराच काळ तिथेही कोणतीच संधी सुयशला मिळत नव्हती. सुयश म्हणतो, ‘नेमकं काय चुकतंय ते कळत नव्हतं, मात्र एक दिवस सुहृद गोडबोलेने ‘अमर प्रेम’ या मालिकेत एक कॅरेक्टर रोलसाठी विचारलं आणि मीही त्याला होकार दिला. माझ्या प्रायोगिक नाटकाच्या संपूर्ण सर्कलने मला खूप सपोर्ट केला, प्रोत्साहन दिलं. आणि तिथून माझा टीव्ही मालिकांचा प्रवास सुरू झाला’. ‘अमर प्रेम’नंतर ‘बंध रेशमाचे’, ‘पुढचं पाऊल’, ‘का रे दुरावा’ अशा सगळय़ा मालिका मी केल्या, असं सुयश सांगतो. रंगभूमीपासूनही तो दूर राहिला नाही. त्याने ‘स्ट्रॉबेरी’ हे नाटकही केलं आणि सध्या त्याचं ‘मी स्वरा आणि ते दोघं’ हे आणखी एक नवीन नाटक रंगभूमीवर दणक्यात सुरू आहे. ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘क्लासमेट्स’ हे चित्रपटही त्याने केले. मालिका विश्वात तर सुयश लोकप्रिय अभिनेता आहे. ‘सख्या रे’, ‘एक घर मंतरलेलं’, ‘दुर्वा’, ‘बापमाणूस’ आणि ‘शुभमंगल ऑनलाइन’ याही मालिका त्याने केल्या आहेत.
‘मालिकांच्या आणि चित्रपटाच्या विश्वात वावरताना हर्षदा खानविलकर, मृणाल देशपांडे, संजय जाधव, सुबोध भावे, रवींद्र मंकणी, विनय आपटे, विजय पटवर्धन यांच्यासारखी अनेक चांगली, अनुभवी आणि पॉझिटिव्ह माणसं भेटली. आता नाटकाच्या निमित्ताने निवेदिता जोशींसारख्या चांगल्या व्यक्तीशी ओळख झाली. त्यामुळे माझं असं मत आणि अनुभवही आहे की आपण कष्ट घेतोच, पण चांगली माणसं भेटणं खूप महत्त्वाचं असतं आणि ती मला सतत भेटली’, असं तो म्हणतो.
पूर्णपणे विचार करून, ठरवून, शिक्षण घेऊन, मेहनत घेऊन मनोरंजन क्षेत्रात आलेला सुयश कोणत्याही क्षेत्रात वावरताना संयमाने वागायला हवं हेही स्वानुभवाने सांगतो. ‘तुम्ही एखाद्या क्षेत्रात का आला होतात हे कायम लक्षात ठेवायचं. अचानक एक दिवस मला आता हे सोडायचं आहे असं म्हणताना हा प्रश्न स्वत:ला विचारायचा. तात्पुरती प्रसिद्धी आणि तात्पुरतं काम हे आपलं उद्दिष्ट होतं का? हा प्रश्न स्वत:ला विचारायचा. म्हणजे आपण छोटय़ाशा अपयशाने किंवा एखाद्या बॅड पॅचने खचून जात नाही’, असं तो ठाम विश्वासाने सांगतो. सुयशने जाणीवपूर्वक स्वत:वर घेतलेली मेहनत त्याच्या या मतावरून नक्कीच जाणवते.
viva@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा