तन्मय गायकवाड, वैष्णवी वैद्य
कॉलेज, कॉलेज कॅम्पस, दरवर्षी होणारे फेस्टिव्हल, खेळांच्या स्पर्धा आणि अजून बऱ्याच गोष्टी आजची तरुणाई गेले दोन वर्षे हमखास मिस करत होती. कॉलेज फेस्टिव्हल हा तर कॉलेज लाइफमधला महत्त्वाचा टप्पा असतो. करोनाच्या प्रादुर्भावामुळे मागच्या दोन वर्षांपासून कॉलेजेस बंदच होती. विद्यार्थी कॉलेज फेस्टिव्हलची आठवण काढून काढून उसासे टाकत होते. पण आता इतर सगळीच गाडी रुळावर आली आहे म्हटल्यावर यंदा कॉलेज फेस्टिव्हल्सही पुन्हा सुरू झाले आहेत. ओस पडलेले कॉलेज कॅम्पस आता ‘फेस्टमय’ व्हायला लागले आहेत. अनेक कॉलेजेसमध्ये याआधीच फेस्टिव्हल्स आणि नवनवीन उपक्रम सादर करून झाले आहेत, तर अनेक कॉलेजेसमध्ये लवकरच फेस्टिव्हलचे बिगूल पुन्हा वाजणार आहे.
कॉलेजेस सुरू झाल्यापासून कॅम्पसमध्ये उत्साहाचं वातावरण तयार झालेलं दिसतं आहे. अभ्यासासह मुलं आता फेस्टिव्हलच्याही तयारीला लागले आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना या फेस्टिव्हल्सच्या निमित्ताने वाव मिळतो. नवनवीन उपक्रमांचं सगळं प्रयोजन करणारी ही तरुणाई शिक्षकांच्या आणि सीनियर्सच्या मार्गदर्शनाखाली घरचं कार्य असल्याप्रमाणे संपूर्ण फेस्टिव्हलसाठी राबत असते. फेस्टची जबाबदारी हे तरुण शिलेदार कायमच नेटाने पार पाडताना दिसतात. कॉलेज फेस्टिव्हलचा पुनश्च हरी ओम झाल्याच्या निमित्ताने गेल्या दोन वर्षांत मिस केलेली गंमत आणि पुन्हा सळसळत्या उत्साहाशी जुळलेलं नातं याबद्दल मुलांना काय वाटतं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘व्हिवा’ने केला.

मुंबईतील ‘के.जे. सोमय्या इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअिरग ॲण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’मध्ये शिकत असलेला अथर्व सावंत सांगतो, ‘‘दोन वर्षांनंतर पुन्हा प्रत्यक्ष कॉलेज सुरू झाल्यामुळे खूप आनंद झाला. त्याआधी कॉलेज सुरू होतं, पण ऑनलाइन असल्यामुळे प्रत्यक्ष कॉलेजची मज्जा मिस करत होतो. कॉलेज फेस्टिव्हल, स्पोर्टस् इव्हेंट्स यासह प्रॅक्टिकल अभ्यासावरही परिणाम झाला होता. कितीही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आली तरी कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जाऊन अभ्यास करण्यात जी मज्जा आहे ती अजून कशातच नाही.’’ पुन्हा सुरू झालेल्या फेस्टिव्हल्सबद्दलही तो भरभरून बोलतो. ‘‘ नुकताच आमच्या कॉलेजचा फेस्टिव्हल झाला. सोबतच स्पोर्ट्स इव्हेंट्सही झाले. आम्ही यंदा जोमाने तयारी केली. ही तयारी करताना प्रत्यक्ष सगळे मित्र-मैत्रिणी समोर असल्यामुळे एक वेगळाच आनंद होता. वेगळीच एनर्जी या वेळी जाणवली ’’, असं सांगतानाच पुन्हा सुरू झालेलं कॉलेज, फेस्टिव्हल्स हे कोणत्याही कारणामुळे बंद होऊ नयेत, अशी आशाही अथर्वने व्यक्त केली.

Deepti Sharma : दीप्ती शर्माने झुलन-नीतू सारख्या दिग्गजांना मागे टाकत घडवला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
11 thousand 500 students passed ca final examination conducted in November 2024 Mumbai
‘सीए’ अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल जाहीर, ११ हजार ५०० विद्यार्थी ‘सीए’ म्हणून पात्र
Recruitment of various posts in the State Government Service of the State Public Service Commission MPSC
एमपीएससीच्या तेवीस परीक्षांसाठी पुन्हा अर्जाची संधी, तुम्ही अर्ज केला नसेल तर…
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
Statement of Shailesh Lodha of Taarak Mehta Ka Ooltah Chashma fame about life Pune print news
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम शैलेश लोढा म्हणाले, आयुष्य म्हणजे…

अथर्वप्रमाणेच ‘विद्यालंकार इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’चा विद्यार्थी मयूर काकडे म्हणतो, ‘‘कॉलेज आणि कॉलेज कॅम्पस या दोन्ही गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी फार जिव्हाळय़ाच्या असतात. घरी बसून आम्ही ऑनलाइन शिक्षण घेत होतो त्याचीही आपली वेगळी मजा होती, परंतु, प्रत्यक्ष शिक्षणातील मजा कुठलीही दुसरी गोष्ट पूर्ण करूच शकत नाही. ऑनलाइन अभ्यास आणि परीक्षा तर झाल्या, पण फेस्टिव्हल्स काही होऊ शकले नाहीत. काही कॉलेजेसमध्ये ऑनलाइन फेस्टिव्हल्सही झाले पण त्यात मज्जा नाही.’’ फेस्टिव्हलमधली मज्जा मस्ती याशिवाय आणखी एका वेगळय़ा मुद्दय़ाकडे मयूर आपलं लक्ष वेधून घेतो. ‘‘कॉलेज फेस्टिव्हल म्हणजे एक प्रकारचा इव्हेंट नसून आम्हा कॉलेज विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भागही असतो. या फेस्टिव्हल्समध्ये भाग घेऊन आपलं टॅलेंट ओळखायची, समजण्याची संधी मिळते. इतर कॉलेजच्या फेस्टमध्ये सहभागी होण्यासाठीचा आत्मविश्वास मिळतो. अनेक ओळखी होतात आणि यातून पुढे करिअरच्या दृष्टीनेही फायदा होतो ’’, असं मयूर सांगतो. एकंदरीत अजूनही शिकत असल्याने पुन्हा कॉलेजमध्ये परत येता आलं, याबद्दलही तो आनंद व्यक्त करतो. ‘‘आम्ही खूप लकी आहोत, कारण गेल्या दोन वर्षांत ज्यांचे डिग्री शिक्षण किंवा कोर्स पूर्ण झाले. त्यांना पुन्हा कॉलेजचा आनंद घेता आला नाही ’’, अशी खंतही मयूर व्यक्त करतो.

मयूरने सांगितले त्याप्रमाणे फेस्टिव्हल्स म्हणजे फक्त मौजमजा आणि आनंद नाही. तर यानिमित्ताने एरव्ही अभ्यासाशी संबंधित नसलेल्या, पण जडणघडणीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरतील अशा अवांतर गोष्टी करून पाहण्याची संधी यानिमित्ताने विद्यार्थ्यांना मिळते. पुण्यात सिंहगड महाविद्यालयातही ‘सिंहगड करंडक’, ‘सीओईपी’च्या अनेकविध स्पर्धाचे आयोजन येत्या काही दिवसांत केले जाणार आहे. या सगळय़ाच स्पर्धा – उपक्रमांचे आयोजन कसं करावं?, यानिमित्ताने आत्ताच विचारमंथन सुरू झाली असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. दोन वर्षांत भवतालातही अनेक बदल झाले असल्याने त्याला अनुषंगून या स्पर्धा अधिक हटके आणि आधुनिक कशा करता येतील, यावर विद्यार्थी जोर देत आहेत. फेस्टिव्हलची संकल्पना, त्यानुसार आयोजन, प्रायोजकांची जमवाजमव अशा अनेक गोष्टींसाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होते. रुईया कॉलेजची सानिका जोशी सांगते, ‘‘मी गेल्या वर्षी मास मीडियाच्या पहिल्या वर्षांला प्रवेश घेतला. आम्हाला सगळं वातावरण खूपच नवीन होतं, पण सीनिअर्सबरोबर वेगवेगळय़ा फेस्टचे आयोजन करताना कमालीची मजा आली. ज्युनिअर कॉलेजला असताना हे सगळं लांबून बघायचो तेव्हा खूप कुतूहल वाटायचं. या वर्षी आम्ही थोडे सीनिअर होऊन यंदाच्या फेस्टची जबाबदारी घेणार आहोत ’’. कॉलेजमध्ये पार पडलेल्या उपक्रमांबद्दल सांगताना ती म्हणते, नुकताच प्राइड मंथ झाला तेव्हा एनएसएसच्या साहाय्याने आम्ही ‘प्राइड फ्लॅग’ कॅम्पसमध्ये उभारला, सिनेमा स्क्रीनिंग केले, ओपन माइक ठेवला. सगळय़ा विभागातून आम्हाला भरपूर सहभाग मिळाला. पुढील काही उपक्रम आणि फेस्टचं आयोजनही मार्गावर आहे. ‘आरोहन’ (मराठी वाङ्मय मंडळ), एनएसएस डे, मास मीडिया विभागाचे फेस्ट, इंग्लिश विभागाचे फेस्ट या सगळय़ाची तयारी जोमाने सुरू आहे, असं तिने सांगितलं.

हे महाविद्यालयीन फेस्ट आयोजित करतानासुद्धा अनेक स्तरांवर मुलांची तयारी सुरू असते. त्याबद्दल सानिका सांगते, कल्चरल टीम फेस्ट ठरवते, थीम ठरवणे, स्पर्धा, जज, कलात्मक बाबी वगैरे सगळय़ा गोष्टी ही टीम बघते. प्रत्येक विभागातील प्रमुख, कॉलेजचे स्टुडन्ट सेक्रेटरी हे सगळे त्या प्रक्रियेत सहभागी असतात. प्रायोजक मिळवणे, कॉलेजमध्ये सजावट करणं हे सगळं विद्यार्थी उत्साहाने करत असतात. पुण्यात फग्र्युसन महाविद्यालयातील संस्कृत मंडळही सध्या संस्कृत प्रचार करण्यात मग्न आहे. संस्कृतचा पाया समाजात अधिकाधिक घट्ट व्हावा यासाठी दर वर्षी संस्कृत एकांकिका, वर्कशॉप व सेमिनार्सचे आयोजन त्यांच्यातर्फे केले जाते. या वर्षीसुद्धा येत्या महिन्याभरात संस्कृत साहित्य प्रचार कार्यक्रम हे विद्यार्थी करणार आहेत. माजी विद्यार्थीही यात हिरिरीने सहभागी होतात.

महाविद्यालयीन मुलं बऱ्यापैकी प्रौढ आणि स्वावलंबी असतात. फक्त अभ्यास एके अभ्यास असल्यास महाविद्यालयीन जीवन कोरडे व कंटाळवाणे होऊ शकते. अनेकदा तर तरुणाई कॉलेजमध्ये किती व कशा पद्धतीचे फेस्ट होतात यावरून तिथे प्रवेश घ्यायचा की नाही ते ठरवतात. अभ्यास व फेस्ट अशी सांगड घालताना नवीन अनुभव, मैत्री, वातावरण ही एक वेगळीच ऊर्जा तयार होते, असं तरुणाईचं म्हणणं आहे. फेस्टच्या तयारीमध्ये दिवस, महिने, वेळ, तास सगळं एकच होऊन जातं. तेवढय़ा काळासाठी कॉलेज हेच घर बनून जातं. अभ्यासापलीकडे प्राध्यापकांशी विविध विषयांवर संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या भेटीगाठी, आपल्यातील कलागुण वाढवण्याच्या दृष्टीने केले जाणारे प्रयत्न अशा कितीतरी नव्या आणि प्रयोगशील गोष्टींमुळे फेस्टिव्हल्सबद्दलची विद्यार्थ्यांची ओढ वाढतच जाते. एकंदरीतच महाविद्यालयं आणि त्यांचे फेस्ट्स पुन्हा नव्या जोमाने या वर्षीपासून सुरू झालेले पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा कॉलेज कॅम्पस फेस्टमय झाले असून तरुणाई उत्साहाने आनंदली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
viva@expressindia.com

Story img Loader