रसिका शिंदे
नोव्हेंबर महिना सरून गेला तरी हवी तशी थंडी जाणवत नव्हती, मात्र, डिसेंबर महिना सुरू झाला आणि गारवा जाणवायला लागला. या हिवाळय़ात आपली त्वचा कोरडी होते किंवा रुक्ष होते. हिवाळय़ात त्वचा निरोगी ठेवण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. हिवाळय़ात त्वचा अधिकच कोरडी झाली तर त्रासदायक होऊ शकते. अशा वेळी त्वचा मुलायम ठेवण्यासाठी घरगुती उपायच जास्त फायदेशीर ठरतात.
‘‘थंडीत कोरडय़ा हवामानात आपण दिवसभर बाहेर फिरत असल्यामुळे त्वचेवर बाहेरच्या प्रदूषणामुळे धुळीचे कण साठले जातात. त्यामुळे रोज रात्री त्वचेला मॉश्चराईझ करणे गरजेचे आहे. त्यासाठी शक्यतो घरगुती उपाय ज्यात खोबरेल तेल किंवा दुधाची साय आणि कोरफड यांचे मिश्रण मॉश्चराईझर म्हणून वापरावे. तसेच, घरगुती स्किन टोनर म्हणून गुलाब पाण्याचा वापर करावा ’’, असे स्किन थेरपिस्ट निकिता डांगे सांगतात. त्यामुळे काही घरच्या घरी करता येणारे उपाय येथे सुचवले आहेत.
नारळाचा फेस पॅक
सर्वसामान्य महिलांमध्ये हिवाळय़ात फेस पॅक लावला तर त्वचा अधिकच कोरडी होते असा गैरसमज आहे. मुळात कोणत्या प्रकारचा फेस पॅक लावतो याकडे लक्ष देणे महत्त्वाचे असते. जर थंडीत तुमची त्वचा जास्तच कोरडी होत असेल तर तुम्ही नारळाचा फेस पॅक लावू शकता. हा फेस पॅक बनवण्यासाठी दोन चमचे खोबरेल तेल घेत त्यात एक चमचा मध मिसळून घ्यायचे. आणि हे मिश्रण चेहऱ्याला नीट लावावे. आठवडय़ातून जवळपास तीन दिवस हा पॅक लावला तर तुमची त्वचा नक्कीच मऊ आणि मुलायम होण्यास मदत होईल. असे घरगुती नुस्के आपल्या खिशांनाही परवडणारे असतात आणि कोणत्याही रासायनिकांचा चेहऱ्याशी संबंध न आल्यामुळे त्वचादेखील निरोगी राहण्यास मदत होते.
आंघोळीसाठी गरम पाणी घेऊ नका
हिवाळय़ात गारवा चांगलाच जाणवत असल्यामुळे आपण आंघोळीसाठी कडकडीत गरम पाणी घेतो खरे.. पण हिवाळय़ात जास्त गरम पाणी अंगावर घेतल्याने त्वचेची आद्र्रता कमी होऊ शकते. गरम पाणी त्वचेतील नैसर्गिक तेल शोषून घेते. ज्यामुळे त्वचा अधिक कोरडी होऊ शकते. म्हणूनच हिवाळय़ात कडकडीत गरम पाण्याने आंघोळ करणे टाळा.
रात्री झोपताना खोबरेल तेलाने मसाज करा
आपली त्वचा सर्व ऋतूंमध्ये टवटवीत आणि तजेलदार कशी दिसावी यासाठी आपण कायमच प्रयत्नशील असतो. मात्र, रोजच्या कामाच्या व्यापामुळे त्वचेची हवी तशी निगा राखण्यास वेळ मिळत नाही. अशा वेळी रात्री झोपताना खोबरेल तेलात थोडे पाणी टाकून ते मिश्रण त्वचेला लावावे. त्यामुळे नैसर्गिक मॉश्चराईझर त्वचेला मिळेल आणि त्वचा तजेलदार राहण्यासही मदत होईल.
आपण हिवाळय़ात कोणता आहार घेतो यावरही तुमची त्वचा किती निरोगी आणि मऊ राहते हे अवलंबून आहे. आपल्या आहाराची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे हिवाळय़ात बरीच हंगामी फळे आणि भाज्या बाजारात दिसू लागतात. स्ट्रॉबेरी, कॅनबेरी, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी या हंगामी फळांचा आहारात समावेश करा. इतकेच नाही तर, हिरव्या भाज्यांचाही आहारात समावेश करा. तसेच, थंडीत फार तहान लागत नाही. मात्र, त्वचेमधील आद्र्रता कायम ठेवण्यासाठी पाण्याचा भरपूर वापर केला पाहिजे. कमीत कमी तीन ते पाच लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. आहाराची काळजी आणि त्वचेसाठी घरगुती उपायांची जोड दिली तर गुलाबी थंडीचा आनंद तजेलदार त्वचेने नक्की घेता येईल.