फेस्टिव्हलच्या दिवसात अनेक चेहरे अंग झटकून कामाला लागलेले दिसतात. त्यातले काही चेहरे आपल्यासमोर सेलिब्रिटी म्हणून नंतर समोर येतात. फेस्टिव्हलच्या दिवसातील सेलिब्रिटींच्या आठवणी त्यांच्याच शब्दात.

आदिनाथ कोठारे
मी तर माटुंग्याच्या रुईया महाविद्यालयाचा विद्यार्थी. त्याच्या उत्सवमध्ये सॉलिड फूल टू धमाल रंगते. मला त्याचा खूप चांगला अनुभव आहे. कधी मी त्या महोत्सवात सहभागी झालो, तर कधी मी प्रेक्षक म्हणून मस्त टेस्टी आस्वाद घेतला. एकदा जाझ संगीताचा परफॉर्म करून वाहव्वा मिळवली. रुईयात आपली कला साकारायची अनेकांना तीव्र इच्छा असते. हेच त्याचे यश आहे. कॉलेजच्या फेस्टिव्हलची संकल्पना एवढय़ावरच थांबत नाही, तर त्यात ट्रेकिंग, पिकनिक स्पोर्ट्स यांचीही धमाल समाविष्ट होते. अभ्यासाची सगळी जबाबदारी सांभाळत त्याला ‘समांतर’ असे हे बहुरंगी महोत्सव रंगतात, विद्यार्थ्यांतील क्रिएटिव्हीटीची जाण बाहेर काढण्याचा ‘फुल्ल टू’ सही मौका म्हणजे हे महाविद्यालयीन फेस्टिव्हल असतात. त्याच्या ‘धूम’ आठवणीदेखील एक टॉनिक ठरतात.

पंकज विष्णू
माझं कॉलेज लाइफ सर्वापेक्षा वेगळे.. मी व्हीजेटीआयला मेकॅनिकल इंजिनीअरचा चार वर्षांचा पदवी परीक्षेचा अक्षरश: प्रचंड अभ्यास केला. ना आम्हाला कसला टाइमपास, ना मेकॅनिकलला एकही युवती! अशा वातावरणातही आमच्या कॉलेजचे मेकॅनिकल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक अशा विविध भागांचे सांस्कृतिक घडामोडी साकारणारे काही गट होते. आमच्या गटाचे नाव ‘मिसा’, म्हणजे मेकॅनिकल इंजिनीअर स्टुडण्ट्स असोसिएशन; दुसऱ्या गटांची नावे अर्थातच सिका, इका वगैरे. आमच्यात होणाऱ्या सांस्कृतिक स्पर्धाचे ‘इंट्रा कॉलेज’ असे नामकरण होते. त्यात पहिल्या वर्षी मी सहभाग घेऊ शकलो नाही, तर दुसऱ्या वर्षी स्त्रीविरहित एकांकिका शोधून बसवली व आम्ही जिंकलोदेखील. अन्य गटांत मात्र मुली होत्या व अशा महोत्सवात त्यांचे निदान दर्शन होईल याची आम्ही केवढीतरी अपेक्षा ठेवत असू. उच्च शिक्षणासाठी घाटकोपरच्या सोमय्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये असताना मी सांस्कृतिक विभागाचा प्रमुख होतो. कॉलेजच्या सिंफनी महोत्सवात मी अभिमानमधले तेरे मेरे मीलन की.. या गाण्यावर संगीतकार रवी यांच्या हस्ते पुरस्कार मिळविला. येथेही आम्हा तब्बल ७१ विद्यार्थ्यांत अवघी एकच युवती.. तात्पर्य, मेकॅनिकल इंजिनीअर कॉलेजमध्ये महोत्सव असले तरी फार स्फूर्ती मिळावी याचा मात्र दुष्काळ, तरी मी कॉलेज सांभाळून बाहेर प्रायोगिक नाटके, मालिकांतून काम सुरू केले.

मानसी सिंग
‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ ही मालिका व आता ‘अनिश्चित’ हा मराठी चित्रपट यांतून भूमिका साकारताना मला कायम कॉलेज फेस्टिव्हलची धमाल आठवत होती. किंबहुना तेव्हा मिळालेले उत्साहाचे टॉनिक आता मला उपयोगी पडत आहे. वांद्रय़ाच्या नॅशनल कॉलेजमध्ये दोन र्वष असताना ‘ब्ल्यू फेस्ट’मध्ये म्हणजे त्याच्या फेस्टिव्हलमध्ये मस्त ‘धूम’ केली. गायनाच्या स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला, तर पुढील वर्षी मैत्रिणींसह नृत्य करीत ‘लक्ष्य’ वेधले. गोरेगावच्या पाटकर कॉलेजमध्ये बीएमएम करताना अर्थात माध्यम पत्रकारिता करतानाही ‘फेस्टिव्हलचा तडका’ एन्जॉय केला. पुरुषरूपात स्कीट, मग पुढच्या वर्षी वकिली करताना पाच मिनिटांचा संवाद, यातून माझ्यात अभिनय गुण असल्याचे दाखवले. मी शक्ती सिंग व जान्हवी पणशीकर यांची कन्या असल्याचा त्यातून प्रत्यय दिला. कॉलेजमध्ये अभ्यासाचे ओझे हलके करण्यासाठी अशा फेस्टिव्हलचा टॉनिकसारखा उपयोग होतो. खूप मनमोकळे होण्याची संधी म्हणजे हे फेस्टिव्हल. अनेकांनी अशा फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेतानाच पुढील आयुष्यात सांस्कृतिक क्षेत्रात झेपावायचे स्वप्न पाहिलंय. त्यात मीदेखील आहे.

लोकेश गुप्ते
मी पुणे शहरात सिम्बॉयसिस महाविद्यालयात असताना आजच्यासारखे महोत्सव नव्हते, तर तेव्हा कॉलेजचे नाटक हा वार्षिकमहोत्सवी सोहळा असायचा. कॉलेजांमधील नाटकांसाठी पुरुषोत्तम करंडकापासून फिरोदिया करंडकापर्यंत वार्षिक स्पर्धा असे व मी सलग चार वर्षे व्यक्तिगत अभिनय पुरस्कार पटकावला. या नाटकांसाठीची महिनाभरची तयारी, मग त्याचे प्रयोग, पाठीराख्या विद्यार्थ्यांचा जल्लोषपूर्ण प्रतिसाद हे तेव्हा मी भरपूर एन्जॉय केले. कॉलेजच्या पहिल्या वर्षांलाच ‘वेटिंग फॉर गोदो’ या एकांकिकेत भूमिका साकारल्याने माझ्यात अभिनयाची आवड निर्माण झाली. आपण कलाक्षेत्राकडे वळावे याची दिशा व आत्मविश्वास मला कॉलेजच्या या महोत्सवांनी दिला. तेव्हा जे रुजले ते आता श्याम मनोहरलिखित ‘प्रियांका आणि दोन चोर’ या नाटकात मी भूमिका करीत असताना उपयोगी पडतेय. कॉलेजचे महोत्सव वैचारिक बैठक बसवतात हे नक्की.

ऊर्मिला कानेटकर
मी सेंट झेव्हियर्सची विद्यार्थिनी व त्यातही नृत्य माझा अभ्यासाचा विषय. त्यामुळे महाविद्यालयीन महोत्सवातून मला नृत्य-कला दाखवायची व ते करतानाच त्याचा भरभरून आनंद घेण्याची भरपूर संधी मिळालीय. अठरा वर्षे मी नृत्याचे शिक्षण घेत असून, त्यातील महाविद्यालयीन कालखंड खूप मोठा व महत्त्वाचा. आताही मी नृत्यालंकार ही पदवी परीक्षा देण्याची तयारी करतेय. मी आमचे विद्यालय, मग विभागीय महाविद्यालय, राज्य आणि केंद्र शासन या सर्व स्तरांतील महाविद्यालयांच्या महोत्सवातून नृत्ये साकारण्याचा पराक्रम केला आहे. त्यामुळे प्रत्येक स्तरावर या महोत्सवाच्या स्पर्धाचा मूड कसा असतो याचा मला खूप चांगला अनुभव आहे. एका वर्षी तर मी कथ्थक, लोकनृत्य, पाश्चात्त्य वगैरे एकूण पाच प्रकारची नृत्ये या महोत्सवातून साकारली. मला कॉलेजच्या अशा अनेक महोत्सवांतून सुवर्णपदक व अन्य पारितोषिके मिळाली. अगदी चॅम्पियन ऑफ चॅम्पियन म्हणूनही माझी निवड झाली. मला या महोत्सवांनी बरेच काही भरभरून दिले असून, त्याचा मला आज कलेच्या क्षेत्रात वापर करता येत आहे. उद्याचे कलाकार घडविणे महाविद्यालयातील महोत्सवात होत असते.

Story img Loader