वेदवती चिपळूणकर

दैनंदिन मालिकेतून घराघरांत पोहोचलेला मात्र त्याआधी रंगभूमीचा शिलेदार असलेला क्रिएटिव्ह अभिनेता म्हणजे विराजस कुलकर्णी. आई आणि आजोबांचा अभिनयाचा वारसा मिळूनही केवळ तेवढय़ापुरतं मर्यादित न राहता लेखन, दिग्दर्शन, प्रायोगिक रंगभूमी अशा अनेक क्षेत्रांतलं प्रशिक्षण विराजसने घेतलं. यामागे आपल्याला ज्या क्षेत्रात जायचं आहे त्याबाबत संपूर्ण माहिती असावी हा उद्देश डोळय़ासमोर ठेवला होता, असं विराजस सांगतो.

लहान असल्यापासूनच स्टोरीटेलिंगची आवड विराजसला होती. तो म्हणतो, ‘माझी शाळा एकमेव अशी शाळा होती जिथे फाइन आर्ट्स हा विषय शिकवला जायचा. नाटक, तबला, स्कल्प्चर, नृत्य आणि गाणं यातून एक निवड करता यायची. त्यामुळे मी तेव्हापासूनच नाटकात असायचो. त्याशिवाय वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद, नाटय़छटा अशा सगळय़ांमध्येही असायचो, मला ते आवडायचं. त्यात बक्षीसंही मिळायची म्हणजे मला ते बऱ्यापैकी जमतही होतं. त्यामुळे पुढे जाऊन तेच करावं असा विचार नैसर्गिकपणे मी केला होता. मात्र सगळय़ांना असं वाटतं की मला या क्षेत्राची पार्श्वभूमी असल्याने हे सोपं झालं असेल, तर ते उलट आहे’. आईने या क्षेत्रात येण्याआधीच मला सावध केलं होतं, असं तो सांगतो, ‘माझ्या आईने सगळय़ात आधी मला हे सांगितलं की तू अ‍ॅक्टिंगच्या भानगडीत पडू नकोस. त्यात करिअर होण्यासाठी वेळ, नशीब, संधी या सगळय़ाची सांगड घातली जावी लागते. तिने मला सांगितलं की नुसतं आपण आपलं काम चांगलं केलं एवढंच पुरेसं नसतं. आईने मला एकदा ऋषी कपूर यांची मुलाखत वाचायला दिली होती. त्यात त्यांनी म्हटलेलं की त्यांना अ‍ॅक्टिंगशिवाय दुसरं काहीच येत नाही त्यामुळे ते अभिनेते झाले ते खूप बरं झालं. तेव्हा मला जाणवलं की आपण इतरही गोष्टी शिकायला पाहिजेत’, अशी आठवण सांगणाऱ्या विराजससाठी शाळेतली आवड आणि आईचा सल्ला हाच खरं तर क्लिक पॉइंट ठरला असं म्हणायला हरकत नाही.

विराजस केवळ अभिनेता नाही आहे तर तो कलाकार आहे. त्याच्याकडे केवळ अभिनय सोडून इतरही अनेक कला आहेत. त्याला या इतर गोष्टींची आवड कशी लागली याबद्दल तो सांगतो, ‘मला लहानपणी आईच्या शूटिंगच्या सेटवर जायला आवडायचं नाही. कंटाळा यायचा, कारण ती प्रक्रिया तशी फार कंटाळवाणी असते. पण आईच्या ‘सोनपरी’ मालिकेच्या सेटवर मला जायला आवडायचं. तिथे लहान मुलं असायची, आणि मुख्य म्हणजे त्यात ग्रीन स्क्रीन वापरलेलं असायचं, अ‍ॅनिमेशन वापरलेलं असायचं. ते सगळं कसं करतात ते पाहायला मला तेव्हाही आवडायचं. मला यात इंटरेस्ट असल्यामुळे आणि माझ्या क्षेत्रातल्या सगळय़ा गोष्टी, अगदी तांत्रिकसुद्धा मला माहिती असल्या पाहिजेत असं मला वाटत असल्यामुळे मी व्हीएफएक्स, एडिटिंग, कॉपीरायटिंग, अ‍ॅडव्हर्टायजिंग असं सगळं शिकलो. म्हणून मी माझं ग्रॅज्युएशन अ‍ॅडव्हर्टायजिंग घेऊन केलं. आणि सगळं काही शिकण्याचा फायदा असा की, आता मी एक ब्रॉडवे म्युझिकलसारखा प्रयोग घेऊन येतो आहे, डिसेंबरमध्ये मी लिहिलेला आणि दिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट येतो आहे.’

रंगभूमीवरून विराजसने सुरुवात केली आहे. अकरा वर्षांपूर्वी त्याची ‘थिएट्रॉन’ ही संस्था सुरू झाली. नाटक लिहिणं, बसवणं, वेगवेगळी वर्कशॉप घेणं अशा गोष्टी ही संस्था करत असते. विराजस म्हणतो, ‘थिएट्रॉनसाठी मी लिहिलेल्या, दिग्दर्शित केलेल्या, अभिनय करत असलेल्या पहिल्या नाटकाच्या वेळी मी स्वत: जाऊन थिएटर बुक केलं, शोज बुक केले, जाहिराती केल्या, त्यासाठी लागणारं बॅकग्राऊंड वर्क केलं आणि प्रत्यक्ष नाटकाचे प्रयोग केले. लोकांना आवडतं आहे हे कळायला लागलं, तेव्हा मला हे सगळं खरंच जमतंय याबद्दल माझी खात्री पटली. कारण माझे बॅकअप प्लॅन्स होते, नक्कीच होते. पण माझा प्लॅन ए, बी, सी, डी.. सगळे प्लॅन्स याच क्षेत्रातले होते’. विराजसने त्याच्या क्षेत्राबाबतीत किती सखोल आणि चौफेर विचार केला होता, याबद्दल तो सविस्तर सांगतो. ‘जेव्हा मला अभिनेता म्हणून हवं तसं काम मिळत नाही, तेव्हा जर मला निर्मिती, लेखन, दिग्दर्शन यापैकी काही येत असेल, म्हणजे संपूर्ण शास्त्रशुद्धपणे येत असेल, तर मी माझ्या स्वत:साठी संधी नक्कीच निर्माण करू शकतो, असाही माझा विचार यामागे होता’, असं त्याने सांगितलं. 

विराजसने स्वत:च्या कामातून शिकत प्रगती केली आहे. प्रायोगिक रंगभूमीसाठीदेखील तो काम करतो. त्या वेळी अनेक मर्यादा असतात आणि त्या मर्यादांमध्ये राहूनच आपली कलाकृती सादर करावी लागते. त्या वेळी कोणताही सेल्फ-डाऊट येऊ द्यायचा नसतो असं विराजस म्हणतो. ‘माझ्या येणाऱ्या चित्रपटात पुष्कर जोग, आशय जोग, सोनाली कुलकर्णी आहेत. त्यांनी माझ्यावर दिग्दर्शक म्हणून विश्वास टाकला, वेगळा प्रयोग करून पाहण्याची तयारी दाखवली. अशा वेळी मी स्वत:च्या कामाबद्दल ते योग्य आहे की अयोग्य, मला जमेल की नाही अशा शंका घेत बसणं बरोबर नाही. माझ्या सोबतच्या माणसांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास हाच माझ्यासाठी पुढची मोठी स्टेप घेण्यासाठीचा क्लिक पॉइंट आहे’, असं तो विश्वासाने सांगतो.

ज्या क्षेत्रासाठी जिथे जाऊन काम करावं लागेल ते करण्याची मानसिक तयारी, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि संयम या त्रिसूत्रीने काम केलं तर मनोरंजन क्षेत्रही इतर कोणत्याही करिअरसारखंच आहे, असं ठाम मत त्याने व्यक्त केलं. तो म्हणतो. ज्या सीरियसली इतर कोणत्याही करिअरचा विचार केला जातो, त्यातल्या अनुभवी लोकांशी बोलून समजून घेतलं जातं, थोडा रिसर्च केला जातो, तेवढंच महत्त्व अभिनय आणि तत्सम कला क्षेत्राला द्यायला हवं. आपण आपल्या क्षेत्राचा चौफैर विचार आणि अभ्यास पक्का केला असेल तर योग्य संधी आपोआप मिळत जातात, हा विश्वास तो आपल्या अनुभवातून तरुणाईला देतो.

Story img Loader