– वेदवती चिपळूणकर
ती कथ्थक नृत्यांगना आहे, ती वकील आहे आणि ती अभिनेत्रीसुद्धा आहे. स्टीरियोटाइप व्यक्तिरेखांपेक्षा वेगळय़ा भूमिका करणारी कलाकार म्हणून तिची ओळख आहे. ‘.. आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेलं हे नाव म्हणजे वैदेही परशुरामी! हिंदी जाहिरातींचं म्हणजेच टीव्ही कमर्शियल्सचं जगदेखील तिने बघितलेलं आहे. प्रेक्षकांच्या तिच्याकडून असणाऱ्या अपेक्षा ओळखून जबाबदारीने भूमिका निवडणं हे तिचं उद्दिष्ट आहे. नुकताच तिचा ‘झोंबिवली’, ‘लोच्या झाला रे’ हे चित्रपटदेखील प्रदर्शित झाले आहेत आणि येत्या वर्षांत तिचे अजून काही चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत.
वयाच्या सातव्या वर्षांपासून कथ्थक शिकलेल्या वैदेहीचं नृत्य हे ‘पॅशन’ आहे. प्रोफेशन म्हणून अथवा पैसे कमावण्यासाठी नृत्य करायचं नाही हे तिचं तत्त्व आहे. वैदेही म्हणते, ‘ज्या क्लासला मी जात होते त्याच क्लासला अभिनेत्री उर्मिला कानिटकरही होती. तिचे आणि माझे आई-बाबा चांगले फॅमिली फ्रेंड आहेत. माझ्या कथ्थकच्या एका परफॉर्मन्सला दिग्दर्शक-अभिनेते महेश कोठारे आणि अन्य काही मान्यवर प्रेक्षक म्हणून आले होते. त्यानंतर त्यांनी मला ऑडिशनला बोलावलं. मीही तेव्हा ते सहज गंमत म्हणून करून पाहिलं. आदिनाथ कोठारेसोबत केलेला ‘वेड लावी जीवा’ हा माझा पहिला चित्रपट होता. त्या वेळी या इण्डस्ट्रीकडे करिअर म्हणून पाहावं असा विचारही मी केला नव्हता, कारण माझं शिक्षण वेगळय़ा क्षेत्रातलं आहे. मी बी.ए. इंग्लिश केलं आहे, त्यानंतर मी लॉ केलं आहे आणि माझ्या घरी सगळी बॅकग्राऊंड वकिलांचीच आहे. त्यामुळे मी असा वेगळा काही करिअरचा विचार त्याआधी फारसा केला नव्हता. मी माझ्या मोठय़ा भावाला काही काळ असिस्ट करत होते, कथ्थकचे परफॉर्मन्सेस करत होते.’ अनाहूतपणे या क्षेत्रात आलेली वैदेही सहजपणे सगळय़ांचं मन जिंकून गेली ती ‘..आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटातून!
सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, मोहन जोशी अशा दिग्गज कलाकारांसोबत वैदेहीने ‘..आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटात काम केलं आहे. त्याबद्दल वैदेही सांगते, ‘हा चित्रपट माझ्यासाठी निर्णयी फॅक्टर ठरला, कारण या सिनेमानंतर प्रेक्षक मला ओळखायला लागले, प्रसिद्धी मिळाली आणि आपलं काम लोकांना आवडतंय याचा कॉन्फिडन्स मला मिळाला. एक दिशा मिळाली, ड्राइव्ह मिळाला जो त्याच्या आधीपर्यंत कधी मिळाला नव्हता. तेव्हा मला असं जाणवलं की मला हे खूप छान जमतंय आणि हेच मला जास्त आवडतंय.’ त्या चित्रपटानंतर ही जाणीव व्हायला लागली की आपल्यावर आता चांगलं काम करण्याची, विचारपूर्वक काम करण्याची जबाबदारी आहे, असं सांगतानाच माझ्या स्वत:च्याही स्वत:कडून अपेक्षा वाढल्या. त्यामुळे आता करिअरमध्ये त्या दिशेने प्रयत्न करायचे असं ठरवल्याचं वैदेहीने स्पष्ट केलं. अभिनेत्री म्हणून नवनवीन भूमिका करणं हे वैदेहीचं ध्येय आहे. एकाच पद्धतीच्या भूमिकांमध्ये अडकून पडायचं नाही असा तिचा प्रयत्न आहे.
वैदेहीने जसं कथ्थककडे कधीही प्रोफेशन म्हणून पाहिलं नाही, तसंच वकिलीकडेही तिने कधी बॅकअप प्लॅन म्हणून पाहिलं नाही. तिच्या घरच्यांच्या खंबीर पाठिंब्याबद्दल ती म्हणते, ‘मला माझे निर्णय स्वत: घेण्याचं स्वातंत्र्य घरच्यांनी दिलं. घरचे सगळे वकील आहेत, मीही वकिलीचं शिक्षण घेतलंय म्हणून मीही तेच प्रोफेशन निवडावं असा त्यांचा कधीही आग्रह नव्हता. माझ्या भावाने मला सांगितलं आहे की कधीही ऑफिसला ये, काम कर किंवा कामात बदल म्हणून थोडय़ा वेळासाठी कर. मात्र मी अभिनय हेच क्षेत्र करिअर म्हणून निवडलं आहे याबद्दल घरच्यांना कधीच काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्यामुळेच मी विचार करून कोणतं काम करायचं ते ठरवू शकले. मी फार लवकर या क्षेत्रात आले असते तर कदाचित आतापर्यंत आऊटडेटेड झाले असते. निवडक कामं केल्याने मी प्रेक्षकांच्या लक्षात राहाते.’ आपलं काम प्रेक्षकांच्या लक्षात राहाणारं असलं पाहिजे, मग ते कोणत्याही भाषेत असलं तरी चालेल, असं वैदेहीचं मत आहे. आपल्याला दर्जेदार काम करायला मिळतंय आणि अभिनेत्री म्हणून स्वत:ला डेव्हलप करायला मिळतंय अशा भूमिकांना भाषेचा अडसर येता कामा नये, असं वैदेही ‘सिंबा’ या चित्रपटातील भूमिकेबद्दल बोलताना म्हणते.
‘सिंबा’ या हिंदूी चित्रपटात भूमिका केल्यानंतर वैदेहीला एका खास व्यक्तीकडून कौतूक ऐकायला मिळालं ज्याने तिच्या अभिनय क्षेत्रात करिअर करण्याच्या निर्णयावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं. ‘अभिनेत्री म्हणून मी कोणाला आदर्श मानत असेन तर ते तब्बूला!’ वैदेही सांगते, ‘तिच्या भूमिका, त्यातली व्हरायटी, तिचा ताकदीचा अभिनय आणि स्वत:च्या भूमिकेच्या निवडीबद्दल इतर लोकांच्या म्हणण्यापेक्षा स्वत:च्या निर्णयाला जास्त महत्त्व देणं, या गोष्टी मला प्रचंड आवडतात. २८ डिसेंबरला ‘सिंबा’ रीलिज झाला आणि ३० तारखेला मला सुलभा आर्या यांचा फोन आला, त्यांनीही ‘सिंबा’मध्ये काम केलेलं. त्या म्हणाल्या की त्यांच्या भाचीला माझ्याशी बोलायचं आहे. त्याक्षणी मला लक्षात आलं नाही की त्या नेमकं कोणाबद्दल बोलत होत्या. मात्र फोनवर तब्बूचा आवाज ऐकला, तिच्याकडून माझ्या कामाचं कौतुक ऐकलं आणि मला मी स्वप्नात असल्यासारखंच वाटायला लागलं.’ तब्बूकडून ऐकलेल्या कौतुकाच्या शब्दांनी वैदेहीला स्वत:च्या निर्णयाच्या योग्यतेबद्दल पुन्हा एकदा खात्री पटली.
कोणत्याही भाषेचं बंधन न ठेवणारी, स्वत:ला ‘टार्गेट’मध्ये बांधून न घेणारी अशी वैदेही एक स्वप्नाळू अभिनेत्री आहे. तिच्या स्वप्नात केवळ चांगलं काम करणं इतकंच आहे. वेगवेगळय़ा भूमिका तिला करायच्या आहेत. भूमिकांमध्ये तोचतोचपणा येऊ नये ही खूणगाठ मनाशी बांधत आपल्यातील अभिनय खुलवण्यासाठी ती धडपडते आहे.
viva@expressindia.com